जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 30, 2009

पापणीला तुझा रंग येतो......


हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हांच या बोलांनी-संगीताने व अप्रतिम सुरांनी जबरदस्त मोहिनी घातली. बरेचदा आपल्या मन:स्थितीनुसार ह्या आवडीनिवडी बदलतात. या बोलांमधली आर्तता, विरह, प्रिय व्यक्तीची चाहूल जरी नुसती लागली तरी कंपणारे हृदय. धृवपदच इतके बोलके आहे, जिथे मनीचे गूज व्यक्त करताना शब्द पुरे पडत नाहीत तिथे एक स्पर्श ते सगळे भाव शब्दांच्या पुढे जाऊन देऊन जातो. समोर नसतेस तेव्हां मला किती त्रास होतो.....हे सांगताना कवी यशवंतांनी किती सुंदर बोल रेखले आहे......., ' पापणीला तुझा रंग येतो. वा!! ' हे धृवपद स्वत: गुणगुणून पाहा, अडकूनच पडायला होते ना? अतिशय अर्थपूर्ण आणि गेय असे हे गीत कवी यशवंत देव यांचे असून संगीतही त्यांचेच आहे. हे काळजाचा ठाव घेणारे गाणे गायलेय येसूदास यांनी. जितकी ताकद शब्दात तितकीच संगीतात वआपल्या मंतरलेल्या आवाजाने ही शब्दांची भाषा समरसून रसिक मनापर्यंत पोचवली येसूदासनी.


॥ पापणीला तुझा रंग येतो ॥


शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो.....।धृ।

आर्त कोमेजलेल्या मनाची, पाकळी पाकळी खिन्न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने, प्राण घेऊन आली नव्हाळी
एक हुंकार देतो दिलासा, एक झंकार गात्रात गातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो.....।१।

माळवैराण निश्वासताना, रानपक्षी असा गात होता
काळरात्रीस ही सोबतीला, रातराणी तुझा गंध होता
काल निश्वासलेला तराणा, आज विश्वास देऊन जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो....।२।

मोरपंखी खुणेसारखी तू, चित्त मोहून घेतो फुलोर
अभ्र दाटून आले तरीही, तू ढगामागची चंद्रकोर
चांदण्याचा झुला हालताना, जीव भोळा शहारून जातो
लोचनाआड जातेस जेव्हा, पापणीला तुझा रंग येतो....।३।


माझ्याकडे हे गीत होते परंतु कसे कोण जाणे कुठेसे हरवून गेले. जालावर खूप शोधूनही मिळाले नाही. जर कोणाकडे असेल तर मला पाठवाल का?

चुरापाव यांनी श्री.अरुण दातेंनी गायलेले गाणे दिले आहे. येथे ऐका.
चुरापाव अनेक आभार.

Monday, September 28, 2009

मनापासून मनापर्यंत......

ना ओळख ना कधी पाहिलेले तरीही अनेकदा समोरच्याच्या मनाशी संवाद साधता येतो. तुम्ही म्हणाल हे तर सगळ्यांनाच साधते. बरोबर पण बरेचदा आपण किंवा समोरचा मूक संवाद करतो आणि तोही अगदी नेमका. अन मग आश्चर्य वाटत राहते. जणू काही हा माझे मनच वाचतोय की काय असा संभ्रम निर्माण होतो. हे असे संवाद वेळ-काळ, वय, देश, स्थळ, प्रवृत्तीतील भेद, धर्म, वंश-रंग सगळ्यांच्या परे आहेत. एकवेळ व्यक्त संवादात यातील काही गोष्टींचा आपल्याला नको असला तरी परिणाम होतोच. कुठे मन साशंक होते तर कधी आडदांड देह पाहून कचरते-अगदी उगाचच. तर कधी वाटते नकोच यांच्या फंदात पडायला..... मात्र मूक संवादांचे तसे नसते. ते इतक्या चटकन अन अनपेक्षित घडतात अन नेमके दुसऱ्याच्या मनापर्यंत जाऊन पोचतात.

आमच्या जुन्या गावी एके दिवशी संध्याकाळी लेक व नवरा दोघेही आपण ऑलिव्ह गार्डन मध्ये जेवायला जायचे का आज असे म्हणू लागले. मी नुकतीच ऑफिसमधून आले होते. जेवण खरे तर तयार होते. फक्त पोळ्या करायच्या की जेवायला बसायचे. काहीतरी ऑफिसमध्ये कटकट झालेली त्यामुळे माझा मूड गेलेला होता.
ऑलिव्ह गार्डन हे या दोघांचे एकदम आवडते ठिकाण. तसे मलाही तिथल्या गार्लिक ब्रेडस्टीक्स, आल्फ्रेडो सॉस व सॅलड आवडते. पण बेसिकली मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने अगदी तीन-चारच पदार्थातून मला काहीतरी घ्यावे लागते. त्यात माझा मूड गेलेला असला ना की मग त्या न्यूडल्स म्हणजे मला वळवळणाऱ्या गांडुळांसारखी वाटू लागतात. सॅलडला कधीही घासपूस न म्हणणारी मी काय ते गवत खायचे असे म्हणू लागते. एरवी मला न्यूडल्स-सॅलड आवडतात. त्यातून दोनवेळा व्हेज डिश आहे असे म्हणून शिंपल्यांचा सॉस व हॅमचा बारीक भुगा असे प्रकार घडल्यामुळे माझा वैतागात भर पडलेली. वरकरणी काही न दाखवत मी बापलेकांना तुम्ही दोघेच जा ना प्लीज आणि माझ्यासाठी सॅलड घेऊन या तोवर मी जरा कामे आवरते पुन्हा सकाळी साडेसातला निघायचे ना असे हसून म्हणत पटवायचा प्रयत्न केला. पण आज लेक अगदी हटूनच बसला होता. त्याने हाताला धरून गाडीत बसवले. नवरा खूश. एरवी मी त्याला ऐकले नसते पण लेकापुढे नाईलाज झाला होता.

ऑलिव्ह गार्डन मध्ये पोचलो. मधलाच दिवस त्यात आठ वाजून गेलेले त्यामुळे जरा गर्दीचा भर ओसरला होता. पटकन जागाही मिळाली. या दोघांनी मुद्दामहून मला छळायलाच इथे आणलेय असे मला सारखे वाटत होते त्यामुळे मी अजिबात बोलत नव्हते की हसत नव्हते. चेहरा एकदम ताणलेला आणि हुप्प करून बसले. यांचे आवडते पदार्थ आले, बरोबर सॅलड- माझ्यासाठी. उगाच चिवडल्यासारखे करत मी बसून होते. लेक अगदी उत्साहाने त्याच्या बॉक्सिंगच्या वार्म अप व प्रॅक्टिसच्या स्टोरीज सांगत होता. एरवी मला इतके आवडले असते ऐकायला. मी सतत त्याच्या मागे असते दिवसभरात काय काय केलेस ते सांग म्हणून. आणि आत्ता तो सांगत होता तर मी मन बंद करून घेतले होते.

असे असले तरी आपल्या आजूबाजूला काय घडतेय हे नकळत आपण टिपत असतोच. येतानांच मी पाहिले होते, आमच्या पुढच्या टेबलवर एक मोठी अमेरिकन फॅमिली बसली होती. तीन मुले, आई-वडील, आजी व आजोबा. त्यांच्या एका मुलीचा वाढदिवस होता म्हणून ही सगळी मंडळी आली होती. त्यांच्या जोरदार गप्पा, धमाल सुरू होती. मध्येच एकदा आजोबांनी मागे वळून माझ्या लेकाचे बॉक्सिंगचे वार्म अप ऐकून काही प्रश्नही विचारले होते वर चल आपण दोघे कुस्ती खेळूयात असे म्हणून आव्हानही दिले. एकदोनदा त्या मुलांच्या आईची व माझी नजरानजर झाली. ती हसली मीही हसल्यासारखे केले खरे पण चिडचिडीमुळे हसू चेहऱ्यावर उमटले नव्हतेच त्यामुळे ते तिच्यापर्यंत पोचणे शक्यच नव्हते.

एकदाचे या दोघांचे खाऊन संपले मग माझा अंत पाहून बील आले ते पे करून आम्ही निघालो. आमच्या मागोमागच ही अमेरिकन फॅमिलीही बाहेर आली. आमच्या दोघांच्याही गाड्या शेजारी शेजारीच होत्या. बरोबरच चालल्यासारखे आम्ही सगळे गाड्यांच्या दिशेने निघालो. डोळ्याच्या कोपऱ्यातून मला जाणवले की मुलींची आई माझ्याकडेच पाहतेय. पण मी लक्ष दिले नाही. ती कशाला पाहील माझ्याकडे हाही विचार होताच मनात. गाडीपाशी पोचले आणि दार उघडताना का कोण जाणे तिच्याकडे पाहिले आणि काय सांगू, जणू दबा धरून बसल्यासारखी मी कधी तिच्याकडे पाहतेय याची ती वाटच पाहत होती. तिच्या नजरेशी नजर भिडताच तिने टम्म फुगलेल्या पुरीसारखे गाल फुगवले आणि दोन्ही हात कमरेवर घेऊन दोन्ही पाय जोरात आपटले. तिचा तो आविर्भाव पाहिला आणि इतका वेळ धरून ठेवलेला माझ्या रागाचा फुगा फुटला आणि मी जोरात हसू लागले
. तशी ती माझ्यापाशी आली व मला मिठी मारली. माझ्या पाठीवर थोपटले व हात हालवून बाय करत निघूनही गेली. नवरा व लेकही जोरात हसत होतेच शिवाय तिच्या गाडीतलेही सगळे हसत होते.

प्रत्यक्ष एका शब्दाचाही संवाद न घडता हा किती मस्त किस्सा घडला.


असेच एकदा आम्ही नेहमीप्रमाणे वॉलमार्टात नेहमीच्या भाजीपाला-दूध वगैरेसाठी गेलो होतो. थंडीची चाहूल लागलेली होती. फॉलची जॅकेट्स ज्याच्या त्याच्या अंगावर चढवलेली. खोगिरे चढवायला सुरवात झाली ह्या कल्पनेनेही अर्धी अधिक मंडळी वैतागलेली. खरेदी झाली, नवऱ्याचे ओरडून झाले- अरे हे काय बागेत फिरताय काय, आवरा पटापट. रांगेत उभे राहून बील देऊन झाले. कार्ट ढकलत दारापाशी आलो. तिथेच थांबून जॅकेट घालत होते तोच माझ्या पुढ्यात मोठ्ठा किल्ल्यांचा जुडगा पडला. चांगल्या सात-आठ किल्ल्या होत्या शिवाय मोठी किचेन. कोणाची आहे म्हणून मान वर केली तर पुढ्यात एक भरभक्कम सहा फूट चार-सहा इंच उंच साडेतीनशे पाउंडाची गोरी अमेरिकन उभी होती. आता या इतक्या मोठ्या देहाला खाली वाकून जमिनीवर पडलेला जुडगा उचलणे शक्यच नव्हते. शिवाय नेहमीच्या मदत करण्याच्या सवयीप्रमाणे पटकन मी वाकून तिला उचलून देणार( म्हणजे हे विचार माझ्या मनात आले की तिला उचलून द्यावे ) तोच तिने माझे विचार वाचल्यासारखे हाताने नो नो असे सांगत मला थांबवले. आम्ही दोघीही दारात उभ्या. तिच्या देहापुढे मी म्हणजे तिनका. मध्ये किल्ली. मागे बरीच गर्दी जमली. सगळे पाहत होते आता पडलेली किल्ली हा अगडबंब देह कसा उचलणार.

पिन ड्रॉप सायलेन्स झाला. एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. फोटो काढणे मला शक्य नव्हते -वाईट दिसले असते म्हणून मी काढला नाही. असता तर इथे टाकला असता. मागे दोघाचौघांनी सेल क्लिक केलेले पाहिले मी. ती शांतपणे दहा पावले मागे गेली. ओणवी होत होत हळूहळू बरोबर किल्लीवर आडवी झाली. दातात किल्ली धरून उचलली, पुन्हा हळूहळू तोल सावरत ओणवी होत होत उभी राहिली. तिला जमिनीवर संपूर्ण आडवे होणे शक्यच नव्हते. त्यामुळे ही इतकी चमत्कारिक कसरत तिने केलेली. पण आपला देह इतका मोठ्ठा आहे म्हणून इतरांनी मदत करावी ही अपेक्षा नाही की आजूबाजूला इतके लोक उभे राहून गंमत पाहत आहेत याची फिकीर नाही. माझ्या हातातून किल्ली पडली तेव्हा ती मीच उचलली पाहिजे हा साधा सरळ दृष्टिकोन. मला किल्ली खळखळवत दाखवली व हसून टाटा करून ती गेलीसुद्धा. खरेच सांगते, तिने जेव्हां मला किल्ली हालवून दाखवली ना तेव्हा माझ्या पोटात मोठ्ठा गोळा आला होता, न जाणो पुन्हा तिच्या हातून ती सटकायची अन पुन्हा एकदा ही जमिनीवर आडवी.........


एकदा दुपारची मी ग्रोसरी करायला गेले होते. बऱ्यापैकी शांतता होती. माझी खरेदी आटोपली तसे बिलाच्या रांगेत उभी राहिले. पुढचीचे आटपत आलेच होते. सामान पट्ट्यावर ठेवत असताना मागे पाहिले तर एक ऐशींपंच्च्याऐंशींच्या जरा पुढचीच कमरेत जराशी वाकलेली आजी हातात फक्त एक स्वेटर घेऊन उभी होती. मी माझ्या भरलेल्या कार्टकडे नजर टाकली, अन मनात आले की कमीतकमी वीस मिनिटे नक्की जातील या सगळ्या वस्तूंचे बिल होऊन पैसे देऊन पुढे सरकायला. तोवर एका वस्तू साठी या इतक्या वयस्कर आजीला कशाला थांबवायचे म्हणून मी तिच्याकडे पाहिले मात्र, जणू हे माझ्या मनातले विचार वाचल्यासारखे तिने खुणावले, अग तुझे आरामात होऊ दे. मी मजेत आहे. तरीही मी पुन्हा प्रयत्न करीत माझी कार्ट बाजूला घेत तिला हाता नेच पुढे जा असे खुणावले पण हसून तिने नकारार्थी मान हालवीत, डोंट यू वरी डियर मी ठीक आहे असे पुन्हा खुणावले. मग मात्र मी हसून इशाऱ्यानेच ओके म्हणत सामान ठेवायला सुरवात केली.

खरे तर लिमिटेड आयटम्स च्या रांगा ओस पडल्या होत्या. ती सहज तिथे जाऊ शकत होती. पण बहुतेक आजीबाई एकटीच असावी. एका वस्तूसाठी ती आली होती कारण ती वस्तू तिला अर्जंटली हवी म्हणून नव्हे तर त्या निमित्ताने थोडा वेळ आनंदात जाईल. चार माणसे दिसतील, त्यातील काही हसतील, बोलतील. तेवढेच दोन घटका जिवंत असल्यासारखे वाटेल. आजूबाजूच्या लोकांची लगबग, चैतन्य, वातावरणातील उल्हास ती शोषून घेत होती तिच्या उर्वरित दिवसाच्या एकलेपणावर मात करण्यासाठी. हे जाणवले आणि एकदम गलबलून आले. या भयावह वास्तवाचे चटके होरपळून काढणारे आहेत. आज हा एकलेपणा वयातीत राहिलेला नाही. कुठल्याही वयातील मग तरुण असो वा मध्यमवयीन का वयस्कर, सगळ्यांनाच छळतोय. असे अनेक लोक अनेक प्रकारे मूक संवाद साधत यावर मात करत आनंद गोळा करताना आजूबाजूला रेंगाळताना दिसतात. मनापासून मनापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे रस्ते अन नेमका भाव पोचवणारे मूक संवाद
.

Sunday, September 27, 2009

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!



सिध्दलाडू


जिन्नस

  • तांदुळाची तयार उकड दोन वाट्या
  • एक चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आख्खे जिरे, चवीनुसार मीठ
  • तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • थोडी कोथिंबीर बारीक चिरून
  • एक चमचा तेल व दोन चमचे तूप

मार्गदर्शन

गणेश चतुर्थीला मोदकांबरोबरच सिद्धलाडूचाही नैवेद्य दाखवतात. नैवेद्याच्या सिद्धलाडूत मिठाशिवाय काहीही घालत नाहीत. मात्र नंतर आपल्याला खाण्यासाठी सिद्धलाडू अशाप्रकारे बनविले जातात. हे लाडवांसारखे दिसत नसूनही याला सिद्धलाडू हे नांव का पडले आहे हे बरेचदा आजीला विचारले परंतु तिलाही त्याचे उत्तर माहीत नव्हते. त्यामुळे ती नेहमी म्हणे, " हात मेल्यांनो, खायचे सोडून नको ते प्रश्न कशाला विचारता रे. "


मोदक करून झाले की उरलेल्या उकडीमध्ये चवीनुसार मीठ, जिरेपूड व थोडे आख्खे जिरे, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून उकड मळून घ्यावी. नंतर हाताला थोडे तेल लावून उकडीचे छोटे छोटे गोळे करून त्यांना आपण जश्या गाठी मारतो तसा आकार देऊन कुकरमध्ये वाफवून घ्यावे. गरम असतानाच थोडेसे तूप सोडून खायला द्यावे. जिरे-मिरचीमुळे सुंदर चव लागते.

तांदुळाच्या उकडीच्या निवगीऱ्या करतात. त्या थापून करतात. सिद्धलाडू हे तसेच फक्त आकार वेगळा.

Friday, September 25, 2009

मनात रेंगाळणारे शब्द अन त्यांचा भावार्थ.......

अनेक साहित्यिकांचा माझ्यावर खोलवर पगडा आहे. जितके अधिक अधिक वाचावे तितके पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला होते. हाताच्या बोटावर मोजण्याइतके असते तर नावे लिहिलीही असती. तरीही काहींकडे मन अधिक ओढ घेतेच . आरती प्रभूंशी दोन शब्द तरी बोलायला मिळाले असते तर.... पण इतके भाग्य कुठले. असे अकाली जायचे होतेच तर तुमच्याऐवजी मी जायला तयार होते-आहे. ग्रेस, सुरेश भट, सुधीर मोघे, यशवंत देव, शांताबाई शेळके...... कुसुमाग्रजांबरोबर भेट झाली. आजही तो आनंद अंतरात भरून आहे. गद्य लिखाणामध्ये ना. स. इनामदारांच्या झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊची पारायणे केलीत. रणजित देसाईंचे स्वामी तर तोंडपाठ. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय तर गोनींचे - श्रिकृष्णायन, कर्णायन आणि मोगरा फुलला. जयवंत दळवींचे सारेच लिखाण, श्री. ज. जोशींचे - आनंदीगोपाळ, सुभाष भेंडेंची - अंधारवाटा तर ह. मो. मराठेंची - निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी. आवडीच्या पुस्तकांची यादी काढणे शक्यच नाही इतकी ती मोठी आहे.

या साऱ्यात वपुंचे लिखाण सतत मला झपाटत राहते. मानवी मनाचा, त्यात उठणाऱ्या तरंगाचा, सुख, दुःख, लोभ, हव्यास, झपाटलेपण, आर्तता, निकटता, वैषयीक कल्लोळ, वासनांशी दिलेला झगडा, बेबंदपणा, मुक्तता, रितेपण, एकाकीपण, अगतिकता, अन बरेच काही नेमके आणि अतिशय भिडणाऱ्या, हलवून टाकणाऱ्या, पटणाऱ्या सहज शब्दात अलगद वपुंच्या लिखाणातून उलगडत असे. वाचलेलेच पुन्हा वाचले तर प्रत्येकवेळी त्यातील भावना अजूनच स्पर्शून जाते. आपल्या मनाच्या त्या वेळेच्या अवस्थेनुसार काही नवीन अर्थही अचानक समोर येतात. वपुंचे लिखाण अनेकांना आवडते, बहुतांशी साहित्यप्रेमी मंडळींनी वाचलेही आहेच. त्यांच्या अनेक कथासंग्रहातील मला भावलेले बरेच काही आहे त्यातले थोडे नमूद करतेय. दररोजचे प्रसंग व अतिशय साधे शब्द पण आशय प्रचंड. या सगळ्या देवाकडून देणगी मिळवून आलेल्यांना सलाम.

अंत ’ आणि ’ एकांत ’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. शब्द जोडण्याचा आटापिटा तेवढ्याचसाठी.

" प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणानं जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनरुक्तीचा असतो. ’क्षणभंगूर ’ हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहीजे. "

" प्रेमपूर्तीत साफल्याची शंका असते, प्रेमभंगातलं वैफल्य नवी पायवाट शोधायला लावते, स्वत:च्या मालकीची. प्रेम, प्रेमविवाह दोन्ही मान्य. पण संसार हा व्यवहार आहे. "

" माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत. जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते. आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही. एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं त्याला वाटतं. असं का?-ह्याला उत्तर नाही."

" प्रत्येकाने काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राणवायूच्या शोधात असते. पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला कुणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते. अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेने चालू असतो. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, ह्याचं उत्तर पण नियतीजवळच असतं."

" माणूस कायमचा दुरावतो. तेव्हा त्या दु:खात आणखी एक दु:ख मिसळलेलं असतं. ज्या दु:खाचं सांत्वन होऊ शकत नाही असं ते दु:ख असतं. वियोगाचं दु:ख काळ शांत करतो. हे दुसरं दु:ख कायम ताजं राहतं. ते म्हणजे, जिवंतपणी आपण त्या माणसाशी कधीकधी ज्या अमानुषतेने वागलो, त्या आठवणींचं दु:ख. ते नेहमी ताजं राहतं. काळाचं औषध तिथं प्रभाव दाखवू शकत नाही."

खरा संसार हा एकाच दिवसाचा आणि एकाच रात्रीचा असावा. बाकी पुनरावृत्ती असते. माणूस खरं तर सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडावा, आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रध्दा ठेवावी. सुख दाराशी हात जोडून उभं राहील. पण तसं होत नाही. माणसं खळखळून मोकळी होत नाहीत. गप्प राहतात. सहन करतात. ही माणसं, ह्या व्यक्ती काय गमावतात, काय मिळवतात हे फक्त त्यांनाच माहीत. मोहावर जेव्हा ही मंडळी मात करतात तेव्हा त्यांच्या त्या यशाला सत्काराचे हार नाहीत आणि पराभवाच्या दु:खाला सांत्वनाचा स्पर्श नाही."

" नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण ’ नाही ’ का म्हणत नाही? न पटणाऱ्या, न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते, तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो."

" दिवस कधी थांबत नाही म्हणूनच हवा असलेला दिवस हा असा उगवतो. काळ हा माणसाचा शत्रू नव्हे. तो सर्वात जवळचा मित्र आहे. मुख्य म्हणजे तो गतिमान असल्याने नित्य टवटवीत, ताजा असतो. एखाद्याच दिवसाची तो तुम्हाला वाट पाहायला लावतो तो तुमचा अंत पाहायचा म्हणून नवे, तर त्या दिवसाला तुम्ही कडकडून, तीव्रतेने भिडावं म्हणून! जेवढी प्रतीक्षा मोठी, तेवढाच पूर्तीचा क्षण ज्वलंत, ताजा, उत्कट. "

" सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य, बुध्दी हे सौंदर्याचंच रुप, नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतंही काम भक्तीने करणं हेच सौंदर्य. आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरुपता. "

" स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळतं त्यालाच पालक शब्द समजला. "

" गैरसमज हा कॆन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो. "

" समोरच्या चालत्या-बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दु:खी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. "

" नकार
देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच करणे , ही त्याहून मोठी कला आहे. "

( सगळे लिहीणे शक्यच नाही. असेच पुन्हा केव्हांतरी ...... )

Thursday, September 24, 2009

दगड होऊन पड म्हणावं....

फोटो जालावरून

वाळल्या भेगाळल्या खपल्या

फिरूनी एकदा लसलस ओल्या

सैरभैर पापण्यांच्या झऱ्यावर

थरथरतात नकारांच्या फुल्या

आता तरी समजून घे गं

सांजेचे ऊन तुझे नाही गं

जडलेल्या जीवाला समजावं

दगड होऊन पड म्हणावं

दगडांना रूजणं नाही माहीत

प्रेमाचे धुमारे त्यांना फुटत नाहीत

ऊरी फुटले तरी असतात मुकाट

कुणी ठोकरलेच तर दुसरी वाट

Tuesday, September 22, 2009

तू ही मेरी शब हैं......


तू ही मेरी शब हैं......

माझा लेक - शौमित्रने गायलेले गाणे सादर करीत आहे. ऑगस्टमध्ये एका आठवड्याच्या सुटीवर आलेला असताना आम्ही दोघेही त्याने गावे यासाठी त्याच्या मागे लागत होतो. पण तो काही दाद देईना, शेवटी कॉलेजला परतायच्या आदल्या दिवशी बाबाने हे गाणे त्याला अचानकपणे रात्री एक वाजता म्हणायला सांगितले. अतिशय साध्या क्वालिटीचा माइक वापरून गाणे रेकॉर्ड केले आहे.



मूळ गीत:

सिनेमा: गॆंगस्टर. गीतरचना: सईद कादरी. संगीत: बंटी राजपूत. गीत गायक: कॄष्ण कुमार मेनन

Monday, September 21, 2009

साबुदाणा वडे

नवरात्र सुरू झाले, घट बसले. त्याबरोबरच उपवासही सुरू झाले. मागोमाग उपवासाचे पदार्थही आलेच की. मग काय फर्माइश आलीच, " अग, तुझा उपवास आहे ना? मग साबुदाणा वडे कर की, म्हणजे तुला खाता येतील. " ह्म्म्म, माझे नांव आणि यांचे गाव. पुन्हा काय तर तुझ्यासाठी कर.

जिन्नस

  • तीन वाट्या भिजलेला साबुदाणा
  • दोन मध्यम बटाटे उकडून
  • एक वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी दही
  • सात-आठ हिरव्या मिरच्या, तीन चमचे आल्याचा रस
  • एक चमचा जिरे, दोन चमचे जिरेपूड, थोडीशी कोथिंबीर,
  • एक चमचा साखर व चवीनुसार मीठ
  • तळण्याकरीता तेल.

मार्गदर्शन

साबुदाणा सात-आठ तास आधी भिजवावा. भिजवताना अर्ध पेर पाणी ठेवावे, दोन तासांनी साबुदाणा मोकळा करून अंदाज घ्यावा. कोरडा वाटत असेल तर पाण्याचे दोन हबके मारून झाकून ठेवावे. वडे करायला घेताना साबुदाणा, उकडलेले बटाटे, दही, जिरे पूड, वाटलेली मिरची, आल्याचा रस, साखर व मीठ एकत्र करून मळावे. चव घेऊन पाहावी. मीठ/मिरची कमी वाटल्यास आवडीनुसार वाढवावे. नंतर कोथिंबीर व दाण्याचे कूट व जिरे घालून मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून छोटे छोटे चपटे वडे करून घ्यावेत. कढईत तेल सुरवातीलाच चांगले तापवून घेऊन मध्यम आचेवर सोनेरी रंगावर वडे तळून काढावेत. टिश्यूपेपरवर टाकून अनावश्यक तेल टिपून घ्यावे. ओल्या खोबऱ्याच्या किंवा दाण्याच्या कूटाच्या दह्यातल्या चटणीबरोबर वडे गरम असतानाच खायला द्यावेत.

टीपा

साबुदाणा हा फार लहरी आहे त्यामुळे दरवेळी एकाच दुकानातून जरी आणला तरी आपले रंग दाखवतो तेव्हा मधून मधून त्याकडे लक्ष द्यायला हवे. दह्यामुळे वडे अतिशय हलके होतात. दाण्याचे कूट खमंग असावे. मिरची किंचित जास्तच पडू दे, त्यामुळे वडे मस्तच लागतात.

काहींच्या मते उपवासाला कोथिंबीर चालते तर काहींच्या मते नाही तेव्हा ती आपल्या मतानुसार घालावी. न घातल्यास चवीत काही फरक पडत नाही.

आयत्यावेळी साबुदाणा वडे करायची लहर आल्यास, आजकाल आपल्याकडे अतिशय बारीक साबुदाणा मिळतो. तो भिजवतानाच थोडेसे पाणी व दह्यात भिजवावा. बाकीची तयारी होईतो छान भिजतो.

Sunday, September 20, 2009

वेठबिगार

( फोटो जालावरुन )

अक्राळविक्राळ महानगरातील

सदाची वेठबिगार मी

धुरकट मलीन रेघांतून

मनाला जीवंत ठेवणारी मी

वाट्याला आलेले मुकाट सोसले

तरी हळवे स्वर जपले मी

जगात असेनही आस्तित्वहीन

मनात सूर्याचे तेज तेवले मी

दबून, मोडून जरी जगले

मनात प्राजक्त बहरला मी

असूनही वेठबिगार

अंतरंग माझे जपले मी

Saturday, September 19, 2009

सामान्य माणसा, तू जप रे स्वत:ला.......


काल दुपारी नेहमीप्रमाणे ऑनलाईन पेपर वाचायला सुरवात केली. प्रथम लोकसत्ता उघडला, तर काय दुसरीच बातमी होती, " आठवले यांचे बिऱ्हाड रस्त्यावर, दिल्लीच्या बंगल्यातील सामान बाहेर काढले. " त्याखालोखालच चौथी बातमी,"सूडबुद्धीने वागणाऱ्या काँग्रेसलाच रस्त्यावर आणेन -रामदास आठवले." जे अपेक्षित होते तेच सगळे व्यक्तव्य आणि कृती. मटा , सकाळनेही या दोन्ही पद्धतीच्या बातम्या सविस्तर दिल्या आहेतच. इतका वैताग आला हे सगळे वाचून. राजकारण आणि राजकारणी यांची ही नाटके कधीच न संपणारी आहेत. आता निवडणूक हरल्यावर पटकन बंगला सोडायला हवाच ना? आठवलेसाहेबांनीच नव्हे हो सगळ्यांनीच -जेजे हरले-पडले त्यांनी निदान एवढे तरी तारतम्य दाखवावे. पण काय असते एकदा का गोष्टी फुकट मिळायची - जनतेच्या जीवावर जगण्याची सवय लागली ना की मग ' ना जनाची ना मनाची. '

आता हेच पाहा काँग्रेस आहेच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसही आहे आता यांच्या विरोधात तिसरी आघाडी उघडून उभे राहिलेत म्हणून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे असे म्हणत विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीत ' साहेब ' आले का नाही चर्चेत? बरे जर बारकाईने पाहिले तर लक्षात येईल जे सामान बाहेर काढून ठेवलेय त्यात कुठलेही मौल्यवान सामान दिसत नाही. फुटकळ गोष्टीच दिसत आहेत. म्हणजेच महत्त्वाचे ते सगळे कधीच हालवले गेले असून निव्वळ बंगला अडवून ठेवलाय. पण म्हणताना मात्र सोफा, गादी, संगणक, फ्रीज वगैरे होते असे म्हटलेय. प्रत्यक्षात दिसत मात्र काही नाही. आता कृपया असे म्हणू नका हो की फोटो ना उरलेल्या कचऱ्याचा घेतलाय. इतका पण लोकांच्या अकलेचा-समजूतीचा कचरा करू नका.

या सगळ्यात एक प्रकार नेहमीच दिसतो तो म्हणजे असे एखाद्या मंत्र्यावर-खासदारावर कार्यवाही झाली ना की लागलीच ते इतर अनेक मंत्र्यांचा कच्चा-चिठ्ठा मांडून टाकतात. आत्ताही पाहा ना किती जणांना त्यांनी घसिटले आहे. रामविलास पासवान आले, मणिशंकर अय्यर, रेणुका चौधरी , मोहन रावले , रेंगे पाटील नावांमागोमाग नावे धडाधड बाहेर आली. पुन्हा काय तर मी सरळ मार्गी नेता म्हणून माझ्यावर ही कठोर कारवाई पण या इतरांचे काय हो? म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचेय हे बाकीचे सरळमार्गी नेते नाहीत म्हणून प्रशासन त्यांना घाबरून आहे. आता यावर हे नेते उद्या हल्ला बोल करतील. ऍक्शन-रिऍक्शन, आग पेटत ठेवायचीच. बहुतेक एकमेकांना फोन करून पर्फेक्ट स्ट्रॅटेजीक प्लानींग करत असतील नाही.

आता एका बाजूने ऍक्शन झाली म्हणजे रिऍक्शन हवीच -- ठोशास ठोसा झालेच पाहिजे ना. म्हणजे त्यासाठीच तर हा ड्रामा घडवलाय. लागलीच मी दलित पक्षाचा नेता असून कॉग्रेस विरोधी भूमिका घेतल्यामुळेच हा सूड काँग्रेस घेत आहे, वगैरे वगैरे. शिवाय काय तर ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' यांचा फोटो व पुस्तके रस्त्यावर टाकलीत. हरे राम! अरे बाबा किती किती यातना देत राहणार त्या ' महान नेत्याच्या जीवाला.' घरात ना फ्रीज सापडला ना टीव्ही, म्हणजे साहेबांना डॉ. बाबासाहेबांच्या फोटोंची-ग्रंथांची जर तितकीच किंमत असती तर असे सोडून गेले असते काय? पण आता मात्र बाबासाहेबांना नेहमीप्रमाणे हाताशी धरून, नाही नाही वापरून बोंब ठोकलीये. लागलीच कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. आता सुरवात झालीच आहे, हे प्रकरण जितके चिघळवता येईल तितके हे चिघळवणार पण कसे तर स्वतः एअर कंडिशनर मध्ये सुरक्षित बसून. मुख्यमंत्रिपदावर दावा करणारे हे नेते लोकांपुढे हा असाच आदर्श ठेवून ठेवून स्वतः कसे कंटाळत नाहीत. एकतर भाडे थकवायचे , इलेक्ट्रिसिटी बील, पाण्याचे बील भरायचे नाही. टेलिफोन, गाड्या सगळ्या गोष्टी फुकटच्या वापरायच्या. वर काय तर ऍट्रोसिटी ऍक्ट चा आधार घेत दावे ठोकायची भाषा. अरे बिचारा एखादा गरीब दोन महिने जर इलेक्ट्रिसिटी बील भरत नाही तर त्याची वीज तोडता तुम्ही. जरा थोडी तरी लाज वाटू द्या.

शिवाय यात आणिक एक वेगळा पदर आहेच. लखनौत उभारलेल्या आंबेडकर स्मारकाचे बांधकाम जनहितासाठी थांबवावे म्हणून दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे बांधकाम थांबवण्याचा निकाल दिला आहे. या अशा अडवून ठेवलेल्या सरकारी निवासस्थानांबाबतही अशीच एक याचिका दाखल करण्यात आलेली असून जर न्यायालयाने तातडीने निवासस्थाने खाली करवण्याचा आदेश दिल्यास हे पाहा आम्ही तर आधीच सुरवात केली आहे हे दाखवता येईल. आठवले साहेबांचे दुर्दैव की नेमके ते यात पहिले सापडलेत.

हे असले प्रकार कोणालाच नवीन राहिलेले नाहीत. प्रश्न हा आहे की राजकारणी लोक त्यांची खेळी खेळतात. दोन्ही बाजूने धुरळा उडवतात. रकानेच्या रकाने भरून वाहतात. मोडतोड-दंगली घडवून आणतात. पण या सगळ्यात बळी कोण जातेय? 'सामान्य जनताच ' ना? म्हणजे सामान्य जनतेच्या जीवावर बसून वर्षोनवर्षे स्वतःची पोळी भाजून घेतच आहेत. पण तेवढ्याने यांचे समाधान कधीच होत नाही. या दंगली घडवून आणून सामान्य माणसांचे जीव घ्यायचे. ' वेन्सडे ' मधले शब्द किती सत्य आहेत. इसमें मरता मेंही हूं. दुकान खोलू तो सोचना पडता हैं की नाम क्या रखूं? नाम देखके दंगेमें मेरी दुकान न जला दी जाये. ही भीती कधी संपणार?

आज इतकी वर्षे झाली आपला भारत स्वतंत्र होऊन तरीही अफझलखानावरून मिरजेत दंगल होते. सामान्य माणसे मरतात- जीवन विस्कळीत होते. अफझलखानाने जिवंत होता तेव्हा आपल्याला लुटले, मारलेच पण आज मरूनही स्वतंत्र हिंदुस्तानात-माझ्या भारतात हा नीच माणूस आमचे बळी घेतो आहेच. आणि हे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी या घटनेला आणिकच चिथावतात. यापरीस दुर्दैव काय असावे. आपण कधीतरी ऐकले काहो पाकिस्तानात शिवाजी महाराजांवरून दंगल झाली. पाकिस्तानातील माणसे जखमी झाली/ मारली गेली. नाही ना? का? मग आपल्याकडेच का असे वारंवार होतेय? कुठल्याही नेत्याला याचा विचारही करावासा वाटू नये. सामान्य माणसा तू स्वतः तरी याला बळी न पडण्यासाठी विचार कर रे. तुझा वाली तुझ्या स्वतःशिवाय कोणीही नव्हता- आजही नाही व कधीही असणार नाही. हे घरातले अतिरेकी असेच तुझ्या छातीवर वार करत राहणार आहेत. तेव्हां सामान्य माणसा, तू जप रे स्वतःला.

Friday, September 18, 2009

रव्याची खीर.


रव्याची खीर अतिशय सोपी व चटकन होणारी आहे. कधी कधी अचानक पाहुणे आले किंवा गोड खाण्याची हुक्की आली पण मोठ्ठा घाट घालायचा नसल्यास सहज करता येते. राजस गुणांची असून खाल्ल्यावर छान वाटते ( सूदिंग ), पोट अजिबात जड होत नाही.

जिन्नस

  • दोन टेस्पून रवा
  • तीन कप दूध
  • अर्धा कप पाणी
  • अर्धा कप साखर( जास्त गोड हवी असेल तर प्रमाण आवडीनुसार वाढवावे )
  • अर्धा चमचा तूप, आठ-दहा काड्या केशर, दोन चिमूट वेलदोडा पूड
  • दहा-बारा बदामाचे काप, दहा-बारा काजू ( ऐच्छिक )

मार्गदर्शन

जाड बुडाच्या पातेल्यात तूप व रवा घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे भाजावे. रव्याचा रंग शक्यतो बदलू देऊ नये. रवा भाजला गेल्याचा वास सुटला की त्यात पाणी गरम करून घालावे. सगळ्या गुठळ्या मोडून त्यात साखर घालावी. साखर विरघळली की दूधही गरम करून घालावे. मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात वेलदोडा पूड, केशराच्या काड्या, बदाम व काजू घालून दहा मिनिटे चांगले शिजू द्यावे. मधून मधून ढवळावे. ( खाली लागू देऊ नये.) गरम गार जशी आवडत असेल तशी बदाम कापाने सजवून वाढावी.

टीपा

दूध पटकन लागू शकते म्हणून सतत ढवळावे. चुकून लागल्यास अजिबात न ढवळता( खरवडता ) वरची खीर दुसऱ्या पातेल्यात ओतून घेऊन शिजवावी म्हणजे जळका वास लागणार नाही.

Thursday, September 17, 2009

खिडकी......

नेहमीप्रमाणे सीएसटीला उलट बसून गेले होते. मस्त खिडकी मिळालेली. या खिडक्यांचे पण गणित आहे. दररोज लोकलने प्रवास करणारे सगळे या गणिताला सरावलेले असतात. कधी खिडकी मध्यभागी असते. त्यामुळे जेव्हा लोकल खच्चून भरते ना त्यावेळी हमखास कोणीतरी खिडकी व्यापून उभी राहते. मग कसली हवा आणि कसला नजारा. बरे तिला टोकले ना, " अगं जराशी लांब सरून उभी राहा गं " की ती इतका वाईट्ट चेहरा करून पाहील अन उगाच सरकल्यासारखे करेल. शिवाय मनात बडबडत असतेच, " एकतर आरामशीर खिडकीत बसायला हवे वर यांना वाराही हवाय. आम्ही उभ्या आहोत ते दिसत नाही वाटते. " अग बाई यासाठी तीन स्टेशने मागे जाऊन मोलाचा अर्धा तास गमावलाय हे तुला दिसत नाही.

पण जाऊ दे, हे मानसशास्त्र अजब आहे. अगदी कधी कधी तर मीही मनातल्या मनात असेच बडबडायची. विशेषतः काहीतरी त्रास झाला असेल, डोके सटकले असेल . त्यामुळे या अशा नजरांची सवयच होऊन जाते हळूहळू. दादर गेले की या नजरेच्या मालकिणीला मी बसायला देत असे. शिवाय खिडकी न अडवता उभी राहून वाराही खाऊ देई. घाटकोपरला ती उठली की आपसूक खिडकीपासून हटके उभी राही. आणि नजरेनेच विचारी आता ठीक आहे ना? यावर मीही नजरेनेच तिला थॅक्स म्हणे. या गमतीजमती नेहमीच्याच झाल्या तरीही त्यातली रंगत कमी होत नसे. मी जरी तिच असले तरी समोरची मात्र रोजच नवीन असे.

खिडकी जर सीटला लागूनच असेल तर मात्र सुखच सुख. त्यातून भुरभूर पाऊस असेल किंवा नोव्हेंबर ते जानेवारी किंचित गारवा असला की छान वाटे. अर्थात मुंबईत हा असा आल्हाददायक गारवा प्रकार कमीच. मात्र बरेचदा घामेजले असताना वारा आला की थोडे बरे वाटत असे. तर मी उलट गेले खरी पण ती गाडी नेमकी लागली कुर्ला, बोंबला. आता उतरणे भागच होते. कुर्ला गाड्या मुळात इतक्या सोडतात कशाला हा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच कायम सतावत असे. एकदा तर सह्यांची मोहीमही राबवली होती, एक ठाणा की एक कुर्ला न सोडता दोन ठाणा नंतर एक कुर्ला सोडा. शिवाय कुर्ला गाड्या अनेकदा रिकाम्या धावत आणि सगळी गर्दी ठाणा गाडीलाच. मग भांडणे, बाचाबाची ओघाने आलीच. लोकल कुठल्याही साइडची असू दे हा कायमचा चिघळणारा वाद असतोच. विद्याविहार पासून पुढच्या सगळ्यांना वाटे इतक्या गाड्या यांच्यासाठी आहेत तरी कशाला मरायला येतात आमच्या गाडीत. तर कुर्ल्यापर्यंत राहणाऱ्यांचे म्हणणे, " म्हणजे समोर असलेली गाडी सोडून द्यायची का? गाडी काय तुमच्या मालकीची आहे का? अहो कुर्ला गाडीत ना हे टिकल्या-कानातले वाले येतच नाहीत बघा,. आमचा गृप आहे या गाडीचा. " थोडक्यात कारणे अनेक आहेत आणि मुख्य म्हणजे समोर आलेली गाडी सोडायची हे कुठल्याही लोकलप्रवाश्याला न पटणारी व मानवणारी गोष्ट आहे. तेव्हा ही भांडणे होणारच.

गाडीतून उतरले शेजारीच ठाणा होती लागलेली. पाहिले तर सीएसटीलाच खच्चून भरली होती. कसली खिडकी अन कसला वारा. गाडी सुटत आली होती. इकडून-तिकडून बायका आपली पर्स, ओढण्या-साड्या सांभाळत आक्रमण करीत होत्याच. माझी चलबिचल होत होती. चढू का पुढच्या ठाणासाठी थांबू, म्हणजे पुन्हा १५ मिनिटे नक्की फुकट जाणार. आधीच उशीर झालेला. घरी पोचेतो साडेसात नक्की. म्हणजे आजचे तळवलकर चुकणार. डोळ्यासमोर इन्स्ट्रक्टरचा चेहरा आला, बापरे! नकोच. शिवाय या आठवड्यात एक दांडी झाली आहे. त्यात त्या मेल्या डायरीत दररोज लिहावे लागते , आज काय व किती खाल्ले. मग दोन दांड्या व एक प्लेट वडा खाल्ला असे दिसले की ती इतकी जोरात डाफरेल की मला वाटू लागते मरो ते जीम आणि वजनाचा काटा. सुखाने दोन घासही ही बया खाऊ देईना. शिवाय वर हिचे हे ओरडणे ऐकायला भरमसाठ पैसेही मोजा. वजन तर तिथल्यातिथेच आहे. पुन्हा दोष माझ्या त्या छोट्याश्या वड्यांचा. एका मिनिटात इतके विचार घोंघावले म्हटल्यावर ती खच्चून भरलेली ठाणा पकडणेच भाग होते. जेमतेम दरवाज्यातून आत वळतेय तोच गाडी सुटली.

ठाण्यापर्यंत जायचे असल्याने तासाभराची निश्चिंती होतीच. तेव्हा उगाच दरवाजा-मधला पॅसेज इथे गर्दी करण्यापेक्षा आत जावे निदान हातातली बॅगतरी वर ठेवता येईल असे म्हणत आत वळले तोच, " ए जोशी जोशी, अग इकडे गं खिडकीत खिडकीत बघ. " माझे माहेरचे आडनाव जोशी. कुठूनही हे नाव कानावर आले की माझे कान लागलीच टवकारतात. कोणीतरी अगदी जिव्हाळ्याचे आपले माणूस आहे हे असे वाटते. . गर्दीत चेहरा दिसेना म्हणून पुढे जायचा प्रयत्न करत होते तोच पुन्हा आवाज आला, " भागाबाई, काय ओळखलेस का मला? " भागाबाई? फक्त माझे शाळासोबतीच या नावाने हाक मारत. कोण कोण असेल, माणिक की भारती? का वीणा, मला इतका आनंद झाला होता. त्या भरात पुढच्या दोघी-तिघींना ढकलून मी एकदाची त्या हाकांच्या मालकिणीला पाहिले. भारतीच होती. आठवी-नववी एका बेंचवर बसायचो आम्ही.

दोघीही एकमेकींना सोळा-सतरा वर्षाने पाहत होतो. आमच्यात बाह्य बदल बरेच झाले असले तरी मला माझी शाळेतली दोन वेण्या घातलेली, कधीही गाणे म्हणायला सांगितले की, " धागा धागा अखंड विणूया , विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया... " म्हणणारी, डब्यात बरेचदा कोबीची भाजी आणणारी भारतीच दिसत होती. तिने पटकन उठून माझा हात धरला. काय काय होते त्या स्पर्शात. इतक्या वर्षांनी भेटलो तरीही मैत्री तशीच जिवंत होती. म्हणत होती, " काय भागाबाई, कशी आहेस? तुझे घोड्याचे शेपूट गायब झालेय की. किती लांब व सुळसुळीत झालेत तुझे केस. मुळात होतीसच, आता अजूनच देखणी झाली आहेस. " माझे केस सरळ असल्याने व पोनी बांधलेला असला की चालण्याच्या लयीवर ते हालत असत मग काय सगळे घोड्याचे शेपूट म्हणत. बाकी दिसण्याचे कौतुक हे म्हणजे निव्वळ मैत्रिणीच्या मनातले प्रेम बोलत होते.

मग आम्ही दोघी ज्या काही सुटलो की बस. इतक्या वर्षांचा इतिहास-भूगोल फक्त एका तासात कसा भरून निघणार. कॉलेज, शिक्षण , नोकरी, लग्न-नवरा, ओघाने सासर-माहेर आलेच . मुले किती- प्रश्नच प्रश्न. या सगळ्यामागे कुठेही भोचकपणा नव्हता, असूया नव्हती. अनेक मैत्रिणींची आठवण निघाली. अग ही भेटली होती. राम पुण्याला शिफ्ट झालाय. सुभाष तर माझ्याच ऑफिसमध्ये आहे. वीणा लग्न होऊन बडोद्याला गेली. एक ना दोन , आम्ही दोघी एकमेकींना जे जे माहीत होते ते सांगत होतो. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची आठवण अपरिहार्यच होती. काही आवडते तर काही जरा.... आम्ही कोणाला वटाणा म्हणायचो तर कोणाला चिऊताई. कोणाच्या पोटातल्या चिमट्यांना घाबरायचो तर कोणाचे कसे भक्त होतो. हे सगळे भरभरून बोलत असताना गाडी धावतच होती. आज का कोण जाणे जरा जास्तच वेगाने पळाल्यासारखे वाटत होते. सिग्नलही लागले नाहीत. आमचे बोलणे तर नुकतेच सुरू झालेले.

भारती डोबिंवलीकर झाली असल्याने ती मुलुंडाला उतरून मागून येणारी कल्याण पकडणार होती. भांडूप गेले तशी मी हात अजूनच घट्ट पकडून तिला विचारले, " आता कधी भेटशील गं पुन्हा? फोन नंबर घेतलेच आहेत, मी फोन करेनच गं. पण हे असे पुन्हा पुन्हा भेटत राहूयात, खूप खूप छान वाटले. पुन्हा एकदा ते सगळे शाळेचे दिवस आठवले." तशी पटकन माझा हात सोडवत म्हणाली, " अगं बोलण्याच्या नादात लक्षातच आले नाही, थांब तुझी अतिशय प्रिय गोष्ट आहे माझ्या पर्समध्ये " असे म्हणत तिने पर्समधून फाईव्ह स्टार काढले व मला दिले. " काय, अजूनही तितकीच पागल आहेस ना? बघ गेले चार दिवस हे माझ्या पर्समध्ये आहे. मुलीने दोन वेळा हातात घेतले होते खायला पण पुन्हा ठेवून दिले, का माहीत आहे? त्याच्यावर तुझे नाव लिहिलेले होते, . माझ्या अजूनही लक्षात आहे तुझी आवड. खा गं नक्की, चल भेटूच आपण. " असे म्हणून भारती उतरून गेली.

फाईव्ह स्टार म्हणजे माझा जीव की प्राण होते एकेकाळी. अगदी बसचे पाच पाच पैसे वाचवून मी महिन्याच्या शेवटी दोन रुपये पन्नास पैशाचे एक फाईव्ह स्टार घेऊन हळूहळू चिमणीच्या दातांनी तुकडे तोडत चवीचवीने खात असे. हा अर्धा तास चालणारा माझा कार्यक्रम घरी व शाळेत जबरदस्त फ़ेमस होता. भारतीच्या अजूनही ते स्मरणात होते आणि नेमके तिच्या पर्समध्ये आज फाईव्ह स्टार होते. इतक्या वर्षांनी मैत्रीण भेटलेली, आठवणींचा मेळावा व त्यात हे फाईव्ह स्टार. मुलुंड ते ठाणा या पाच-सात मिनिटांच्या प्रवासात मी अर्धे चॉकलेट खाल्ले. अवीट गोडी होती त्यात. आमच्या भेटीचा सोहळा खिडकीने पाहिला-अनुभवला होताच. सहजच वाटले असे किती प्रसंग या खिडकीच्या डायरीत नोंदलेले असतील. आनंदाचे- दुःखाचे, कधी चिवचिवणारे- तर कधी निःशब्द. लहान मुलांची बोबडी लाडेलाडे बडबड तर कोणा बोळके झालेल्या आजीचे अनुभवकथन. कधी एखादीच्या डोळ्यातून राहून राहून ओघळणारी आसवे तर कधी भावी जीवनाचे मनसुबे. अनेक मनांच्या अगणित भावनांची मूक साक्षीदार, ‘ खिडकी ’.


Wednesday, September 16, 2009

भरली मिरची





जिन्नस

  • सहा मोठ्या मिरच्या
  • तीन मोठे चमचे बेसन खमंग भाजून
  • दोन मोठे चमचे कोरडे खोबरे भाजून पूड करून
  • एक मोठा चमचा बडीशोप भाजून पूड करून
  • एक चमचा धणेजिरे पूड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला व हिंग
  • चवीपुरते मीठ, एक चमचा साखर,
  • एक मोठी लसूण पाकळी, तीन मोठे चमचे लिंबाचा रस. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
  • चार चमचे तेल

मार्गदर्शन

गडद हिरव्या रंगाच्या थोड्या जाडसर व जास्त तिखट असलेल्या मिरच्या घ्याव्यात. देठ तसेच ठेवून मध्ये चीर देऊन सगळ्या बिया काढून टाकाव्यात. ( तिखटपणा कमी हवा असेल तर पोपटी- हिरवा रंग असलेल्या मिरच्या घ्याव्यात. ) नंतर अर्धा चमचा तेलात चिमूटभर मीठ व अर्धा चमचा लिंबाचा रस खलून ते या मिरच्यांना चोळून ठेवावे. मध्यम आचेवर बेसन कोरडेच खमंग भाजावे. कोरडे खोबरे, बडीशोप भाजून घेऊन त्यात लसणाची पाकळी घालून दोन-तीन चमचे पाणी घालून वाटून घ्यावे. एका भांड्यात बेसन, खोबरे- बडीशोप-लसूण पाकळीचे वाटण, धणेजिरे पूड, साखर, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, साखर व चवीनुसार मीठ व मावेल इतपतच पाणी घालून ( फार सैल नाही परंतु घट्टही नाही ) कालवून घ्यावे. हलक्या हाताने मिरच्यांमध्ये नीट भरावे. ( पोकळ/कमी भरू नये ) एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून सगळ्या मिरच्या सहज उलटता येतील अश्या लावाव्यात. बाजूने व वरून थोडे तेल सोडून झाकण ठेवावे. सात-आठ मिनिटांनी उलटवाव्यात मात्र झाकण ठेवू नये. पुन्हा पाच मिनिटांनी कुशीवर वळवून ठेवून थोडे तेल सोडावे. दोन्ही बाजूने किंचित लागल्या की लगेच उतराव्यात.

टीपा

तोंडीलावणे म्हणून चांगलेच आहे परंतु एखादेवेळी भाजी कमी असेल किंवा अजिबात नसेलच तर या मिरच्या उणीव भरून काढतील.

Monday, September 14, 2009

आनेवाला पल जानेवाला हैं.........

" अजय, आजकाल तुझं स्वतःतच राहणं फार वाढलंय..... , अरे मी काय म्हणतेय? आहेस का जागेवर? तुझं लक्ष कुठेय? "
" काय गं उगाच काहीही बोलतेस, हा काय तुझ्यासमोर आख्खा बसलोय ना? आणि लक्षही तुझ्याकडेच आहे. मोतिया रंगावर प्राजक्ताच्या देठाची फुले सगळीकडे फुलली आहेत. तू आज खासच दिसते आहेस. बाहेर भुरभूर पाऊस पडतोय मध्येच एखादा मोठ्ठा ढग आकाश व्यापून म्हणतोय मी कोसळणार आहे. चार टेबले मागे बसलेला मुलगा सारखा तुझ्याकडे पाहतोय. जितक्या वेळा तू मान वेळावलीस तितक्या वेळा तो अजूनच खेचला जातोय. कदाचित तो मनात मला शिव्या देत असेल,जळत असेल ...... म्हणत असेल काय लकी आहे. असल्या फाटक्या पोराबरोबर एवढी सुंदर पोरगी काय करतेय? "
" पुरे..... मला कळले की तुझे माझ्याकडे लक्ष आहे. अगदी मोतिया अन प्राजक्ताचे देठ वगैरे रंग कळत असल्याचे प्रमाण दिल्यासारखे बोलू नकोस. आणि तू कशाला त्या पोराकडे पाहतो आहेस? "
" बरं नाही पाहत. फक्त तुझ्याकडे पाहतो.... तू मघाशी काय म्हणत होतीस? हा, स्वतःतच राहणं...... झालंय खरं तसंच. "
" चला, निदान मान्य तर केलंस. आता काय घोळतंय, सलतंय, हवंय, खटकतंय.... ‍ जे काही असेल ते पटकन सांगून मोकळा हो बरं. "
" मोकळा होऊ? असं खरंच मोकळं होता येईल का गं? सगळ्या बाजूने आभाळ दाटून येतं अन धडाधडा पाऊस कोसळतो, अविरत, मूक्तपणे... तसंच भावनांच, विचाराचंही झालं असतं तर? "
" तू प्रयत्न तरी कर ना, असेही मनात कोंडून ठेवून काय साधतो आहेस तू? त्यापेक्षा कदाचित होशीलही मोकळा. "
" रमे, मानलं मी तुला. तू खरेच फार चिवट आहेस गं. माझ्याकडून काय ते वदवल्याशिवाय गप्प बसायची नाहीसच. "
" चला, निदान एवढे तरी तुला कळलेय ना, मग सुरू कर ....... ऐकतेय मी. "

" अगं फार काही नाही, नेहमीचंच वाक्य गं...... उद्या घेऊ, आणू, करू..... म्हणजे काय झालं, आज शेजारची पिंकी आईपाशी हट्ट करत होती. बार्बी हवी.... आईने समजूत काढत उद्या आणू हं का असे म्हटले. आता पिंकी पुन्हा उद्या हट्ट करेल ..... पुन्हा तेच संवाद होतील. बरं पैसे नाहीत म्हणून बार्बी आज आणता येत नाही हे आई पिंकीला सांगू शकत नाही. म्हणजे हे सत्य सांगायची तिची इच्छा नाही. पिंकी दररोज उद्या बार्बी मिळेल या स्वप्नात रममाण होईल आणि रोज आई तिला उद्याचा वायदा करत राहील.

आपणही अनेकदा स्वतःशीच जाणूनबुजून हा खेळ खेळत असतोच. त्या नादात आज जगायला मात्र विसरतो. ते वाण्याच्या दुकानावरील पाटीवर लिहिलेले असते ना गं, ’ आज रोख उद्या उधार ’ तसेच झाले आहे आपल्या ’ आजचे ’. अनेक भावना, प्रेम, संवेदना, जाणीवा हे सगळेच पैशाप्रमाणेच उधार ठेवायला लागलोय आपण. आपल्याला हवं ते मिळणारच नाही या मनात कुठेतरी खोलवर रुजलेल्या भयाने आजचा दिवस कधीच जगत नाही. अगं, आपली सगळी धडपड, कष्ट, मेहनत कशाकरिता करतो आहोत आपण? आनंदासाठी, सुखाने जगण्यासाठीच ना? हे सुखाने जगणे कधी तर उद्या-भविष्यात, बरोबर? अग पण मग आजच्या जगण्याचे काय? आणि कधी काळी आज जो मागे भविष्यात होता तेव्हाही आपण जगलोच नाही ना. हे चक्र संपतच नाहीये गं. त्यामुळे आजचा ’आज’ फार दु:खी व पोकळ झालाय. कंटाळलाय तो आता, हे धड ना ’ उद्या ’ धड ना ’ आज " व धड ना ’काल ’ मधले बेचव जीवन जगून. दोन क्षण थांबून मनातल्या भावना मोकळ्या कराव्यात म्हणून पराकाष्ठेने ह्या दुष्टचक्रातून स्वत:ला सोडवावे तर काय आजूबाजूला कोणाला वेळच नाहीये. जो तो माझ्यासारखाच धावतोय. अग ह्या उद्याच्या सुखाच्या सुप्त आशेने आपल्या सगळ्यांच्या मनाचा संपूर्ण कब्जा घेतलाय. एखाद्या अमली पदार्थाच्या नशेपासून सुटका मिळेल एकवार पण या संपूर्ण अशाश्वत हव्यासाला अंतच नाही. कुठेतरी आणी काहीतरी ठोस करून ’ आज ’ ला आजच जगायचेय गं मला. जमेल का, नाही जमवायलाच हवेय. आधीच उशीर झालाय. हे अंगवस्त्रासारखे त्वचेला चिकटलेले अपेक्षांचे-सुखाच्या व्याख्यांचे बांडगूळ माझा जीवनरसच शोषतेय. आता बास, यातले फोल फसवेपण मला गिळंकृत करण्याच्या आत मला यातून बाहेर पडायला हवे. आजच्या आज मध्ये भरभरून जगण्यासाठी. "

" ए रमे, अग अशी काय पाहते आहेस? काय मला पिटवायचा विचार आहे का? त्या पोराला वाटतेय की मी तुला काहीतरी भयंकर सांगतोय. अग तो भराभर फोन करतोय. बहुतेक मित्र जमवत असेल मला धोपटायला. एका सुंदर मुलीची राक्षसाच्या तावडीतून सुटका......हाहाहा...अग बाई आता तरी हस ना? पाहिलेस का, पाऊसही उद्याच्या उधारीचा वायदा सोडून आजच कोसळू लागलाय. चल मनमुराद भिजूयात, भिजता भिजता मी गुणगुणतो तू ही साथ दे....... चल चल गं......आनेवाला पल जानेवाला हैं, होसके तो इसमें जिंदगी बिता दो " (गाणे येथे ऐका)

Sunday, September 13, 2009

असाहाय....

दु:ख आम्ही खातो

वर अपमानाचे पाणी पितो

आपल्यांनीच केलेली अहवेलना

सोसायला परत परत तयार राहतो

सामर्थ्य आमचे तोकडे आहे

त्याला असाहाय्यतेचे कुंपण आहे

कुंपणात अडकलेले आम्ही

केवळ प्रेमाचे भुकेले आहोत

पूर्व आम्हाला पारखी झाली

सगळीकडे पश्चिम पसरली

अवकाशी उदासी भरून उरली

क्षितिजाच्या सीमेला भिडली

आता एकच गोष्ट निश्चित झाली

सोसणे आहे आपले नशिबी

सोसणे ही ही एक कला आहे

ती बाणवावी लागते अंगी

नाही रागवायचे नाही भांडायचे

आनंद आहे म्हणत हसायचे

हसत हसत निघून जायचे

कायमचे....

Friday, September 11, 2009

श्रद्धांजली




श्रद्धांजली

दुसरी बिल्डिंग डोळ्यासमोर ( टीव्हीवर ) कोसळताना पाहिली. काहीच उमगेना. हे खरे घडते आहे, का कुठल्या नवीन येऊ घातलेल्या सिनेमाचा ट्रेलर दाखवत आहेत हेच कळेना. आजही या वेदना तितक्याच ताज्या व काळीज विदीर्ण करणाऱ्या आहेत. सर्व मुतात्म्यांस देव शांती देवो.

रंजीश ही सही.......


आज सकाळपासून मनात हीच गझल घुमते आहे. काही काही गाणी, गझला, बोल, शब्द, प्रसंग, स्थळ अनेकदा तर लकबी, देहबोली, पाऊस, पिवळट मातकट चमत्कारिक संधिप्रकाश, दुरावलेले तरीही आपल्या मनात खोलवर रुतून बसलेले जीवलग............ यातले काहीतरी मनात पावलांचा आवाजही न येऊ देता सारखे समोर येऊन उभे ठाकते आहे. काहीसे दूर मात्र हृदयाशी कवटाळलेले आठवणींची आवर्तनांवर आवर्तने उठवते आहे. अन मग रंजीश ही सहीचे सूर अपरिहार्यच आहेत. सगळा दिवस या बोलात व सुरातच डुबणार.

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिये आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो जमाने के लिये आ

कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुश-फहम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिये आ

माना की मुहोब्बत का छुपाना हैं मुहोब्बत
चुपके से किसी रोज जताने के लिए आ

जैसे तुझे आते हैं न आनेके बहाने
ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ

अहमद फराज यांनी लिहीलेली व मेहदी हसन यांनी गायलेली
गजलेचा सूर अतिशय दु:ख, विरहाने तडपणारे हृदय वेदनेने विनवते आहे असाच आहे

हिरव्या रंगातले शेर मात्र अशआर तालिब बागपती यांचे आहेत.


काही शब्दांचे अर्थ
मरासिम = नाती, पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान,
लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, महरूम=वंचित

Thursday, September 10, 2009

बायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप

बायकोची अदलाबदली-वाइफ स्वॅप. काय क्षणभर दचकलात ना? मीही अशीच अगदी पहिल्यांदा हे पाहिले तेव्हा दचकलेच होते. चक्क दुर्लक्ष करून पुढे गेले तेही मनातल्या मनात बडबडत. आजकाल लोकांना काहीही करायचे वेड लागले आहे. काहीतरी हटके, साहसी, मूर्खासारखे आणिक बरीच बडबड करून मी तिथून चालती झाले. पण कसे असते ना, की एखादी गोष्ट करू नको असे सांगितले की लहान मूल तीच करू पाहते. अगदी तसेच मोठ्यांचेही होतेच. यात खरे तर वयाचा काहीच संबंध नसतो. शिवाय मोठ्यांना ओरडणारे तसे फारसे कोणी नसते, या फायद्याचा लाभ मी तर बाबा अनेकदा उठवत असते. आणि माझी खात्री आहे तुम्हीही उठवत असणारच. पाहिलेत, मूळ विषय भरकटला.

तर एखाद्या हट्टी मुलासारखे माझे लक्ष पुन्हा पुन्हा या बायकांच्या अदलाबदलीकडेच वळत होते. ही गोष्ट आहे २००५ मधली. झाले काय एकदा असेच टीव्हीवर ह्या चॅनलवरून त्या चॅनलवर उड्या मारत असताना एबीसीवर वाइफ-स्वॅप हा कार्यक्रम सुरू होता. प्रोग्रॅम गाइडमध्ये नाव दिसताच दोन-चार वेळा माझी पुढे गेलेली गाडी एक दिवस चांगली सरसावून हा प्रकार नक्की आहे तरी काय हे पाहण्यासाठी स्थिरावली. आणि चक्क या पाठीमागच्या संकल्पनेच्या प्रेमातच पडली. मी पाहत होते तो भाग नंबर १५ होता. म्हणजे आधी १४ भाग झाले होते. पाहताना संपूर्ण वेळ मी अगदी एका जागी चिटकून होते. नंतर मी आधीचे चौदा भाग व आजवर झालेले पाचही सीझन संपूर्ण पाहिले. बऱ्याच जणांना हा कार्यक्रम माहीत असेलच तरीही थोडी रूपरेषा देते.

मुळात ही मालिका २००३ मध्ये युकेत सुरू झाली. आणि प्रचंड प्रसिद्धी पावली. अनेक अवॉर्डस मिळालीच पण अतिशय मानाचे असे BAFTA-(ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स )अवार्ड सगळ्यात चांगला रिऍलीटी शो म्हणून मिळाले. तसेच गोल्डन रोझ हे इंटरनॅशनल रोझ डी-ऑर फेस्टीवलचे अवार्ड शिवाय युरोपमधील टेलिव्हिजन वरील टॉप मनोरंजन कार्यक्रमाचे अवार्डही मिळाले. यावरून लक्षात येईलच की ही संकल्पना किती मनांवर परिणाम करते आहे ते.

वाइफ स्वॅप ही मालिका २६ सप्टें,२००४ रोजी इथे सुरू झाली. याची संकल्पना अशी आहे की, अमेरिकेतील दोन टोकाच्या म्हणजे भौगोलिक दृष्ट्या व जीवन पद्धती या दोन्ही प्रकारे अगदी विरुद्ध ठिकाणी वास्तव्य असलेल्या व जीवन जगणाऱ्या दोन कुटुंबाची निवड करून त्या दोन्ही घरातील बायकांची अदलाबदली करायची. आता या दोन्ही बायकांनी तसेच त्यांच्या घरातल्यांनी नेमके काय करायचे याची चौकट-रूपरेषा ठरवलेली आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे बायकांची अदलाबदली झाल्यावर त्या एकमेकींचे नवरे, मुले व त्यांचे जीवन अनुभवणार. मात्र खाजगी संबंध-बेडरूम्स मात्र शेअर करणार नाहीत. नवीन घरी गेल्यावर त्या बाईच्या भूमिकेत शिरून जगायला कसे वाटते हे अनुभवतील. यातून अनेक गमतीजमती, भांडणे तर कधी कधी अती टोकाच्या घटना म्हणजे नवीन बायकोने घरच सोडून जाणे अशी नाटकेही घडतात. परंतु नंतर याबदलामुळे स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवनावर होणारे व टिकून राहणारे चांगले परिणाम होतात. कधी कधी तर कायमचेच बदल घडतात.

दोन्ही बायका एकमेकींच्या घरात दोन आठवडे राहतील. स्वतःचे घर सोडण्याआधी येणाऱ्या बायकोसाठी गाईड म्हणून एक अहवाल-पुस्तिका लिहून ठेवतील. जेणेकरून तिला हे घर, त्यातील बायको-तिचे वागणे व तिचे कुटुंबीय यांची सविस्तर माहिती मिळेल. दोन्ही बायका पहिल्या आठवड्यात नवीन घरातील स्त्रीच्या भूमिकेतच वावरणार असून, अगदी तिच्या सारखेच कपडे, राहणे, विचार तसेच तिच्या कुटुंबीयाशी असलेले तिचे संबंध, वागणूक अगदी जशीच्या तशीच तिने जगायची आहे. अगदी घरातले खर्च, सामाजिक जीवनातील तिची मिसळणूक इथपर्यंत. म्हणजेच त्याघराची जीवन जगण्याची पद्धत, त्यांचे नियम हे सगळे तिचेच आहेत असे समजून तिने वागायचे. आता हेच किती कठीण आहे पाहा. आणि दुसऱ्या आठवड्यात तिने तिचे नियम, गेल्या आठवड्यात तिला खटकलेल्या, लागलेल्या, चुकीच्या वाटलेल्या गोष्टी बदलून टाकायच्या. म्हणजे ती व तिचे कुटुंब ज्या पद्धतीने जीवन जगते आहे व ते कसे बरोबर आहे/ त्यात किती आनंद आहे / असेच जगायला हवे इत्यादी त्या नवीन कुटुंबाला करायला लावायचे. आणि त्यांनी ते करायचे.

यात सगळ्यात महत्त्वाचा नियम हा कार्यक्रम राबवणाऱ्यांनी केला आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही भाग घेता तेव्हा कोणीही आखलेल्या नियमांविरुद्ध जाणार नाही. मग कितीही त्रास झाला तरीही तो सहन करून शक्य तितके काटेकोर नियम राबवायचे. आता जेव्हा कोणीतरी उपटसुंभ, आजवर कधीही न पाहिले ली बाई घरात घुसते आणि इतक्या वर्षांचे आपले घर-नियम, मुले आणि स्वतःला ( नवऱ्याला ) बदलायला सांगते. तू कसा चुकतो आहेस ते सांगतेच वर मुलांसमोर सांगते हे पचवणे फार कठीण आहे. मग कशी नाटके, ओरडाआरडे, रडारड व कधी कधी अर्व्याच्य शिव्या वगैरे प्रकार होतात. मानापमानाची नाटकेही जोरदार रंगतात.

पण हे जरी घडले तरीही अनेकदा नव्हे ९०% वेळा दुसऱ्याने दाखवल्याने स्वतः व आपली बायकोही करत असलेल्या चुका, अतिरेकी शिस्त, मी म्हणेन तिच पूर्व, हेकेखोरपणा, आपल्या जोडीदाराबद्दलची अनास्था, गृहीत धरण्याची सवय, हिटलरशाही हे प्रकार ठळकपणे दिसतात, जाणवतात व मनाला फार बोचतात. तसेच या अतिरेकांचा तिच्या/ मुलांच्या/त्याच्या मनाला किती त्रास होतो ते कळून येते. आणि बरेचदा यात सुधारणा घडून येतात. घरात नवरा किंवा बायको क्वचित दोघेही हिटलर असतील तर प्रामुख्याने भरडली जातात ती मुलेच. अशा कुटुंबातील मुलांना आपल्या आई-बाबाबद्दल काय वाटते, जीवनात काय करावेसे वाटते इत्यादी मुद्देही समोर येऊन अतिशय चांगल्या गोष्टी, परिवर्तनेही घडतात. हीच या कार्यक्रमाची यशाची पावती आहे.

दोन आठवडे संपले की दोन्ही बायका आपापल्या कुटुंबात परत जातील परंतु जाण्यापूर्वी त्या दोघी व त्यांचे नवरे एकमेकांना एकत्र भेटतील व या पंधरा दिवसात परस्परांच्या घरातील माणसांच्या वृत्तीचा तसेच त्यात्या घरातील बाईचाही आढावा/ अनुभव/आणी अनेक चमत्कारिक गोष्टी समोरासमोर बसून सांगतील. थोडक्यात आरोप-प्रत्यारोप, तर कधी मुद्दे पटल्याने मनापासून आभार आणि झालेल्या टोकाच्या भांडाभांडीतून बोललेले घाणेरडे शब्द, नवीन बायकोला-पर्यायाने आपल्या स्वतःच्या बायकोला( यात उलटही होत असतेच शिवाय मुलेही आहेतच-जी एकतर भरडली जातात किंवा शेफारली जातात ) समजूनच ने घेण्याचा हेकेखोरपणा यासाठीची मागितलेली माफी. हे सगळे जरी असले तरी मी प्रत्येक भागात एक गोष्ट अतिशय महत्त्वाची व साधर्म्याची पाहिली आणि ती म्हणजे प्रत्येक बायको-नवरा व मुले आपल्या स्वतःच्या घराची-माणसांशी अत्यंत घट्ट बांधलेली असतात. पंधरा दिवसांनी ज्या ओढीने ते भेटतात ते पाहिले की फार फार बरे वाटते. अगदी एकच घर आजवर झालेल्या पाच सीझन मधील प्रचंड भागात असे होते की जे या बदलाबदलीनंतर मोडले. कदाचित ते मुळातच त्या दिशेने चालत होते आणि ही शेवटची काडी पडली असावी.

कोणीही मनुष्य तसेच कुठलेही घर अचानकपणे समूळ बदलू शकतच नाही. परंतु आपल्याच माणसांच्या मनात काय चालले आहे हे बरेचदा कळून येत नाही किंवा ते समजून घेण्याची गरजच वाटत नाही. मुलांनी असे म्हणजे असेच वागले पाहिजे. मी म्हणेन त्याच मार्गाने चालले पाहिजे, घरातील अमुक अमुक कामे कुठल्याही स्थितीत - मग ताप आलेला असो किंवा परीक्षा असो केलीच पाहिजेत. तर कधी फक्त धमाल करणे अशा प्रवृत्तीची माणसे कधी आयुष्य गंभीरपणे घेतच नाहीत शिवाय आपल्या मुलांनाही तसेच शिकवतात. मग होणारे त्रास अपरिहार्य असतात म्हणून ते कसे टाळता येतील. एक ना दोन, अनेक मुद्दे- माणसाच्या मनाचे कंगोरे, भूमिका यातून समोर येतात.

मी कुठेही तुलना करत नाही हे प्रथमच स्पष्ट करते. हे पाहताना वारंवार माझ्या मनात विचार आला, हे जर आपल्याकडे केले तर काय परिणाम करू शकेल? मुळात आपली कुटुंबसंस्था बळकट आहे. त्यात इथे अगदी घरटी सापडणारे टोकाचे स्वभाव आपल्याकडे कमी दिसून येतात. परस्पर सामंजस्य, आदर, मुलांच्या प्रती असलेले प्रचंड प्रेम या आपल्या जमेच्या बाजू आहेत.( याचा अर्थ इथल्या लोकांमध्ये हे गुण नाहीत असा कोणी काढू नये.) राखी सावंतचे स्वयंवर दाखवण्यापेक्षा किंवा इतर रिऍलीटी शोजच्या भ्रष्ट नक्कल करून प्रेक्षकांचा अमूल्य वेळ फुकट घालवण्यापेक्षा हा प्रयोग करून पाहावा. जर होम मिनिस्टरचा दीर घराघरात जाऊन त्यांना आपलेसे करू शकतो, बोलायला लावू शकतो शिवाय कोपरखळ्याही मारू शकतो तर या प्रयोगालाही प्रतिसाद मिळू शकेल. आणि समजा खरेखुरे लोक भाग घ्यायला तयार नसतील-( यात चूक काहीच नाही कारण आपण अजून तितके मोकळे, पारदर्शी होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनाची घडण पटकन बदलणे शक्यच नाहीये. तेव्हा काहीतरी खुळचटपणा न करता- आजकाल रिऍलीटीच्या नावाखाली घराघरात घुसून न्यूज चॅनलवाले जे चाळे करतात - माणूस गेलाय आणि बायकोला विचारतात तुला काय वाटते याच्या मरण्याबद्दल- किती दुर्दैव. ) तर कलाकारांना घेऊन करावा. यशस्वीही होईल. आता कोणीतरी असेही म्हणेल या प्रबोधनाची काय गरज आहे तर मग पुढे काही न बोलावे हेच योग्य.

बदल हा स्वीकारणे-पचवणे हे तुमच्या मनावरच सर्वस्वी अवलंबून असते. मानले, समजून घेतले तर अतिशय सोपे आणि हटवाद सोडला नाही तर अशक्यच. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष सहभाग होणारे व आपल्यासारखे असंख्य पाहणारे- अप्रत्यक्ष सहभागी या सगळ्यांवरच याचा निश्चित व चांगला परिणाम होतो हे नक्की.

Wednesday, September 9, 2009

सगळ्यांचे प्रिय बटाटेवडे


बटाटेवडे - नुसत्या विचारानेच तोंडाला पाणी सुटते. खरे ना? अनेक ठिकाणी यांची चव आपण चाखलेली आहे. त्यातल्या काहींची चव आपल्या खास आवडीची असते. मग त्यासाठी आपण घरापासून लांब का जवळ हे न पाहता हमखास व वारंवार तिथे जातोच. पण ही चैन मायदेशातच आहे ना? इथे खायचे तर आयते-मायते मिळण्याचे ख्वाब मायदेशाच्या वारीसाठी ठेवून स्वतः कष्टायलाच हवे . खपून वडे करून घरच्यांना खायला द्यावेत आणि उत्सुकतेने त्यांच्या डोळ्यात पावतीची उत्स्फूर्त दाद शोधावी तर, " अग छानच झालेत गं पण ते आपल्या अमुकतमुक सारखे नाही. " थोडक्यात हॉटेल/गाडीवरच्या सारखे लागत नाहीत असे बोलत सारे मटकावून टाकतात . मग मीही म्हणते, " हं, बरोबरच आहे, कसे आवडणार? यात सडके बटाटे नाहीत की घाम.... ‍" जाऊदे बाई. उगाच काहीतरी डोळ्यासमोर येऊ लागते. मग मी चंग बांधला आणि सगळ्यांना असे बटाटेवडे खिलवले की आता म्हणतात की, " अग मायदेशात गेल्यावर तू कर गं हे इतके सुंदर वडे मी त्याला ( आवडीच्या ठिकाणवाल्याला ) खिलवतोच. तोही पावती देईल. " मी मनात म्हणते हो ना नक्की देईल पण ते चांगले झाल्याची का त्याला कधी नव्हे ते आयते स्वादिष्ट वडे चापायला मिळाले याची.

जिन्नस

  • सहा मोठे बटाटे उकडून
  • एक मध्यम कांदा चिरून
  • सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • सात-आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून, आल्याचा रस दोन मोठे चमचे
  • सात-आठ कडीपत्त्याची पाने तुकडे करून, मुठभर कोथिंबीर चिरून
  • दोन वाट्या बेसन, एक चमचा तांदूळाचे पीठ
  • दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, एक चमचा हिंग
  • चवीनुसार मीठ, फोडणी व तळण्याकरीता तेल

मार्गदर्शन

बटाटे उकडून घेऊन गार झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. हातानेच कुस्करले तर जास्ती चांगले परंतु पीठ होता नये. एका भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ ), तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीनुसार मीठ एकत्र करावे. त्यात प्रथम अर्धे भांडे पाणी ओतून सगळ्या गठूळ्या फोडून मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ असता नये. म्हणून हळूहळू पाणी वाढवावे. साधारण इडलीच्या पिठाइतपतच असावे. एकजीव करताना व केल्यावर एकाच दिशेने फेटावे. ( थोडी हवा निर्माण होईल-तसेच मिश्रणात मोहन किंवा साधे तेल अजिबात घालू नये ) दहा मिनिटे फेटून झाकून ठेवून द्यावे.

कढईत दोन चमचे तेल घेऊन चांगले तापल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यात चिरलेल्या मिरच्या, कडीपत्ता, लसूण, अर्धी कोथिंबीर टाकून तीन मिनिटे मध्यम आचेवर परतून त्यावर कांदा टाकावा. दोन मिनिटे कांदा परतून त्यावर कुस्करलेले/चिरलेले बटाटे टाकून सगळे नीट एकत्र करून आच बंद करावी. जर लागलीच वडे तळायला घेणार असल्यास आल्याचा रस, उरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने मिश्रण एकत्र करून मध्यम आकाराचे गोळे वळून घ्यावेत. ( सगळे एकाच वेळी वळून घेतल्यास तळताना सोयीचे पडते )

मोठ्या आचेवर कढईत तळण्यास पुरेसे तेल घेऊन चांगले तापवून घ्यावे. तोवर पुन्हा तयार बेसनाचे मिश्रण एकाच दिशेने फेटावे. तेल तापले की आच मध्यम ठेवावी. आता बटाट्याचे वळून ठेवलेले गोळे बेसनात घोळून हलकेच कढईत सोडावेत. सोनेरी रंगावर तळून टिश्यूपेपरवर टाकून अनावश्यक तेल टिपून घ्यावेत. हिरवी/लाल चटणी, तळलेली मिरची, सॉस बरोबर किंवा नुसतेच मात्र गरम गरम खावेत.

टीपा

आवरणासाठी बेसनघोळ बनवताना तेल/मोहन घातल्यास वडे जास्ती तेल पितात असा स्वानुभव आहे. ( तसेच ते घालण्याची अजिबात गरजही नसते ) एकाच दिशेने मिश्रण फेटल्याने त्यात हवा तयार होते त्यामुळे आवरण घट्ट-फुगलेले न होता पातळ व हलके होते.
तांदुळाच्या पिठामुळे आवरणाला थोडा कुरकुरीतपणा येतो.
फोडणीमध्ये कांदा असल्याने वडे तळायला घेण्याच्या वेळीच त्यात मीठ घालून गोळे करून घ्यावेत. आधीच मीठ घातल्यास मिश्रणास पाणी सुटून ते पातळ होईल.
आल्याच्या रसाने वडे अतिशय स्वादिष्ट होतात. आल्याचे तुकडे घातल्यास ते सगळ्या मिश्रणाला नीट लागत नाहीत म्हणून रस घालावा.