जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, January 31, 2010

देशोदेशी पुणेरी चुली..........

डायरेक्ट शापच आणि तो पण ........

जबरीच.....

अरेच्या! इथेही.......

रवीवारी असे काय खास असेल.......?



पूर्वी आमच्या गल्लीत राहत होता का रे........

ह्म्म्म्म......


मी इथेच बसणार आणि शिटणार पण....... काय करशील?


जपून ओलांडा रे....... ते वाटच पाहत आहेत......



really.......?



(जालावरून )

Saturday, January 30, 2010

१० वाजून १० मिनिटेच का.....


जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही घड्याळ विकत घ्यायला दुकानात गेलात तर तेथील प्रत्येक घड्याळ १० वाजून १० मिनिटे ( काही वेळा १०.०८ वा १०.१२ असेही दर्शविलेले दिसते ) ही वेळच दाखवते. क्वचित काही वेळा ८ वाजून २० मिनिटेही दिसून येते. बऱ्याच जणांना यामागची कारण मीमांसाही माहीत असेलच. नेमकी वेळ लावायच्या आधी नेहमीच १० वाजून १० मिनिटे हीच वेळ का असते, याबद्दल मलाही नेहमीच कुतूहल होते. गुगलबाबाला विचारताच काही उत्तरे-स्पष्टीकरणे-प्रवाद समोर आले.

या १० वाजून १० मिनिटांमागे काही आख्यायिका जोडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की घड्याळ्याच्या दुकानातील विकावयास ठेवलेल्या घड्याळात दाखवलेली वेळ ही अब्राहम लिंकन/जॉन एफ्. केनेडी/ मार्टीन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या स्मरणार्थ आहे. म्हणजे एक तर त्यांना त्यावेळेला गोळी लागली किंवा ते मरण पावले. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. अब्राहम लिंकन यांना रात्री १०.१५ मिनिटांनी गोळी मारली व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी त्यांचे देहावसान झाले. जेएफके यांना दुपारी १२.३० मिनिटांनी गोळी लागली व दुपारी १ वाजता त्यांना मृत घोषित केले गेले. आणि मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांना संध्या ६.०१ मिनिटांनी गोळी मारली गेली व संध्या ७ वाजून ५ मिनिटांनी मृत घोषित केले.

आणखी एक प्रवाद असाही आहे की नागासाकी किंवा हिरोशिमा यापैकी एका शहरावर १० वाजून १० मिनिटांनी अणुबॉम्ब टाकला गेला. त्यावेळी मारले गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ ही वेळ दाखवली जाते. परंतु लिटल बॉय हा हिरोशिमावर ६ ऑगस्ट,१९४५ रोजी ८.१५ मिनिटांनी व फॅट मॅन हा नागासाकीवर ९ ऑगस्ट,१९४५ रोजी ११.०२ मिनिटांनी टाकला गेला होता. त्यामुळे या प्रवादातही तथ्य दिसत नाही.

जाहीरात करताना किंवा विक्रीसाठी मांडताना घड्याळात १० वाजून १० मिनिटे ही वेळ दर्शविण्यामागे घड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच हेतू प्रामुख्याने असला पाहिजे.

दोन्ही काटे एकावर एक नसल्याने व्यवस्थित व संपूर्ण दिसतात. काट्यांची अशी समअंग रचना ( सिमेट्रिकल -मध्यबिंदू पासून तंतोतंत सारखी परंतु उलट -मिरर इमेज ) बहुतांशी लोकांना अपील होते-आवडते.

घड्याळ कंपनीचा लोगो बहुतेक वेळा १२ आकड्याच्या खाली व घड्याळ्याच्या मध्यभागी असतो. काट्यांच्या या रचनेमुळे तो आकर्षक रित्या मांडला जाऊन लोकांच्या नजरेत भरतो.

टाईमेक्स कंपनीच्या म्हणण्यानुसार पूर्वी ८ वाजून २० मिनिटे ही वेळ दर्शविली जात असे. परंतु घड्याळ हे चेहऱ्याचे प्रतीक मानले तर ८ वाजून २० मिनिटे मधील काट्यांच्या रचनेमुळे चेहरा दुःखी भासतो. याउलट १० वाजून १० मिनिटे मध्ये हसरा चेहरा दिसून येतो. अजूनही ज्या घड्याळांमध्ये कंपनीचा लोगो ६ च्या वर असतो त्या घड्याळांत ८ वाजून २० मिनिटे वेळच दर्शवण्याचा प्रघात आहे.

(माहिती जालावरून संकलित )

Wednesday, January 27, 2010

लोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती

लोकलच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात अनेक बरेवाईट अनुभव-घटना सामावलेल्या. प्रवास करायचा म्हणजे तिकीट-पासही आलाच, मागोमाग टिसीही आलेच. आता इतकी मोठी यंत्रणा चालवायची म्हणजे नियम बनवायला हवेतच शिवाय जर कोणी ते तोडत असतील तर त्यांना दंडही करायलाच हवा ना. पण रोजच कोणी आपला पास तपासू लागले की संताप येणारच. त्यातून नेमका एखादे दिवशी पास संपलेला असावा आणि एरवी दाखवते तरी नको म्हणणारा टिसी आजच हटकून पास दाखव म्हणू लागला की धरणी पोटात घेईल तर बरे अशी अवस्था. माझ्या चेहऱ्यावरच त्याला दिसले असणार की माझा पास संपलाय ते. बघ ना तूच, नेमके आजच कसे दाखव म्हणाला. माझ्या डोक्यात पास शुक्रवारी संपतोय. उद्या सकाळी काढणारच होते ना मी. सगळे आजूबाजूचे कुत्सितपणे हसत मजा पाहत होते. माझा मनस्ताप मी नवऱ्याला सांगत होते आणि तो गालातल्या गालात हसत होता. त्या एका तमाशानंतर मी पुन्हा काही माझ्यावर ही वेळ आणली नाही. दोन दिवस आधीच जाऊन गुपचुप पास काढत असे.

जसे कधीकधी टिसी मुद्दामहून सतावतात तसेच टिसींनाही सतावणारे, पळून जाणारे व त्यांना स्वत:मागे पळायला लावणारेही काही कमी नाहीत. मस्त मजेदार किस्से आपल्या अवतीभोवती रोजचे घडत राहतात. आपल्याला प्रत्येकवेळी ती गंमत अनुभवायला वेळ नसतो पण काही मात्र जणू खास आपली व डब्यातल्या सगळ्यांची करमणूक करायलाच घडतात. रोजच्या गाड्या ठरलेल्या त्यामुळे मैत्रिणी-ग्रुप्सही ठरलेलेच. म्हणजे अगदी नेहमीची गाडी चुकली तरीही पुढच्या दोन-तीन गाड्यांचे समीकरण तयार असतेच. त्या मैत्रिणीही अगदी तितक्याच आपुलकीने आपल्याला सामावून घेतात. सकाळ व संध्याकाळचे हे टॉनिक चुकवणे म्हणजे सगळा दिवस खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत राही. सेलफोन्स बोकाळलेले नव्हतेच. फार क्वचितच एखादीकडे दिसत असे. जिच्याकडे तो असे तिला सारखे कोणाचे तरी फोन्स येत, मग कधी मोठ्याने-सगळ्यांना ऐकू जावेच म्हणूनच मुद्दाम, तर कधी इतकी कुजबूज की ज्याच्याशी बोलतेय त्या व्यक्तीला तरी ऐकू येतेय का नाही हाच प्रश्न सगळ्या पाहणाऱ्यांना सतावत राही.


एकदा अशीच माझी रोजची गाडी अगदी चार पायऱ्यांसाठी चुकली. दोन नंबर पासून जीव काढत धावलेली मी वैतागून गेले. पुन्हा जिने चढून पुलावर जाऊन उभे राहावे तोच अनॉन्स्मेंट झाली. आधीची एक लेट झालेली फास्ट तिनावर येते आहे. चला, हे बरे झाले बाई. नाहीतर आज थोडक्यासाठी उशीर होत होता. गाडी आलीही. चढून जरा दम टाकत होते तोच समोर टिसी. मी पर्समध्ये हात घातला तर म्हणाली नको. मी मनोमन खूश. आजूबाजूच्या दोघीतिघींनाही तिने राहू दे म्हणून सांगितले. आम्ही सगळ्या जरा नवलच करत होतो. टिसी एकदम डब्याच्या आत घुसली. आधीच फर्स्टक्लासचा लेडीज डब्बा एवढासा त्यात सकाळी आठ ते अकरा म्हणजे गर्दीचा कहर. आणि त्यावर टिसी आला/आली की ज्याच्या त्याच्या नजरेत चिडचिडेपणा येत असे. जणू ही सारी गैरसोय तिनेच केली आहे या थाटात सगळ्या तो जाहीर उघडही करीत. टिसींची कातडी या साऱ्याला सरावलेली. काय करतील रोजचेच झालेय म्हटल्यावर.

तर ही टिसी खिडकीशी एक जण अगदी हळूहळू सेलवर कुजबुजत होती तिच्याकडे गेली आणि तिकीट म्हणून विचारू लागली. त्या मुलीने अगदी आश्चर्यचकित झाल्याचे भाव डोळ्यात आणत हातानेच तिला आहे ना... असा इशारा केला. सेलवरचे बोलणे सुरूच होते. टिसी म्हणाली, तिकीट दाखव. तसे पलीकडच्या व्यक्तीला एक मिनिट थांब असे सांगत टिसीला म्हणाली, " मी बोलतेय ना, दिसत नाही का? आहे ना पास. रोज रोज काय दाखवायचा? इथे इतक्या जणी आहेत त्यांना विचार ना, मी काय पळून जातेय का? बोलणे संपले की दाखवतेच. " आता हे सगळे बोलण्यापेक्षा पटकन पास दाखवून टाकायचा तर...... टिसी बरं म्हणाली आणि इतरांकडे वळली. इतरजणी त्या सेलवालीवर जाम वैतागल्या. नसता उच्छाद, हिला कोणी सांगितलेय नको ते सल्ले द्यायला, वगैरे बडबडत पर्स मधून पास काढू लागल्या.

टिसीची पाठ वळताच ही खिडकीवाली पटकन उठली. समोरच उभ्या असलेल्या एकीला हाताला धरून आपल्या जागेवर बसवले. आणि हळूहळू सरकत सरकत आतून बाहेर आली. बऱ्याच जणी पाहत होत्या. पण प्रत्येकीला वाटले हिचे स्टेशन येत असेल तेव्हा..... तोच टिसीबाई वळल्या आणि हिच्यामागोमाग बाहेर आल्या. " अहो, झाले का बोलणे? आता पास दाखवताय ना? " टिसीचा आवाज जरा चढलाच होता. हिने एकवार टिसीकडे पाहिले आणि शांतपणे पर्समधून पाकीट काढले. इतका वेळ बघत असलेल्या आम्ही सगळ्या , काय पण ही टिसी... उगाच एखाद्याच्या मागे लागायचे म्हणजे... असे मनात म्हणत होतोच, तोच हिने पर्समधून पासच्या ऐवजी दोनशे रुपये काढले आणि टिसीच्या हातावर ठेवले.

क्षणभर टिसीही चकीतच झाली पण अश्या बायकांची तिला सवय असणारच. विजयी मुद्रेने तिने, " काय... चकटफू प्रवास करायला हवा ना? तोही फर्स्टक्लास मधून? "त्यावर टिसीलाच झापत, " अहो, उगाच फालतू बडबड नकोय. मी कळव्याला चढलेय, आता भांडूप येतेय. तेव्हा जो काय मिनिमम होइल तो दंड घ्या. चला पटापट. जितकी स्टेशन्स पुढे जातील तितक्याला तुम्ही जबाबदार, मी त्याचे पैसे भरणार नाही. " हिचाच आवाज चढलेला. टिसीने पावती फाडली तिला दिली आणि वळली. " उरलेले पैसे काय उद्या देणार का? " टिसीपण... वेंधळेपणा की मुद्दाम... पण उरलेले पैसे दिलेच नव्हते ना.... मग चडफडत दिले, ही उतरली. माझी खात्री आहे, मागून येणारी गाडी तिने पकडली असणार. हा रोजचाच प्रकार असेल. एकतर डब्यात टिसी काही रोज येतच नाहीत. चुकून आलाच तर तो तुमच्यापर्यंत पोचेलच असेही नाही. तीन-चार महिन्यातून एकदा असे पैसे द्यावे लागले तरी किती फायद्याचा सौदा होता की हा. पन्हा ना खेद ना खंत.

एकदा अश्याच एक वयस्कर बाई धावतपळत आल्या. " अगो, परेलला थांबेल ना ही गाडी?" मी हो म्हटले. तश्या चढू लागल्या. त्यांना थांबवत मी हा फर्स्टक्लास असल्याचे सांगितले आणि अगदी दहा पावलांवरच असलेल्या सेकंडच्या डब्याकडे बोट दाखवत तिथे जा असेही सांगितले. तसे, " मला माहीत आहे हा पेशल डब्बा आहे ते. माझ्या लेकीने इथेच चढायचे असे बजावून सांगितलेय. तिकीट आहे ना माझ्याकडे." मी चूप. तिकीट असू शकतेच ना....... त्या चढल्या. मुलुंडाला टिसी आली. आमचे पास पाहून पुढे पुढे सरकत या बाईंकडे पोचली. तिकीट दाखवा मावशी, आहे ना? असे विचारताच यांनी सेकंड्चे तिकीट काढून टिसीला दिले. अहो हा फर्स्टक्लास आहे. तुम्ही इथे कशाला चढलात? अगो बया, मला काय माहीत या डब्यात चढायचे नाही. सगळे चढले मग मीही चढले." " हो का? बरं, आता उतरा भांडुपाला आणि जा सेकंडमध्ये. पुन्हा सापडलात तर दंड वसूल केल्याशिवाय सोडणार नाही मी " असे सांगून ती पुढे गेली. या डामरट बाईला मी एवढे सांगूनही - खरे तर तिलाही ते माहीतच होते, तरीही ही आरामात चढली होती. उभा जन्म लोकलने प्रवास केला असेल तिने वर हा अडाणीपणाचा आव...... धन्य. पुन्हा पुढच्यावेळी ती हमखास फर्स्टक्लासच गाठणार होतीच.

माझी जवळची मैत्रीण, दिवस अगदी भरत आलेले तिचे. वसई ते बॉम्बे सेंट्रल, रोजचाच प्रवास. तिकडून शेअर टॅक्सीने ऑफिस. शेअर टॅक्सी मिळवायची असेल तर तुम्हाला झटकन स्टेशनबाहेर पडायला हवे. एकदा का मेंबर पटापट टॅक्सी पकडून गेले की पंचाईत. एकच टिसी रोजच हिला अडवून पास विचारी. आधीच हिचा जीव मेटाकुटीला आलेला तश्यांत हा उच्छाद. एके दिवशी त्याने पास विचारताच ही थांबलीच नाही. सरळ चालू पडली. "ओ मॅडम, कहाँ जा रही हो? तिकीट किधर है?" तुला रोजच माझे तिकीट पाहायचेय ना? मला थांबायला वेळ नाही आत्ता. तू ये माझ्या मागोमाग. ऑफिसमध्ये पोचले ना की दाखवते हं का तुला माझा पास." असे म्हणत ही पुढे आणि टिसी मागे. शेवटी अगदी गेटपर्यंत पोचल्यावर टिसीने नाद सोडला. ही पठ्ठी काही थांबलीच नाही.

काहीवेळा खरोखरच पास संपत आलाय/संपलाय हे लक्षातच नसते. मग अशावेळी अगदी दयनीय अवस्था होऊन जाते. तर कधी काही लोक अतिशय बेमुर्वत आणि निर्लज्ज असतात. तर काहींचा एकदम कॅलक्युलेटेड हिशोब असतो. जोवर लोकल आहे तोवर किस्से तर घडतच राहणार. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार त्यांचे रंगही वेगवेगळे असणार... कधी रडवेले, कधी टाईमपास करणारे तर कधी हळहळ वाटावी असे.

Monday, January 25, 2010

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: नचिकेत सरदेसाई)

सगळे देशभक्त व ज्ञात-अज्ञात वीरांना सलाम व श्रध्दांजली

चवळी - उसळ

जिन्नस

  • भिजलेल्या दोन वाटी चवळ्या.
  • एक चमचा जिरे, चार चमचे सुके खोबरे व दोन-तीन सुक्या लाल मिरच्या
  • चार-पाच अमसुले, दीड चमचा घाटी मसाला, चवीनुसार मीठ
  • चार चमचे तेल, फोडणी-नेहमीचीच ( मोहरी+हिंग+हळद व लाल तिखट-आवडीनुसार )
  • मूठभर कोथिंबीर बारीक चिरून

मार्गदर्शन

चवळी ( कडधान्य ) भाजी करण्याआधी आठ-दहा तास भिजत घालावे. चांगले भिजले की उपसून ठेवावे. पातेल्यात तेल घालून ते चांगले तापले की मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर भिजलेल्या चवळ्या टाकून परतावे. दोन भांडी पाणी घालून झाकून मध्यम आचेवर दहा मिनिटे शिजू द्यावे. एकीकडे खोबरे, जिरे व सुक्या मिरच्या भाजून वाटून घ्याव्यात. चांगली वाफ आली की झाकण काढून त्यात हा वाटलेला मसाला, लाल तिखट व अर्धी कोथिंबीर घालून पुन्हा पाच-सहा मिनिटे शिजू द्यावे. आता चवळ्या बोटचेप्या झाल्या असतील. त्यात चवीनुसार मीठ, आमसुले व घाटी मसाला व एक भांडे पाणी घालून एक सणसणीत उकळी आणून आचेवरून उतरवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी.

टीपा

चवळ्यांचा गाळ होईल इतक्या शिजवू नयेत. घाटी मसाला नसल्यास चार-पाच लसूण पाकळ्या ठेचून फोडणीत घालाव्यात. जिरे, खोबरे, मिरची बरोबरच अर्धा मध्यम कांदाही भाजून वाटून चवळीला लावावा. गूळ-साखर आवडत असल्यास घालावी. घालावयाची असल्यास, एक चमचा साखर/तीन मध्यम गुळाचे खडे घालावेत. वरून फोडणी आवडत असल्यास घालावी. त्याने उसळ अजूनच खमखमीत लागते. ही फोडणी करताना तीन चमचे तेलात मोहरी, हिंग व सुक्या मिरच्या घालाव्यात. हळद-तिखट घालू नये. सुक्या मिरच्या नसल्यास आच बंद करून नंतरच लाल तिखट घालावे. अन्यथा तिखट पटकन जळते.

Friday, January 22, 2010

नटरंग....



चार दिवसांपूर्वी ऑरकुटवरील माझ्या एका मैत्रिणीने आवर्जून सांगितले की ' आपली मराठी ’ वर फक्त मोजक्याच दिवसांसाठी ' नटरंग ’ पाहता येईल. मग काय मी सगळी कामेधामे सोडून आपली मराठीचा रस्ता धरला. बैठक मारून अगदी तल्लीन होऊन संपूर्ण सिनेमा पाहिला. मुळात ' नटरंग ’ चे लेखक श्री. आनंद यादव म्हणजे, " झोंबी, नांगरणी, स्पर्शकमळे, गोतावळा, पाणभवरे आणि बरेच काही सशक्त लेखन करणारे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक व माझा मित्र श्री. मिलिंद मुळिक( प्रसिद्ध चित्रकार ) याचे सासरे असल्याने अजूनच जिव्हाळ्याचे. तश्यांत मायदेशी आलेली असताना त्यांच्याघरी गेलो असताना, ध्यान-जप-मन:शांती अन इतरही काही बाबींवर बरीच चर्चा केलेली. शिवाय काकूंच्या हातची झकास ' कच्छी दाबेली व फर्मास चहाची ' मेजवानीही हाणलेली. आणि ' अतुल ’ आहे म्हणजे ' न पाहणे ’ हा पर्याय खुला नाही. दोस्त आहे राव - शूटिंग सुरू झाल्यापासून खबरी मिळत होत्या. तेव्हा कधी एकदा सिनेमा येतोय आणि मी पाहतेय असे झालेले. पण आम्ही पल्याडकर- जोवर डिवीडी-विसीडी बाजारात येत नाही आणि ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोवर नुसती वाट पाहत राहायची. त्यामुळे मैत्रिणीचा निरोप मिळताच एका झटक्यात ' नटरंग ’ पाहिला. एका कलंदराच्या जीवनाचा कलेच्या वेडापायी झालेला तमाशा म्हणजेच ’ नटरंग ’.

गेले काही महिने या चित्रपटाची गाणी-विशेषतः अमृता खानविलकरचे ' वाजले की बारा ’ व सोनालीचे ' अप्सरा आलीs...’ व ’ नटरंग उभा - टायटल सॊंग ’, बरेच वेळा ऐकली होतीच. नटरंगच्या सगळ्याच गाण्यांचे बोल जास्ती परिणामकारक आहेत. खालोखाल संगीत. शिवाय झी ने प्रचंड गाजावाजा केल्याचेही ऐकत होते. मी ही कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे मूळ कादंबरी व लिहिलेली पटकथा यात किती फेरफार केले आहेत हे मला कळलेले नाही. तरीही श्री. यादवकाका व अतुल ही दोन अस्सल खणखणीत नाणी असल्यामुळे व झी ची प्रचंड प्रसिद्धी पन्नास टक्के डिस्कॉउंट करूनही माझ्या या चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा फारच जास्त असल्या पाहिजेत. लागोपाठ दोन वेळा एका दिवसाचे अंतर ठेवून ' नटरंग ’ पाहिला. गेले चार दिवस मनात तोच घोळत आहे. प्रथम पाहताना, दुसऱ्यांदा पाहताना व दोन दिवस उलटून गेल्यावरही काही विचार तेच राहिलेत. तेव्हा तो पाहून मला काय वाटले ते लिहीत आहे.

गेली बरीच वर्षे म्हणजे - ' आशिकी ’ ( १९९० साली आलेली, महेश भट दिग्दर्शित ) पासून चित्रपट येण्याआधीच सहा महिने आधी गाणी जिकडेतिकडे वाजवायची आणि एक जबरदस्त हवा निर्माण करायची हा पायंडा पाडला व रुजलाही गेला. अर्थात त्यासाठी गाण्यांमध्ये थोडा तरी दम हवाच. पण तो नसला तरीही सतत ऐकून गाणी लोकांच्या कानावर तरी रुळतातच. मराठीतही गेली काही वर्षे असे करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. प्रसिद्धी हवीच त्याशिवाय निभाव लागणार नाहीच. परंतु मराठी सिनेमात यापेक्षाही अतिशय चांगली गाणी आलेली आहेत. तरीही 'वाजले की बारा ’ व ' अप्सरा आली ’ ही संगीत व अप्सरा-सोनालीमुळे जास्त प्रभावी झालीत असे वाटत राहते.

मुळात ’ गुणा ’ हा पैलवान गडी आहे. शेतमजुरी हा त्याचा पेशा. कमावलेलं शरीर असलं तरी मनात कुठेतरी तमाशा-त्यातला वग-लावण्या यावर त्याचा जीव - ओढा आहे. परंतु तो बाईलवेडा नाहीये. त्यामुळेच जेव्हां तमाशा काढायचा हे ठरते तेव्हा त्यात बाईही हवीच हे समीकरण त्याच्या डोक्यात नसतेच. कलेवरील प्रेमाने भारलेला कलावंत गडी. कलेवरच्या प्रेमापायी आणि घरातील दारिद्र्याने, ओढग्रस्तीने त्रासलेल्या गुणाचा हा एक प्रयत्न.

आता जेव्हां यात ' नयना ’ चे पात्र येते तेव्हा काही बदल होणारच हे अपरिहार्य आहेच. नयनाच्या पहिल्याच दोन तीन प्रसंगातच हा मर्दगडी तिला आवडतोय हे सहज कळून येते. म्हणजे तसे दिग्दर्शकाने हेतुपुरत्सर दाखवले आहेच. नयनाच्या जन्माचा/बापाचा उल्लेख असला तरी नयनाच्या पूर्वायुष्याचा अजिबातच उल्लेख नाही. परंतु एकंदरीत तिने तमाशात नाचण्यास तयार होणे, गुणाकडे पाहताना डोळ्यांतून, आवाजांतून- नखरेलपण-लाडिकपणा-आव्हान आणि लचकणे-मुरडणे पाहता तिला या मर्द गड्याची ओढ असावी असे जाणवते. त्याचे लग्न झाले आहे-पोरे-बाळे आहेत हे तिला माहीत असेल असे गृहीत धरले तर, तरीही तिचे गुणाला आकर्षित करणे म्हणजे तिला समाजाची-लोकलाजेची किंवा नीतिमत्तेची फारशी काही पर्वा नसावी हेही गृहीतच धरायला हवे. तमाशात नाच्या हवाच ही अट घालणे समजू शकते परंतु गुणा नाच्या बनतोय म्हटल्यावरही ती तिच्या अटीवर अडून राहते. एवढेच नाही तर तिचे डोळे खट्याळपणे व काहीसे कुत्सितपणे लकाकतात हे मात्र पटले नाही. नयनाला मर्द गडी हवा आहे मग खरे तर तिने गुणाला हे काम करूच देता नये. घडते उलटच.

तमाशा नाच्याबिगर होऊच शकत नाही आणि दुसरे कोणी तयार होत नाही हे पाहून एका असहाय क्षणी नाच्याची भूमिका स्वतःच करायचा उरफाटा निर्णय गुणा घेतो. " अरे पर म्या तर राजा हाय नवं........मग......." हा प्रश्न खरे तर तो स्वतःलाच विचारत असतो. गुणाची ती अगतिकता अतुलने चांगली व्यक्त केली आहे. केवळ सदैव पाहिलेले-खरे झालेच पाहिजे असे स्वप्न पूर्ण व्हावे, आपले-घरादाराचे भविष्य घडावे या आशेने नाचा होण्याची तडजोड स्वतःहून स्वीकारतो. पण मुळातला तो पैलवान गडी. केवळ मंचावर फालका माणूस आहे हे समाज पाहत नाही त्यामुळे पुढे जे जे घडते अन गुणाला ही औटघटकेची भूमिकाच खाऊन टाकते याचे चित्रण परिणामकारक झाले आहे.

अजून एक अतिशय खटकलेली घटना म्हणजे गुणाला पुढे करून काम साधणे. हे गळी उतरणे कठीणच आहे. क्षेत्र कुठलेही असेल पण काम साधण्यासाठी नाचाला पुढे करणे हे अशक्यच आहे. तमाशात नयना सारखी नखरेल, नाजूक तरुण नार असताना नाचाला शिंदेशी अशी जवळीक करायला लावून सुपारी मिळवणे म्हणजे अजब गणित आहे. बरे हा शिंदे काही ' त्यातला-समलिंगी संबंधातला ’ दाखवलेला नाही की साधा बोलण्यातूनही तसा उल्लेख नाही. आणि गुणाचे हे असे लाडेलाडे बोलणे-घोळात घेणे एकवेळ नयनाबाई तिथेच बसलेली असताना झाले असते तरीही खपले असते. तिचे मादक कटाक्ष-देहबोली व गुणाचे शब्द. पण तसेही घडत नाही. केवळ पुढचे नाट्य घडवता यावे यासाठी हा प्रसंग रचला गेलाय असेच वाटत राहते.

पुढचा सारा प्रवास-प्रसिद्धी भरभर होते. मग लगोलग पुरस्कारही मिळतो. मग येणाऱ्या सुपाऱ्या, राजकारणी लोकांची कारस्थाने- हेवेदावे आणि त्यातून नाचावर - गुणावर झालेला बलात्कार. नयनाबाईला सोडून गुणाला पळवणे- म्हणजे दोघांनाही पळवले गेलेले दाखवले असते तर जास्त खरे वाटले असते. गुणाचे घरी परत येणे. बाप मेलाय हे तेव्हा तरी कळले असेलच ना..... पण दोन मिनिटांचाही प्रसंग - विवशता - बोच काहीच नाही. अतुलने त्या दोन मिनिटांचेही सोने केले असते. मुळात गुणाची व्यक्तिरेखा व्यवस्थित खुलवायला हवी होती. त्याच्यातला कलाकार, लेखन सामर्थ्य फारसे काही भरीव दाखवले गेलेच नाही. चार टाळकी जमून जेव्हां एखादी सुरवात करतात तेव्हा एकदम काही बेष्ट असत नाहीत पण हळूहळू बदल होतोच ना? इथे तसे काही जाणवतच नाही. तसेच एकदा उध्वस्त झाल्यावर पुन्हा उभारी धरून झालेल्या गुणाच्या आयुष्याची कहाणी अक्षरश: गुंडाळली--नाही उरकूनच टाकली आहे. ' जीवन गौरव ' इतका मोठा मानाचा पुरस्कार प्राप्त व्हावा असे गुणाने काय केले हे उलगडतच नाही. म्हणजे प्रेक्षकांनी सगळे समजून घ्यायचे का? गुणातला ' तो-स्पार्क ' ना आधी नीट व्यक्त होत ना नंतर. मूळ कथानकात हे दाखवले असल्यास पटकथेचा जीव दुबळा झाला असे म्हणावे लागेल आणि मूळ पुस्तकातही ते नसेल तर मात्र तसे मुद्दाम असायला हवे होते असे वाटत राहते.

काही चित्रपट, दिग्दर्शक स्वतःच्या कसबावर जिंकून नेतात तर काही टीम वर्कने तरून जातात. इथे कलाकारांनी अभिनय सामर्थ्यावर व अजय-अतुलच्या संगीतावर सिनेमा तडीस लावला आहे. ’ गुणा-अतुल कुलकर्णी ’. नव्याने काहीही सांगायची गरज नाही. किती ताकदीचा व कसदार अभिनेता आहे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. या सिनेमातही प्रचंड मेहनत घेऊन अतुलने गुणाची दोन्ही रुपं अप्रतिम सादर केलीत. बायकापोरांची-बापाची जबाबदारी असूनही फारसे त्यात न गुंतता स्वतः:च्या स्वप्नांसाठी आयुष्य झोकून टाकणाऱ्या - भारलेल्या वेड्याची भूमिका अतुलने समरसून केली आहे. मुळात अतुलची शरीरयष्टी पैलवान प्रकारातील नाहीच. त्यामुळे मेहनत घेऊन तितके मजबूत-पीळदार शरीर कमावले आणि लगोलग इतके उतरवले की नाचाच्या चेहऱ्याला गरजेचा तो उभेपणा, गालफडे आत, मान काटकुळी...... मानले पाहिजे. नुसतेच अभिनय कसब या चित्रपटासाठी पुरेसे नसून भूमिकेसाठी देहबोलीची तितकीच नितांत गरज आहे हे जाणून ती गरज समर्थपणे पुरी केली आहे. मात्र कधीकधी जास्त शुद्ध बोलतो -शिक्षणामुळे आपसूक होणारे उच्चार डोकावतात. शिवाय नाच्याचे काही संवाद तोंडातल्या तोंडात वाटतात. लेकरू तोंडावर थुकते अन पाठ फिरवते त्यावेळी गुणाचा चेहरा जास्ती विदीर्ण व्हायला हवा होता - फाटलेले काळीज दिसायला हवे होते.

सोनाली कुलकर्णी( नंबर-२...
) ने मात्र झकास काम केले आहे. मला तिची एंट्रीच एकदम आवडून गेली. जत्रेत तिचे स्वतःच्याच मस्तीत बेभान होऊन नाचणे सहीच झालेय. तिचे लटके-झटके, मुरडणे मस्तच. तमाशाप्रधान नृत्यात तेच तेच असते तरी सोनालीने त्यात जान ओतली आहे. गुणाची बायको- विभावरी देशपांडे यांनी मन लावून भूमिका केली आहे. घर चालायला हवे म्हणून नवऱ्याने कामाला जावे, शेती करावी याकरिता तिचे गुणाला मनवणे, सासऱ्याची तगमग, नवऱ्याचे स्वप्न- त्याची ओढ, त्याची अगतिकता समजून घेण्याचा प्रयत्न, नाचा झाल्यावर ते काम सोडून दुसरे काहीबाही करावे चा वडिलाबरोबर केलेला प्रयत्न व सरतेशेवटी घडलेल्या घटनेने, समाजातील छीः थूने पोळलेली, आयुष्याचे वाटोळे झाले या भावनेने खचलेल्या गुणाच्या बायकोचे काम नीटस केले आहे. किशोर कदम यांचे काम नेहमीप्रमाणेच आहे. खास वेगळेपणा काहीच जाणवत नाही.ते आता टाईप कास्ट होऊ लागलेत. उदय सबनीस यांनी छोटेसेच काम नेटके केलेय. गुणाच्या बरोबरीला सगळ्याच कलाकारांनी योग्य ती साथ दिली आहे.

अजय-अतुल चे संगीत एकंदरीत चांगले झाले आहेच. गाणी मनात रेंगाळतात - काही काळाने आपण गुणगुणू लागतो. ’ खेळ मांडला ’ काळजाचा ठाव घेणारे बोल आणि अजय-अतुलचे संगीत, लाजवाब.

तुझ्या पायरीशी कुनी सान-थोर न्हाई,

साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई,

तरी देवा सरना ह्यो भोग तशा पाई,

हरवली वाट दिशा अंधारल्या धाई,

वोवाळुनी उधळतो जीव मायबापा,

वनवा ह्यो उरी पेटला,

खेळ मांडला,... देवा....खेळ मांडला |


सांडली गा रीतभात, घेतला वसा तुझा,

तुच वाट दाखीव गा, खेळ मांडला,

दावी देवा पैलपार, पाठीशी तू र्‍हा उभा,

ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला ||धॄ||


हे... उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई,

भेगाळल्या भुईपरी जिनं, अंगार जीवाला जाळी,

बळं दे झिजायाला, कीरतीची ढाल दे,

ईनविती पंचप्रान, जीवारात ताल दे,

करपलं रान, देवा जळलं शिवारं,

तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला ||१||

एकंदरीत दोन वेळा सिनेमा पाहीला, गेले काही दिवस अनेक ठिकाणी आलेला वृत्तांत, समीक्षाही वाचली. मुळातच माझ्या मनात शूटिंग सुरू झाल्यापासूनच एक अपेक्षा तयार होत होती. त्यात अतिरेक प्रसिद्धीचा मारा. हा सिनेमा नक्कीच एका उंचीवर नेणारा असेल हे मनाने आधीच ठरवून टाकल्यामुळे असेल पण काहीसा अपेक्षाभंगच झाला. मी चित्रपट मनाची पाटी कोरी ठेवून पाहिला असता तर कदाचित मत थोडेसे( थोडेसेच ) वेगळेही झाले असते. असे असले तरीही आपण सगळेच हा सिनेमा नक्कीच पाहणार व जरूर पाहायला हवा यात दुमत नाही. सिनेमा प्रभावी आहे व बराच काळ गुंतवून ठेवणारा - मनात रेंगाळत राहणारा आहेच. मुख्य म्हणजे नेहमीचा घिसापीटा मराठी सिनेमांचा मामला नसून वेगळेपणा आहे. तमाशाप्रधान, नुसतीच यथातथा करमणुक करणारा चित्रपट इतकेच समीकरण नाही, जरूर पाहा.

Wednesday, January 20, 2010

अपघात....का घातपात+मिलीभगत......?

आज दुपारी नेहमीप्रमाणे जालावर मटा वाचायला घेतला तर नजर एका बातमीवर खिळून राहिली. 'बंद गिरणी आगीत खाक '. माझे सारे बालपण गिरणगावात गेलेले. आमच्या घरातले कोणीही मिल मध्ये कामाला नसले तरीही आसपासचे बहुतांशी लोक वेगवेगळ्या मिल्समध्येच होते. मिल्स, तिथे चालणारे काम, रात्रपाळी-दिवसपाळी-ते तीन पाळ्यांचे गणित, डबेवाले, मिल्सच्या बाहेर बसणारे अनेकविध विक्रेते. केवळ मिलच्या जीवावरच चालणाऱ्या खानावळी. गणपती-गोविंदा, शिमगा व दिवाळीला मिळणारी उचल, ओव्हरटाइमची रोखी. मिल्सची स्वतःची असलेली दुकाने, त्यांची मिळणारी कुपने. त्यांच्या मुकादमांची-कटकटींची, खाड्यांची चालणारी चर्चा.

त्यांचे संप, मागण्या, कामगार नेते श्री. दत्ता सामंत, हे सगळे आमच्याही अगदी जिव्हाळ्याचे होते. दत्ता सामंत यांचा आमच्या मनावर फार पगडा होता. ना मी कधीही त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले का ऐकलेले( लहानपणी ). पण आमच्या शेजारी राहणाऱ्या घाटीमामांच्या तोंडून त्यांचे नाव वारंवार ऐकून ऐकून आम्ही अक्षरशः भारले गेलेलो. गिरणी मालक भयंकर पिळवणूक करणारेच असतात व फक्त कामगार नेते श्री. दत्ता सामंतच एकटे त्या सगळ्यांशी निकराने लढा देत कामगारांचे भले करत आहेत. अगदी शाळेतही यावर नेहमीच चर्चा रंगे. सामंतसाहेबांचे सगळेच बरोबर नसेलही परंतु त्यांना कामगारांचा कळवळा आहे यावर आमच्यात नेहमीच एकमत होते. सहावी-सातवीतले आम्ही, जे समोर दिसे त्यावर गाढ विश्वास होता आमचा. पडद्यामागे काय चालते हे कधी दिसले नाही आणि दिसले असते तरी त्या वयात फारसे कळलेही नसतेच म्हणा.

जळालेल्या गिरणीचे नाव वाचले. ' गोल्ड मोहोर ', अरे देवा! केसरबागेच्या बरोबर समोरच आमची चाळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर. आमची शाळा म्हणजे, ' तीर्थस्वरूप ताराबाई मोडकांची- शिशुविहार माध्यमिक विद्यामंदीर. ' ' दादासाहेब फाळके ’ मार्गावरूनच आम्ही रोज शाळेला जात-येत असू. ' गोल्डमोहोर ' मिल आमच्या वाटेवरच. ' रूपतारा स्टुडिओच्या ’ साधारण समोरच म्हणायला हवी. ' गोल्डमोहोर ' एवढे लांबलचक नाव फारसे कोणी घेत नसे. सगळे ' भोवंड ' म्हणत असत. ' भोवंड ' का व कधीपासून म्हणू लागले हे मला कधीच कळले नाही. कदाचित दिवसरात्रीतून बरेचवेळा मिलचे भोंगे वाजत आणि ते ऐकून लोकांना भोवळ येत असेल. त्यात तिथे भंगी वस्तीही फार होती. त्यामुळे भोवळचे भोवंड झाले असेल असा आपला आम्हा मुलांचा एक तर्क होता.

मिल दादासाहेब फाळके मार्गावर असली तरी जराशी आतच म्हणायला हवी. रस्त्यावरून येता जाता मिलचे पिवळे गेट व गेटावर नेहमीच असलेली वर्दळ, कारणीक छुटकू-फुटकू दुकाने हेच ठळक नजरेत भरे. सकाळची उसळ-पाव, वडा-पावच्या गाड्यांची गडबड तर संध्याकाळ झाली की सगळ्याच मिल्सच्या आजूबाजूस दिसणारे ठरलेले दृश्य..... जवळच दोन-तीन देशी दारूची दुकाने व उकडलेली अंडी, शेंगदाणे, वाळूत भाजलेले काळे शिंगाडे व उकडलेले हिरवे शिंगाडे पुढ्यात घेऊन बसेलली लहान लहान मुले किंवा बाया. रात्र चढू लागली की बुर्जीपावच्या गाड्या लागत. मिल मधून कामगार बाहेर पडला की हातभट्टीची मारूनच घरला जानार.... त्या घेतल्याबिगर जमतच नाय. कायबी सुदरत नाय गड्या. एकदा का सांज झाली की ' दारवा ' पाहिजे म्हंजी पाहिजेच. मग बायको-पोरांना बडविणे प्रकारही रोजचेच. शिवाय उधारी प्रकारही होतेच. पठाणी व्याजही होते. मिलच्या दारावर दहा तारखेला किंवा रोखीच्या दिवशी पठाण उभे असत आणि जर कोणी ठरलेले पैसे दिले नाहीत तर तिथेच त्याला बडवतही. पैसे काढून घेत मात्र त्याच्या घरी जाऊन बायकोच्या हातावर राशनपाण्याचे पैसेही टिकवत. अर्थात अपवादही होतेच पण हाताच्या बोटावर मोजण्यापुरतेच.

असे असले तरी मिल्स सुरू होत्या तोवर रोजगार होता. अर्धा पगार ' दारवा 'वर उडाला तरी कच्च्याबच्च्यांच्या तोंडात घास पडत होता. सणासुदीला स्वतःच्या मिलच्याच कापडांचे फ्रॉक, सदरे-विजारी, साड्या अंगाला लागत होत्या. पाहता पाहता मिल्स बंद पडल्या. काहींनी एका क्षणात दम तोडला तर काही झिजून झिजून संपल्या. रडत खडत का होईना जोवर धूर निघत होता तोवर एक वेळचे अन्न तोंडात पडत होते. शेवटी एक एक करत गिरण्या संपल्या त्याबरोबरच गिरणगावही विझले. हळूहळू उभे राहिले टोलेजंग टॉवर-मॉल्स. स्वार्थ कोणाला सुटलाय हो... पण असा हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणून साधलेला स्वार्थ....... बायका पोरांची लागलेली हाय-खपाटीला गेलेली पोटे, म्हाताऱ्या आईबापाचे कोरडे शुष्क ओठ अन आटलेले-फूल पडलेले धुरकटलेले डोळे. पांढऱ्या दाढीची खुंटे खाजवत गुडघे पोटाशी घेऊन उकिडवे बसून भकास नजरेने आकाशाकडे पाहत बसणारे वडील-बाप्ये-घरातले कर्ते पुरूष. अतिशय केविलवाणी अवस्था. आभाळच फाटलेले तिथे कोण कोणाला व कुठले ठिगळ लावणार हो.

माझ्या अनेक मैत्रिणींच्या घरी फार हलाखीची परिस्थिती होती. अनेकदा डबाही नसे. त्यांच्या आया इंडस्ट्रियल इस्टेट मधील छोट्या छोट्या दुकानांमधून घरी कामे आणत. ढिगावारी नग जोडायचे/घासायचे/वेगळे करायचे अशा प्रकारचे अतिशय कष्टाचे व कटकटीचे काही काम मिळे. ते करून दिले की दुकानदार त्यात हजार नुक्स काढणार आणि पैसे कमी करणार. मेहनत भयंकर व कमाई अतिशय मामुली. संपूर्ण घरदार पाठ मोडून काम करी तेव्हा कुठे चूल पेटे. आठवले तरी जीव कळवळतो.

दोनच दिवसांपूर्वी तीन गिरण्यांच्या आधुनिकीकरणाचा करार झाला आणि आज ही आग. घातपाताची शक्यता सर्वत्र एकमुखाने चर्चेत आहेच. आगीचे स्वरूप इतके भीषण असावे की २२ फायर इंजिन व फायर इंजिनच्या जोडीला १७ जम्बो टँकर असूनही आगीवर काबू मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. फायर ब्रिगेडच्या मदतीला सरकारी आस्थापनांचे पाण्याचे टँकरही होते तरीही दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग विझवायला तीन- चार तास लागले. आता आगीने काय लागतानाच रौद्रावतार धारण केला असेल का? मग लागलीच का फायर ब्रिगेडला बोलाविले नाही?

थोडक्यात काय अजून एक मिल पद्धतशीर रित्या धारातीर्थी पडली. आता सगळे फार्स होतील पाहा. राजकारणी धडाधड आगीत उड्या टाकून रणशिंग फुंकतील. चौकशी झालीच पाहिजे. पूर्वनियोजित कटच आहे हा तेव्हा सुत्रधारांना शिक्षा व्हायलाच हवी वगैरे नाटके करत नाचतील मग, ' नेमके नेमक्या जागी पोहोचले ’ की चार-आठ दिवसात कुठली गोल्डमोहोर मिल अन कुठली आग? वरपर्यंत मिलीभगत आहे झालं. अपघात का घातपात हे सत्य वरकरणी गुलदस्त्यातच राहिलही नाही म्हणजे तीच शक्यता जास्त असली तरी सगळेच मनोमन जाणून आहेत. मन फार फार दुखलेय आज. आयुष्याची अनेक वर्षे गोल्डमोहोर मिलला व अश्या गिरणगावातील अनेक मिल्सना वाहून टाकलेल्या साऱ्या कामगारांच्या दुःखात मीही सहभागी आहे.

Tuesday, January 19, 2010

नॅनो आली रे......


बहुचर्चित नॅनो एकदा का गल्ली-बाजारात फिरू लागली की खूपच गमतीजमती होतील हे नक्की. ( अजूनतरी ऐकले नाही की जळीस्थळी दिसतेय....... ) कोणाच्या तरी भन्नाट कल्पनांनी भरारी मारून मस्त मस्त व्यंगचित्रे बनवलीत. त्या कलाकाराचे( अज्ञात ) आभार मानून तुम्हाला दाखवतेय. अजूनही ' कुछ लोगोमें दम है बाप..... त्यांची व्यंगचित्रे तितकीच मार्मिक, विषयानुरूप व तरोताजा करणारी असतात.'

श्री. रवि सिंह यांनी नुकत्याच टाकलेल्या टिपणीत ही मार्मिक कार्टुन्स काढणा~याचे नाव: किर्तीश भट्ट ( Kirtish Bhatt ) असे असून इथे त्यांची कार्टुन्स पाहता येतील. शुक्रिया रविजी।









Monday, January 18, 2010

बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२




जिन्नस

  • चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल
  • चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल
  • चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे )
  • दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर
  • तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य

मार्गदर्शन

कडवे वाल बारा-चौदा तास भिजवून नंतर मोड येण्यासाठी पंधरा-सोळा तास बांधून ठेवून नंतर सोलून घ्यावेत. थंड प्रदेशात मोड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. कढई/पातेले मध्यम आचेवर ठेवून चांगले तापले की चार चमचे तेल घालावे. नेहमीप्रमाणेच मोहरी- हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर सोललेल्या डाळिंब्या घालून हलक्या हाताने परतावे. त्यावर दोन भांडी पाणी घालून झाकण ठेवावे. दहा-बारा मिनिटांनी दोन चमचे हिंग व थोडीशी कोथिंबीर घालून ढवळून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. पाणी कमी वाटल्यास एक भांडे पाणी घालावे. झाकण काढून एखादी डाळिंबी काढून शिजली आहे का ते पाहावे. नसल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ, ओले खोबरे व गूळ घालून सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवूनच शिजवावे. आचेवरून उतरवून कोथिंबीर घालावी. एका छोट्या कढईत किंवा फोडणीच्या पाळीत दोन चमचे तेल घालून तापले की मोहरी व हिंगाची फोडणी करून आच बंद करावी. लागलीच त्यात सुक्या मिरच्या घालून मिनिटभर हालवून वाटीत काढावी. डाळिंब्या वाढताना वरून ही वेगळी केलेली फोडणी घालून वाढावे.

टीपा

डाळिंब्या शिजायला हव्यात पण मोडू देऊ नयेत. अतिरेक शिजवू नयेत. मात्र शिजल्याची खात्री झाल्याशिवाय गूळ घालू नये. आवडत असल्यास चार आमसुले घालावीत. किंवा बरोबर आमसुलाचे सार जरूर करावे.

Saturday, January 16, 2010

शेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........

त्या बटबटीत भासणाऱ्या गेट नंबरने कितीही चिडवले तरी शेवटी त्यालाच शरण जाणे भाग होते. पहाटे पाच वाजता घेतलेल्या एक कप चहाच्या जोरावरच इतकी प्रचंड धावपळ चालली होती. त्या चहाने तरी किती वेळ आम्हाला उष्णता द्यावी....... शेवटी त्याने मान टाकली. इतका वेळ चाललेल्या पळापळीत तहान-भूक-रेस्टरूम कशाचीही जाणीव व्हावी अशी मनाला व शरीरालाही फुरसत मिळालीच नव्हती. नवीन फ्लाईट सहा वाजताची आहे हे कळताच मन व शरीर " मी मी " करू लागले. प्रथम थोडे फ्रेश झालो आणि कॉफी घ्यावी म्हणून समोरच दिसलेल्या फूड जॉइंट मध्ये घुसलो. तोच फोन वाजला. सुतारपक्ष्याचे विमान अखेरीस उडावयास निघाले होते. अटलांटा पोचलास की फोन कर रे असे म्हणून फोन ठेवला. कॉफी व हॅश ब्रॉऊन खाऊन आमचा मोहरा गेट नंबर ७८ कडे वळवला. आता कसलीही घाई नव्हती. स्टँड बाय फ्लाईटही ७८ वरच होती तेव्हा अगदी तीन वाजता पोचलो तरी चालणार होते. गेल्या दीड तासाचा वचपा काढायला की काय मी अगदी मुंगीच्या पावलांनी चालायला सुरवात केली.

समोर दिसेल त्या दुकानात घुसून थोडेसे विंडो शॉपिंग करू लागले पण पंधरा मिनिटातच पायांनी कुरकूर करायला सुरवात केली. बिचारे खूप दमले होते शिवाय असाही खूप वेळ आपल्याला विमानतळावर काढायचाच आहे तेव्हा प्रथम थोडा आराम करावा असे ठरवून आम्ही दोघांनी भोज्जाला टच केले. गेट नंबर ७८ हे शेवटचे गेट. सी शेपमध्ये - एका भिंतीला ७२-७४, ७६ दुसऱ्या भिंतीला ७३-७५-७८ व मध्यभागी ७७ अशी गेट्स असून या सगळ्यांच्या सेंटरला मोठ्ठा कॅफेटेरिआ आहे. हुश्श्श..... मी एक मोठा निःश्वास टाकला. हो ना... नाहीतर काही खावे म्हटले की पुन्हा किमान दहाबारा गेट्स तुडवावी लागतील या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आलेला. ७७ च्या समोरच भले मोठे टांगलेले टीवी पाहून एकदाचे स्थानापन्न झालो. जरा श्वास नियमित झाल्या झाल्या मन आजूबाजूला फिरू लागले.

आमच्या समोरच एक वयस्कर व्हाईट अमेरिकन जोडपे बसलेले. त्यांच्या थोडेसे पुढेच एक कपल " तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा " स्टाइलवर स्वतःत मशगुल होते. त्यांच्या शेजारीच.... अरे, ही तर तीच मेक्सिकन मुलगी ना? आपल्यामागेच होती की रांगेत उभी. माझे कुतूहल चाळवले. नेमके तिनेही त्याचवेळी माझ्याकडे पाहिले. मी हात हालवून तिला हाय करताच एखादे कोणी ओळखीचे माणूस दिसावे असे हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले. तिनेही हात हालवून प्रत्युत्तर केले. आणि बाडबिस्तरा उचलून समोरच बसलेल्या वयस्कर जोडप्याच्या शेजारच्या खुर्चीवर स्थिरावली.

मग तू कुठे मी कुठे जातेय..... आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिची कथा अजूनच वैताग आणणारी होती. पहाटे पाचालाच ती आलेली तरीही ८.०५ मिनिटांची लॉस अँजेलिसची तिची फ्लाईट चुकली होती. त्यातून तिचा सख्खा भाऊ नॉर्थ वेस्टमध्येच काम करत होता. मिळेल ते कनेक्शन घेऊन ती ये असे त्याचे म्हणणे हिला काही केल्या पटत नव्हते. तिचे म्हणणे मी डायरेक्ट फ्लाईटनेच जाणार. ती मिळेतो बसेन इथेच. आता खरे तर नको त्या वेळी हे आडमुठे धोरण उपयोगाचे नव्हते पण तिला समजावणार कोण. ओघाओघात मी तिला म्हटले, अग गंमत म्हणजे माझी बॅग मात्र गेली बरं का त्याच विमानाने. काश त्या बॅगांसारखीच आपल्यालाही तिथूनच कलटी मारता आली असती. या गप्पा शेजारीण ऐकतच होती.

बॅग हा शब्द ऐकताच तिही मैदानात उतरली. ते दोघे मुलीकडे लॉस अँजेलिसलाच निघाले होते. त्यांचीही फ्लाईट चुकली होती. १.५० च्या फ्लाईटची तिकिटे आणि आधीच्या दोनवर ते स्टँड बाय होते. " अग आमच्या दोन्ही बॅग्ज गेल्यात पुढे. सगळी गिफ्ट्सही त्यातच आहेत. आता मला बाई भारी अस्वस्थ वाटतेय. नातवंडांना आजच्या दिवसात भेटणार की नाही काही समजत नाही. ते म्हणतील आजीने आम्हाला चीट केले. येते म्हणाली आणि आलीच नाही." ती अगदी रडवेली झालेली. तिचा नवरा हातावर थोपटून तिचे सांत्वन करत होता. तोच ७४ नंबरवर एकदम गडबड सुरू झाली. एलएचीच फ्लाईट निघणार होती. बोर्डिंग सुरू झालेले. काही लोकांच्या नावाची अनाँन्समेंट सुरू होती. जर ते लोक आलेच नाहीत तर कदाचित या जोडप्याचा व मेक्सिकन मुलीचा नंबर लागू शकला असता. कोणाचीही फ्लाईट, गाडी, बस काहीही चुकणे हे वाईटच त्यात तसे दुसऱ्या कोणाचे व्हावे म्हणजे आपण जाऊ शकू अशी वाट पाहणे म्हणजे...... मनाला एकीकडे अपराधी भावना सतावत असते तर दुसरीकडे आपल्याला जायला मिळेल याचा आनंद. फारच चमत्कारिक अवस्था....


हे तिघेही उठले आणि कॉउंटरपाशी जाऊन उभे राहिले. पण यांच्या आधीपासून नंबर लावून उभे असलेले दोन जण होते. त्यांना फ्लाईट मिळाली. म्हणजे आणखी दोन जणांची चुकली होती. अजून दोन लेडीज नावांची सारखी पुकारणी सुरू होती. अगदी गेट बंद करणार तोच एक जण धापा टाकत आली ... नशीब जोरावर होते तिचे. दुसरीचे नाव पुन्हा एकवार घेऊन तिच्या जागी एका माणसाला त्यांनी पाठवून गेट बंद केले.

अक्षरशः दोन मिनिटेच मध्ये गेली आणि एक अठरा-वीस वर्षांची मुलगी पळत पळत गेटवर येऊन थडकली. अतिशय बारीक शरीरयष्टी, केसांच कसातरी बांधलेला बुचडा. जीन्स, टीशर्ट, खांद्यावर भली मोठी बॅग, पाठीवर दप्तर आणि हातात जाडा कोट. धावताना चष्मा नाकावर घसरलेला. तो सावरायला हात मोकळे नव्हतेच. कॉउंटरवर टेकली तोच कर्मचाऱ्याने आत्ताच गेट बंद केले तेव्हा आता तुला जाता येणार नाही हे सांगताच ती स्तब्ध झाली आणि पाहता पाहता स्फुंदून स्फुंदून रडायलाच लागली. आम्ही सगळे पाहत होतो. कॉउंटरवरील दोघेही जरा बावचळलेच. ही आपली रडतेय रडतेय. एकाने तिचे दुसऱ्या कुठल्याश्या फ्लाईटचे तिकीट करून दिले, पाणीही दिले.

तरीही तिचे रडे थांबेचना. रडतच तिने सगळे सामान उचलले अन आमच्याच रांगेत येऊन सामान फेकून दोन्ही गुडघे पोटाशी घेऊन डोके गुडघ्यात खुपसून खूप वेळ मुसमुसत राहिली. एक विचित्र शांतता पसरली. फसफसून उतू चाललेल्या प्रेमी युगुलाची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. शेवटी त्या दोघांनी परस्परांच्या कुशीत झोपून टाकले. मी पुस्तकात डोके खुपसले. नवरा चक्कर मारून येतो म्हणून सटकला. मेक्सिकन सेलला लटकली. अमेरिकन आजी-आजोबा टीवी पाहू लागले. एकंदरीत पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात आपापल्या चुकलेल्या विमानाची याद प्रकर्षाने उफाळून आली.

असाच अर्धा तास गेला. ही मुलगी शांत झाली. सेल काढून कोणालातरी काय काय झाले त्याचे रंगून वर्णन करत हसू लागली. चला.... निदान हसतेय तरी. वातावरण सैलावले. तोवर ११.४५ झालेले. भुकेची जाणीव चांगलीच सतावू लागली. आम्ही दोघे कॅफेटेरियाकडे निघालो. ती मक्कू मुलगीही आमच्याबरोबर आली व सोबतच खायलाही बसली. " अग मी पहाटेपासून इथे आहे. भाऊ म्हणत होता तसे कनेक्शन घेऊन किंवा $५० देऊन गेले असते तर बरेच झाले असते गं. नाहीतरी बघ ना आता फ्लाईट मिळेतो माझा खाण्यावर तेवढाच खर्च होणार आहे. शिवाय इतका त्रासही. " अग बाई हे तुला कळतेय ना मग कशाला हा हेकटपणा करायचा....... मनातच मी बडबडत होते. तोच बाजूला ओळखीचा आवाज कानावर पडला.

अरे हा तर चिंकीचा आवाज. म्हणजे हे लोक अजूनही इथेच आहेत. आश्चर्याने मी वळून पाहिले.... चिंकू फॅमिली टाको बेलचे विविधप्रकार घेऊन पलीकडेच बसली होती. आजी-आजोबा खूप थकल्यासारखे दिसत होते. तान्हुले झोपले होते. जरा मोठा नातू आजीला मोठे मोठे डोळे करत रंगून काहीतरी सांगत होता आणि चिंकी अजूनही तडतडच होती. तोच अचानक चिंकू पळत सुटला तो कॉउंटरवर जाऊन थडकला. त्याच्या मागोमाग चिंकीही पळाली. तिथे काय झाले कोण जाणे पण परत आले तेव्हा चिंकीचा चेहरा आनंदाने फुलला होता. टेबलपाशी पोचताच एका फ्लाईटची तिकिटे देत नाहीत म्हणजे काय मी बरी गप्प बसेन. ही बघा आणलीच मी मिळवून या आवेशात ती लगालगा आजी-आजोबांना काहीतरी सांगू लागली. त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रथम अचंबा मग अविश्वास आणि सरतेशेवटी आनंद व सून-लेक जी कोण असेल तिचे कौतुक ओसंडून व्हावू लागले. भरभर खाणे तोंडात कोंबत त्या सगळ्यांनी संपवून गेटकडे धूम ठोकली. चला एका कुटुंबाची तरी नैय्या पार झाली होती.

खाणे संपवून आम्ही तिघे पुन्हा येऊन बसतच होतो तोच अमेरिकन जोडप्याचा स्टँडबाय मध्ये नंबर लागला. ते हॅपी हॉलिडेज-मेरी ख्रिसमस म्हणत बाय करून पळाले. ती फ्लाईट निघताच आम्हाला स्टँडबाय वर टाकलेली फ्लाईट लागली. ते पाहताच नवरा विचारायला गेला. लेकही तोवर अटलांटाला पोचून पुढच्या फ्लाईटची वाट पाहत बसला होता. त्याच्याशी बोलताना एक डोळा नवऱ्याकडे होताच. बोलता बोलता नवऱ्याने खिशात हात घालून पाकीट काढलेले पाहिले आणि मी उमजले. आधीच गगनाला भिडलेले रेटस कमी पडले की काय म्हणून नॉर्थवेस्टने आमची काहीही चूक नसताना आम्हाला अजून $१०० ची फोडणी दिली होती.
पण एकदाचे ३.५० च्या डायरेक्ट फ्लाईटचे कन्फर्म तिकीट मिळाले होते. चला आता तरी कुठेही नवीन माशी न शिंकता सकाळी ११.३० वाजता पोचणारे आम्ही दैवाने साथ दिली तर संध्याकाळी ६ वाजता ( म्हणजे डेट्रॉईटच्या वेळेनुसार रात्री ९ वाजता ) पोचणार होतो.

सुतारपक्षी अटलांटावरून वेळेवर उडाला. आम्ही तरीही गेट नंबर ७८ वरच धरणे धरून होतो. अखेरीस ३.१५ ला आमचे विमान आले. ३.३५ ला आम्ही विमानात शिरलो व ४ वाजता चक्क आम्हाला घेऊन विमान उडालेही. टेल विंड असल्याने विमान ५० मिनीटे आधीच पोचले. लेक कधीचाच पोचलेला होता. मित्रही येऊन आम्हा सगळ्यांची वाट पाहत होता. मग सकाळीच रवाना झालेली बॅग पावती दाखवून ताब्यात घेतली आणि मित्राच्या गाडीने घरच्या रस्त्याला लागलो तेव्हा घड्याळात साडेसहा वाजून गेले होते
.