जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, May 12, 2009

हयामागची नेमकी मानसिकता काय

काही महिने टेस्टिंग मध्ये काम केले त्यावेळची घटना आहे. अनेक बाजूंनी विचार करूनही ह्यामागची नेमकी मानसिकता मला अजूनही उलगडलेली नाही. त्याचे असे झाले,

नुकतीच दिवसाची सुरवात होत होती. कॉफीचे घोट घेत घेत जोतो आपापले मेल्स, मीटिंग्ज नजरेखालून घालतहोते. सकाळी काही वेळ नांदणारे शांत प्रसन्न वातावरण होते. आणि अचानक आमच्या डिरेक्टरचा आवाज ह्या सगळ्या निरवतेला भेदू लागला. ती नुकतीच आली होती, अजून केबिन गाठली नसल्याने खांद्यावर भली मोठी पर्स, एका हातात कॉफीच थर्मास, तर दुसऱ्यात बऱ्याच फाईल्सचा गठ्ठा. साधारण पन्नासच्या आसपास. हाईट चांगली होती तिची, महागडे परफ्यूम्स, कपडे. शूजचे मोठे कलेक्शन होते तिच्याकडे. जिव्हाळ्याचे दोनच विषय, एक म्हणजे तिचे कुत्रे आणि दुसरे शूज. चेहऱ्यावर नेहमीच तुसडेपणा भरलेला. दिवसभर कोणाला कोणाला ती झापतच असे. अगदी कोणीच नाही तर घरचे होतेच.

आमच्या क्युबिकल्सच्या मधल्या पॅसेजमध्ये ती आली तेव्हा नेमका तिचा आसिस्टंट समोर आला. ती त्याच्याशीच तारस्वरात बोलत होती. कानावर पडत असल्यामुळे प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आपोआप सगळे ऐकत होते आणि दोनच मिनिटात समग्र जनता कान देऊन ऐकू लागली. झाले होते असे, तिची मुलगी कुठल्यातरी दुसऱ्या स्टेटमधील कॉलेजात होती. पहिलेच सेमिस्टर चालू होते. मुलीचे बरेच मित्र, बॉयफ्रेंड होते. आदल्या रात्री नेहमीसारखे मुलीच्या डॉर्ममधील रूमवर सगळे जमले होते. धांगडधिंगा, मस्ती झाल्यावर बरेचसे मित्र-मैत्रिणी पांगले. तिनचार मित्र मात्र थांबले होते आणि त्यांनी हिच्या मुलीवर रेप केला होता.

हे ऐकले मात्र आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. हिच्या मुलीवर इतका भयंकर प्रसंग ओढवला आहे आणि ही इथे काय करतेय? बरं हे सगळे लॉउडस्पिकर लावून समस्त जनतेला का ऐकवतेय? तोच पुन्हा हिचे बोलणे कानावर आले. " मी पोरीला सांगितले, मला आणि तुझ्या डॅडीला बिलकूल वेळ नाहीये तुझ्याकडे यायला. तू प्रथम पोलिसांना फोन कर. मेडिकल करून घे, प्रुफ हवे तेव्हा अंघोळ करू नको. त्या पोरांना चांगला धडा शिकवला पाहिजे, ब्ला ब्ला.... ... मी पुढच्या वीकएंडला प्रयत्न करेन येण्याचा. " तिच्या आसीस्टंटला ही समजेना की आता ह्यावर काय रिअक्शन द्यावी. तेवढ्यात तिच्या मुलीचा फोन आला, तिला पुन्हा ताडताड झापतच एकदाची बाई केबिन मध्ये गेली. अर्थात आवाज येतच होता.

ह्या संपूर्ण वेळात एकदाही तिने मुलीला विचारले नाही, तू कशी आहेस? तुझ्याजवळ कोणी आहे का? शारीरिक मानसिक दोन्ही धसक्यातून पोर जाते आहे त्याचा मागमूसही हिच्या बोलण्यात नव्हता. ऑफिसचे काम नंतरही होऊ शकले असते पण ही पोरीकडे गेली नाही. तिला धीर मिळेल, आधार वाटेल, आईबाप आहेत आपल्याबरोबरअसे काहीही भाव फोनमधूनही पोचले नाहीत. त्या पोरांना पकडले पाहिजे, मेडिकल वगैरे बरोबर आहे. पण इतके कोरडे, लांबून लांबून.... मुलीची काळजी, तिच्या नाजूक अवस्थेची दखल आहे असे कुठलेही लक्षण नव्हते.

संपूर्ण दिवस हे प्रकरण तारस्वरात चालू होते. बऱ्याच जणांना कळल्यामुळे लोक हिला भेटायला येत होते. त्या प्रत्येकाला सगळी टेप परत ऐकवली जाई, वर त्यात मुलीशी चालू असलेल्या फोन्स मुळे नवीन भर पडत असे. आलेले लोक बुचकळ्यांत पडत होते, हिचे सांत्वन करायला जावे तर काहीतरी वेगळेच ऐकवेल. पुन्हा ही हसतेय म्हणजे आपणही हसावे हेच बरे असा विचार करून तेही जणू गंमतच चाललीये या अर्विभावात हसल्यासारखे करत होते.

हे सगळे ऐकून मी कितीतरी दिवस अचंबित होते. ही आई आहे, हिला आपल्या मुलीबद्दल प्रेम असणारच ह्यात मला शंका नाही. पण इतक्या गंभीर कोलमडून टाकणाऱ्या प्रसंगात ही असे का वागतेय? कुठलेही आईवडील पळत मुलीकडे पोचले असते. पण इथे तर ही दिवसभर एकही मिनिट ऑफिसचे काम करता नुसता बोभाटा करतेय वर मला तुझ्याकडे यायला वेळ नाही तेव्हा तुझे तू निस्तर असे पोरीला सुनावतेय. पोरीची चूक आहेच पण ते सांगायची ही वेळ आहे का? ह्या सगळ्यात हिची मानसिकता काय आहे हे काही केल्या मला समजत नाहीये.

5 comments:

  1. ह्याला काय सांस्कृतिक वेगळेपणा म्हणायचं कां?
    खरंच लोकं कशी असातात नाही?

    ReplyDelete
  2. काय कोण जाणे. का आपण जास्त रिअक्ट करतो?
    धन्यवाद महेंद्र.

    ReplyDelete
  3. hi,
    thanks for your comment on my blog... Do keep visiting.
    ~atulatul . wordpress

    ReplyDelete
  4. हो ना, पण हे फारच depressing वाटते. धन्यवाद, मंदांजली.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !