जाता जाता एक नजर इथेही........

Friday, April 17, 2009

आंटी मत कहो ना!!

" नमस्ते आंटी!! कैसे हो आप?" समोरून प्रश्न आला. ती माझ्याकडे पाहतच विचारीत होती. तरीही मी आजूबाजूला पाहिले पण कुणीही नव्हते. म्हणजे मलाच होता प्रश्न. एक छान स्माईल देऊन मी तिला विचारले, " आप मुझसे पुछ रहे हो?" त्यावर, " जी, आंटीजी. पहचाना मुझे?" मग तिने मी अमुकतमुक ची होणारी बायको असे सांगितले. मी तिचे अभिनंदन केले जुजबी बोलून निघाले. रस्ताभर तिचा आंटी हा शब्द माझा पाठपुरावा करीत होता. रोजच्या कामाच्या गर्दीत मी हे विसरून गेले. पुढे काही दिवसांनी नवऱ्याने सांगितले, अग ह्या शुक्रवारी माझा मित्र आणि त्याची होणारी बायको ह्यांना मी जेवायला बोलावले आहे. हे एकले मात्र, डोळ्यासमोर बटबटीत अक्षरे आली, "आंटी". उघडपणे मी हो का, छान. असे म्हणून विषय बंद करून टाकला.

शुक्रवार आला. दिवसभर खपून जेवण तयार केले. आता जेवायला बोलवायचे त्यातून हे केळवण म्हणजे घाट घालायला हवा. खरे तर हे आपणच ठरवतो. येणारा जे तुम्ही द्याल ते खातोच. तर सगळे काम झाले, घरही आवरून घेतले. स्वतःचा कळकट अवतार टाकून यजमानीण बनले. बेल वाजली. नवऱ्याने दार उघडले, " हाय नची, कैसे हो?असे म्हणत हात मिळवून झाले. मग गाडी माझ्याकडे वळली, " हेलो, नमस्तेजी. ये नीतू हैं, नीतू इनसे मिलो..." त्याला मध्येच थांबवत, "अरे मैं मिल चुकी हूं आंटीजीसे . याद हैं ना आपको? " बाई बाई, काय हा दुष्टपणा, नवऱ्याला नची आणि मी त्याच्यापेक्षा लहान तर मला आंटी. मनात ठरवले आज नही सुनेंगे, पण आधी स्वागत करायला हवे. हसून हो हो केले, आवभगत झाली. मग इकडचे तिकडचे बोलणे सुरू झाले. लग्न कसे जमले, मग ह्याने प्रपोज कधी केले, मी ह्याला सरप्राइज कसे केले, वगैरे गप्पा होत होत्या. खाणेपिणे चालू होतेच एकीकडे. गप्पामध्ये मी तिचे वय जाणून घेतले. त्याचे मला माहीत होतेच. तेवढ्यात...

"
आंटीजी, मै आपकी हेल्प करू?" असा प्रश्न आला. म्हटले ही संधी सोडता नये. मी मोठ्याने हसून नवऱ्याला म्हटले, " हे छान आहे ना, तुला नची आणि मला आंटी. " हे एकले मात्र पटकन नवऱ्याचा मित्र म्हणाला, " तरी मी हिला सांगत होतो की तू असे म्हणू नको. पण हिने एकले नाही." हा माझ्या नवऱ्याचा मित्र ३२/३३ वर्षाचा. आजकाल उशीराच लग्न होते. नीतू २७/२८ वर्षांची. गप्पा होतच होत्या. नीतूला काय मनात होते कोण जाणे, तिची गाडी पुन्हा 'आंटीकडे वळली. आणि काही मजेशीर किस्से सुरू झाले. मी ऐकत होते. त्यात माझ्या नवऱ्याने भर घातली. तो म्हणाला," मला तुम्ही अगदी आजोबा म्हटले तरी चालेल." झाले मग काय अजूनच जोर आला चर्चेला.

ह्या सगळ्यांना थांबवत मी म्हणाले," मला एक प्रश्न पडला आहे? विचारू का? " " विचार ना." इति सगळे. " तुम्ही माझ्या नवऱ्याचे मित्र, म्हणजे आमचा मुलगा तुम्हाला अंकल आंटी म्हणणार, हो ना?" हे एकले मात्र नीतूचा चेहरा चमत्कारिक झाला. नवऱ्याच्या ह्या मित्राने आणि बऱ्याच जणांनी आधीच मुलाला अंकल म्हणण्याबद्दल सांगून झालेले होते. आता मला मजा वाटू लागली. मग मी म्हटले, " माझे ऑब्जेक्शन आंटी म्हणण्याला नसून ते कोणी म्हणावे ह्याला आहे." सगळे प्रश्नार्थक चेहरा करून पाहू लागले. " आमच्या बिल्डिंग मधील एक मुलगा मला नेहमीच काकू अशी हाक मारतो. मला कधीच वाटले नाही की हा का असे म्हणतो. कारण त्याला मी तो लहान असल्यापासून पाहते आहे. त्याच्या माझ्यात फार तर तेरा-चौदा वर्षांचे अंतर असेल . तो माझ्या मुलाचा मित्र आहे नवऱ्याचा नाही.

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मोठ्या माणसांना मान द्यावा हे मनात रुजलेले आहे. पण कधीकधी मान राहतो बाजूला अन..... " हल्लीच आम्ही असेच नवऱ्याच्या एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्यांना सात-आठ वर्षांची लहान मुलगी आहे. माझ्या मुलाने काहीतरी बोलता बोलता त्याच्या बायकोला असेच आंटी म्हणून हाक मारली. ती पटकन म्हणाली, " नको रे असे म्हणू. तू मला नावानेच हाक मार. " खरेच होते कारण तिच्यात अन आमच्या पोरात असेच बारा-तेरा वर्षांचे अंतर असावे.

हे एकल्यावर नीतू म्हणाली, " अरे बापरे, मी असे करायला नको होते. तिला काय वाटले असेल?" पुढे तिने सांगितले की असेच एकाकडे जेवायला गेली असता, हिने तिलाही आंटी म्हणून हाक मारली होती कारण त्या मुलीला वर्षाचे बाळ होते. नंतर हिला गप्पामध्ये समजले होते ती मुलगी नीतूपेक्षा दोन-तीन वर्षांनी लहानच होती. लग्न लवकर झाले अन मूलही लागलीच झाले. नीतूच्या लेखी मूल झाले म्हणजे झाली आंटी. आता ह्या लॉजिकवर काय बोलणार. म्हणजे उद्या वर्षभरात नीतूलाही आंटी म्हणून हाक मारायला हरकत नाही.

दोन दिवसांपूर्वी मायदेशातून मित्राचा फोन आला. चांगलाच वैतागला होता. म्हणाला अग जो उठतो तो अंकल म्हणतो. काय लावलेय काय? एवढे भडकायला निमित्त काय झाले आहे ते तरी सांग. म्हणाला, ऑफीस मध्ये काहीतरी विकायला एक बाई आली होती. ती ह्याच्याकडे आली. वस्तू दाखवल्या, पण ह्याने काही फारसे लक्ष दिले नाही. तर मागे लागली, " ले लो ना अंकल. बढियां क्वालीटी हैं. " हा म्हणे ती बरेच काय बडबडत होती पण अंकल ऐकल्याक्षणी मी जो सटकलो. तिला दिले हाकलून. एकतर ऑफीसमध्ये, सर नाही का म्हणता येत? उद्या साहेबाकडे जाऊन त्याला आजोबा म्हणेल. मला डोळ्यासमोर दिसायला लागले, ह्याच्या कपाळावरची ताडताड उडणारी शीर अन त्या बाईचा गालातल्या गालात हसणारा चेहरा.

गेल्या वर्षी आईकडे गेले असता जवळ जवळ तीन आठवडे मुक्काम होता म्हणून जीम लावली होती. तिथेही असाच एक किस्सा घडला. एक पंजाबण अन एक गुजरातण ह्यांच्यात चांगली तू तू मे मे झाली. पंजाबी पोरीला दोन मुले होती अन गुजरातीणीचे लग्न व्हायचे होते. पण वयात अंतर फार तर पाच-सहा वर्षांचे. गुजराती पोरीने मारलीन अशीच आंटी म्हणून हाक। झाले, पंजाबचे रक्त जे उसळले, " खोत्ती, तुला काही अक्कल आहे का नाही. मी तुला आँटी दिसते? " एवढासा चेहरा करून गुजरातीण आली माझ्याकडे, " आँटी बघ ना कशी ओरडली मला, माझे काय चुकले? तिला मुले आहेत ना म्हणून मी म्हटले. " मी कपाळावर हात मारला. हिला समजावणे मला शक्य नव्हते.

6 comments:

  1. वाह! क्या बात है.. मस्त जमलाय लेख एकदम.. आवडला.

    ReplyDelete
  2. धन्यवाद महेंद्र!!

    ReplyDelete
  3. Ag tuze aunty vachale ani mala mich lihite aahe ase vatale.

    Char varsha purvi aamhi ethe rahayala aalo ani mothi mothi manase /mule ani muli ( mhanaje vayaskar mule ani muli ) kaka - kaku mhanu lagale.

    Hi bhayankar Puneri style aahe. Madan mhanala ti varachi kachra valyalahi kaka mhantye ani malahi....

    Amhala lahanpani disel tya mansala kaka mhanayala shikvale navate...
    tech barobar hote. Ha ata pharach jivhalyacha vishay hoil. Pratyakshat

    tyachavar khoop bolata yeil.. panechya pane bharavata yetil.

    40 varshanchi taruni (?) ajun lagn zale nahi tar ti mulgich rahate.

    Kaka/ kaku hyatale khare natech harvalya sarkhe zale aahe.

    Pan asha gavathi lokanmule karmanook hote. Bichare .. dusryala Aunty mhatya mule tyana aapan lahan aslyacha bhas tari hoto!!!!

    Ekandarit he puran khoop vel chalel. Karan amhcyakade ha motha tingalicha vishay aahe

    Madhumati

    ReplyDelete
  4. अग हो ना असेच होतेय. खूप खूप धन्यवाद. अगदी मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहेस. असाच लोभ असू दे.

    ReplyDelete
  5. hahahha aunty mat kaho na :))))))) ok mademji aapko madmjee kahenge LOL

    naatyaanvhee labels laavaaychee phaar junee khod aste aaplyala ji jaat naahi bahutek janaachee!

    ReplyDelete
  6. Deep प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. खरे आहे. बरेचदा सवयीने संबोधले जाते आणि मग गंमती घडून येतात.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !