जाता जाता एक नजर इथेही........

Friday, May 1, 2009

यशस्वी संसाराची गुरुकिल्ली

लग्न झाल्यावर सहा महिन्याने आम्ही काश्मीरला गेलो. आम्ही म्हणजे आम्ही दोघेच नाही हो, बरीच जनता होती. ती टोळेकाकूंची पोस्ट टाकलीये ना, हा तीच ट्रीप. नवऱ्याचे पणजोबा म्हणजे आजोबांचे मामा, वयाने मात्र आजोबां एवढेच. त्यांना सगळे जण मामा म्हणत. अगदी बरोबर तेच ते, गिरगावचे फडकेवाडीतले पुरोहित लोणचीवाले. मामाच ऑर्गनायझर होते आणि त्यांचे खास प्रेमही होते पतवंडावर. खूपच मज्जा येत होती.

एके दिवशी रात्री दल लेकमधील आमच्या तरंगत्या हॉटेल [ हेवन कॅनॉल ] मध्ये मस्त जेवून आम्ही सगळे जण गप्पा मारत बसलो होतो. बोलता बोलता गाडी पुरूष कसे घरात काही काम-मदत करीत नाहीत याकडे वळली. आम्ही चार बायका होतो, सगळ्या जणी आपापले म्हणणे मांडू लागल्या. इकडे पुरूषही काही गप्प बसले नव्हते. एकदम कलकलाट सुरू झाला. " मी काय म्हणते ह्या पुरुषांना ना सगळे हातात... अन ... अरे कितीही केले ना तरी कमीच पडते रे ह्या बायकांना... अशी जोरदार लढाई सुरू झाली. "

तेवढ्यात मामा उठले म्हणाले, " हे बघा भाग्यश्रीच्या लग्नाला फक्त सहाच महिने झालेत आणि तरीही ती जर म्हणत असेल की नवरा मदत करीत नाही, तर हे काही बरोबर नाहीये." मग मला हाका मारून म्हणाले, " मी बाबा तुझ्या मामीला बरोबर अर्धी अर्धी मदत करतो. आमच्याकडे कामाची पर्फेक्ट वाटणी केलेली आहे. आमच्या लग्नाला पस्तीस वर्षे झालीत एकही दिवस संधी दिलेली नाही मामीला तक्रार करायला. तुझी मामी पण खूश मी पण खूश. " मी लागलीच नवऱ्याकडे पाहून म्हटले, शिका जरा मामांकडून. झाले समस्त पुरुषवर्ग मामांवर भडकला, ऐनवेळी दगा दिला तो दिलाच वर आगीत अजूनच तेल ओतले.

आम्ही बायका एकदम खूश झालो. थोडावेळ आमचे नवऱ्यांना चिडवणे नवऱ्यांचे भडकणे एन्जॉय करून आजोबा म्हणाले, " अरे पण मी आजीला कशी मदत करतो ते कोणी ऐकणार का? " सगळ्या बायका हो हो करून एकदम सरसावून बसल्या. आजोबा म्हणाले, " मी अगदी सकाळपासून सुरवात करतो बरे का. तर असे पाहा, आजी सकाळी मला उठवते मी उठतो. ती बाथरुम मध्ये गरम पाणी काढून ठेवते मी तोंड धुतो. ती गरम गरम चहा देते मी पितो. मग अंघोळीचे पाणी काढते मी अंघोळ करतो. ती सुंदर गरमागरम जेवण वाढते मी जेवतो दुकानावर जातो. पुन्हा संध्याकाळी चहापासून सुरवात ते रात्री झोपण्यासाठी ती गाद्या घालते मी झोपतो. झाली ना कामाची अर्धी वाटणी? आता जर हे पुढचे अर्धे काम मी केलेच नाही तर तिच्या इतके कष्ट घेऊन माझ्यासाठी केलेल्या आधीच्या अर्ध्या कामाला काही तरी अर्थ राहील का? "

हे ऐकल्यावर आम्हा बायकांचे एवढूसे झालेले चेहरे अन पुरषांचे विजयाने फुललेले चेहरे पाहून आजोबा एकदम खुशीत माना डोलवत होते. हा त्यांच्या प्रत्येक ट्रीपचा सुपरहिट आयटम असणार हे नक्की. तेव्हापासून नवऱ्याला काहीही काम सांगितले की लागलीच मामांची वाटणी सुरू होते. बरोबर का चूक ते जाऊदे पण ही पन्नास टक्के वाटणी जबरी आहे ना?

4 comments:

  1. एकदम सही वाटणी आहे, आता सांगतोच बायकोला. उगाच किरकीर करु नको, एकतर पन्नास टक्के काम करतोच आहे तरी समाधान नाही. मस्त मस्त.
    लेख छान झालाय.

    राम.

    ReplyDelete
  2. धन्यवाद राम. बायको काय म्हणाली कळवा बरं का.

    ReplyDelete
  3. maza navra nehemich ase bolto. Pan wel aali tar madat suddha karto bar ka!

    ReplyDelete
  4. माधुरी स्वागत व आभार.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !