जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 30, 2009

यथा राजा तथा अधिकारी

आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त्यांनी ठाणे शहराचा संपूर्ण कायापालट केला. अत्यंत कार्यक्षम सचोटीचा अधिकारी अशी प्रतिमा जनमानसात होती. तर काहींच्या मते शहराचे नागरीकरण/आधुनिकीकरण ह्या नावाखाली मनमानी केली. जेव्हां एखादा अधिकारी बेधडक कृती करतो तेव्हा दोन्ही बाजूने मतप्रवाह वाहणारच. कोणाच्याही दबावाला बळी पडणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

चंद्रशेखर यांचे काम चांगले का वाईट- हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ज्यांची दुकाने, घरापुढचे अंगण रस्ता रंदीत गेले आहे ते नक्कीच बोटे मोडणार. परंतु मुळात वरिष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची मनमानी-मग ती स्वत:च्या स्टाफची असली तरीही खपवून घेणारा नसेल तर जनसामान्यांना आवडतो. चंद्रशेखर यांच्या हाताखालील लोकांना हे चांगलेच माहीत होते. जर राजा कार्यक्षम असेल तर जनतेला किती उपयोग होतो ह्याचे हे एक छोटेसे उदाहरण.

ठाण्याच्या नीतिन कंपनी जवळच्या उड्डणपुलाचे काम सुरू होते. आमचे घर हायवेच्या अलीकडे. रस्त्याच्या दोन्हीबाजूने मध्यभागी नेहमीच क्रेन्स, ट्रक्स, पुल बांधण्यासाठी लागणारी अनेक मशीन्स उभी असत. ह्या कामामुळे नागरिकांच्या दररोजच्या कामात फार अडथळे येत होते, तरीही पूल पूर्णं झाल्यानंतरच्या फायद्याकडे डोळे ठेवून लोक सहन करीत होते. रविवारी काम बंद असे. ही सगळी वाहने जिथे असतील तिथे सोडून देऊन कर्मचारी निघूनजात. मग ट्रॅफिक चा गोंधळ ठरलेला. लोक तेवढ्यापुरते बोंबाबोंब करीत अन दमले की चालू पडत. ह्या कामामुळे आवाजाचे प्रदूषण धूळ हे सगळ्यांचा अंत पाहत होते. त्यातच,

एका रविवारी सकाळी नऊच्या आसपास एकाएकी हॉर्न चा कर्कश आवाज आला, येतच राहीला. आत्ता थांबेल मग थांबेल, पण दोन मिनिटे होऊन गेली तरी चालूच. बरेच लोक गॅलरीमध्ये येऊन शोध घेऊ लागले की हा मूर्खपणा कोण करते आहे. आम्हीही पाहत होतो. पण पत्ता लागेना. पंधरा मिनिटे झाली हॉर्न चालूच. डोके दुखायला लागले. तोवर एवढे लक्षात आले होते की हॉर्न चिकटला आहे. काही पोरे पार्क केलेल्या प्रत्येक गाडीजवळ जाऊन पाहू लागली. करता करता शोध लागला एकदाचा. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या क्रेनचा हॉर्न टाहो फोडून आक्रंदत होता. झाले, आज रविवार असल्याने सुटी म्हणजे पूर्ण चोवीस तास हा आवाज आजूबाजूच्या समस्त जनतेला बहिरे करणार होता.

आता बरेच लोक क्रेन भोवती गोळा होऊन चर्चा करत होते. काही पोरे वर चढून खिडकी उघडी आहे का ते पाहत होती. तासापेक्षा जास्त वेळ गेला पण उपाय सापडत नव्हता. डोके अगदी पिकले. तिरिमिरीतच मी उठले अन ठाणा टेलिफोन एक्सचेंजला फोन करून चंद्रशेखरांचा नंबर मागितला. नेहमीप्रमाणे मला ऑपरेटरने उडवलेच. पुन्हा नंबर फिरवला अन प्रथमच सांगितले की मला नंबर हवा आहे आणि तुम्ही तो देता जर फोन ठेवून दिला तरी मी तो मिळवेनच आणि मग त्यावेळी तुमचीही तक्रार करेन. खरे तर ह्या धमकीत काहीच तथ्य नव्हते पण कदाचित माझ्या आवाजातला संताप किंवा ऑपरेटरलाच वाटले असेल देऊन टाकावा. मला तिने चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीचा नंबर दिला.

सेक्रेटरींना फोन लावला तर आधी दुसऱ्याच कोणीतरी उडवाउडवी करू लागले. त्या दिवशी माझ्या अंगात कसला संचार झाला होता कोण जाणे मी त्या माणसाला सेक्रेटरीला फोन देण्यास भाग पाडले. त्यांना काय झाले आहे ह्याची कल्पना दिली. त्यांनी काय करता येईल ते पाहतो असे आश्वासन दिले. परंतु तेवढ्याने काही होणार नव्हते म्हणून मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे मला आयुक्तांशीच बोलायचे आहे असा धोषा लावला. तसे त्यांनी मला पालिकेच्या एका इंजिनियर चा नंबर दिला, म्हणाले मी प्रयत्न करतोच पण तुम्हीही इथे फोन करा.

इकडे रस्यावर प्रचंड गर्दी जमलेली. अर्धे लोक कानात बोटे खुपसून तर काही क्रेनची काच तोडण्याच्या विचारात. मी त्या इंजिनियरचा नंबर फिरवला. पलीकडून एक बाई बोलत होती, ती म्हणे ते फोन घेऊ शकत नाहीत. सत्यनारायणाची पूजा सुरू आहे. मी तिला सांगितले की तितके महत्त्वाचे काम आहे म्हणूनच त्यांच्याशी बोलायचे आहे. दोन मिनिटांनी ते आले फोनवर. मी थोडक्यात काय घडते आहे ते सांगितले आणि चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीने तुमचा नंबर दिला असून तुम्हीच ह्या कामाचे इनचार्ज असल्याने हे काम तुम्हीच करू शकता असेही सांगितले. इंजिनियरने घरात किती गडबड आहे, त्यात रविवार असल्याने पाहतो असे गुळमुळीत उत्तर देऊन मला वाटेला लावले.

आता पुढे काय करावे? आवाज बंद होईल अशी चिन्हे दिसत नव्हती. मनात एकच आशा होती की चंद्रशेखर यांच्या दराऱ्यामुळे कदाचित हे काम होईल. आणि काय आश्चर्य खरोखरच पंचवीस मिनिटांत पालिकेचे दोन कर्मचारी कुठुनसे उगवले आणि एकदाचे त्या चिकटलेल्या हॉर्नचे मुस्कट दाबले. हूश्श्श... झाला बंद. दोनसव्वादोन तास चाललेला गोंधळ शांत झाला. पाच मिनिटात फोनची बेल वाजली, फोनवर चंद्रशेखरांचे सेक्रेटरी होते. आवाज थांबला का? तुमचे काम झाले ना? असे विचारीत होते. ह्यापुढेही कधीही काहीही अडचण आल्यास फोन करावा हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचे आभार मानून फोन ठेवला तर इंजिनियरचा फोन आला, त्यानेही हेच विचारले. तुमच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या गडबडीतही तुम्ही काम केलेत ह्याचे मनापासून आभार असे म्हणून फोन ठेवला.

ह्या सगळ्यातून पुन्हा एकदा प्रूव्ह झाले, जर मुख्य अधिकारी चांगला असेल तर हाताखालच्यांनाही प्रेरणा मिळते. किमान धाक तरी नक्कीच असतो. सामान्य माणसाचीही दखल घेतली जाते.

Wednesday, April 29, 2009

अहाहा!!! वासानेच मन वेडे झाले .


स्थळ: मुंबई विमानतळ, रात्रीचे बारा वाजत आलेत. नुकतेच आम्ही एकूण तीस तासाच्या प्रवासातून सुटलो आहोत. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने जोरदार हल्ला बोल केला असला तरी आम्हाला मायदेशात आल्याच्या आनंदापुढे तो जाणवतही नाहीये. तीच चिरपरिचित ओळखीची हवा, हॉर्नचे, माणसांच्या जोरजोरात ओरडण्याचे आवाज, मुख्य म्हणजे जिकडेतिकडे माणसेच माणसे. हेच अंगात भिनलेले, हवेहवेसे चित्र. पटकन पासपोर्टावर छप्पे मारून घेतले. त्या ऑफिसरशी मराठीतून बोलण्याचा आनंद घेतला. पुढे सामानाच्या पट्ट्याकडे जायचे म्हणून वळलो तोच नवऱ्याने मी आलोच तू जा तिकडे म्हणून कलटी मारली. मला काही बोलायची संधी देता तो गुल झाला.

मी सामानाच्या पट्ट्याकडे आले. नुसता सावळा गोंधळ माजलेला पण मला अतिशय छान वाटत होते. मी माझ्या घरी आले होते. माझ्या प्रिय घरी. एक बॅग काढली ओढून तेवढ्यात नवरा आला. " अरे कुठे गेला होतास? बॅग्ज आल्यात बघ. " इति मी. नवरा एकदम खुशीत होता. बॅग्ज काढल्या आणि निघालो कस्टम्सकडे तेव्हा म्हणाला, " अग बाबांना फोन करून आलो. आम्ही उतरलो आहोत. तासाभरात पोचतो घरी. तुम्ही लागा बंदोबस्ताला. "

सगळे सोपस्कार पटापट पार पडले. असे पण अमेरिकेवरून येणारे लोक हे कस्टम्सच्या लोकांना फारसे दखल घेण्यासारखे नसतातच. एकदा तर आम्हाला ग्रीन चॅनल मधून सरळ बाहेर सोडले होते. मित्राने पाठविलेली गाडी होतीच बाहेर उभी. लागलोही रस्त्याला. तीन वर्षात काय काय बदलले आहे ह्याची नोंदणी आणि काही आठवणी ह्यात घर आलेसुद्धा.

माझे आई-बाबा वाट पाहत उभे होतेच खिडकीत. घरात आलो, भेटलो दोघांनाही, आईने जवळ घेतले अन जे भरून आले ते बरसल्यावरच थोडे कमी झाले. मग घरभर फिरून पाहिले. तोच नवऱ्याने विचारले, " बाबा, आणले ना?" त्यावर बाबा म्हणाले, " अरे जय्यत तयारी आहे. चला हातपाय धुऊन घ्या. " मी अजूनही गोंधळलेली. आई अन बाबा हसत होते.

हातपायतोंड धुतले अन डायनिंग टेबलाशीच गेलो. पाहते तो काय, गरम गरम पावभाजी, मसाला पाव कांदा असे पान वाढलेले. " आता कळाले का मी उतरल्या उतरल्या कलटी का मारली होती ते. " इति नवरा. नवऱ्याचा फोन आल्या आल्या बाबांनी शिवसागरला फोन करून पावभाजी मागविली होती. त्यानेही एवढ्या रात्री घरपोच पाठविली होती. अहाहा!!! वासानेच मन वेडे झाले. रात्री दोन वाजता आम्ही दोघांनी सणसणीत तिखट, मनापासून बटर मारलेली पावभाजी खाल्ली तेव्हा कुठे जीव शांत झाला. आता महिनाभर नुसती धमाल.

Tuesday, April 28, 2009

तिच्या न येण्याची वाट पाहू लागले

नेहमी सारखीच सकाळ झाली. आपल्याला रूटिनाची इतकी सवय लागलेली असते, विशेषतः वीकडेज मध्ये. जरासा क्रम चुकला तरी खूप चिडचिड, अस्वस्थपणा येतो. अगदी शुल्लक गोष्टीही आपला पारा चढवतात. हयावर मात करायला हवी हे गेली किती वर्षे मी स्वतःला सांगतेय पण दिल्ली अभी भी बहोत दूर हैं.

तर, पोराला उठवले, त्याचे आई प्लीज पाच मिनिटे, दोन मिनिटे सरतेशेवटी एक सेकंद ह्या सगळ्या प्रकारातली गाढ झोपेची जादू अनुभवूनच तो उठला. मग नुसती धावपळ. रिक्षावाला .४५ ला येई. फक्त अर्धा तास आणि ह्या ढोल्याचे स्वतःच्या नादात आवरणे. दररोजची हाणामारी. अंघोळीला नेला की शॉवर खाली मांडी ठोकून बसे आणि गाढ झोपे. सासरे तसेच त्याला साबण लावत, धुऊन काढीत. मग पुन्हा दूध प्यायला बसला की एक डुलकी. मी सासरे ह्याच्याभोवती नुसते भिरभिरतं असू आणि हे साहेब गालातल्या गालात हसत आमची मज्जा पाहत बसत.

रिक्षावाले काका एकदम छान होते. हाका मारून मारून सगळी कार्टी गोळा करीत. हाकांना उत्तर नाही आले तर तीन मजले चढून विचारायला येत पोरगं येतंय की नाही. त्यामुळे हा बिनधास्त झालेला. काका टाकून जाणारच नाहीत. काकांच्या रिक्शाचा आवाज ऐकल्याबरोबर मात्र गडी पटकन उठला अन माझे दप्तर, वॉटरबॉटल, निबंधाची वही अन काय काय असा बराच दंगा करून सासऱ्यांबरोबर एकदाचा खाली उतरला. तो गेला ना की मी पाच मिनिटे शांत बसते. अगदी कसलाही विचार मनात नको असतो. पण असे कधीच झाले नाही. काहीनकाही भुंगा गुंगू... करतच राही.

पोराची खाली उतरायची वेळ आणि आमच्या सुनिताबाईंची -मोलकरणीची आमच्याकडे येण्याची वेळ एकच होती. त्याला टाटा केल्याचा त्यांचा आवाज माझे कान बरोबर टिपत. दिवस चांगला जाण्यासाठी ह्या एका आवाजाची नितांत गरज होती. तशी मस्टची यादी भली मोठी होईल पण इथेच जर गणित कोलमडले तर पुढचा सगळा दिवस घरघर लागलीच म्हणून समजा. हे काय, आज सुनिताबाईंचे टाटा ऐकू आले नाही. म्हटले येतील होते थोडे मागेपुढे, लागलीच काजवे नकोत चमकायला. एकीकडे आवरायला सुरवात केली. पंधरा मिनिटे गेली तरी बेल काही वाजली नाही. संपले. आता नाही. भांडी, कपडे, झाडणे-पुसणे, पोळ्या, भाजी चिरणे इतर अनेक कामे मी पहिला मी पहिला अशी भांडाभांडी करत रांग लावून उभी ठाकली. गेली नक्की गेली. आज काही लेडीज स्पेशल मिळत नाही.

वैताग, संतापाने धुमसतच मी भांड्यांना हात घातला. पाहते तो काय, सगळी भांडी खूश झालेली. मी म्हटले, "काय तुम्हाला जाम मजा येतेय का, माझी चिडचिड पाहून? " " अग कशाला इतकी रागावतेस? किती दिवस झालेत तू आम्हाला प्रेम केलेच नाहीस. दररोज कसेतरी खसाखसा घासून, इथेतिथे खरकटे तसेच ठेवून ती आम्हाला नुसते नळाखाली धरून आपटते. तू कशी रागावलीस तरी छान चकचकीत करतेस गं." इति पातेले. त्याला मागे सारत डाव, चमचे एकाचवेळी बोलू लागले, " पाहा जरा आमच्या कडा, पाठी. किती मळ जमलाय. तुम्ही सगळे तसेच खाता अग इतका जीव घाबरा होतो. पण काय करणार. म्हणून आम्ही सगळे मिळून दररोज म्हणतो उद्या ती टवळी नकोचयेऊ देत. तुझी खूप तारांबळ उडते हे दिसते गं.राग सोडून दे अन कधीतरी कुरवाळ ना प्रेमाने आम्हाला. तुलाही छान वाटेल. "

तेवढ्यात मागून आवाज आला, पाहते तो भिंत हाका मारीत होती. " अग पाहिलेस का किती ठिकाणी कचरा जमलाय. फरशीही बघ कोपऱ्याकोपऱ्यातून काळवंडलीये. तुझा हात फिरला की कसे आम्ही झुळझुळीत होतो. आम्हाला माहीत आहे तुला जराही अस्वच्छता चालत नाही पण दररोजच्या धबडक्यात आजकाल तू डोळे बंदकरतेस. अशी अचानक मिळालेली संधी सोडू नकोस. " पाहता पाहता सगळेच आपापल्या मागण्या मांडू लागले.

खरेच की असेही चिडचिड करूनही बाईतर येणार नाहीच आहे. मग आनंदानेच का करू नये हे सगळे काम. जेवढे जमेल तेवढे करावे उरलेले संध्याकाळी पाहावे. घरालाही आपल्या प्रेमाची नितांत गरज आहेच ना. नुसते सणासुदीला लाड केले की झाले असे कसे चालायचे. सगळा राग पळून गेला. लताची जुनी गाणी लावली अन भांड्याकडे पाहून हसले. ह्या दिवसा नंतर बाई आली नाही म्हणून माझा पारा कधीही चढला नाही. उलट मीही घरासारखीच तिच्या येण्याची वाट पाहू लागले.

Monday, April 27, 2009

चोराने मारली हाक

शीर्षक वाचून बुचकळ्यांत पडला असाल ना? चोर आणि हाक मारतो? काय दिवस आलेत पाहा. आजकाल चोरांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलली आहे. हो तर अहो त्यांच्यासाठी हे कामच ना, मग ते वाईट आहे हे आपण म्हणतो. तर काय सांगत होते, हां चक्क हाका मारून चोऱ्या करतात की.

अगदी हल्लीच घडलेली ही घटना आहे. नेहमीप्रमाणे घरातली सकाळची कामे आवरून माझी आई भाजी आणण्यासाठी घरापासून दोन गल्ल्या सोडून असलेल्या दुकानात गेली होती. तिथून भाजी घेतली नंतर थोडे किराणा सामान घेऊन ती घरी यायला निघाली. घराकडे येण्याच्या रस्त्यावर
दोन-तीन मिनिटांचा वळणाचा थोडासुनसान टप्पा आहे. बहुतांशी तिथे रिक्षा उभ्या असतात. नेमके त्या दिवशी कोणीही नव्हते.

आईच्या हातात दोन बऱ्यापैकी जड पिशव्या होत्या. दुपारचे १२ वाजत आले होते त्यामुळे ऊन चांगलेच तापलेले. आई भरभर घर गाठण्याच्या नादात इकडे तिकडे पाहता चालत होती. तेवढ्यात एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाने तिला हाक मारली. " अहो, अहो बाई. ते पाहा तुम्हाला हाक मारीत आहेत." आई थांबली. त्याच्याकडे पाहिले तो ज्या माणसाकडे बोट दाखवीत होता त्याच्याकडे पाहिले. तो मनुष्य आईच्या ओळखीचा नसल्याने दुर्लक्ष करून पुढेनिघाली.

तिला निघालेली पाहून त्या माणसाने आईला थोडी जोरात हाक मारली. " अहो बाई, मी हाक मारतो आहे ना? मग तरीही तुम्ही पुढे चाललात?" आईने पुन्हा वळून पाहिले. तो माणूस मोटरसायकलवर बसला होता. पटकन पाहून साध्या कपड्यातील पोलीस ऑफिसर वाटावा. हातात जड पिशव्या त्यात कडक ऊन याने आधीच त्रासलेली आई त्याला म्हणाली," अरे कमालच आहे. एकतर मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचे तर तुम्ही या इथे. माझ्या हातातील जड पिशव्या दिसत नाहीत का तुम्हाला? "

हे ऐकून अजूनच थोड्या जरबेने तो म्हणाला, " दिवस कसे वाईट आहेत माहीत आहे ना तुम्हाला? हातात पाटल्या-बांगड्या घालून फिरू नका. ठेवा काढून पर्समध्ये." हे ऐकले मात्र, आई थोडीशी चमकली. काहीतरी गडबड आहे हा इशारा मनाने दिला होताच. आई म्हणाली, " मी कशाला काढू हे सगळे? खोटे आहे ते. चोरही नेणार नाही." त्यावर लागलीच तो म्हणाला," आणि ते मंगळसूत्र? खरे आहे ना? ठेवा ते पर्समध्ये. आम्ही पोलीस काय तुम्हाला मूर्ख वाटतो का? मग चोराने नेले की येणार आमच्याकडेच शंख करीत."

आता मात्र आईच्या लक्षात आले की हाच माणूस गडबड आहे. ती त्याला म्हणाली, " खरे आहे बाबा तुझे. पण हल्लीच्या दिवसात कोणीतरी खरे मंगळसूत्र घालते का? सगळे खोटे आहे. आणि तुम्ही पोलीस आता एवढी काळजी घेत आहात मग आम्हा नागरिकांना थोडा तरी दिलासा आहेच ना." असे म्हणून आई तिथून पटकन निघाली अन घरी आली. बाबांना सारे सांगितले. आमच्या बाबांचे आवडते वाक्य लागलीच आले, " तरी मी नेहमी सांगतो. कशाला हवाय तो पिवळा धातू. पण नाही तुम्हा बायकांना सोस नुसता. आता तू खोटे दागिने का घातले म्हणून एखादा चोर रागावून त्रास द्यायचा."

दोनच दिवसांनी स्थानिक पेपरमध्ये मोठी बातमी आली, " संपूर्ण शहरभर मोटरसायकल वरून पोलीस ऑफीसर असल्याचे भासवून
बायकांना जरबेने सुरक्षिततेचे कारण पुढे करून दागिने पर्स मध्ये ठेवावयास भाग पाडून तीच पर्स ओढून पसार होणाऱ्या चोरास त्याच्या साथीदारास रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे." आईने खोटेच दागिने घातले होते ती प्रसंगावधानी असल्याने बचावली होती. बऱ्याचदा पेपरात अशा बातम्या आपण वाचतो पण आपल्याबरोबर असे होणार नाही हे गृहित धरून वावरतो. परंतु वेळप्रसंग कधीही कसाही समोर उभा राहू शकतो हे लक्षात ठेवायला हवे. सावध राहा.

Sunday, April 26, 2009

बेसन लाडू



साहित्य

  • चार वाट्या बेसन
  • सव्वा वाटी तूप ( पातळ केलेले)
  • पावणे तीन वाट्या साखर
  • पाव वाटी दूध
  • अर्धा चमचा वेलदोडा पूड
  • प्रत्येकी दोन चमचे बेदाणे व बदामाचे पातळ तुकडे

मार्गदर्शन

शक्यतो पसरट कढई/नॉनस्टिक पॅन घ्यावे. त्यात बेसन व तूप घालावे. आंच मध्यम ठेवावी. हळूहळू सगळ्या बेसनाला तूप लागेल. हे मिश्रण सारखे हालवत राहायला हवे. प्रथम खूप घट्ट, ढवळायला कष्ट पडतील असे असेल. अर्ध्या तासानंतर मिश्रण हलके वाटू लागेल व ढवळण्यात सहजता येऊ लागेल. आता ह्या मिश्रणातून तूप सुटूलागेल. खमंग वास व सोनेरी रंग येईल. अजून पाच मिनिटे ढवळून आंच बंद करावी. लागलीच ह्या मिश्रणावर दुधाचे हबके मारावेत आणि चांगले ढवळावे. दुधामुळे मिश्रण चांगले फुलेल. दूध पूर्णपणे एकजीव करावे. साधारण पंधरा मिनिटाने मिश्रण कोमट होईल मग त्यात साखर घालून ढवळून ठेवावे.

साधारण तासाभराने( संपूर्ण गार झाल्यावर) मिश्रण खूप मळावे. साखर व भाजलेले बेसन खूप हलके लागेपर्यंत मळायला हवे. मळून मऊ झाल्यावर त्यात वेलदोडा पूड, बेदाणे व बदामाचे काप घालून मध्यम आकाराचे लाडू वळावेत.

टीपा

मध्यम आंचेवर बेसन छान भाजले गेले पाहिजे तसेच साखर घातल्यावर मिश्रण खूप मळल्यामुळे लाडू मऊ होतात व टाळूला अजिबात चिकटत नाहीत.

Saturday, April 25, 2009

माझ्या अमेरिकन सख्या

मायदेशातील नोकरी आणि सहकारी यांचा अनुभव गाठीशी ठेवूनच अमेरिकेत आले. नोकरी अंगात भिनलेली होतीच. परवाना हातात मिळताच एका विमा कंपनीत नोकरी धरली. पहिले काही दिवस कुतूहल, नवीन सहकारी आणि थोडे दडपण असे गेले. हळूहळू मी रुळले. आमच्या सेक्शन मध्ये सगळा बायकांचा कारभार होता. अगदी सुरवातीला एक मुलगा होता पण ह्या गोकुळाला कंटाळला अन जो गेला पळून तो एकदम त्याने फ्लोरिडाच गाठले. मग काय आनंदीआनंद.

सेक्शनची हेड होती, बार्बरा: साठीच्या आसपास. चांगलीच स्थूल. वजनामुळे गुडघे तिला त्रास देत. पेसमेकर लावलेला असल्यामुळे ती नेहमीच मोठ्यामोठ्याने श्वास घेत असे. नवीन असताना मी खूप घाबरून जाई, वाटे हिला कधीही काही होईल. पण ही बाई एकदम बिनधास्त. दर दोन तासाने दहा मिनिटे गायब-सिगरेट फुंकायला. आली की पुढची पंधरा मिनिटे मी तिच्या आसपासही फिरकत नसे. मनाने ही मोकळी होती. नवऱ्याला शिव्या घालणे हा तिचा आवडता उद्योग. हा तिचा तिसरा नवरा. फारच रागावली तर आधीच्या दोघांचाही जाहीर उद्धार.

मुलाची मुलगी-नात खूप लाडकी होती. नात पाच वर्षांची असताना तिला आजीने गाडी भेट दिली होती. नातही आजीच्या गळ्यातगळा घालीत असे. वर्षभरात नात टीनएजर झाली अन मग जे खडाष्टक सुरू झाले दोघींचे ते आजवर चालूच आहे. माझी स्विटू पाय असे नातीला म्हणणारी आजी बि़X शिवाय काही बोलेना. प्रथम प्रथम हे एकताना फार त्रास होई. नातही वांडच झाली होती. जिभेवर, ओठांच्या कडेला, भुवईवर टोचून घेतले होते. डेटिंगला जात होती. आजी तो तो भडकत होती. येईल एक दिवस शेण खाऊन मग बसेल रडत असे सारखे म्हणत राही. सरतेशेवटी एक दिवस मला नात नाही असे डिक्लीयर करून ही मोकळी झाली. सेक्शनमध्ये मात्र ही सगळ्य़ांना सांभाळून घेई. उगाच कटकट करणे, ओरडणे असले प्रकार तिने कधी केले नाहीत त्यामुळे स्टाफही तिला त्रास न होईल असाच वागे.

कॅथी, अजब रसायन होते हे. पंचावन्नाच्या पुढेच, एकदम बारीक. हिच्यालेखी बार्बरा म्हणजे देव होती. ऑफिसचा सगळा वेळ ही बार्बराचे आणि स्वतःचे, त्याचबरोबर इतरांचे काम करण्यात घालवी. पाणी आण, बार्बराची कॉफी आण. सगळे फोन हिच घेणार. चुकून दुसऱ्या कुणी घेतलाच तर दिवसभर ही तोंड फुगवून बसणार. अगदी लहान मुलांसारखे रुसवेफुगवे चालत. इतरवेळी मात्र एकदम छान.

सकाळी ही लवकर येत असे. आम्ही आलो की प्रसन्न हसून स्वागत करी. एखादीच्या हातात जड बॅग असेल तर पटकन घेईल. हिच्या काही गोष्टी फारच गंमतशीर होत्या. ऑफिसचा फोन हा स्वतः:ची खाजगी मालमत्ता असल्यासारखा वापरी. खरे तर ह्या सगळ्याच वापरत. पण हिचा अजब प्रकार. घरी फोन नव्हता. का घेतला नाहीस असे विचारले तर म्हणे, " माझा पगार हे थाट करायला परवानगी देत नाही. " आणि इथे पाहावे तर फोनवाचून हिला मिनिटभर चैन पडत नाही. एकदा तिला म्हटले, " कॅथी, अग तू एकटी राहतेस, रात्री-बेरात्री काही झाले आणि डॉक्टरला किंवा पोलिसाला बोलवायचे असेल तर काय करशील? " काय वेडीच आहे असा आर्विभाव आणून म्हणाली, " अरे मग तो शेजारच्याचा फोन कशाकरिता आहे? " धन्य आहेस खरी असे म्हणून मी हातच जोडले. हिच्या क्यूबिकल मध्ये टकटक केल्याशिवाय कुणीही डोकावायचे सुद्धा नाही आणि ती मात्र शेजारच्या घरी बिनधास्त घुसत होती.

एक दिवस नेहमीचा टपालगाडीवाला गायब होता म्हणून एक पोरगी आली. टपाल हा कॅथीचा विकपॉइंन्ट. पण ही जागची हालली नाही की त्या पोरीकडे पाहिलेही नाही. मी बुचकळ्यांत पडलेली, आता हे काय नवीन. थोड्यावेळाने बार्बराबरोबर गप्पा छाटून ती पोरगी गेली. कॅथीबाई एकदम सूममध्ये बसलेल्या. दुसऱ्या दिवशी मला समजले की ती मुलगी कॅथिची मुलगी आहे आणि माय, लेकीशी बिलकूल बोलत नाही. आमच्यासाठी फास्टफूड मध्ये जाऊन, हुज्जत घालून व्हेज आणणारी चांगली कॅथी पोटच्या पोरीला ओळखही दाखवीत नाही. आकलनाच्या पलिकडील आहे खरे. कॅथी नेहमी मला सांगे, " माझा घटस्फोट माझ्याच्यामुळे झाला आहे. मी खूप कटकटी आहे. माझा नवरा आणि मुले चांगली आहेत गं, पण मी जमवून घेतच नाही. " स्वतः:तील दोष ती जाणून होती.

डेबी: टिपीकल मध्यमवर्गीय, पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास. वयाच्या अठराव्या वर्षीच लागलेली त्यामुळे सेक्शन मध्ये सगळ्यात सीनिअर. परंतू हिने प्रमोशन नाकारलेले अन तेच तेच काम करीत होती आणि खुशीत होती. सगळ्यांशी गोडीगुलाबीने वागे पण तरीही स्वतः:चा आब राखून असे. ही बरेच उद्योग करी. विणकाम, ज्यूरीची ड्युटी, एवॉन कंपनीचे प्रॉडक्ट अख्ख्या कंपनीभर विकत असे. सगळे बिनबोभाट काम. सेक्शनमध्येही बऱ्याचवेळा प्रत्येकाला काहीतरी छोटिशी भेट देऊन खूश करी. हे करताना गाजावाजा मात्र बिलकूल नसे. हिने लग्न केले नव्हते किंवा हिचा कोणीही बॉयफ्रेंड ही नव्हता. आश्र्चर्य म्हणजे हिला कोणीही त्यावरून छेडतही नसे. हिच्या कपड्यांचा चॉईस फारच गंमतशीर असे. ढगळ आणि कशावर काहीही. ही जेव्हा रिटायर होईल तेव्हा हिला खूप पैसे मिळणार ह्याची चर्चा हिच्या मागे सगळ्याजणी करीत आणि एवढ्या पैशांचे ही काय करणार ह्याचा तर्क लढवीत.


डोना: हीपण साठीच्या आसपास. स्वतः:वर प्रेम करणे हा हिचा सगळ्यात आवडता छंद. ही आणि नवरा. पस्तीस वर्षे लग्न टिकवून असलेली एकदम कबुतरी जोडी. डोना स्वभावाने एकदम जिंदादिल होती. नटणे-मुरडणे, छान छान भारी कपडे, हिरे, मोती व वेगवेगळ्या रत्नांचे दागिने घालणे, मॅचिंग चप्पल, पर्स, भारी परफ्यूम म्हणजे डोना. फिगर जपण्यासाठी सबंध दिवसात एक सफरचंद आणि चार कप बिनसाखरेची कॉफी एवढेच ती खाई. हिच्यासमोर बसून बार्बरा डोनटस चापित असे तेव्हा डोना तिच्याशी उत्साहाने चिवचिवत उभी राही, पण चुकूनही कण सुद्धा खात नसे. नवऱ्याचे फार प्रेम आहे माझ्यावर असे नेहमी सांगे. आठवड्यात एकदातरी संध्याकाळी डेटला जाई. प्रथम प्रथम मला कळत नसे ही इतकी एक्साइट होऊन कुणाबरोबर डेटला जाते. एक दिवस बोलता बोलता तिनेच सांगितले की गेली पस्तीस वर्षे नवराच हिला डेटला घेऊन जातोय. नाहीतर माझा नवरा. वर्षातून एकदा नेईल तर शपथ.

डोना आणि स्वयंपाक म्हणजे छत्तिसाचा आकडा. तिला कॉफीशिवाय काहीच करता येत नव्हते. क्वचितच तिला वाईट वाटे, आपण नवऱ्याला काहीच करून घालत नाही ह्याचे. तुम्ही इंडियन बायका इतका वेळ स्वयंपाक कसा करता हा तिला नेहमी सतावणारा प्रश्न. ही कायम स्वतः:तच रममाण असे. मनाने खूप हळवी आणि प्रेमळ होती. भारताबद्दल फार कुतूहल होते, विशेषतः: पंजाबी ड्रेस, साड्या, दागिने, कलाकुसर. तिच्यासाठी छानसा बांगड्यांचा सेट मी नेला त्यावेळी फार आनंदली होती. आभार मानून मानून मला वेडे करून सोडलेन.

जेनी: ही मी जॉईन केल्यावर चारच महिन्यात रिटायर झाली. फारच गर्विष्ठ, आतल्या गाठीची होती. फारशी कुणाच्या अध्यातमध्यात करीत नसे पण सगळ्यांवर हिचे बारीक लक्ष असे. कॅथीचे आणि हिचे बिलकूल जमत नसे. मग कधीतरी ह्या दोघी एकमेकींना शालजोडीतले हाणीत आणि आम्ही सगळे मजा बघायचो. बार्बरातर जोरात हसे, मग अती झाले की दोघींना झापे. एकमेकींच्या फाइल लपवणे असे प्रकारही ह्या दोघी करीत.

जेनी दिसायला चांगली होती. एवढे वय झाले तरी उठून दिसायची. तिला फंक्शन्स चे भारी वेड होते. तिची रिटायरमेंट ची पार्टी फारच जोरदार झाली. उत्सवमूर्ती जेनी दिवसभर बागडत होती. मोठा केक कापला, खूप लोक गोळा झाले होते. दोन-तीन भाषणे झाली. जेनीनेही भाषण ठोकले. आपल्यासाठी एवढा समारंभ झाला पाहून एकदम हवेत तरंगत होती. ही गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिची जागा डोनाने बळकावली. बाकीच्या सगळ्याजणी दिवसभर मनापासून जेनीची नालस्ती करीत राहिल्या. तिसऱ्या दिवशी जेनी नावाची बाई गेली तिस वर्षे आपल्या सोबत होती ह्याचा मागमूसही उरला नाही.

विकी: मला आजतागायत भेटलेल्या बायकांमधील सगळ्यात जहांबाज, धूर्त, कावेबाज, कोणाचाही काटा कधी काढेल अन एखाद्याची नोकरीही घालवेल अशी महामाया होती. बार्बराला मी साडेचार वर्षात त्रासलेले, घाबरलेले पाहिले नाही. पण जेव्हापासून ही महामाया आमच्या सेक्शनमध्ये आली तेव्हापासून सगळे चित्रच बदलले. अपवाद कॅथीचा. बार्बला तर नेहमी वाटे की विकी तिला नोकरीवरून घालवणार. विकीच्या अपरोक्ष नावाने कधीच कुणी बोलत नसे, एकजात सगळे शिव्याच देत. तिलाही हे नक्की माहीत होते. बार्बराच्या, बॉसला जाऊन चुगल्या करणे हा विकीचा आवडता उद्योग. दिवसभर कामाचा आव आणून डोळ्याच्या कोपऱ्यातून कोणाचे काय चालले आहे हे पाहत राहायचे, अन उरला वेळ फोन होताच. सारख्या कुणाच्या न कुणाच्या कागाळ्या करीत राही. सरतेशेवटी एकेकाळी आमच्या सेक्शनची सर्वेसर्वा असलेल्या बार्बराला विकीने पळवून लावले. कोल्ह्यालाही मागे टाकेल अशी कनिंग विकी.

अजूनही काही जणी होत्याच. ह्या गोकुळामुळे जगभरात कुठेही गेले तरी ऑफिस गॉसिप तितकेच जोरदार चालते ह्याची मला खात्री पटली. काम कसे टाळायचे आणि पुढेपुढे कसे करायचे ह्याचे एक से एक नमुने पाहिले. नवीन टेक्नॉलॉजीचा कुणी दुस्व:स करते हे सांगून खरे वाटेल का कोणाला? पण ह्या सगळ्या बायका सेलफोन, आयपॉड, प्लाझमा, इत्यादींचा अत्यंत द्वेष करीत. फालतू चोचले आहेत असे म्हणत. अनेक जणी आमच्या छोट्याश्या गावातून एकदाही बाहेरही गेल्या नव्हत्या. फारच मर्यादित आणि संकुचित जग आहे त्यांचे.

ह्यांच्यात मी वयाने लहान म्हणून असेल, दुसऱ्या देशातून येऊन इथे एकटेच राहतात म्हणूनही असेल, ह्या विविध छटा असलेल्या बायकांनी मला नेहमीच प्रेम दिले, मदत केली. आता मी त्या गावातही राहत नाही तरीही न चुकता ख्रिसमस ग्रिटिंग व वाढदिवसाच्या शुभेच्छा येतातच. यांच्याबरोबर घालवलेले दिवस मी कधी विसरणार नाही.

Friday, April 24, 2009

सहज केला चाळा अन झाला की हो घोटाळा

कधी कधी सहज चाळा म्हणून केलेल्या गोष्टीचे रुपांतर आधी गंमत मग लाज, वेदना, असहायता ह्यामध्ये कसे बदलते पाहा. झाली असतील चौदा-पंधरा वर्षे. माझे ऑफिस आठव्या मजल्यावर लिफ्टच्या बाजूला होते. बहुतेक सगळ्याच मजल्यावर लिफ्टच्या बाजूला पब्लिक फोन टांगलेले. त्यातले अनेक बरेचदा ऑउट ऑफ देवाणघेवाणच असत. सुदैवाने हा आठवा मजल्याचा फोन मात्र कायम जिवंत. त्यावेळी सेलफोन हा प्रकार अगदी तुरळक. सरकारी नोकरांकडे तर नाहीच. पब्लिक फोनचा वापर समस्त जनता नेमाने करी. तर हा ठणठणीत सखा बऱ्याच लोकांना माहीत झालेला. त्यामुळे कायम गुंतलेला. सकाळपासून लोक हजेरी लावत. अनेकदा तर रांग लागे मग आम्ही आठव्या मजल्यावरचे लोक वैतागत असू. कारण पहिला हक्क आमचा ना.

फोनच्या शेजारीच चहाची गाडी असे. सकाळी एक तास ही झुंबड. अकराच्या आसपास शांतता पसरे. एक दिवस चहावाला गेला आवरून. सकाळच्या वेळी खूप गडबडीचे एकदम शॉर्ट कॉल असत. नेहमीप्रमाणे बरेच डीलर्स, वकील लोक नाणी अर्पण करून गेले. मग माझी एक मैत्रीण पाचव्या मजल्यावरून आली. सेक्शन मध्ये येऊन थोड्या गप्पा केल्या म्हणाली," चल गं, निघते. साहेब बोंबलेल नावाने उशीर झाला तर. एक फोन करायचा आहे. पुन्हा थोडा वेळ जाईल त्यात." ती गेली, मी कामाला लागले.

तासाने आमचा चहावाला घाईघाईने आला म्हणाला, " चला पटकन, तिकडे तुमची मैत्रीण अडकली आहे." मला काहीच उमगले नाही. मैत्रिणी ढीगभर, आता नक्की कुठली? अन अडकली-बापरे! म्हणजे काय, कुठे? चहावाला पण मेला धड काही सांगताच गेलाही बाहेर. त्याच्या मागोमाग मी. पाहिले तर बाहेर थाप गर्दी. सगळ्यांना बाजूला सारल्यावर मिनू दिसली. म्हणजे ही अजून गेली नाही सेक्शनमध्ये? दिसतेय तर नीट, हा थोडीशी रडवेली झालीये. फोनवर तर बोलत नाहीये मग कशाला उभी आहे तिथे? मनात प्रश्नांची सरबत्ती चालू.

तिच्या जवळ जाऊन तिला म्हटले, " काय झाले गं मिनू? आधी चल इथून. माझ्या सेक्शनमध्ये जाऊ, बस तिथे शांतपणे. मग सांग कशाला रडतेस ते." बस हे एकले आणि भराभर अश्रू वाहू लागले. " अग हालताच येत नाहीये ना, मी काय वेडी आहे का अशी उभी राहायला?" झाले होते काय, मिनू जवळ जवळ अर्धा तास फोनवर रंगात येऊन बोलत होती. सहज चाळा म्हणून भिंतीवर असलेल्या भोकात तिने करंगळी घातली होती. तिच्या लक्षात यायच्या आधीच ती सुजली अन बाहेर येईचना. मग हिने केलेल्या प्रयत्नाने अजूनच त्रास होऊन सूज वाढली. भरीत भर म्हणजे हात असा वर तरंगता राहून बाकिची बोटे पंजाही सुजला. अन मिनू तिथेच लटकली.

झालेली फजिती, लोकांचे कॉमेंट्स, सल्ले ऐकून बेजार मिनूची अवस्था फारच दयनीय झाली होती. त्यातून ही बातमी तिच्या साहेबापर्यंत पोचली अन तोही आला वर. धन्य आहात तुम्ही म्हणून पहिले हिला फटकारले मग गेला आता कसे सोडवायचे ते पाहायला. दोन तास होऊन गेले तरी काही मार्ग निघेना. बोटाशी अजून मस्ती करणे शक्यच नव्हते, मिनू तर कधीही चक्कर येऊन पडेल या अवस्थेत गेली होती. शेवटी फायरब्रिगेड्ला बोलावले. ते आल्यावर हे दृश्य पाहून त्यांनाही हसू आलेच. पण मग लागलीच ते कामाला लागले. छोट्या हातोडीने हळूहळू त्यांनी आजूबाजूची भिंत फोडली आणि मिनूची सुटका केली.

जवळ जवळ चार तास मिनूचा हा गोंधळ चालू होता. सगळ्यांची बरीच करमणूक झाली, अनेक सूचना काही शेलक्या कमेंट्स. पुढे खूप काळ हा विषय ऑफिसमध्ये चर्चेत राहिला. ह्यातून एक फायदा मात्र झाला तो म्हणजे ते भोक कायमचे बुजले. नंतर फोनवर जास्त वेळ कोणी लटकले तर लोकं लागलीच म्हणत, " सांभाळ रे, नाही तर पुन्हा फायरब्रिगेडला बोलवावे लागेल."

Thursday, April 23, 2009

खारीचे योगदान






आपण सगळेच जण कधी ना कधी प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर पीतोच . पाणी पिऊन झाले की रिकामी बाटली कचऱ्यात फेकून देतो. ह्या दोन्ही क्रिया इतक्या अंगवळणी पडल्यात की ह्यामागच्या संभाव्य धोक्यांची वस्तुस्थितीची कल्पना कानामागे टाकली जाते, दुर्लक्षिली जाते. माहीत असलेलेच पुन्हा वाचले गेले तर किमान काही दिवस तरी मन त्याचा पाठपुरावा नक्कीच करते, त्यासाठी हा प्रयत्न.

एका बॉटल्ड वॉटरची किंमत- साधारण $.५० म्हणजे नळाच्या पाण्यापेक्षा १९०० पट्टीने जास्त.
म्हणजे, आजच्या रिसेशन, महागाई च्या जमान्यात वर्षभरात बॉटल्ड वॉटर साठी केवढा तरी पैशाचा अपव्यय.

पाणी प्लॅस्टिकमध्ये ठेवल्यामुळे विषारी द्रव्ये शोषून घेते [Bisphenol-A(BPA)] ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.
ह्या बॉटल्सचे पॅकिंग, वाहतूक आणि शेवटी त्याची विल्हेवाट ह्या प्रक्रियेमुळे वातावरण खराब होते.

२००४ साली झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एका वर्षात २६,०००,०००,००० लीटर पाणी म्हणजे २८,०००,०००,००० प्लॅस्टिक बॉटल्स. त्यातील ८६% बाटल्या कचऱ्यात फेकल्या जातात. म्हणजेच दर सेकंदाला १५०० बाटल्या कचऱ्यात.

२६,०००,०००,००० पाण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक बॉटल्स बनविण्याकरिता १७,०००,००० बॅरल्स तेल लागते. ह्या एवढ्या तेलावर ,००,००० गाड्या वर्षभर धावू शकतात. शिवाय ह्याच्या उत्पादनामुळे वातावरणात २५,००,००० टन्स कार्बन डायॉक्साईड सोडला जातो.

$
१००,०००,०००,००० म्हणजे १०० बिलीयन डॉलर्स इतके पैसे दरवर्षी प्लॅस्टिक बॉटल्स मुळे खर्च होतात. ह्यापुढे तर फेडरल बेलऑऊट पॅकेजही लहानच आहे.

आपण जर फक्त बॉटल्ड वॉटरच पीत असाल तर आपल्याला हे माहीत आहे का?
तुम्ही पैसे खर्च करता वातावरणात प्रदूषण वाढविण्यास मदत करता. जमिनीखाली असलेल्या पाणी धरून ठेवणाऱ्या खडकांचा थर प्रदूषित करता. ज्यामुळे विहिरीतून पाणी मिळण्याची प्रक्रिया कमी होते.

आता सोयीचे पडते म्हणून सगळेजण गाड्यांमध्ये ह्या प्लॅस्टिक वॉटर बॉटल्स ठेवतात. पण,
गाडीत असलेली उष्णता बॉटल्सचे प्लॅस्टिक ह्यामुळे तयार होणारी केमिकल्स आतले पाणी शोषून घेते. परिणाम ब्रेस्ट इतर प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.

आता ह्या बॉटल्स आपल्यापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या तापमानातून प्रवास करतात. म्हणजे, गोडाउन मध्ये २५फॅ ते ८५फॅ, ट्रक्समधून प्रवास १००फॅ ते १५०फॅ, दुकानात माल उतरवणे-चढवणे ४५फॅ ते १००फॅ, दुकानात ५५फॅ ते १००फॅ शेवटी आपले घर-गाडी. म्हणजे आतील पाण्यावर किती दुष्परिणाम झाले ते पाहा.


दरवर्षी १४ बिलीयन पॉउंडस टायर्स, कार्डबोर्ड बॉक्सेस, प्लॅस्टिक कप्स, बॉटल्स, कॅन्स, शीटस इतर प्रचंड कचरा समुद्रात टाकला जातो. त्यातील काही समुद्राच्या तळाशी जातो तर काही मासे खातात. परंतु प्लास्टीकयुक्त कचरा पाण्यावरच तरंगत राहतो, मैलोनमैल प्रवास करतो. शेवटी कधीतरी कुठल्या कुठल्या किनाऱ्यावर फेकला जातो. प्लॅस्टिक हे कधीही नष्ट होत नाही. म्हणजे शेवटी नुकसान आपले सगळ्या प्राणिमात्राचे होते. अगदी अलास्काच्या रिमोट प्रदेशातही प्लॅस्टिक बॉटल्स सापडल्या आहेत.

प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर व्यतिरिक्त आपण कसेही पाणी प्यायलो तर आपली पृथ्वी आपले पाकीट हरेभरे ठेवायला खूपच मदत होईल. प्रत्येकाने लावलेला हातभार येणाऱ्या पिढीच्या भविष्यास काही अंशी कमी प्रदूषण निर्माण करेल. चला तर मग ह्याची अंमलबजावणी नक्की करून आपले खारीचे योगदान देऊयात.

[
अनेक उपयुक्त लेखांमधून वरील माहिती संकलित केलेली आहे. ]

Wednesday, April 22, 2009

'Fracture' एक अप्रतिम सिनेमा...


'Fracture' २००७ साली आलेला हा सिनेमा. डायरेक्टर: ग्रेगरी हॉब्लिट, कलाकार: अन्थनी हॉपकीन्स, रायन गॉस्लींग. एक अप्रतिम सिनेमा. प्लॉट नेहमीचाच आहे. परंतू सिनेमाची पकड जबरदस्त आहे.

'टेड क्रॉफोर्ड’( अन्थनी हॉपकीन्स ) श्रीमंत, अतिशय हुशार स्ट्रक्चरल इंजिनियर. आपल्या बायकोचे एका पोलीस ऑफिसर बरोबर संबंध असल्याचे त्याला कळते. टेड बायकोच्या डोक्यात गोळी घालतो, ती जखमी होते. टेड तिच्या शेजारीच थांबून पोलिसांना फोन करतो. रॉब नूनाली( पोलीस इन्स्पेक्टर) एकटाच आत येतो टेड बरोबर बोलायला. टेड ताबडतोब गुन्हा कबूल करतो, तसे पोलिसांना लिहूनही देतो. ज्या पिस्तुलाने खून झाला तेही पोलिसांना देतो.

केस कोर्टात ताबडतोब घ्या असा आग्रह टेड धरतो. कोर्टात मी दोषी नाही, पोलिसांनी स्टेटमेंट जबरीने घेतले आहे. स्वतःची केस मी स्वतःच लढणार आहे असे सांगतो. टेडच्या विरुद्ध सरकारी पक्षातर्फे वीली बिचम (रायन गॉस्लींगहा अतिशय हुशार, डिपार्टमेंटचा स्टार वकील केस लढणार असतो. त्याच्या दृष्टीने ही केस अतिशय सोपी असते. गुन्हेगाराचे स्टेटमेंट, त्याने वापरलेले पिस्तूल ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे भक्कम पुरावा असतो. त्यातून वीलीला एका खूप मोठ्या क्रिमीनल लॉ फर्म ने मोठ्या पोस्ट्च्या जॉबची ऑफर दिलेली असते. त्याच्या तिथल्या नवीन बॉसबरोबर प्रेमाचे संबंधही जुळत असतात. त्यामुळे तो इथला गाशा गुंडाळायच्या प्रोसेस मध्ये असतो. वीली म्हणजे केस जिंकणे हे प्रूव्हन समीकरण असते.

ट्रायल च्या आधी टेड वीलीला भेटायला बोलावतो. तू मला खूप आवडलास असे सांगतो. नवीन जॉब बद्दल शुभेच्छा देतो. मला ह्यांची गरज नाही असे म्हणून विलीने केस संदर्भात दिलेले सगळे कागद परत करून टाकतो. केस कोर्टात उभी राहते. जेव्हा पोलीस इन्स्पेक्टरला साक्षीसाठी बोलावले जाते त्यावेळी टेड सांगतो की माझ्या बायकोबरोबर संबंध ठेवणारा माणूस म्हणजे हाच ऑफिसर आहे. ह्याने जबरीने माझ्याकडून खोटे लिहून घेतले. ह्या टर्नमुळे गुन्ह्याचा कबुलीजवाब कोर्ट पुराव्यासाठी ग्राह्य धरता येणार नाही म्हणून बाद करते. वीलीला पहिला धक्का तिथे बसतो.

ज्या पिस्तुलाने खून झाला ते मिळवण्यासाठी वीली टेडचे संपूर्ण घर पिंजून काढतो परंतू ते कुठेही मिळत नाही. जे पिस्तूल जप्त केलेले असते त्यातून एकही गोळी फायर झालेली नसते टेडचे ठसेही मिळत नाहीत. सरकारी पक्षाकडे कुठलाही ग्राह्य पुरावा नसल्याने टेडची सुटका होते. अन ९७% सक्सेस मिळवणारा वीली केस हरतो. टेडनेच खून केला आहे आणि तरीही तो सुटला ह्या धक्क्याने रॉब- पोलीस ऑफिसर कोर्टाच्या पायरीवर स्वत:ला गोळी मारतो.

वीलीला खात्री असते की खून टेडनेच केला आहे परंतू पुरावा नसल्याने एकमेव जिवंत पुरावा म्हणजे टेडची कोमात गेलेली बायको. तो दररोज तिला हॉस्पिटल मध्ये भेटायला जातो. ती पुन्हा बोलेल ह्या चिवट आशेने सतत तिच्याशी संवाद करत राहतो. इकडे सुटल्यावर टेड विलीने बायकोला भेटू नये अशी कोर्टाकडून ऑर्डर आणतो. अन लागलीच बायकोचे लाईफ सपोर्ट काढून टाकायला सांगतो. ती मरते. वीली खूप प्रयत्न करतो पण तोवर उशीर झालेला असतो. गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार संपतो.

आता ते पिस्तूल हाच काय तो आधार उरलेला आसतो. एकदा वीली विचार करीत असताना दुसरा पोलीस ऑफिसर बोलता बोलता चुकून वीलीचा फोन आपला समजून उचलतो वीलीला नंतर परत देतो. त्या क्षणाला वीलीला लक्षात येते की जे पिस्तूल सगळा वेळ आपण अन पोलीस शोधत आहेत, होते ते समोरच होते. रॉबच्या कमरेला.

ते पिस्तूल टेडने प्रथम कसे मिळवले मग ते कसे बदलले. सुटल्यावर स्वत: वीलीला बोलावून सगळा प्लॅन कसा आखला कसा राबवला हे सगळे टेडचे कथन अन नंतर विलीने दिलेला मोठा टर्न..... जोवर बायको लाईफ सपोर्ट्वर जिवंत होती तोवर टेडवर मर्डर चार्ज नव्हता परंतू आता मात्र त्याने मुद्दामहून तिला मारले आहे अन मर्डर वेपनही मिळाले आहे. नवीन केस लागलीच पुन्हा उभी राहते अन ह्यावेळी मात्र टेड केस स्वत: लढता अनेक वकिलांच्या गराड्यात .....आणि वीली भक्कम पुरावा घेऊन.... हे सगळे पाहायलाच हवे.

सिनेमा सगळ्याच अंगाने अप्रतिम झाला आहे. कथानक खिळवून ठेवणारे आहेच. टेडची बायको आणि रॉब ह्या दोघांनाही ते खरे कोण आहेत हे माहीतच नसल्याने तिला जखमी पडलेली पाहून झालेली रॉबची अवस्था...हे असेच घडणार ह्याची पूर्ण कल्पना असलेला टेड, फारच इंटरेस्टिंग वळण.

अन्थनी हॉपकिन्स, ग्रेट अभिनेता. कुठल्याही भूमिकेत टाका सोनेच करणार. त्याच्या चेहऱ्याची रेष ना रेष बोलते. वीलीशी डोळ्यांनी, हावभावातून साधलेले संवाद कमाल आहेत. थंड, कॅलक्युलेटेड श्रीमंत म्हातारा, पर्फेक्ट जीवंत केला आहे. वीली-रायन, हाही एकदम डॅशिंग, हँडसम तरुण अभिनेता. अप्रतिम काम केले आहे. त्याचा अग्रेसिव्हनेस, हरल्यामुळे आलेला राग, टेडला अडकवण्यात यश मिळत नसल्याने झालेली तडफड..सगळे काही ताकदीने उभे केले आहे. इतरही सगळ्यांचीच कामे चांगली, पूरक झाली आहेत.

एकदा पाहून हा सिनेमा समजला तरीही पुन्हा पाहावाच लागतो. दुसऱ्यांदा ह्याचे खरे कंगोरे, घटनेमागची सुसूत्रता नीट कळते. आणि सिनेमा मनात घर करतो.