जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, May 3, 2009

रिसीवींग एंड ला मीच आहे रे

तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच घरात हे असे प्रत्यक्ष देहबोलीतून ठसक्यात व्यक्त होणारे संवाद घडत असतातच. प्रसंग एक, माणसे प्रत्यक्ष दोन अप्रत्यक्ष दोन, काळाचे टप्पे दोन.

मुलाचे-विजयचे नुकतेच लग्न झालेले. सुनेने-रेवाने संध्याकाळी चहा केला, सगळ्यांना-म्हणजे सासू-सासरे, विजय स्वतःला दिला. रिकामे कप आत नेऊन ठेवले, विजय रेवा फिरायला बाहेर पडले.

जिना उतरताना रेवा विजयला म्हणाली, " येईलच हाक आता तुझ्या आईची, रेवा आधी वर ये. चहाचे भांडे, गाळणी कपबश्या स्वच्छ विसळून जागेवर ठेव आणि मग कुठे जायचे ते जा. " हे तिचे सांगणे पुरे होतेय तोच खरचं आईची हाक आली आणि रेवा संतापली. विजयने थोडा प्रयत्न केला, " आई, अग आम्ही उतरलोत आता. आल्यावर पाहू." त्यावर आईचा कडक आवाज आला , " मी तुला हाक मारलेली नाही, रेवा येतेस ना?" रेवा वर गेली. सगळे काम आवरले आणि खाली उतरली. झाल्या प्रकाराने रेवाचा फिरायला जाण्याचा उत्साह कधीच संपला होता त्याची जागा आता संताप, अपमानाने घेतली. विजयही थोडा अस्वस्थ झाला होताच. आईपण कधी कधी अतीच करते. काय झाले असते स्वतःच केले असते तर? नव्हते करायचे तर ठेवायचे तसेच रेवाने केले असते ना आल्यावर, पण छे! हट्टीपणा नुसता.

इकडे घरात सासूबाईंनी सुरवात केली, " पाहिलेत ना, कशी तणतणत आली आणि एकदाचे सगळे धुऊन आपटून गेली. काय चुकीचे सांगितले होते मी? चहाचे भांडे, गाळणे, कपबश्या तश्याच पडल्या की पटकन मुंग्या लागतात, शिवाय त्याला डागही पडतात. हातासरशी विसळून टाकले की पटकन होऊन जाते पुढे काही निस्तरत बसावे लागत नाही. " सासरे म्हणाले, " अग हे सगळे तुझे बरोबर आहे गं, पण नसते आत्ता सांगितलेस तर काय बिघडले असते तुझे? रेवाचा चेहरा किती उतरला. आता कसले फिरणे? सगळा वेळ ते दोघेही हेच बोलत राहणार. " हयावर नेहमीप्रमाणे सासूबाईंनी मान उडवली आणि त्या निघून गेल्या.

पाहता पाहता रेवाच्या संसाराला पंचवीस वर्षे झाली. सासूबाईंच्या अनेक गोष्टी नकळत रेवाही करू लागली. काही गोष्टी त्याच्या त्यावेळी केल्याने होणारे फायदे ठळक दिसल्याने रेवाने ते सगळे स्वतःला शिकवले आणि आता ते पक्के भिनले होते. दिवस जात होतेच. पाहता पाहता मुलाचे लग्न झाले. जुई एकदम गोड मुलगी. खूप लाडात वाढलेली, शिवाय श्रीमंताची पोर. त्यातून पोराचे लव्हमॅरेज. रेवाने आधीच ठरवलेले कोणाच्याही स्पेसमध्ये आपली ढवळाढवळ करायची नाही.

एक दिवस संध्याकाळी अचानक जुईला चहा करायची लहर आली. जुई चहा करणार, ह्याचेच भरपूर कौतुक झाले. भारी क्रोकरीत एकदम थाटात चहा आला. मग ज्याने त्याने आपापला बनवून घेतला. तोवर तो बराच थंड झाला होता तरीही सगळ्यांनी खूप कौतुकाने प्यायला. डायनिंग टेबलवर ओट्यावर सगळे तसेच टाकून जुई पोराबरोबर किती मोठे काम केले ह्या आनंदात पसार झाली.

ते उष्टे कप पाहून रेवाला सासूबाईंची खूप आठवण आली. तुमची त्या मागची भूमिका बरोबरच होती परंतु सांगण्याची पद्धत कडक. कालांतराने मला त्याचे फायदे कळले असले आत्ता मीही तसेच सारे करत असले तरीही जुईला काही म्हणणार नाही. कधीतरी तिला कळेल. किंवा नाही कळाले म्हणूनही काही मोठे बिघडणार नाही. मात्र तिचे हे सुंदर दिवस परत येणार नाहीत. तेवढ्यात विजयने तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शातून सगळे भाव पोचले. रेवा मनमोकळे हसून म्हणाली, " विजय, जुईचे वागणे अगदी नॉर्मल अपेक्षीत आहे. तसेच सासूबाईंचेही बरोबरच होते. फक्त दोन्हीत रिसीवींग एंड ला मीच आहे रे. "

6 comments:

  1. वाह. छान झालाय लेख. माझ्या आईचं बोलणं नेहमी याच सुरावटीत असतं. ती तेच म्हणते. आम्हि आमच्या सासवांकडून ऐकून घेतलं आता सुना मोठ्या हुश्शार त्यांचं पण ऐकावं लागतं.
    खूप छान मांडला आहे हा मुद्दा !

    ReplyDelete
  2. धन्यवाद साधक. मधल्या पीढीचे नेहमीच असे मरण असते.

    ReplyDelete
  3. अगदी आमच्या घरात घडलेला किस्सा :-)
    का आमच्या आया असे वागतात खरंच नं सुटलेले कोडं. रोज सकाळी ४लाच उठुन घरातले सगळे आवरले पाहीजे का? ७ ला उठले तर काय बिघडले. शनीवार / रविवार थोडे उशीरापर्यंत झोपले तर टोमणे मारलेच पाहीजेत का? काय प्रॉब्लेम असतो कुणास ठाउक.
    बर काही बोलायला जावे तर इतके वर्ष आईच्या पदराखाली घालवलेले दिवस आठवतात ना!!

    ReplyDelete
  4. अगदी खरं. मलाही नेहमी असेच वाटते, प्रत्येक गोष्ट काट्यावर झालीच पाहिजे का? आमच्या वेळी असे नव्हते बाई... ह्या वाक्याने तर नको जीव करून सोडलेले असते. असो, न संपणारा विषय आहे.:)

    प्रतिक्रियबद्दल आभार माझ्या मना.

    ReplyDelete
  5. अग्ग,मस्त लिहिले आहेस..आता मधल्या पिढीची पुरती वाट आहे...पहिले सासवांच्या ताटाखालच मांजर आणि आता सुनांच्या हाताखालच ..पण एक मात्र खरं..ह्या लेखाने ब~याच जणांचे डोळे उघडतील..

    ReplyDelete
  6. अग उमा, अनेक वेळा जे सांगतीले जाते ते फायद्याचे असते फक्त सांगण्याची वेळ यथोचीत नसते व पध्दत चमत्कारीक. स्वभावाला औषध नाही हेच खरे. धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !