जाता जाता एक नजर इथेही........

Monday, May 18, 2009

प्रेम करा भरभरून पण ज़रा सांभाळून

दोनतीन दिवस आळस केला होता. पण आता जाणे भागच होते म्हणून मग आज सकाळीच बँकेत डोकावले. मी लहान असल्यापासूनच ह्या बँकेत आमचे खाते आहे. त्यामुळे जवळ जवळ सगळाच स्टाफ ओळखीचा झालेला. कधी कधी बदल्या होतात पण नवीन आलेलेही लवकरच कस्टमरशी रुळून जात. बऱ्याच सीनिअर सिटीझन्सचाही राबता आहे. स्टाफ हसतमुख मदतीस तत्पर असल्याने वातावरणही छान असते.

गेल्या गेल्या पहिले काम करून घेतले मग जरा थोडे इकडचे तिकडचे बोलणे होत होते तोच जाणवले की सप्रे दिसत नाहीये. हा सप्रे तसा आमच्या घरापासून जवळच राहतो. नवरा-बायको दोघेही बँकेतच आहेत, पण वेगवेगळ्या. गेल्याच वर्षी लग्न झालेय, एकदम जॉली प्राणी आहे. बायकोही त्याला साजेशी आहे. थोडक्यात राजा-राणीचा संसार बहरू लागलाय. जरा दोन दिवसांची सुटी दिसली की पळायचे बाहेर. वाटले गेला असेल ट्रीपला.

म्हटले विचारावे कुठे गेलाय म्हणून समोरच पोंक्षे होता त्याला विचारले, " काय हो पोंक्षे, सप्रे कुठे कटलाय? दिसत नाहीये, महाबळेश्वर का माथेरान? " पोंक्षाचा चेहरा एकदम बदलला. माझे बोलणे ऐकून शेजारची शलाकाही उठून आली. तिचाही चेहरा अगदीच पडलेला. " अरे काय झाले? तुम्ही दोघेही असे चेहरे करून... काहीतरी बोला ना? सप्रे बरा आहे ना? " तसा पोंक्षे म्हणाला, "आम्हाला वाटले तुमच्या दोन बिल्डिंग सोडूनच राहतो तर तुम्हाला कळले असेलच." "आता हे बोलण्यापेक्षा काय झाले ते सांग रे लवकर." मग त्याने सगळे सांगितले. झाले होते काय...

नेहमीप्रमाणे गेल्या बुधवारी संध्याकाळी सप्रे बायको भेटली. कुठेतरी जवळच भटकून दोघे आठच्या सुमारास घरी आली. बायको स्वयंपाक घरात घुसली. तिला मदत करावी म्हणजे लवकर आवरेल ह्या हेतूने हाही डोकावला. बायको भाजी चिरत होती. हा म्हणाला अग तू पोळ्या करायला घे तोवर मी देतो भाजी चिरून. म्हणून तिच्या हातातून सुरी घेऊ लागला. तिला वाटले कशाला उगाच ह्याला त्रास, दमलाय. पड जरा किंवा टिव्ही पाहा. म्हणून ती नको नको म्हणू लागली. सुरी तिच्या हातात होती. अग दे गं, अरे नको म्हटले ना च्या झटापटीत कसे कोण जाणे सुरीचे टोक सप्रेच्या डोळ्यात घुसले. निसटते लागले असते तरी भागले असते पण इतके जोरात घुसले की रक्ताची धार लागली. वेदना सहन होणे कठीणच होते तो भोवळ येऊन पडला. मग शेजारच्यांना हाका मारून हॉस्पिटलमध्ये नेले.

हॉस्पिटलवाले प्रथम दाखल करून घेईचनात. आधी पोलिसांना बोलवायला हवे मग उपचार करू. त्यांचेही थोडे बरोबरच होते. हा बेशुद्ध होता आणि बायको जे सांगते त्यावर ते पटकन विश्वास ठेवेनात. दोघांचेही आईवडील लांबलांब राहतात त्यामुळे ते लागलीच पोचणे शक्य नव्हते. कसेतरी शेजारच्यांनी डॉक्टरांना समजावले तेव्हा कुठे दाखल करून घेतले . लागलीच ऑपरेशन केले पण जखम इतकी खोल झाली होती की डोळा गेला. त्यात भर म्हणून पोलिसांनी बायकोला फार त्रास दिला. कशावरून तुम्ही मुद्दामच केले नाहीत यावर आडून तिला दोन दिवस पोलीस स्टेशनात सवाल-जवाबात अडकवून ठेवले. जेव्हा सप्रेने सांगितले काय झाले होते तेव्हा तिला सोडले. भयंकर मनस्ताप आणि दुःख झालेय दोघांनाही. आठवडाभराने काल घरी आलाय.

अतिशय दुःखद घटना घडली ही. दोघांची एकमेकाला सुख द्यावे, मदत करावी ही धडपड. पण झाले काहीतरी वेगळेच. डोळा गमावला वर बायकोला आयुष्यभराचा सल. ह्याने कितीही समजावले, अग तुझी काही चूक नाही असे म्हटले तरीही ती स्वतःलाच दोषी मानत राहणार. प्रेम आहे ते दर्शवायलाच हवे पण थोडे भान ठेवून, नको तिथे आग्रही भूमिका घेऊ नये. छोट्याश्या चुकीचे, हट्टाचे रुपांतर अश्या दुष्ट घटना घडण्यात होते, तेव्हा प्रेम करा भरभरून पण जरा सांभाळून.

2 comments:

  1. काय करता काय होईल कांही खरं नाही . सप्रे लवकर बरे होऊ देत.

    ReplyDelete
  2. हो ना. धन्यवाद आशाजी.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !