जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, May 21, 2009

लोकलच्या गमतीजमती -पळा पळा ते सुटलेत...

सहसा संध्याकाळी मी स्लो लोकलच घेत असे. खिडकी पकडून सीएसटीला उलट जायचे. बहुतेक ती ठाणाच लागे. मग तासभर निवांत. लोकलमध्ये आणि निवांत? हो तर. अहो दररोजच्या सवयीने अनेक गोष्टींची मूलभूत संकल्पनाच बदलते म्हणतात ना, तसेच आहे हे. किमान अर्धा तास गाढ झोप आणि काही वेळ परोपकार असे होईतो उतरायची वेळ येतेच. ही झोप सगळी संध्याकाळ उत्साहात घालवण्यासाठी गरजेची असल्याने मी चुकवत नसे. पण कधीकधी घाई असली की नाईलाजाने फास्ट लोकलकडे पळावेच लागे.

फास्ट लोकल म्हणजे त्या त्या भागातील बायकांची मक्तेदारी. काहींच्या मते गाडी थांबते ना मग आम्ही चढणारच, मग जवळ जायचे असो का लांब. तर काहींच्या मते तुम्हाला खंडीभर गाड्या आहेत कशाला मरायला येता इथे? आधीच उभे राहायलाही जागा नाही आणि ह्यांना दादरला जायलाही फास्ट लोकल लागते. हा वाद कधीही संपणारा आहे. चूक कोणाचीच नाही, तरीही काढायचीच म्हटली तर लांब जाणाऱ्यांना थोडे झुकते माप द्यावे लागेल. पण हा विषय पुन्हा कधीतरी.

मी धावतपळत जाऊन बदलापूर लोकल पकडली. दररोजच्या बायकांनी ही कोण आगंतुक आलीय असे भाव डोळ्यात आणून एकमेकीकडे पाहिले. मला लवकरच उतरायचे होते शिवाय आत जाऊन कोणा लांब जाणारीची जागा अडवायची माझी इच्छाही नव्हती. काय भरवसा नंतर इतकी गर्दी होईल की ह्या बाया मला जातील घेऊन पार डोंबिवलीपर्यंत ही भीतीही होतीच. मी दाराजवळच थांबले. सीएसटीलाच गाडी भरली होती. त्यातही लागलीच विणकाम, वाचन, काल गप्पा जिथे थांबवल्या तिथूनच पुढे चालू केल्या. फेरीवाल्यांनची वर्दळ सारे सारे जोरात सुरू झालेले. गाडी सुटली. पाच मिनिटात भायकळा आले. उतरणारे कोणीच नव्हते, त्यामुळे हल्ला बोल करीत तीनही दरवाज्यातून मुसंडी मारून सैन्य घुसले. भराभर आपापल्या मैत्रिणी शोधून स्थिरावलेही.

गाडी सुटणार तोच एक कोळीण भली मोठी टोपली घेऊन दाराजवळ आली. मालाच्या डब्यापर्यंत तीला पोचणे शक्य नव्हते म्हणून बायकांच्या डब्याकडे तिने मोहरा वळवला होता. कोळणीच्या पाटीतल्या पाण्याचा एक थेंब जरी अंगावर पडला तरी काय होते ह्याचा अनुभव अनेक जणांनी घेतलेला असेलच. त्यातून डब्यात मुंगीलाही जागा नाही अशी परिस्थिती झालेली. तिला पाहताच सगळ्यांनी एकच कालवा केला. दाराशी उभे असणाऱ्यांची जबाबदारी असते अशावेळी खिंड लढवायची. त्यांनी अगदी जोर लावून प्रयत्न केला. पण कोळीण हार मानणारी थोडीच होती. तिने फक्त म्हटले, " बायांनो गप रावा, नाहीतर पाटीतले पाणी टाकीन अंगावर. चला, सरा बाजूला. येऊ दे मला आत. " सगळ्या भरभर सरकल्या. उगाच कोण हिच्या तोंडाला लागणार असे म्हणत पुन्हा आपापल्या गप्पात रमल्या. कोळिणीने पाटी उतरवली. हुश्श.. करेतोच दादर आले.

दादरला उतरणारे आणि चढणारे ह्यांची नेहमीची हाणामारी होत बायका डब्यात घुसू लागल्या. पुढे असलेल्या दोघीतीघी मागच्या रेट्याने ढकलल्या जाऊन हिच्या मध्येच ठेवलेल्या पाटीवर आपटल्या. त्यांना उठायला मिळेतो गाडी सुटली. डबा खच्चून भरला. दोन्ही दाराच्या मधल्या जागेत गोंधळ माजला होता. कसेबसे सावरत कोणाच्यातरी आधाराने पाटीवरून उठताना झाकण सरकले. तोवर कोळणीने खास शेलक्या, समस्त बायकांनाच काय पुरषांनाही लाज वाटेल अशा शिव्या घालत सगळ्यांचा उद्धार करून झाला होताच. तिचेही बरोबरच होते. कारण पाटीत काय आहे हे फक्त तिलाच माहीत होते ना.

झाकण सरकले मात्र, पाटीतले दोन तीन खेकडे भर्रकन बाहेर आले. चांगले हाताच्या पंज्याएवढे मोठे होते. अगदी पाटीला खेटून असणारीला प्रथम दिसले. ती घाबरली आणि तिने दूर होण्यासाठी म्हणून जी हालचाल केली त्याने पाटीचे झाकणच पूर्ण निघाले. तोवर आजूबाजूच्या बायकांनाही पत्ता लागला होता. त्यात भर म्हणून कोणीतरी ओरडले, " अग बाई, खेकडे सुटलेत की. " झाले एकच रण माजले. जवळजवळ वीसपंचवीस खेकडे पाटीबाहेर पडून इतस्ततः पळत होते. साड्या, पंजाबी सावरत बायका बेंचवर चढून उभ्या राहू लागल्या. इकडे कोळणीचा जीव खालीवर होत होता, " मुडदा बशविला तुमचा. अग कशाला इतके नाचकाम करताय? तुम्ही आग लागल्यावाणी बोंबलताय अन माझे खेकडे तुम्हाला घाबरून पळू लागलेत. गप रावा जरा. आत्ता धरून आणते की सगळ्यांस्नी. "

शेजारीच असलेल्या पुरषांना काही दिसत नसले तरी किंचाळणे ऐकू येत होते. त्यांना वाटत होते की कोणीतरी सुरा घेऊन घुसलाय किंवा बेवडा दिसतोय. ते तिकडून विचारत होते काय झालेय, का ओरडताय? पण त्यांना सांगणार कोण, जोतो खेकडे शोधण्यात गुंतलेला. जाणो अंगावरच चढायचा आणि नांगी मारायचा. शेवटी एकदाचे घाटकोपर आले. उतरणाऱ्या सुटलो म्हणत पळाल्या.

मात्र उतरताना त्यांनी त्यांचे काम चोख केले, " गाडीत खेकडे सुटलेत गं बायांनो, सांभाळा. " हे ऐकले मात्र कोणी चढलेच नाही. तोवर काही खेकडे पकडून कोळणीने पाटीत कोंबले होते. हळूहळू बेंचवर उभे असलेल्या बायका खाली उतरत होत्या. पण सारखे वाटे काहीतरी वळवळतेय की पुन्हा किंचाळणे अन लागलीच कोळणीचे करवादणे ही जुगलबंदी सुरू झाली. कमीतकमी आठदहा खेकडे ह्या कालव्यात नक्कीच डब्यात पसरले होते.

ठाणा आले आणि मीही धूम ठोकली. पुढे काही दिवसतरी नक्कीच हे निसटलेले खेकडे बायकांना पळवत असले पाहिजेत.

4 comments:

  1. हा हा ... २ वर्षे झाली मी आता ट्रेनने प्रवास करत नाही. पण जुन्या आठवणी खुप आहेत. दादर - ठाणा - दादर. ब्लॉग वाचून धमाल आलीच पण जुन्या आठवणी पुन्हा नविन झाल्या.

    ReplyDelete
  2. खरे आहे, ट्रेनने प्रवास करताना किती प्रसंग घडत असतात. काही मजेचे काही वैतागाचे. धन्यवाद रोहन.

    ReplyDelete
  3. त्या पाण्याचा अनुभव खरंच भयंकर असतो . कांही केल्या अंगाचा वास जात नाही. एकदा ब्रिज क्रॉस करतांना माझ्या अंगावर सांडलं होतं पाणी, आणि नंतर मला सरळ घरीच जावं लागलं कपडे बदलायला.तेंव्हा पासुन मी कोळी दिसले की दुर पळतो आधी..

    ReplyDelete
  4. :)आभार महेंद्र.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !