जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, April 27, 2010

काळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने - स्नेहल भाटकर

गेले काही दिवस १९७५ ते १९९० या कालावधीतील, त्यातही ७५ ते ८२-८३ पर्यंत अगदी सारखी ऐकलेली काही गाणी मनात घोळत आहेत. १९७५ च्या आधीही ही कानावर पडत होतीच. आमच्या आईचा गळा अतिशय सुरेल. तिच्या ऐन उमेदीच्या दिवसात नाशकामध्ये ती - पूर्वाश्रमीची सिंधू भट आणि माझी कै.सौ.मंदामावशी प्रती " लता व आशा " म्हणून प्रसिद्ध होत्या. आईने अनेक नाटकातही कामे केलेली.( १९५२ ते १९६२ ) पुढे लग्न होऊन ती मुंबईस आल्याने व मी व भाऊ झाल्यावर तिचा नाट्यक्षेत्राशी-स्पर्धांशी, प्रत्यक्ष संबंध कमी झाला असला तरी जात्याच गोड असलेला गाता गळा तिला चैन पडू देत नसे. घरात ती नेहमीच गात असे, अजूनही गुणगुणत असते.

काही गाणी आईची परमप्रिय होती. अगदी त्यांच्यावर जीव जडल्यासारखी हटकून ती म्हणायचीच म्हणायची. बैजू बावरातले " मोहे भूल गये सावरीयां..... " हमारी याद आयेगी मधले " कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आएगी... ’ " फरियाद मधले, " हाले दिल उनको सुनाना था..... " त्याच चित्रपटातले, " देखो बोल रहा हैं पपीहा... " हे गाणे. सुमन कल्याणपूर या आईच्या अतिशय लाडक्या होत्या व आहेतच. मराठी सुगमसंगीत, भावगीतं, भक्तिगीते-भजने तर अहमिकेने वर्णी लावत असत. " तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती.... " " मज नकोत अश्रू घाम हवा..... " इथेही सुमन कल्याणपूरच. काही गौळणीही ती हटकून म्हणे, " रात्र काळी घागर काळी..... " " वारिया ने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले..... " या माझ्या अगदी तोंडपाठ झालेल्या होत्या. आईचा सुमधुर गळा, फिरत या सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली असली तरी जसे जमेल तसे भसाड्या तर भसाड्या आवाजात मी नेहमी रेकत असे. अगं नको गं त्या सुंदर सुरांचा जीव घेऊस असे म्हणत मी गाऊ नये म्हणून आई लगेच गुणगुणू लागे अन माझा हेतू साध्य होई.

या व अशासारख्या गाण्यांची मोहिनी आजही तितकीच कायम आहेच पण यातले संगीतकार मात्र काळाच्या ओघात हरवून गेलेत. त्यांची काही गाणी अजरामर झाली असली तरी त्यांचे नाव अनेकांना माहीतही नसेल-आठवत नसेल. मला व्यक्तिश: कमीत कमी वाद्ये वापरून, शब्द व सुरांच्या ताकदीचा पुरेपूर व अप्रतिम संगम साधत केलेली गाणी अतिशय भिडतात. वाद्यांचा अतिरेक, त्यांचा टीपेचा-बोल व सुरांच्या पुढे येणारा कल्लोळ फार त्रास देतो. अशीही काही गाणी निश्चित चांगली आहेतच पण निदान मला तरी ती फारशी मोहवत नाहीत.

आई गात असलेल्या गाण्यांमध्ये जसे सुमन कल्याणपूर असतेच तसेच दत्ता डावजेकर, सुधीर फडके, प्रभाकर जोग, बाळ माटे, भास्करबुवा बखले... यांची बरीच नाट्यपदे ती म्हणत असे. यशवंत देवांचे, " दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी " हे मधुबाला जव्हेरी यांनी गायलेले एक अतिशय आर्त गाणे. " त्यांचेच विसरशील खास मला दृष्टिआड होता... " हे सुधा मलहोत्रांनी गायलेले गीत.... पुढे आशाने ही गायले. वसंत प्रभू यांची, ’" आई कुणा म्हणू मी, तुजवीण सांग आई? व प्रेमस्वरूप आई " ही दोन गीते आई अत्यंत आर्ततेने, हृदय पिळवटून गात असे.... गाणे संपता संपता ती व मी दोघीही रडू लागत असू. चितळकरांच्या आम्ही दोघीही अगदी भक्त. "
मलमली तारुण्य माझे, रूप पाहता लोचनी, हे राष्ट्र देवतांचे, हाऊस ऑफ बॅंबू..... " त्यांची तर अजून कितीक गाणी.... भाऊ-बीज या चित्रपटातले श्री. वसंतकुमार मोहिते यांनी संगीतबद्ध केलेले व आशा ने गायलेले, " वेड्या बहिणीची रे वेडी माया.... " या गाण्यावरही तिचा खास जीव होता. श्री. श्रीकांत ठाकरेचे संगीतबद्ध केलेले, " शोधिसी मानवा राउळी मंदिरी.... व अधीर याद तुझी, जाळीतसे रे दिलवर.... " हृदयनाथांचे संगीतबध्द, " जिवलगा, राहिले रे दूर घर माझे! " जितकी सांगेन तितकी थोडीच.....


या साऱ्या तिच्या आवडत्या गाण्यांमध्ये " संगीतकार स्नेहल भाटकरांची " व त्यातही त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलेली गाणी, " आमुची वसने दे श्रीहरी.... " व " तुझ्या कांतिसम रक्तपताका ...... " तसेच " नको बावरुनि जाऊ नियतीच्या भयाने...... " " सगळी सुमनजींनीच गायलेली " चित्रपट : अन्नपूर्णा(१९६८), " मानसी राजहंस पोहतो..... ज्योत्स्ना भोळेंनी गायलेले " चित्रपट: भूमिकन्या सीता( १९५८), " लाविते गं सांजदिवा...... आशा भोसले " चित्रपट: या मालक( १९६४ ) आणि ही बरीच आहेत... पण आता मी आठवतेयं तर वासुदेव भाटकर व सुमन कल्याणपूर यांच्या बहुतांशी सगळ्याच रचना प्रामुख्याने आई गाई. त्यामुळे श्री. वासुदेव भाटकर या नावाने-संगीतकाराने माझ्या मनातही घर केले. काळाच्या ओघात - चकाकत्या बेगडी दुनियेत हरवलेल्या काही अत्यंत प्रतिभावान व्यक्तींपैकी भाटकरबुवा हे एक.

२९ मे, २००७ ला मी मायदेशात होते. भाटकरबुवांच्या निधनाची अतिशय दुख:द बातमी आली आणि अनेक गाणी झरझर डोळ्यासमोर येऊ लागली. कधीही त्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला नव्हता तरी सतत आईच्या तोंडून व आकाशवाणीवरही ऐकलेल्या गाण्यांचा पगडा जबरदस्त होता, त्यामुळे निदान अंत्यदर्शन तरी घ्यावे म्हणून मी अगदी आमच्या दादरच्या घराच्या मागेच असलेल्या त्यांच्या निवासस्थानी गेले. ( किर्ती महाविद्यालया जवळ ). त्यांना पोचत नसली तरी एक प्रकारे प्रत्यक्ष आदरांजलीच होती ती.

नोव्हेंबर २००६ मध्ये त्यांना ’ महाराष्ट्रभूषण ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु नेमके आदल्याच दिवशी हॉटेल मध्ये ते पडल्याने स्ट्रेचरवरून त्यांनी हा सन्मान स्वीकारल्याचे पेपरात वाचले होते. संगीतकार स्नेहल भाटकर यांचे खरे नाव वासुदेव गंगाराम भाटकर होते. आमच्या प्रभादेवीतील पालखीवाडीत १७ जुलै १९१९ साली त्यांचा जन्म झालेला. त्यांच्या आईचा गळा खूप गोड होता. श्रीकृष्ण संगीत महाविद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतलेले. १६ जून १९३९ रोजी ते एचएमव्ही मध्ये पेटीवादक म्हणून कामाला लागले. सतत चालणारी भजनी मंडळातील भजनांचा खासा पगडा त्यांच्या सगळ्या जीवनावर होता. भाटकरबुवा म्हणूनच ते सर्वत्र ओळखले जात.

केदार शर्मा यांनी सुहागरात या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वासुदेव हे नाव बदलून त्यांच्या मुलीच्या स्नेहलता या नावावरून त्यांचे स्नेहल हे नामकरण केले. राजकपुरने प्रथमच नीलकमल या चित्रपटामध्ये नायकाचे काम केले व त्याच्या तोंडी असलेले गाणे-काही ओळी या भाटकरांनी गायल्यात व संगीतही त्यांचेच होते. अनेक मोठ्या मोठ्या गाजलेल्या कलाकारांचे पदार्पणाच्या चित्रपटाचे संगीत बी. वासुदेव म्हणजेच भाटकर यांचेच. मधुबाला, नूतन, गीताबाली, तनुजा, शोभना समर्थ, कमला कोटणीस.....
अतिशय साध्या - सोप्या परंतु मन जिंकून घेणाऱ्या व पुन्हा पुन्हा भावणाऱ्या चाली त्यांनी दिल्या. " कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे कि बिजली कौंध जायेगी’...... " या मुबारक बेगम च्या आवाजातील गीताने तर त्यांना अजरामरच केले. आजही या गाण्याची मोहिनी कमी झालेली नाही. लता आजही अतिशय खंतावत असेल पण..... हे गीत मुबारक बेगमच्याच नशिबात होते.

शोभना समर्थ यांच्या छबीली(१९५९) या चित्रपटात त्यांनी नूतनला गायला लावले. "
ऐ मेरे हमसफर....... " नूतनची मी ठार वेडी आहे तश्यांत चक्क तिच्या आवाजातील गाणे...... अप्रतिम! सारे श्रेय भाटकरांचेच व " लहरों पे लहर, उल्फत हैं जवॉं.... " हीच ती दोन गाणी. वासुदेव-सुधीर या जोडीतील वासुदेव म्हणजे भाटकरबुवा व सुधीर म्हणजेच बाबुजी. रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला या दोघांनी मिळून संगीत दिलेय. रुक्मिणी स्वयंवरमध्ये, " कुहु कुहु बोल गं, चंद्रमा मनात हसला गं व धाडिला प्रीतीदुत माझा देईल का गं मान " ही गाणी बाबूजींच्या पत्नी सौ. ललिता फडके यांनीच गायलेली आहेत.

भाटकरबुवा हे अतिशय साधे-सरळ म्हणूनच अजातशत्रू होते. त्यामुळे या मोहमयी सृष्टीतही अनेक खास मित्र जोडून होते. त्यांचे, " सुहागरात, गुनाह, हमारी याद आयेगी, नीलकमल, हमारी बेटी, प्यासे नैन, सी.रामचंद्र यांच्या 'संगीता ' चित्रपटातील कव्वाली...... त्याप्रमाणेच " चिमुकला पाहुणा, मानला तर देव, रुक्मिणी स्वयंवर, बहकलेला ब्रह्मचारी, नंदकिशोर, अन्नपूर्णा, तुका झालासे कळस मधील संत तुकारामांची रचना- काय तुझे उपकार पांडुरंगा व उंचनिंच कांही नेणे भगवंत.... त्यांनीच गायल्याही आहेत. " तसेच काही नाटकांचे संगीतही अतिशय गाजलेय. मराठी चित्रपट सृष्टीत व पुढे दूरचित्रवाणीवरही काही काळ समोर असलेले अभिनेता श्री. रमेश भाटकर हे त्यांचेच चिरंजिव. अनेक मनांमध्ये आजही जिवंत असणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार स्नेहल भाटकर यांना माझी ही भावपूर्ण आदरांजली.

फोटो, संदर्भ व दुवे जालावरून साभार.

Saturday, April 24, 2010

साबुदाण्याची खिचडी

लग्नाच्या आधी स्वयंपाक करता येत असला तरी तो निव्वळ चौकोनी प्रकारातला. वरण-भात, भाजी व पोळी. म्हणजे कसे की वरण भात कुकरला आपसूक होतोय. एक वाटी तांदूळ घेतले की तीन वाट्या पाणी..... की आटोपला भाताचा कारभार . डाळीला पाणी घालताना... आईने सांगितलेले पक्के घोकलेले.... " अगं किती सोप्पयं.... डाळ धुतलीस नं की साधारण डाळीच्यावर अर्धे-पाऊण पेर पाणी तरंगेल इतपत ठेवायचे. आठवणीने हिंग, हळद व दोन थेंब तेल टाकायचे की झाले. पुढचे काम कुकर आपोआप करतोय. " अर्धे-पाऊण पेर म्हणजे नक्की किती... , हा घोळ आठवी ते बारावी चालूच होता. पण डाळीचे बरे असते, समजा अगदी गाळ झाला तर म्हणायचे काय झक्क मिळून आलीये नं आज... आणि जरा बोटचेपी - टचटचीत राहिली की.... पाहिलेस कशी अख्खी डाळ दिसतेय... आहे की नाही माझी युक्ती, जराही गाळ होऊ दिला नाही. शिवाय त्यावर साजूक तूप अन लिंबू पिळले की सगळे आनंदाने खातातच. काही नेमक्या भाज्या अन मस्त टम्म फुगलेले फुलके.... मनसोक्त तूप लावून गरमागरम ताटात पडले की उजवी डावी बाजू कोणी पाहत नाही.....पटापट स्वाहा करतात आणि पळतात.

पण..... जेव्हां इतर काहीही चटक मटक, अगदी साधा सांजा, उपमा, साबुदाण्याची खिचडी करायची वेळ आली तेव्हां घाबरगुंडी उडाली. एकतर लग्नाआधी चुकूनही या वरकरणी साध्या दिसणाऱ्या पदार्थांच्या मी वाटेला गेले नाही.... हे काय, अगदी सहज जमेल, त्यात काय शिकायचेय आणि करून पाहायचेय. त्यापेक्षा कधी पुरण पोळी कर तर कधी सांजाच्या पोळ्या कर तर कधी चकल्या.... जमले नाही तरी लुडबुड तरी करायचीच. लग्न झाले आणि दुसऱ्याच शुक्रवारी रात्री सासूबाईंनी साबुदाणा भिजवलेला पाहिला मात्र, माझ्या पोटात मोठ्ठा गोळा आला. अरे देवा! न जाणो उद्या मलाच करायला सांगायच्या. म्हणजे तसे, " सूनबाई, जरा अमुक कर गं.... " सारखी काही परीक्षा नसली तरी मला कुठे खिचडी येईलच ची खात्री होती. रात्रभर धाकधूक होत असतानाच कधीतरी झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी कळले की सासरे-मोठा दीर व नवरा, असा तिघांचा उपास असतो. मोठा दीर खास त्याच्याघरून दर शनीवारी खिचडी खायला येत असे.

सासरे नेहमीप्रमाणे फिरायला गेले. सासूबाईंचे सकाळचे कॉलेज, त्या गेल्या सातालाच. साबुदाणा भिजवला आहे गं... असे वाक्य हवेत सोडून त्या गायब. तसे त्यांनी प्रत्यक्ष मला खिचडी कर असे मुळीच सांगितलेले नव्हते. आणि असेही मी येण्याआधी जे कोण करत होते तेच आजही करेलच की.... मी कशाला उगाच स्वतःवर ओढवून घ्यावे, असा विचार करून थोडे दुर्लक्ष केले पण जीवाला चैन पडेना. मग बटाटा किसून ठेवला, आले-मिरच्या चिरून ठेवल्या, ओले खोबरेही खवले, दाण्याचे कूट वाटीत काढून ठेवले, अगदी कढईही गॅसवर ठेवली. सगळी जय्यत तयारी केली पण फोडणीला टाकायचा धीर काही झाला नाही. वाटले बिघडली तर सगळे चिडतील त्यापेक्षा नकोच.

सासरे फिरून आले आणि त्यांनी खिचडी केली. मी काढून ठेवलेले प्रमाण बरोबरच होते ते पाहून मला थोडे बरे वाटले. पुढे हळूहळू मी रुळले, सगळे पदार्थ करू लागले पण ही आठवण मनात पक्की बसली. सासू-सासऱ्यांना नक्कीच नवल वाटत असेल की ही इतके सगळी तयारी करते पण खिचडी फोडणीला टाकत नाही, ते काम मात्र ठेवते सासऱ्यांसाठी...... मी माझी भीती कधी त्यांना सांगितली नाही पण खरेच मला धीरच होत नसे.

बऱ्याच मैत्रिणींकडून अनेकदा साबुदाणा खिचडीच्या अनेक तऱ्हा ऐकल्या. कोणाची अती फडफडीत होई तर कोणाचा गचका... कोणाची कडकडीत तर कोणाची खरपूड.... एक ना दोन अनेक तक्रारी. नेमके चुकतेय कुठे याचा थोडा शोध घेतला ... तर काय.... सारे पाणी साबुदाणा भिजवण्यातच मुरतेय की.. .... खिचडी चांगली होण्याची पाऊण लढाई साबुदाणा भिजण्यातच आहे बाकी मग फोडणी आणि इतर कलाकुसर काय एकदम सोपी. शिवाय त्यात वेगवेगळे प्रकार करून पाहण्याची सोयच नसल्यामुळे अजूनच सोपा कारभार. साबुदाणा एकाच दुकानातून आणला तरीही अनेकदा तो वेगवेगळा निघू शकतो. त्यामुळे असे नाही एक वाटी साबुदाणा तर एक वाटी पाणी... साधे -सोपे गणित... पण नाही... तोही महा खट, काहीतरी घोळ होतोच.... मग कधी ओला गच्च तर कधी कोरडा ठाक.... बऱ्याच जणांना आपापला अनुभव असेलच की.... काय?

गेल्या वीस एक वर्षात मला आठवत नाही साबुदाण्याची खिचडी बिघडलेली..... त्या आधी मी बनवलेलीच नसल्याने म्हणजे तेवढा धीरच न झाल्याने.... अर्रर्रर्र... हे काय गं बनवलेय? किंवा हा गचका मी नाही खाणार तूच खा..... अशासारख्या टोमण्यातून बालबाल बचावलेयं.... खाली कृती देतेय, तुम्हीही करून पाहा. अजाबात चुकणार नाही. फक्त साबुदाणा मात्र बरोबर भिजवा म्हणजे जिंकलात म्हणून समजा.....


साहित्य:

तीन वाट्या भिजलेला साबुदाणा ( दीड- पावणेदोन वाट्या कच्चा साबुदाणा घेतल्यास साधारण तीन वाट्या भिजलेला भरेल )
तीन चमचे घट्ट साजूक तूप ( पातळ असल्यास चार ते पाच चमचे )
दोन मध्यम बटाटे साले काढून किसून घ्यावेत
एक मोठा चमचा जिरे
चार हिरव्या मिरच्या तुकडे करून ( तिखट आवडत नसल्यास नुसते पोट फोडून घ्यावे )
एक ते दीड चमचा आल्याचे बारीक तुकडे
चार ते पाच चमचे शेंगदाण्याचे कूट
दोन चमचे साखर व स्वादानुसार मीठ
दोन चमचे ओले खोबरे
दोन चमचे कोथिंबीर ( ऐच्छिक : काही जण उपासाला कोथिंबीर खात नाहीत- काही खातात )


वाढणी : तीन माणसांना पुरेल

मार्गदर्शन:

उद्या सकाळी खिचडी करायची असल्यास आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भांड्यात घेऊन भरपूर पाणी घेऊन धुवावा. पाणी काढून टाकावे. नंतर साधारण साबुदाण्यावर पाऊण सेंटिमीटर ( अंदाजे पाव पेर तरंगेल ) इतपत पाणी ठेवून झाकून रात्रभर ठेवून द्यावा. सकाळी सगळे दाणे छान टपोरे फुललेले दिसतील.

कढई-नॉन स्टिक पॅन मध्ये तूप घालावे व मध्यम आचेवर ठेवावे. तूप वितळले की जिरे टाकावेत. मिनिटभराने हिरव्या मिरच्या व आले टाकून परतावे. जिरे व आले-मिरचीचा वास सुटला की बटाट्याचा निथळून घेतलेला कीस त्यावर टाकून परतावे व मध्यम आचेवरच झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावे. नंतर एकदा ढवळून कीस शिजला आहे का त्याचा अंदाज घ्यावा, थोडा कच्चट वाटला तर अजून तीन-चार मिनिटे झाकण ठेवूनच शिजू द्यावा. बटाटा आता नक्कीच शिजला असेल, त्यात साबुदाणा, स्वादानुसार मीठ व दोन चमचे साखर घालून नीट परतावे व झाकण ठेवून मध्यम धीम्या आचेवर पाच मिनिटे वाफ येऊ द्यावी. झाकण काढून त्यात दाण्याचे कूट घालून परतावे. दोन मिनिटांनी आचेवरून उतरवावे. ओले खोबरे, कोथिंबीर व लिंबू पिळून गरम गरम खायला द्यावी. लिंबू आवडत नसेल किंवा दही जास्त आवडत असेल तर सायीचे घट्ट दही घ्यावे.

टीपा:

साबुदाणा भिजवताना पाणी जास्ती होता नये व कमीही पडता नये. साबुदाणा कितीही खट असला तरीही एकदा भरपूर पाण्यात स्वच्छ धुऊन नेमके पाणी घालून झाकून सात ते आठ तास ठेवला की मस्त भिजतो व छान मोकळा होतो. झाकण न ठेवल्यास वरचा साबुदाणा कडकडीतच राहून जातो. उकडलेला बटाटा किंवा बटाट्याचे कापही घालता येतात पण उकडलेल्या बटाट्यामुळे खिचडी कोरडी होऊन घास लागतो कारण बटाटा सारे तूप शोषून घेतो. बटाट्याच्या कापांमुळे खिचडी मिळून येत नाही. कीस घालून करून पाहाच एकदा. साबुदाण्याची खिचडी ही सुरवातीला गोड व शेवटी तिखट अशी लागायला हवी.

Wednesday, April 21, 2010

नोट्स टू मायसेल्फ....

पुस्तके दिसली आणि पावले रेंगाळली नाहीत असे या जन्मात तरी घडायचे नाही. लहानपणापासूनच अगदी पुडीच्या कागदावरचेही वाचण्याची सवय जडलेली. मिळेल तो कागद आणि कुठेही असलो तरी नजरेखालून गेलाच पाहिजे. रद्दीवाल्याकडे उरापोटावर ( उचलत नाही तरी आईला मदत करायलाच हवी.... हे वाक्य इतरवेळी सोयिस्करपणे विसरले जायचे..... ही ही... ) त्यातल्या त्यात हलकी पिशवी उचलून आईबरोबर जायचेच जायचे. तिथे गेलो की मग काय पर्वणीच...... मिळालेले रद्दीचे पैसे कधीच घरी यायचे नाहीत. अक्षरशः वारा प्यायलेल्या वासरासारखी मी भरभर त्या रद्दीवाल्याच्या दुकानात भिरभिरत ढिगाने पुस्तके उचलत असे. अनेकदा अतिशय दुर्मिळ पुस्तके अक्षरशः कवडीमोल किमतीत हाताशी लागून जात. आई तिथे वैतागे पण दरवेळी मला घेतल्याशिवाय रद्दी द्यायला मात्र जात नसे.

जागोगागी भरणारी पुस्तकांची प्रदर्शने तर सारखीच खुणावत असतात. शिवाय मॅजेस्टिकची मी लाईफ मेंबर असल्याने तिथे चकरा चालूच. पण अजूनही अशी काही ठिकाणे आहेत जिथे अगदी सगळ्या विषयांची, भाषांतली व जगभरातील लेखकांची पुस्तके भरभरून-ओतू जाईतो मांडलेली असतात. अतिशय गाजलेली व नावाजलेल्या खूप मोठ्या साहित्यिकांचा हा अनमोल ठेवा दृष्टीस पडला की वेळ -काळ - स्थळ साऱ्याचा विसर पडे-पडतो. जुन्या बाजारात, भाजी मार्केटच्या दारात, स्टेशनच्या बाहेर, अगदी कुठेही रस्त्यावर हा खजिना सापडू शकतो. ठाण्याला गावदेवी मार्केटमध्ये दोघे जण आहेत. शिवाय स्टेशन रोडला अशोक टॉकीजच्या आसपास अगदी हमखास काही सापडतील. काहींजवळ तर अतिशय जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड्सही सापडतात तर काहींजवळ कॅसेट्सही.

हा पुस्तकांचा मांडलेला बाजार चारी हातांनी मला खुणावतो. अगदी बैठक मारून आरामात एक एक पुस्तक पाहत पाहत कधीनुक दोन तरी पुस्तके घरच्या खजिन्यात येऊन पडतातच. दरवेळी मायदेशातून परत येतांना बारा पंधरा पुस्तके बॅगेत विराजमान होतात व एखादे चांगले जाडजूड हातात. मला वाटते ९१-९२ साल असावे. अशीच मी गावदेवी मार्केटमधल्या पुस्तक पंढरीत रमले होते. ताई, हे स्टूल घ्या नं म्हणजे आरामात पाहता येईल... नेकी और पुछ पुछ...... मस्त बैठक जमवली. त्यादिवशी त्याच्याकडे खरेच काही चांगली पुस्तकेही होती. त्यातल्या एका छोट्याश्याच पुस्तकाने माझे लक्ष वेधून घेतले. जरा चाळले आणि खाली ठेवून इतर काही पाहू लागले..... पण नजर सारखी त्याच्यावरच खिळत होती. तेवढ्यात अजून दोन मुली आल्या. त्यातल्या एकीने नेमके तेच उचलले. माझा जीव खालीवर..... घ्यायचे का नाही ते नंतर ठरवले असते पण निदान हातात तरी ठेवायचे नं...... भर्रर्रकन सगळ्या पुस्तकांवरून नजर फिरवली पण ...... बहुतेक ती एकच कॉपी होती.

एकीकडे इतर पुस्तके पाहत एक डोळा त्या मुलीच्या हाताकडे ठेवून होते. तिने पुन्हा एकदा पुस्तक चाळले आणि खाली ठेवले मात्र.... अक्षरशः झडप घालून मी ते पुस्तक उचलले ..... ती अवाक..... आता माझा चेहरा अलीबाबाचा खजिना मिळाल्यासारखा अन तिचा काहीतरी मोठ्ठे घबाड गमावल्यासारखा....... उगाच तिने मला काही बोलून आमची तू तू मैं मैं होण्याआधीच मी चटदिशी फारशी घासाघीस न करता दुकानदाराला पैसे दिले आणि पुस्तक पर्स मध्ये टाकून रिक्षात बसलेही. न जाणो तिने हिसकावून घेतले तर.......



पुस्तकाचे नांव होते, " नोटस टू मायसेल्फ." लेखकः Hugh Prather. २३ जानेवारी १९३८ साली टेक्सासमध्ये जन्मलेला Prather, लेखक, मिनिस्टर व समुपदेशक होता. या पहिल्याच पुस्तकाने त्याला अतिशय प्रसिद्धी मिळवून दिली. आजवर या पुस्तकाच्या पन्नास लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या असून जवळपास दहा भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. १९७० सालात प्रकाशित झालेले हे पुस्तक अक्षरशः तोंडतोंडी प्रसिद्धी होऊन हातोहात खपत होते आजही खपते आहेच.

१९६८ व ६९ या दोन वर्षाच्या कालावधीत लेखकाच्या मनात आलेले विचार आहेत हे सारे. लेखक म्हणतो, " मी बायकोला म्हटले की तू आपले घर तुझ्या शिक्षिकेच्या मिळणाऱ्या पगारात चालव व मी लिखाणात स्वतःला पूर्णवेळ झोकून देतो. ती तयार झाली. परंतु दोन वर्षे झाली तरीही केलेल्या लिखाणातील कुठलेच लिखाण स्वीकारले गेले नाही. शेवटी या साऱ्या काळात आपण आपल्यासाठी लिहिलेल्या रोजनिशीतील काही छोटे छोटे उतारेच संकलित करून प्रसिद्ध करावेत का.... असे वाटून कॅलिफोर्नियात राहणाऱ्या व नव्यानेच पुस्तक छपाईच्या व्यवसायात उतरलेल्या एका नवरा-बायकोच्या प्रकाशन संस्थेत पाठविले. त्याआधी त्या दोघांनी फक्त तीन पुस्तके छापली होती, तसेच त्यांच्या संस्थेची कुठेही जाहिरात नव्हती का कोणी प्रतिनिधीही नव्हता. थोडा वेळ लागला खरा परंतु अखेरीस यश आलेच. पुस्तक नुसतेच प्रसिद्ध झाले नाही तर त्यावर्षीचे बेस्ट सेलर पुस्तक ठरले व जबरदस्त रॉयल्टीही मिळाली. " त्यानंतर Hugh Prather ची इतर पुस्तकेही गाजली पण हे सर्वात बेस्ट होते.

या दोन वर्षात त्याच्या मनात आलेल्या भावना, विचार, असहायता , उदासी, डिप्रेशन ..... अनेकविध प्रसंगातून त्याला अभिप्रेत झालेले, आत कुठेतरी खोलवर स्पर्शून गेलेले भाव, विखुरलेले, भरकटलेले विचार मांडले आहेत. लेखक म्हणतो, " की ऐन तारुण्यात असलेल्या मला, अजून जीवन म्हणजे नक्की काय.... आपला स्वतःचा आपल्याप्रती -आपल्या माणसांप्रती, समाजाप्रती व जीवनाप्रती काय दृष्टिकोन आहे? जीवनात येणाऱ्या संकटांशी आपण सामना करू शकतो का? गोंधळलेली मनस्थिती, बालपण हे समर्थ संस्कार - जडणघडण देणारे नसल्याने, जगाशी सामना करण्याचे बळ, शिकवण, उपदेश नीटसे न मिळाल्याने सदैव द्यावा लागणारा लढा, त्यात लग्न टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड..... या साऱ्यांमधून वेळोवेळी मनात आलेल्या या विचारांनीच मला तारून नेलेय.

बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलेलेही असेल, संग्रहीही असेल . हे पुस्तक कधी वाचावे? खरे तर हे पुस्तक कधीही वाचावे. एकदा वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे. अतिशय साधे रोजच्या जीवनातलेच व आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलेच विचार आहेत तरीही पुन्हा ते जरूर वाचावे. कुठल्याही वेळी व मनाच्या कुठल्याही अवस्थेत. तुम्ही दमला असाल, अतिशय कंटाळला असाल, चिडचिडला असाल, आनंदात असाल, दुःखात असाल किंवा अगदी निष्क्रिय गोळ्यासारखे बसावे अशा विचारात असाल...... एकदा पुस्तक वाचायला घेतले की तुम्हाला शांत वाटेल, जीवन भरभरून आणि अर्थपूर्ण जगावेसे वाटेल. खाली काही अगदी मोजकेच उतारे नमूद करतेय..... तेही मोह अगदीच आवरला नाहीये म्हणून.... खरे तर पूर्ण पुस्तकही लिहून काढायला आवडले असते मला..... पण तसे करणे योग्य नाही.......


Often my desires are based on images of what
I think I want to be: " I want to work out a
theory of reality based on precognition. " Is
this a desire to do something today? If so, what?
Regardless of the subject of the desire, what
does it push me to do now? To drink? to turn
away from Gayle? To leave work early?This
effect is what the desire is " for ."

Perfectionism is slow death. Idols and ideals are
based on the past. If everything were to turn o
out just as I would want it to, just as I new.
My life would be an endless repetition of
state successes. When I make a mistake I
experience something unexpected.

The key to motivation is to look at how
far I have came rather than how far I have to go.

Guilt is a guide that will lead me whenever I
choose to follow. It will raise its righteous
banner and take me to the wasteland of my
incompetence. Guilt is a voice that will
speak whenever I choose to listen. It will
mournfully address any subject but one:
correcting the mistake.

My trouble is I analyze life instead of live it.

Fear is static that prevents me from hearing
my intuition.

All my life I have made it complicated, but it
is so simple. I love when I love. And when I
love, I am my self.

हे पुस्तक Amazon.com वर येथे उपलब्ध आहे. आपल्याकडे क्रॉसवर्ड/काही ठराविक बुक डेपोज/ रद्दीवाले/ जुनी पुस्तके विकणारे यांच्याकडे मिळू शकेल.

Sunday, April 18, 2010

मौला मेरे मौला मेरे....

शौमित्रने गायलेले अजून एक गाणे ऐकवत आहे. चित्रपटातील मूळ गाण्याचा प्रसंग तोच मात्र आवाज शोमूचा....
चित्रपट : अन्वर
मूळ गायक : रूपकुमार राठोड



गाणे येथेही ऐकता येईल.

Friday, April 16, 2010

नापास......

आता जवळपास सगळ्यांच्याच परीक्षा संपल्यात. थोड्याच दिवसात एक एक करून निकालही लागतील. गेल्या वर्षीच्या निकालाचे भयावह परिणाम अजूनही आपले बळी घेत आहेतच. तशातच हे येणारे निकाल किती व कुठवर आघात करतील याची आत्तापासूनच भीती वाटू लागली आहे. तसे पाहू गेल्या निकालानंतर आत्महत्या/ आत्महत्येचा प्रयत्न, असे प्रकार गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून ऐकीवात आहेतच. परंतु गेल्या तीनचार वर्षातील विशेषत: गेल्या वर्षातली आकडेवारी व वयोगट पाहता अनेक प्रश्न मनात येत राहतात......... चौथी-पाचवी-सहावी म्हणजे जेमतेम ९ ते १२ वर्षाची ही लहान लहान मुले इतका टोकाचा निर्णय घेतात कसा....... आणि तो अमलांतही आणतात? एवढे धाडस - हिंमत येते कुठून? आपण जीव द्यायचाच या निर्णयावर ठाम राहण्याची क्षमता.... दुसरा कुठलाही मार्ग आपली सोडववूक करू शकत नाही ....... ही करून घेतलेली समजूत..... आपल्याला समजून घेणारे कोणीच नाही..... अगदी आईवडीलही नाहीत....... फार अनाकलनीय आहे ही मनाची अवस्था.

सर्वसाधारणपणे एखादा विद्यार्थी नापास होतो तेव्हां पहिली प्रतिक्रिया असते ती, " हां...... अभ्यास करायला नको ....... नुसते उनाडायला हवे...... आईबाप मरमर कष्ट करत आहेत. लागेल तितका पैसा देत आहेत, जे मागेल ते लगेच हजर करत आहेत. यांना फक्त अभ्यास करायचाय........ पण नाही, साधे तेवढेही जमत नाही. " ही झाली सौम्य प्रतिक्रिया. ( सौम्य एवढ्यासाठीच की कुठलेही आई-वडील मूल नापास झाले म्हणून त्याचे कौतुक नक्कीच करू शकत नाहीत. त्यांचा झालेला अपेक्षाभंग, मुलाचे वाया गेलेले वर्ष- त्यामुळे त्याच्या भविष्यावर होणारा खोलवर परिणाम, त्यांचा फुकट गेलेला पैसा व समाजात होणारी चर्चा-हेटाळणी, कुत्सित बोचरे शब्द- नजरा याचा एकत्रित परिणाम काहीसा तरी बाहेर पडणारच व तो मुलाला ऐकवला जाणारच आहे. असे बोलणे चूक का बरोबर हा मुद्दा वेगळा परंतु चिडचिड होणारच. ) काही वेळा थोडीशी तर काही प्रसंगी रागाचा अतिरेक होऊन केलेली विचित्र मारहाण, आत्यंतिक जहरी बोलणे, सततचा अपमान, येता जाता केलेला उद्धार व चारचौघांसमोर काढलेले वाभाडे.......... अश्या अनेक प्रकारच्या टोकाच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा होणारा जबर आघात व जीवघेणारा परिणाम.... हे सारे आपण बरेचदा पाहतो व नुसतेच हळहळतो. अरेरे! नापास काय झाली म्हणून लगेच जीवच देऊन का टाकायचा? या आजकालच्या मुलांना काही बोलायचीही सोय राहिली नाहीये...... आता आईबापाने जन्मभर कसे सोसायचे हे दु:ख........

परंतु अनेकवेळा अतिशय साध्या साध्या गोष्टी, पुढे केलेला मदतीचा हात, चार आश्वासक शब्द, धीराचे -आत्मविश्वास वाढवणारे बोल जादू करून जातात. बरे हे फक्त पालकच करू शकतात असे नसून अगदी कोणीही करू शकते. पालक व शिक्षक हे आधाराचे दोन मोठ्ठे खांब आहेत. नंतर येतात घरातील इतर जवळची माणसे, मित्र मैत्रिणी, शेजारी, अगदी रिक्षावाल्यापासून ते मोलकरणीपर्यंत....... अगदी कोणीही....... वाईट घडून गेल्यावर कोरडी सहानुभूती दाखवण्याऐवजी किमान दुसऱ्याच्या दु:खावर अजून घाव तरी न घालण्याचे तारतम्य दाखवता येईलच की.

मुळातच शब्दांत प्रचंड ताकद आहे........ त्यातून ते मनापासून, जवळिकीने व आवर्जून बोलले गेले की त्यामागचे कळकळीचे-प्रेमाचे भाव त्या दुखऱ्या - कोलमडलेल्या मनापर्यंत पोचून आपले काम चोख बजावतात. खरे तर आता या विषयावर इतके लिहून-बोलून झालेय की आता नवीन ते काय....... पण इतका उहापोह होऊनही हे आत्महत्यांचे सत्र थांबलेय का? नाहीच. उलट वाढतेच आहे. असे असले तरी कदाचित हे यापेक्षाही प्रचंड असू शकले असते..... प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीने निराशेने जीव देण्याच्या सीमारेषेवर झुलणारे अनेक जीव वाचले आहेत. पालक - शिक्षक - डॉक्टर्स - मानसोपचारतज्ञ....... वागणुकीवरून - संभाषणातून मुलांच्या मनाचा अभ्यास करून, चर्चा करून त्यांना मदत करणारी तज्ञ मंडळी व इतरही बरेच जण अतिशय मेहनत घेऊन अनेक खचलेल्या मुलांमध्ये पुन्हा आत्मविश्वास जागवत आहेत. न हिणवता - टोमणे न मारता त्यांच्या चुका दाखवून त्यावर मात करण्यासाठी मदत करत आहेत.

आज तीस वर्षे लोटली तरी हा प्रसंग जसाच्या तसा आठवतोय मला.........

माझा नववीचा रिझल्ट आला, चौथा नंबर व मराठी, हिंदी ( दोन्ही हायर लेवल ) समाजशास्त्रात हायेस्ट गुण मिळालेले. बीजगणितात पैकीच्या पैकी व भूमितीत ७५ पैकी ७१ गूण मिळाले होते. मराठी व हिंदीचा पेपर तर बोर्डावर लावला होता. एकंदरीत सगळे आलबेल होते. दहावीचे वर्ष सुरू झाले. शाळा - क्लास व उरलेल्या...... ( ?? ) वेळात गृहपाठ नुसती हाणामारी होत असे. कृष्णधवल टीव्हीवरील रविवारचा सिनेमा तर सोडाच साधे छायागित का रेडिओवरची बिनाका गीतमालाही ऐकायला मिळेना. दहावीत गेली आहेस आता.... अभ्यास सोडून काहीही करू नकोस..... अगदी पोपटाच्या डोळ्यासारखे फक्त परीक्षेकडे लक्ष ठेव. जिकडून तिकडून हेच कानावर पडत होते. त्यामुळेही उगाच टीव्ही पाहायला जाऊन अजून बोलणी ऐकायला लागू नयेत म्हणूनही असेल पण मी जातच नव्हते.

पहिली चाचणी परीक्षा जुलैच्या शेवटी होणार होती. फार काही ताण अजून जाणवत नव्हता. परीक्षा झाली. सगळे पेपर मस्त गेले फक्त का कोण जाणे आजकाल भूमिती हा शब्द जरी कानावर आला तरी फार भितीच वाटू लागे. बीजगणितात २० पैकी २० मार्क्स मिळणार याची खात्री होतीच. भूमितीचा पेपर हाती आला आणि एकदम घशाला कोरड पडली. पाच प्रश्न होते. एकही प्रमेय धड सोडवता येईना. प्रश्नाचा अर्थच लागत नव्हता....... रडू येऊ लागले. पण सगळे हसतील या भितीने तोंड दाबून जे जे लिहिता येईल ते ते मी लिहिले. एकदाचा पेपर संपला. घरी गेल्या गेल्या आईने विचारले, " काय गं, कसा गेला पेपर? नीट सोडवलेस ना सगळे? चल, पटापट मला सगळे प्रश्न सोडवून दाखव. म्हणजे कालच्यासारखेच कळेल पैकीच्या पैकी गुण मिळतील का ते.... " हे ऐकताच मला कापरेच भरले. कसेबसे आईला लाडीगोडी लावत म्हटले, " आई, नको नं गं...... आत्ताच तर परीक्षा संपलीये. जरा आज तरी मजा करू दे. तू काळजी करू नकोस, पेपर मस्तच गेलाय मला. " कसे कोण जाणे पण आई बरं म्हणाली आणि मी स्वत:ची तात्पुरती सुटका करून घेतली.

पुढच्या आठवड्यात एक एक करून सगळे पेपर मिळू लागले. इतर काही विषयांत पैकीच्या पैकी, एखादा गुण कमी इतके चांगले मार्क्स मिळूनही मला अजिबात आनंद होत नव्हता. पेपर लिहितानाच आपल्याला पुरेपूर माहीत असते...... आपण किती बरोबर लिहिलेय व किती थापा मारल्यात...... मला तर मी सगळेच चुकीचेच लिहिलेय असेच वाटत होते...... छातीत नुसती धडधड होऊ लागली......... तशात आमच्या मुख्याध्यापिका- सौ. काटदरेबाई, भूमिती त्याच शिकवत..... पेपरांचा भारा सांभाळत वर्गात शिरल्या. अल्फाबेटीकली वर्गक्रमांक दिलेले असल्याने माझा नंबर मुलींमध्ये लगेचच होता. ( माझे माहेरचे आडनाव जोशी ) काटदरेबाई एकेकाची अगदी मनापासून भादरत होत्या........... सगळ्या वर्गासमोर निघत असलेले इतरांचे वाभाडे ऐकूनच एक मोठ्ठा हुंदका घशात अडकला. आजवर कधीही चौथ्या नंबरपेक्षा खाली नंबर न घसरलेली मी भूमितीत काय दिवे लागलेत या कल्पनेनेच अर्धमेली झालेली होते. तोच.......

" भाग्यश्री...... अगं तू तर कमालच केलीस गं...... " हे ऐकले आणि मी एकदम बावचळलेच.......... मला खूप कमी मार्क्स असतील हे पक्के जाणून होते तरीही उगाच कुठेतरी क्षणभर वाटले की अरे उगाच घाबरत होतो की काय आपण......... सगळी उत्तरे तर बरोबर आलेली दिसत आहेत. नाहीतर काटदरे बाई इतके हसून असे कसे म्हणतील नं...... पण म्हणतात ना........ असे हे वाटणे कधीच खरे होत नसते...... पुढच्याच क्षणाला त्या अतिशय कुत्सितपणे म्हणाल्या, " वा! चक्क नापास....... धन्य आहेस. अगं नुसते बीजगणितात सगळे गुण मिळवून पास नाही बरं होता येत...... गधडी कुठली. काय शिंगे फुटलीत वाटतं........ २० पैकी फक्त सहा गुण मिळालेत तुला. घ्या आता हा पेपर आणि फ्रेम करून लावा..... आता ये की पुढे पटकन आणि घे हा पेपर........नुसते रडून काय फायदा........ लक्ष नको द्यायला - अभ्यास केलाच नसशील मग काय नापासच होणार नं..... " अजूनही त्या काय काय बोलल्या..... मला काहीच ऐकू येत नव्हते. सगळा वर्ग गरागरा फिरत होता. डोळ्यासमोर आई-बाबांचा चेहरा येत होता........... हे मार्क्स पाहून त्यांना काय वाटेल आणि ते मला किती रागावतील..... कधी तास संपला..... शाळा सुटली..... मला काहीच समजत नव्हते. अशी एकाएकी मला भूमिती का समजेनाशी झाली आहे........ काही संगतीच लागत नव्हती....... घरी जावेसेच वाटेना........

कशीबशी पाय ओढत घरी आले........ आईला पाहताच इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका फुटला..... मी ओक्साबोक्शी रडत होते. आईने जवळ घेतले...... काय झालेय ते अंजारून गोंजारून काढून घेतल्यावर म्हणाली, " हात वेडे, इतके कशाला रडायचे. उद्यापासून तू मला समजावून सांग तुला काय समजत नाहीये ते....... मग आपण पाहू बरं का...... " मी नुसतीच मान हालवली पण मनाने अगदी हाय खाल्ली होती. आपण चक्क नापास झालोय हा धक्का जबरदस्त होता.......... त्यावेळी मी रेगे क्लासला जात होते. तिथे भूमिती शिकवायला श्री. रामभाऊ आठल्ये म्हणजेच माझे आवडते आठल्येसर होते. नववीपर्यंत एकदम पुढे पुढे करणारी ही मुलगी दहावीच्या पहिल्या दोन महिन्यातच आक्रसून गेल्यासारखी करतेय..... आपल्याकडे पाहायचेही टाळतेय..... एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही किंबहुना मी तिला प्रश्न विचारीन या भितीनेच ती वरही पाहत नाही हे सरांच्या लक्षात आलेले होतेच.

संध्याकाळी सहाला क्लास सुरू होई आणि पावणेनऊला संपे. एक दिवस क्लास संपल्या संपल्या सरांनी मला हाक मारली आणि थांब गं जरा..... थोडे बोलायचेय तुझ्याशी..... असे सांगताच मी काहीतरी सबब सांगून सटकायला लागले तशी जरा दमात घेऊनच त्यांनी मला थांबवले. आठल्येसर माधववाडीतच ( दादरचा रेल्वेचा ब्रिज उतरून पूर्वेला आलो की लगेचच ही भली मोठी व खूप जुनी व प्रसिद्ध वसाहत आहे. ) राहतं होते आणि मी तिथूनच पुढे चित्रा सिनेमाजवळ. सर म्हणाले, " मी आहे ना सोबत.... तुला घरी नेऊन घालेन. काळजी नको. " पाच मिनिटात सगळी पोरे पळाली. दोन तीन शिक्षक व कारकून व चुकार दोन -चार पोरे इतकेच आम्ही उरलो. सरांनी मला वर्गात नेले........ मघाशी असलेला सगळा गोंधळ निमाला होता.... " हां...... भागाबाई..... आता बोला शांतपणे..... नक्की काय चाललेय तुझे? आजकाल खूप घाबरून घाबरून असतेस..... कोणी काही बोलले आहे का? त्रास देतेय का..... मी आहे नं.... सांगून टाक. अगं प्रत्येकाला काहीतरी त्रास होतच असतो आयुष्यभर..... मग वय लहान असो की मोठे....... पण सगळ्या प्रश्नांवर उत्तरे असतात बरं का..... चल पटकन सांग बरं.... "

आठल्येसरांचे इतके जिव्हाळ्याचे बोल ऐकताच पुन्हा गंगायमुना पूर आल्यासारख्या वाहू लागल्या. थोडे शांत झाल्यावर अडखळत सरांना भूमितीची कशी भीती वाटतेय आणि मी नापास झालेय हे सांगितले. सारे ऐकल्यावर सर म्हणाले, " ह्म्म्म्म....... असे झालेय का...... बरं. आता मला सांग, आपण नापास झालोय आणि सगळे आपल्याला हसत आहेत, आईबाबांना किती राग आला असेल...... याचे जास्त दु:ख वाटतेय की आपल्याला भूमिती समजत नाहीये - जी गेल्या वर्षीपर्यंत अगदी उत्तम समजत होती त्याचे दु:ख होतेय? म्हणजे दु:ख दोन्हीचेही होणारच गं पण हताश न होता दु:खाचे कारणच नष्ट करायला हवे नं..... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा तुझा जो आत्मविश्वास अगदी गेलाय ना तो ताबडतोब तू परत मिळवायला हवांस........ कसा? सांगतो नं.... ऐक...... आजपासून रोज मनाशी दिवसातून शंभर वेळा घोकायचे, मी हुशार आहे. मला भूमिती समजावून दिली की नक्की समजेल आणि पुढच्या परीक्षेत मी पास तर होईनच शिवाय खूप चांगले गुण मिळवेन. काय.... कळतेय का मी सांगतोय ते? माझ्यावर विश्वास आहे नं तुझा? उद्यापासून मी सांगेन तसा अभ्यास करायचा आणि वेडगळ वाटले तरी मी सांगितलेले वाक्य घोकायचेच...... चल आता घरी जाऊ. " असे म्हणून सरांनी मला घरी नेऊन घातले.

हॅं...... हे असे म्हणून काय मला भूमिती समजणार आहे का? सर पण नं..... उगाच मला काहीही सांगतात....... असे सारखे मनात येत होते खरे, पण सरांवर माझा प्रचंड विश्वास होता....... ते माझ्याकडून अभ्यास करवून घेतील आणि मला तो समजेलच. सरांच्या कालच्या शब्दांनी मला थोडासा धीर मिळाला होता. आठवड्यातले तीन दिवस तासभर भूमितीचा अभ्यास सर नेमाने घेऊ लागले. सहामाही परीक्षा जवळ आली तशी अजून एक तास उजळणी चालू झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खरोखरच रोज दिवसातून शंभर काय त्याही पेक्षा जास्ती वेळा ते संपूर्ण वाक्य म्हणत असे. कदाचित हे हास्यास्पद वाटेल वाचताना........ पण ते अतिशय परिणामकारक ठरले. माझा ढासळलेला आत्मविश्वास, अभ्यास व प्रोत्साहनाच्या मदतीने वाढत होता. सहामाहीचा पेपर दिला आणि मी तडक सरांच्या घरी धाव घेतली. सरांनी संपूर्ण पेपर सोडवून घेतला व तुला ६७ मार्क्स मिळतील....... तू पाहशीलच...... अशी पैजही लावली.

दिवाळीच्या सुटीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी सगळे पेपर मिळाले. इतर विषयांची मला बिलकुल चिंता नव्हतीच. भूमितीचा पेपर कधी मिळतोय असे झालेले........ सगळा जीव एकवटून मी काटदरेबाईंची वाट पाहत होते. एकदाच्या अगदी शेवटच्या तासाला बाई आल्या...... पेपरांचा ढीग टेबलावर ठेवता ठेवता त्यांनी म्हटले, " पहिले दिवे लावणाऱ्यांचे मार्क्स सांगते.... बाकीच्यांचे मागाहून...... " नापास झालेल्या एक एक मुलामुलींची नावे घेत घेत त्यांनी, " भाग्यश्री...... उभी राहा गं........" हे ऐकले मात्र मी तटकन उठून उभी राहिले........ आणि मला चक्करच आली. सरांनी तर पैजेवर सांगितले होते की मला ६७ गुण मिळतीलच. मग..... म्हणजे मला येत असून मी पेपर सोडवलाच नाही की काय...... माझी अवस्था पाहून बाई भरभर जवळ आल्या आणि पाठीवरून हात फिरवून म्हणाल्या, " अगं किती घाबरट गं तू...... तुला काय वाटले... याही वेळेस नापास झालीस का? तुझे नाव म्हणून नाही घेतले मी..... उलट सगळ्यांना कळावे की तू झटून अभ्यास करून ६९ गुण मिळवले आहेस....... हा घे पेपर. आणि असाच अभ्यास करायचाय बरं का आता..... "

दहावेळा डोळे फाडून फाडून मी त्या गुणांकडे पाहून खात्री करून घेत होते. शाळा सुटताच तडक सरांचे घर गाठले..... त्यांना पेपर दाखवला..... त्यांची शाबासकी मिळवली तेव्हां कुठे बरे वाटले. पुढे संपूर्ण वर्ष संपेतो मला संजीवनी देणारे ते वाक्य घोकत होते...... दहावीला भूमिती व बीजगणितात मला १५० पैकी १४७ मार्क्स मिळाले. भूमितीत ७४ मार्क्स मिळवून शाळेतून मी पहिली आले आणि हे केवळ सरांमुळेच घडले. अन्यथा कदाचित मी संपूर्णपणे निराश झाले असते..... अभ्यास मला समजतच नाही.... मी मूर्ख - बिनडोकच आहे, असे म्हणत म्हणत इतरही विषयात नापास झाले असते..... शेवटी वर्ष गमावून बसले असते. पाहिले तर घटना तशी शुल्लक आहे...... चाचणी परीक्षेत नापास होणे म्हणजे काही अगदी पहाड कोसळलेला नाही परंतु ही सुरवात होती. योग्य ते मार्गदर्शन व मानसिक आधार नेमक्या वेळी मिळताच यशाचा रस्ता अचूक सापडला. एक नक्की की मी काही जीव दिला नसता..... परंतु निराशा- त्यातून पुन्हा पुन्हा नापास होणे - अपमान - बोचरे शब्द हे गरगरून टाकणारे चक्र सुरू झाले असते आणि कदाचित मी डिप्रेशन मध्ये गेले असते.......

ही घटना माझ्या सगळ्या जीवनावर परिणाम करून गेली. अजूनही कधीकधी अडखळल्यासारखे- जीवनाच्या लढाईत हारल्यासारखे वाटू लागले की मी आठल्ये सरांचा हा संजीवन देणारा मंत्र घोकते....... आपोआप मार्ग सापडतो........ निराश झालेले मन हसू लागते. देव करो आणि अशा हताश- निराश झालेल्या दुबळ्या जीवांमध्ये आत्मविश्वास जागवणारे माझ्या आठल्येसरांसारखे कोणी....... कुठल्या नं कुठल्या रूपात तत्काळ त्यांना भेटोत. सर आज तुमची व तुमच्यासारखे सगळे विसरून केवळ मुलांसाठी तळमळीने मदत करणाऱ्यांची फार फार गरज आहे. आपण सगळेच असे कोणा निराश मनाला उभारी देऊ शकतो....... नकळत एखाद्याचा जीवही वाचवू शकतो ........ कुठल्याही अपयशावर मात करता येते व यशही मिळवता येतेच हा विश्वास व बळ एकदा का जागृत झाले की मग " नापास " होणारच नाही व होवू की काय अशी भीतीही वाटणार नाही.......

Saturday, April 3, 2010

आठवणीतले ब्रेड कटलेट....

टिळक ब्रिज उतरून खाली आल्यावर डाव्या हाताला वळलो की कोपऱ्यात चंदू हलवाई. त्यावरून पुढे सरकलो की एक फ्लोरीस्ट आणि बरोबर तिथेच आहे हॉटेल स्वागत. गेली तीस वर्षे, मीच पाहत आलेय... बहुतेक त्याही आधीपासून हे हॉटेल आहेच. उडप्याचे असले तरी एकदम मस्त आणि जरा वेगळ्याच स्टाइलचे चाटही मिळते. शिवाय थाळी व काही पंजाबी खानाही मिळतो. घर-कॉलेज दादरलाच. नोकरी लागल्यावरही दादर सुटणे शक्यच नव्हते. जीवनात स्थित्यंतरे होत गेली तसतसे राहण्याच्या जागाही बदलत गेल्या असल्या तरी दादर हे अविभाज्य घटकातच अंतर्भूत राहिले.

स्वागत मध्ये आमचा अड्डा नेहमीच जमायचा. कॉलेजमध्ये गेल्यामुळे रडतखडत बाबांनी पॉकेटमनी रू. पन्नास देण्याचे कबूल केलेले पण त्यातही एक मेख होती. येण्याजाण्यासाठी बसचे वेगळे पैसे मिळणार नाहीत. तेव्हां बसचे मिनिमम तिकीट होते एक रुपया. त्यामुळे फार चैन परवडणारी नव्हतीच. स्वागत मध्ये एक खास चाटची डीश मिळे. नाव होते
ब्रेड कटलेट. एकच कटलेट पण आकाराने दणदणीत. सोबत कांदा, टोमॅटो, काकडी व रगडा. शिवाय बाजूला लाल-हिरवी चटणीही असे आणि याची किंमत होती एक रुपया पन्नास पैसे. एक खाल्ले की पोट भरून जाई. स्वागत आणि तिथे मिळणारे हे ब्रेड कटलेट म्हणजे कॉलेजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक होता. हल्लागुल्ला, साजरे झालेले वाढदिवस, काही एकदम सीरियस चर्चा सारे इथेच होत असे. लेकालाही अनेकदा खास नेऊन मी इथे खिलवलेय. गेल्या दहा वर्षात जेव्हां जेव्हां मायदेशी आले त्या प्रत्येक भेटीत मी आणि आई स्वागतमध्ये आलोच.

२००७ मध्ये मी आणि आई पुन्हा एकदा या ब्रेडकटलेटच्या ओढीने स्वागतमध्ये आलो तर अन्ना म्हणे की आता आम्ही ते बनवत नाही. बनवत नाही.....??? अरे, असे कसे.... आमच्या इतक्या आठवणींत सामावलेले हे ब्रेड कटलेट चक्क तुम्ही आता बनवत नाही..... मला खूप वाईट वाटले. तो म्हणे ताई दुसरे काही खाऊन पाहा नं... कितीतरी नवीन पदार्थ आणलेत.... पण मन उदास झाले. काहीच खावेसे वाटेना. फक्त कॉफी घेऊन निघालो. आता पुन्हा स्वागत मध्ये येण्याचे प्रयोजनच उरले नाही. आधीच हा सारा परिसरच बदलून गेलाय, ओव्हरब्रिज आलाय. फार्मर ब्रदर्सही राहिले नाही. अनेक छोटी मोठी दुकाने बदलली. नाही म्हणायला वालीया अँड कं, दाऊद शूज, चंदू हलवाई, अगरवाल क्लासेस, ज्योती हॉटेल, गांगल ऑप्टिशियन, आणि काही किड्स कॉर्नर्स अशी काही दुकाने आजही टिकून आहेत.

काल सहजच गप्पामध्ये कॉलेज- कट्टा- मणीजची इडली व अनलिमिटेड चटणी आणि सांबार, एवन चा समोसा, स्वागत व ब्रेड कटलेटची आठवण निघाली. त्या मुक्त मजेच्या, आनंदी, स्वच्छंदी दिवसांची, मित्रमैत्रिणींबरोबर केलेली धमाल, भटकंती..... सारे सारे जसेच्या तसे तरळून गेले. आता सगळे कुठे कुठे पांगलेत. आपापल्या संसारात - रहाटगाडग्यात अडकलेत. स्वागतही बदलून गेलेय. वाटले निदान तेच ब्रेड कटलेट आपण घरी करावे व त्या सोनेरी दिवसात रममाण व्हावे. तुम्ही आधी कधी स्वागतला गेला असाल आणि खाल्ले असल्यास पुन्हा एकवार तुमच्याही आठवणी ताज्या होतील. ( आता मिळतच नाही नं ते...... ) आणि खाल्ले नसल्यास घरी करून पाहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. घरी एखादा पदार्थ करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चवीत थोडा बदल करता येतो. खास करून तिखटपणा वाढवता अथवा कमी करता येतो. मीही थोडासा बदल केलाय. स्वागतच्या ब्रेड कटलेटमध्ये चटण्यां व्यतिरिक्त काहीच नसे. मी चटण्या व मटाराचे जरासे सणसणीत स्टफिंगही घातलेय. :)



कटलेटच्या आवरणासाठी साहित्य:

दोन मोठे बटाटे उकडून घ्या.
चार ब्रेडचे स्लाइस चुरा करून
एक चमचा जिरे, चार मिरे, चवीनुसार मीठ व एक चमचा तेल

रगड्यासाठी साहित्य:

दोन वाट्या भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.
नेहमीची फोडणी व दोन चमचे तेल व चवीनुसार मीठ

स्टफिंगसाठी साहित्य :

दोन वाट्या ओले मटार दाणे ( आजकाल वर्षाचे बारा महिने फ्रोजन मटार मिळतोच )
मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
एक छोटा कांदा बारीक चिरून
दोन लसूण पाकळ्या, एक चमचा जिरे व दोन हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात
चवीनुसार मीठ व अर्धा चमचा साखर
एक चमचा लिंबाचा रस व दोन चमचे तेल

चटण्या:

हिरवी चटणी:
दोन मुठी कोथिंबीर बारीक चिरून
चार हिरव्या मिरच्या
सहा सात पुदिना पाने
दोन लसूण पाकळ्या
चार चमचे लिंबाचा रस
चवीनुसार मीठ घालून लागेल इतके पाणी घालून चटणी करावी.
( पाणी जरा कमीच घालावे. चटणी वाहायला नकोय )

लाल चटणी:
चार सुक्या मिरच्या
चार लसूण पाकळ्य़ा
चवीनुसार मीठ घालून कमीतकमी पाणी घालून चटणी करावी.
( ओल्या लाल मिरच्या मिळाल्यास ही चटणी अजूनच सुंदर व सणसणीत होते )

चिंचगुळाची चटणी:
दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

एक मध्यम कांदा, एक काकडी व एक टोमॅटो: बारीक चिरून घ्यावे.
कटलेटस शॅलो फ्राय करण्यासाठी दहा ते बारा चमचे तेल.

वरील साहित्याची सहा ते सात मोठी कटलेट्स होतात.

मार्गदर्शन:

बटाटे व भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.

रगडा : कढई/ नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचा तेल घालून ते तापल्यावर मोहरी, हिंग, हळद व एक चमचा धणेजिरे पूड घालून फोडणी करावी. त्यावर हे उकडलेले पांढरे वाटाणे घालून दोन-तीन मिनिटे मोठ्या आचेवर परतावे. नंतर गॅस मध्यम करून दोन भांडी पाणी व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून दहा मिनिटे ठेवावे. एक उकळी आली की आच बंद करावी. रगडा तयार.

आवरण : उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून किसून घ्यावेत अथवा हाताने कुस्करून घ्यावेत. लगदा झाला पाहिजे. किसल्यामुळे गुठळ्या राहात नाहीत व सोपे पडते. मिक्सरच्या चटणी जार मध्ये ब्रेडस्लाईसचे तुकडे, चमचा भर जिरे व चारपाच मिरे टाकून भुगा करून घ्यावा. एकावेळी दोन स्लाइसचे तुकडे टाकावेत. एक थेंबही पाणी घालू नये. कोरडा भुगा करायचा आहे. किसलेल्या बटाट्यात हा ब्रेडचा भुगा व चवीनुसार मीठ घालून मळावे. नीट एकजीव झाले की एक चमचाभर तेल लावून झाकून ठेवावे.

स्टफिंग : एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम करावे. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. एकीकडे लसूण, जिरे व हिरव्या मिरच्या वाटून घेऊन या परतलेल्या कांद्यावर टाकून दोन मिनिटे परतावे. त्यावर ओला मटार, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सारे मिश्रण हालवून पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. मटार पटकन शिजतो. जरा कमी शिजलाय असे वाटल्यास अजून तीन-पाच मिनिटे झाकण ठेवावे. आता त्यात साखर व कोथिंबीर घालून परतावे. दोन मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.

सगळे साहित्य तयार झाल्यावर साधारण मोठ्या लिंबाएवढे चार गोळे घ्यावेत. हाताला किंचितसे तेलाचे बोट लावून हातावरच थापून घ्यावे. हाताच्या तळव्याएवढा प्रत्येकाचा आकार करावा. पहिल्या चकतीला हिरवी चटणी लावावी. त्यावर दुसरी चकती ठेवून त्यावर एक टेबल स्पून स्टफिंगसाठी केलेली भाजी घालावी. त्यावर तिसरी चकती ठेवून लाल मिरचीची चटणी लावावी. त्यावर चौथी चकती लावून हलक्या हाताने या चारही चकत्या बंद कराव्यात. अशा प्रकारे चार कटलेट तयार करून घ्यावीत. नॉनस्टिक तव्यावर दोन चमचे तेल सोडून मध्यम आचेवर तवा तापवून घ्यावा. शक्यतो सगळीकडे सारखी आच लागेल असे पाहावे. तवा तापला की हलकेच तयार कटलेट ठेवून बाजूने चार चमचे तेल सोडावे. आच न वाढवता कटलेटस सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावीत. वाढताना गरम गरम कटलेट वाटीभर रगडा, तीनही चटण्या व कांदा, टोमॅटो व काकडीबरोबर खायला द्यावे. आवडत असल्यास शेवही द्यावी.

टीपा:
रगडा जसजसा थंड होतो तसा घट्ट होत जातो. त्यामुळे वाढण्याआधी अर्धे भांडे पाणी घालून पुन्हा एक उकळी आणावी किंवा कडकडीत गरम अर्धे भांडे पाणी घालून सारखे करून घ्यावे. शिजवताना वाटाण्यांचा अगदी गाळ करू नये. कटलेटस शॅलो फ्राय करताना आच मोठी ठेवून भरभर करू नयेत. ब्रेडक्रम्समध्ये घोळून घेवून घेतले तरी चालेल. पण त्याची खास गरज नाही.

दिसायला ही कृती खूप वेळ खाणारी व बापरे! इतक्या गोष्टी कराव्या लागतील....... असे वाटायला लावणारी भासली तरी थोडेसे नियोजन केल्यास सहजी जमू शकेल. आदल्या दिवशी तीनही चटण्या व रगडा करून ठेवता येईल. अगदी स्टफिंगची भाजीही करून ठेवता येईल. दहा वर्षे आणि पुढे वयाच्या मुलांच्या पार्टीसाठी एकदम पर्फेक्ट पदार्थ. हमखास आवडणारा व पोटभरीचा. सोबत वेफर्स व केक किंवा एखादा गोडाचा पदार्थ असे कॉम्बिनेशन
करता येईल.