जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 26, 2010

दुष्टचक्र

" मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया
जो लिखा था आसूंओंके संग बह गया..... "

" उचल गं बये, उचल पटकन. अगदी ऐकवत नाही मला हे गाणे आता. चार दिवस झाले फक्त हेच ऐकतोय. किटलो... विटलो. आता तुझा अतिरेक झालाय. मी घरी येतोय. च्यायला, हे कोणाला सांगतो आहेस तू? थोड्याच दिवसात तूही पागल होणार आहेस तिच्यासारखा. दोघातिघे वळूनवळून पाहत होते पाहिलेस ना तू? आणि हे सारे या गधडीमुळे. आज तिची अशी तासतो नं की काय बिशाद लागून गेलीये पुन्हा किमान महिनाभर तरी हे फेफरे येईल. त्यापेक्षा जास्त आशा ठेवणे म्हणजे स्वत:ला फसवणे होईल. निदान महिना तरी ती जगेल आणि आईही जगतील. अपना क्या हैं, सईबाई खूश की हम जिंदा वरना सुनते रहो..... मेरा जीवन कोरा कागज कोरा ही ...... "

( दारावरची बेल वाजते... एकदा दोनदा.... अखंड वाजतच राहते. आधी ऐकून दुर्लक्ष केले तरी आता निरुपाय झाल्याने संतापून सई दार उघडते. तो हातात वडापाव घेऊन उभ्या अवीला पाहून अजूनच पिसाळते.)

" अवी, मी दार उघडलेय. आता तो बेलवरचा हात काढ आणि वडापाव टिपॉयवर ठेवून चालता हो. "

( तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अवी आत घुसतो तो थेट स्वयंपाकघरातल्या ओट्यावर स्थिरावतो. ते पाहून चडफडत सई दार आपटते आणि तरातरा अवीपाशी येते. चिडून काही बोलावे तोच अवी तिच्यासमोर वडापाव धरतो. गेल्या चार दिवसांपासून धड काहीच न खाल्ल्याने, रडून रडून दमलेली सई त्या वासाने थोडीशी नॉर्मल होते. पटकन अवीच्या हातातला वडापाव ओढून घेत ती एक मोठ्ठा घास घेते. मग अवीच्या शेजारीच ओट्यावर बसत अवीकडे दुर्लक्ष करत वडापाव खाऊ लागते. ते पाहून अवीच्या चेहरा खुलतो. )

" सये, काय भंकस रिंगटोन लावून ठेवला आहेस गं तू. मुळात या अश्या गाण्यांचा रिंगटोन बनवणाऱ्यालाच मी बदडणार आहे. बरं लावलास ते लावलास वर माझा जीव जाईतो तो ऐकवत राहतेस म्हणजे तुझ्या निर्दयीपणाची कमाल झाली. दे तो फोन इकडे मी बदलूनच टाकतो ती कटकट. "

( फोन घ्यायला जातो तशी सई डोळे मोठे करते. अवी थांबतो निमूट पुन्हा शेजारी येऊन बसतो. तशी सई सगळे चित्त केंद्रित करून वडापाव खाऊ लागते. तिला इतके मन लावून खातांना पाहून.... )

" सुटलो. नाही म्हणजे ही इतकीच लाच द्यायचा अवकाश होता हे आधीच कळले असते तर गेले चार दिवस फुकट गेले नसते. अगं, डोळे कशाला इतके मोठे करते आहेस? माझे नाही तुझेच म्हणतोय मी. आपले काय, आपण तर कायमचे रिकामटेकडे. बरं तू खा सावकाश. अजून तीन आहेत गं. "

" बरं बरं कळले बरं का. आणि काय रे, चार कशाला आणलेस? येताना तू हादडून आला असशीलच. "

" तू पण एकदम चमच आहेस गं. चार दिवस गोशात बसली होतीस न तू. दिवसाला एक....... सिंपल हिशोब. बाकी हिशोबाला तू कच्चीच आहेस. साधे कशातून काय वजा करायचे आणि कुठे कोणाला मिळवायचे हे तुला कधी कळलेच नाही. बरं असू दे. ती गणिते तुझे खाऊन झाले नं की मांडू आपण दोघे मिळून. तोवर आईंना मेसेज टाकतो, " काम फत्ते. ग्रहण सुटले. महिनाभर शांती. " आई खूश होईल. "

" अवी, ती माझी आई आहे. तुझी नाही. तिला कसे खूश करायचे ते पाहीन मी. तू कशाला सतत आमच्या मध्ये लुडबडतोस. जो असायला हवा होता तो तर गेला टाकून. आता कोणीही नकोय मला. तूही नको आहेस. जा बरं तू. "

" इतका अप्पलपोटेपणा लहान मूलंही करत नाहीत. वडापाव चापून झाला आता अवीला हाकला. स्वार्थी कुठली. मी इतका धडपडत घेऊन आलो त्याची तुला काही कदरच नाही. " ( सईच्या डोळ्यात टचकन पाणी येते, ते पाहून अवी गडबडतो. पुन्हा चार दिवस की काय या भितीने थोडा आक्रमक होतो. )

" रडा रडा. तुझे डोळे आहेत की जिवंत झरे. तुला वाळवंटात नेऊन ठेवले पाहिजे. " ( हळूच तिच्या गालावरचा अश्रू ओठांनी टिपतो. तसे सई त्याला मागे ढकलते. )

" अगं, मी चव पाहत होतो. इतके रडून रडून त्यातला खारेपणा नक्कीच संपला असणार याची खात्री होतीच मला. चल, मग ठरलं तर. सईबाई वाळवंटात गोड्या पाण्याचे छोटेसे तळे निर्माण करणार. "

" तू पण असा गोडबोल्या आहेस नं अवी.... " ( असे म्हणत येणारे हसू दाबत सई त्याला दोन धपाटे घालते. तशी तिला जवळ घेत..... )

" सये, अगं बाबा टाकून गेला तेव्हापासून तुझ्या मनाचा एक कप्पा अंधारला आहे. जेव्हां जेव्हां त्या अंधारवाटेवर तू धडपडू लागतेस तेव्हा फार एकटी होतेस.... असहाय तडफडतेस, उरी फुटून आक्रोश मांडतेस. तुझ्या ' त्या ' जगात तू कोणालाही प्रवेश देत नाहीस. अगदी मलाही. शेवटी तुझा आक्रोश, तुझे एकाकीपण शब्दामधून स्त्रवू लागते आणि सुरू होतो एक घुसमटलेला प्रवास. एकटेपणाला शब्दांची सोबत मिळण्याऐवजी शब्दांनाच एकटेपणा मिटवून टाकतो.....

परिणिती तुझे ओठ मिटून जातात....

तुझं सगळं जीवन म्हणजे दु:खाचा एक सलग प्रवास. त्या प्रवासात ज्या ज्या कोणी तुला क्षणिक सुखावलं असेल ती सारी माणसं माझ्या दृष्टीने खूप चांगली. त्यांच्या या नकळत केलेल्या कृतीमुळे तू माझ्यापर्यंत पोहोचलीस. तू मला हवीस म्हणून त्यांचे उपकार झालेत माझ्यावर. पण याचबरोबर ज्या ज्या कुणी तुझा उपहास केला, हिणवलं ती सारी माझी शत्रू झालीत. मी मनस्वी द्वेष करतो त्यांचा. करत राहीन. अगं, पण ते तर परके. काठावरून दगड मारणारे. त्यांची कुवत तितकीच आणि लायकी त्याहूनही कवडीची. पण तू का त्यांना साथ देते आहेस? तीही इतकी वर्षे? सातत्याने....?

माझ्या मन:शांतीसाठी तुझं अस्तित्व अपरिहार्य आहे पण तुझ्या जगण्यासाठी मी अपरिहार्य आहे...... ह्याची जाणीव तुला आहेच. मात्र या जाणीवेवर तुझा मनस्वीपणा मात करतो. हे जेव्हां संपेल त्या दिवशी तुझी मानसिक, शारीरिक प्रकृती सुधारेल. तुझा सर्वात जास्त छळ तू स्वत:च करते आहेस. किती काळ दु:ख कुरवाळत बसणार आहेस? हा छळ अनाठायी आहे असे मी म्हणत नाहीये गं.... परंतु यातून काहीही साध्य होतेय का? बाबाचे जाणे तुझ्या हाती नव्हते आणि त्याला थांबवणे तुला साधले नाही. नाही नाही.... मी तुला मुळीच दोष देत नाही. तो त्याचा निर्णय होता. सर्वार्थाने स्वार्थी निर्णय. तुझे काय होईल याचा विचार त्याने केला असेलच हे नक्की. पण त्याचा स्वार्थ मोठा असावा. त्यावेळी त्याला जे संयुक्तिक वाटलं ते त्याने केलं. खरं तर त्याच्यात तेवढंच बळ होतं.... तुला टाकून जाताना तो उरी फुटला नाही की त्यानंतर त्याने पुन्हा एकदाही मागेही वळून पाहिलं नाही. कदाचित त्याच्यात ती हिंमतच नसेल. कदाचित जाणूनबुजून केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता तो भोगतोय. जे काही असेल ते असो. पण तो सुखी नक्कीच नसावा. केलेल्या गुन्ह्याची माफी मागण्याची ताकद नसेल त्याच्यात.

खरंय गं... मला सारं कळतंय.... त्याने एक घाव दोन तुकडे केले. खुशाल तुला-आईंना टाकून निघून गेला. स्वच्छंदी सोयिस्कर मार्ग स्वीकारला आणि सुटला. तुला टाकून... पोरकं करून. तू प्रत्येक घावाला मेलीस. परत परत मेलीस. जगाने तुला एकदाही बक्षले नाही. सारं सारं मान्य. त्याची शिक्षा स्वत:ला? आईला? मला? का? त्यापेक्षा जगाला फाट्यावर मारायचेस ना? एकटेपणा... रितेपण.. एकांत... ओहोटी यांना अंत असतो का गं? तुला कंटाळा कसा येत नाही दु:ख कुरवाळण्याचा?? अरे ते वेदनेचे तळे कधीचेच आटलेय.... त्यात पुन्हा पुन्हा तुझ्या आसवांची भर कशाला? तुला माहीत आहे नं, काही काळाने वेदना बोथट होतात... उरतात फक्त व्रण. कालांतराने तेही पुसट होतात. उगाच मला तुझे तत्वज्ञान सांगू नकोस..... काळ नक्कीच दु:ख कमी करत असतो. जग सगळं वेडं आणि तूच काय ती एकटी शहाणी का? मुकाट ऐक मी काय बोलतेय ते.... कधी नव्हे ती अशी संधी तुझ्याही नकळत तू मला देऊ केली आहेस. तेव्हा मन सताड उघडं आणि ती वांझ तडफड बंद करून ऐक.

जेव्हां गोष्टी गृहीत धरल्या जातात तेव्हा त्याची कदरच उरत नाही. तसेच काहीसे तुझे झालेय. पण जीव लावणारी व्यक्ती सर्वस्वाचं शिंपण करून सेतू बांधत असते. ते बंध खरे असतील तर त्या वंचना करणार्‍या हृदयाचे अश्रू कितीही अहं जोपासला तरी झरतीलच. अन त्या प्रत्येक थेंबागणिक ते मन आक्रंदन करेल. त्यांच्या संवेदना, जाणीवा एकवटतील आणि केव्हांतरी तो ’ अहं ’ लीन होईल. तिच्या वंचनेचा पराभव होईल. पण हे सारं कधी होईल..... तू त्या अंधारयात्रेतून बाहेर पडशील तेव्हा नं..... निदान प्रयत्न तरी कर.

अशी चिडू नकोस गं मी असे म्हणतोय म्हणून. तुझ्याही नकळत तू जोपासले आहेस हे दु:ख. कुठेतरी खोलवर तू आईला जबाबदार धरते आहेस. हा तुझा ’ अहं ’ तुला तिच्याजवळ जाऊ देत नाही हेही दिसत नाही का तुला? तू माझ्यापाशी असतेस तेव्हाही सतत हा कोश तुला मागे ओढत असतो. माझे सोड गं पण आई...... तिचा काय दोष आहे? ती तर दोन्ही बाजूंनी यातना भोगतेय. नवरा मेला तर निदान ढळढळीत वैधव्य घेऊन ताठ कण्याने जगता येईल गं. पण नवरा परागंदा झालाय.... का? कोण जाणे. त्याने जाताना साधी दोन ओळींची चिठ्ठी खरडण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. घरातल्यांनी, समाजाने प्रश्न विचारून विचारून तिची गात्रच बधिर झालीत. ते सगळे कमी होते म्हणून.... तू.... तू ही छळ करावास तिचा? जणू तीच तुला टाकून निघून गेल्यासारखा उभा दावा मांडलास. अगं बाबाच्या नावाची अंघोळ करून ती कधीच मुक्त झाली आहे. तू ही मुक्त हो. स्वत:साठी नको होऊस गं बाई...... आईसाठी तरी? घाबरतेस? नको घाबरूस सये.... अगं, मी आहेच नं साथ द्यायला.... सदैव. फक्त तुझा, तुझ्याचसाठी.... कायमचाच. "

" अवी, तुझी तळमळ कळते रे मला. मी चुकतेय हेही कळतंय. तरीही, मी माझा, आईचा, तुझा छळ करतेय. पण, हे दुष्टचक्र मला थांबवता येत नाही. अवी, मी पुन्हा एकवार प्रयत्न करेन. आईसाठी, तुझ्यासाठी. फक्त तू माझ्याबरोबर राहा. कायमचा. " ( असे म्हणत सई अवीला बिलगते आणि आता पुढचा दौरा कधी याचा अंदाज घेत, अवी तिला थोपटत राहतो. )


( कथाबिज काही अंशी एका सत्यघटनेवर आधारित आहे )

Sunday, August 22, 2010

उंधीयो

थंडीची चाहूल लागली की दिल्ली मटार आणि उंधीयो हे दोन्ही हटकून बाजारात दिसू लागतात. मटारच्या लांब भरलेल्या हलक्या हिरवा रंग असलेल्या तजेलदार शेंगा जातायेता लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर सुरती पापडी, तिचे सोललेले दाणे, जांभळी-काळपट छोटी छोटी वांगी आणि कोनफळे. खंडेलवाल, प्रशांत व टिपटॉपकडे उंधीयोचे बोर्ड खुणावू लागतात. अनेक ठिकाणी घरगुती उंधीयोही मिळतो. गुजरातची खासियत असलेला उंधीयो महाराष्टात कधीचाच रुळलाय. अगदी रांग लावूनही उंधीयो घेणारे लोक घाटकोपरच्या टिपटॉपकडे पाहिलेत.

तशी ही बरीच खटपटीची भाजी आहे. त्यामुळे बहुतांशी बाहेरून आणण्याकडेच कल असतो. परंतु बाहेरच्या उंधीयोत प्रचंड तेल बदबदलेले असते आणि अनेकवेळा चक्क दुकानाच्या समोरील फुटपाथवर बसून तिथे काम करणारी पोरे तयारी करताना दिसतात. त्यावर उडणारी धूळ, येताजाता लोकांचे चाललेले ख्यॉखूं... आणि इतरही काही... पाहिले की अगदी कसेसेच होते. तरीही ती खायची वासना चक्क डोळेझाक करायला लावते आणि आपण खातोच. मात्र मिळतच नाही म्हटल्यावर हीच खादाडीची इच्छा अजूनच कटकटायला लागते. शेवटी आळशीपणाची हार आणि जिभेचा विजय होतो. तर असा हा उंधीयो पुन्हा एकदा गेले दोन तीन दिवस छ्ळत होता, सरतेशेवटी आज केला. आता माझा छळवाद संपलाय म्हणून पोस्टतेय. कदाचित तुम्हालाही आवडेल. वर म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतेय की जरा वेळखाऊ व किंचित मेहनत करायची तयारी ठेवून उंधीयो करावा लागेल. मात्र एकदा केलात की तब्येतीत हाणता येईल.

मैत्रिणींनो एकदा ही मेहनत करून नवर्‍याला खिलवलेत नं की पुढच्या वेळी ( आणि ती वेळ लगेच येईल ) जेव्हां, ’ पुन्हा कर गं ’ ची फर्माइश येईल तेव्हां, " ए नाही रे. आत्ताच तर केला होता. खूप मेहनत होते. तुला काय तू मस्त मज्जेने खाशील. " असे म्हणून आढेवेढे घेतलेत की लगेच नवरा किमान दिखाव्यापुरते तरी म्हणेलच, " हात्तिच्या! त्यात काय मोठे. चल मी मदत करतो तुला. " बस. मग पुढे काय करायचे ते मी सांगायला नकोच....




वाढणी : चार माणसांना दोन वेळा पुरेल.

उंधीयो हा खरे म्हणजे नुसताच खाल्ला जातो. वाडग्यात उंधीयो घेऊन त्यावर चमचाभर लिंबाचा रस, कोथिंबीर, दोन चमचे शेव व सणसणीत हिरवी चटणी घालून गरमागरम उंधीयो डोळे, जीभ व मन यासगळ्यांनी खायचा. पहिला वाडगा संपेतो कोणाशी बोलायचे नाही की टिवी पाहायचा नाही.

( साहित्याची लांबलचक यादी पाहून पळ काढू नका. खयालों में जा ...... )


साहित्य:

छोटी जांभळी-काळी वांगी दहा ते बारा
दोन मध्यम रताळी साल काढून तीन तुकडे करून
दोन मोठे बटाटे साल काढून तीन तुकडे करून
सुरती पापडीच्या शेंगा चारशे ग्रॅम/ फ्रोजन घेतल्यास एक पाकीट
सुरती पापडीचे सोललेले दाणे पाव किलो/ फ्रोजन घेतल्यास एक पाकीट
कोनफळ अर्धा किलो : दोन इंचांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत
कच्ची केळी दोन घेऊन त्याचे प्रत्येकी दोन तुकडे करून

एक मोठी कोथिंबिरीची जुडी पाने व काड्या वेगवेगळ्या करून घ्यावी व दोन्ही चिरून ठेवावे.

अर्धी वाटी तेल, दोन चमचे तूप

पाच - सहा चमचे लाल तिखट, दीड चमचा हळद, चार - पाच चमचे धणेजिरे पूड, एक चमचा गरम मसाला.
( आवड व झेपेल तितके प्रमाण वाढवावे, )

दोन चमचे चिंचेचा घट्ट कोळ.

एक चमचा साखर व चवीनुसार मीठ.


मसाल्यासाठी :

एक मोठा लसणाचा गड्डा सोलून तुकडे करून : पाच-सहा चमचे तरी हवेतच
चार चमचे आल्याचे चिरलेले तुकडे
बारा-पंधरा हिरव्या मिरच्या चिरून
पाऊण वाटी तीळ
चार चमचे सुके खोबरे ( शक्यतो तयार खीस मिळतो तो घ्यावा )
अर्धी वाटी चिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या


मुठीये करण्यासाठी :

अर्धी मेथीची जुडी: पाने खुडून धुऊन चिरून घ्यावीत
( जर ताजी मेथी मिळाली नाही तर फ्रोजन मेथी घ्या. तीही हाताशी नसेल तर कसुरी मेथी तीन चमचे घ्या )
तीन चमचे डाळीचे पीठ
दोन चमचे तांदुळाचे पीठ
दोन चमचे रवा
चार चमचे गव्हाचे पीठ
एक लसूण पाकळी ठेचून, एक हिरवी मिरची बारीक चिरून
पाव चमचा ओवा, एक चमचा हळद, हिंग व दोन चमचे लाल तिखट
चवीनुसार मीठ व एक चमचा तेल

तळण्याकरिता तेल.

हिरवी चटणी :
(ऐच्छिक )

पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून, एक पेरभर आले बारीक चिरून, एका लिंबाचा रस, मूठभर चिरलेली कोथिंबीर व स्वादानुसार मीठ.

कृती :

वांगी धुऊन डेखं काढून मधोमध चीर करून घ्या. रताळी-बटाटे व केळाचे तुकडे धुऊन घ्या. ताजी सुरती पापडी मिळाल्यास दोरे काढून संपूर्णच ठेवा. दाण्यासाठी आणलेल्या सुरती पापडीतले दाणे काढून झाले की तीही घ्या. कोनफळ स्वच्छ धुऊन ( फार माती असते याला लागलेली ) साल काढून तुकडे करून घ्या.

आता मसाल्यासाठी दिलेले सगळे साहित्य घेऊन मिक्सरला घालून वाटून घ्यावे. अगदी गंधासारखे नको परंतु एकजीव व्हायला हवे. साधारण एक मोठा वाडगा भरून मसाला तयार होईल.

एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये अर्धी वाटी तेल घालून तापत ठेवावे. चांगले तापले की वाटलेला मसाला घालून परतावे. आंच मध्यम ठेवावी. मसाला गुलाबीसर होईतो परतायचा. मात्र आंच मध्यम ठेवूनच.

तोवर परातीत मुठीये करण्यासाठी दिलेले सगळे साहित्य घेऊन पाणी न घालता मळावे. मेथी धुऊन घेतलेली असल्याने / फ्रोजन घेतल्यासही ती ओलीच असते, थोडेसे पाणी अंगचेच असते. एकदा का सगळे मिश्रण एकजीव होऊ लागले की लागेल तितकेच पाणी घालून पुरीची कणीक जितपत घट्ट भिजवतो तितपत घट्ट गोळा तयार करावा. जरासा तेलाचा हात लावून या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करावे किंवा लांबट मुटके करावे. कढईत तेल चांगले तापवून आच मध्यम करून सोनेरी रंगावर तळून घ्यावे.

मुठीये करत असताना मसाला परतत राहावा. तेल सुटू लागलेले दिसले की रताळी व बटाटे घालून हालवून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून एक सणसणीत वाफ काढावी. ( दहा मिनिटे ) नंतर कोनफळ, सुरती पापडी व तिचे दाणे घालावे, त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरून मिश्रण हालवून पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून वाफ काढावी. ( सात आठ मिनिटे )

आता बटाटे व रताळे बरेचसे शिजले असतील. वासही सुटू लागलेला असेल. मिश्रणाचा कच्चा रंग बदलून थोडीशी तकाकी दिसेल. त्यावर वांगी व केळी घालून उरलेली सारी कोथिंबीर व अर्धी वाटी पाणी घालून हलक्या हाताने ढवळून वाफ काढावी. ( सात-आठ मिनिटे ) आच आपण मुळातच मध्यम ठेवली आहे ती तशीच हवी.

झाकण काढून लाल तिखट, हळद, धणेजिरे पूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण हलकेच ढवळून दोन मिनिटे झाकण ठेवावे. अर्धी वाटी पाण्यात चिंचेचा कोळ मिसळून ते पाणी व साखर जवळपास शिजलेल्या उंधीयोत घालून ढवळावे. उंधीयोला तेल सुटू लागलेले दिसत असेलच. तयार करून ठेवलेले मुठीये घालून जर पाणी अगदीच कमी वाटले ( उंधीयोला रस्सा असत नाही परंतु ते कोरडेही नसते. जिथल्या तिथे प्रकारात ते मोडते. ) तर वरून पाण्याचा एक हबका मारावा व झाकण ठेवून सात-आठ मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे. झाकण काढून त्यात तूप मिसळून लगेच झाकण ठेवावे. ( तुपाचा स्वाद मुरू द्यावा )

वाढताना शक्यतो एखादे वांगे, केळे, बटाटा, रताळे, कोनफळ, पापडी-दाणे व दोन तीन मुठीये येतील असे सगळे वाढावे. लिंबू, कोथिंबीर, शेव व हिरवी चटणी घालून गरम गरम, नुसते अथवा पुरी किंवा फुलक्यांबरोबर खावे.

टिपा:

सुरती पापडी व तिचे दाणे उंधीयोसाठी हवेतच.

फ्लॉवर, फरसबी, कोबी, टोमॅटो, सिमला मिरची, वगैरे सारख्या भाज्या यात घालू नयेत. कंद चालतील.

तिखट, धणेजिरे पूड व मसाला घालताना हात थोडा सैलच सोडावा.

मुठीये करताना थोडे जास्तच करावेत. घरातले सगळेजण निदान दोन दोन तरी पळवतातच. आणि आपणही एखादा हळूच मटकावतोच.

इतकी मेहनत करून बनविलेला उंधीयो किमान दोन तीनदा तरी खाता यावा म्हणून... पण जर फक्त एकाच वेळेपुरता हवा असेल तर वरील साहित्य वापरून केलेला उंधीयो साधारण आठ ते दहा माणसांना पुरावा.

उंधीयोतील भाज्या शक्यतो मोडू/ गाळ होऊ देऊ नयेत. अखंड राहायला हव्यात. त्यासाठी अडस होईल असे पातेले अजिबात घेऊ नये.

अजून वाचतायं.... का फोटू पाहून पळ काढलात??? आता मी मात्र कलटी मारतेयं.... कुठे? पानं घेतलीत नं ...... .

Thursday, August 19, 2010

शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......

आज शाळेतल्या जीवलग मैत्रिणीचा फोन आला. जवळजवळ वीस वर्षांनी आम्ही एकमेकींचा आवाज ऐकत होतो. ती म्हणाली, " ओळख बरं, कोण बोलतंय ते? " क्षणात माझ्या तोंडून गेले, " साधना..." आम्ही खूप वेळ व अनेक आठवणी काढून भरभरून बोलत राहिलो. दोघींनाही किती अन काय काय बोलू असे झालेले. मन भरून आलेले. इतकी वर्षे कोंडलेले आभाळ अचानक बरसत होते.

फोन ठेवला अन जाणवले हा सारा संवाद होत असतानाच त्याला समांतर, माझ्या मनातही एक संवाद सुरू होता. शाळेच्या दहा वर्षांच्या आठवणी तासाभरात संपणाऱ्या नसल्या तरी त्यांना नव्याने उजाळा मिळाला होता. तशी माझी स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण आहे. आता हे वरदान आहे की शाप, कोण जाणे. परंतु घडलेले प्रसंग, माणसे, त्यांनी घातलेले कपडे - अगदी त्यांचे रंग, लकबी, चालणे-बोलणे, आवाजाची ढब, त्या त्या प्रसंगातील स्थळे, काळ, सभोवतालची परिस्थिती सारे सारे क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जणू काही मी पुन्हा एकवार ते सारे अनुभवते आहे.

आजही तसेच झालेय. आठवणींनी चौफेर हल्ला बोल केलाय. त्यांना उसंतच नाहीये. किती चेहरे अहमिकेने वर्णी लावून जात आहेत. तसेही बरेचदा ते मनाच्या पटलावर अक्षरे कोरत असतातच. काही लाघवी, तर काही चिकटगुंडे, काहींचा कोरडेपणा तर काहींची मक्तेदारी... काही उगाचच खडूस तर काही राजकारणी. काही धूर्त - लबाड तर काही चतुर. चुकार एकदोन तटस्थ अन काही मनात आरपार घुसलेले. स्वत:ला संपूर्णपणे बाजूला काढून खूप वेळ मी या दहा वर्षांतल्या ' मला व माझ्या मित्रमैत्रिणींना ' न्याहाळत होते.

दहा वर्षे..... किमान ३५ जण तरी आम्ही एकाच वर्गात पहिली ते दहावी होतो. किती बदलत गेलो. बदल.... कधी चांगले तर कधी दुखावणारे, चुकीचे. एकच गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे आम्हा सगळ्यांची अखंड बडबड. अर्थपूर्ण - निरर्थक, आवश्यक - उगाचच, भरभरून, ओसंडून, अव्याहत केलेल्या गप्पा, संवाद, हसणे-खिदळणे, रुसवे-फुगवे, कधी खरी तर कधी खोटी भांडणे, चिडीला येणे, चिडवणे, टिंगल - टवाळी - टोमणे, डोळे पुसणे ...... कुठल्या न कुठल्या रूपातला अखंड संवाद. मध्ये केव्हातरी एका जाहिरातीत ऐकलेले, " संवादानेच संवाद होतो-वाढतो.... " आज या सार्‍या आठवणींच्या कोलाहलात अचानक हे वाक्य समोर आले. अन मन त्या वाक्यापाशीच रेंगाळले. खरेच असे होते का? नेहमीच संवाद घडतो का?

संवाद नक्कीच दोन माणसांना जोडतो.... एकमेकांना ओळखण्याची - समजून घेण्याची संधी प्राप्त करून देतो. एकमेकांच्या जवळ येण्यासाठी संवाद माध्यमाचे काम करतो. अतिशय प्रभावी माध्यम. स्पर्शाच्या संवादानेही मने जवळ येऊ शकतात/येतात परंतु त्यासाठी मुळात शब्दांचा संवाद घडावा लागतो. कुठलाही संबंध, मैत्र संवादाच्या पुलावरूनच सुरू होतो. पण नेहमीच असे होत नाही..... कधी कधी एकही शब्द न बोलताही अनेक माणसांशी आपण व ते आपल्याशी संवाद साधत असतात. अगदी आपल्या मनातले भाव नेमके वाचू शकतात, आरपार पाहू शकतात.

बहुतांशी नेहमीच्याच जीवनातल्या सामान्य गोष्टीत हा अनुभव आपण प्रत्येकजण घेतोच. लोकलमध्ये दाटीवाटीने बसलेय, किती वाजलेत ते पाहावे म्हणून मनगटाकडे नजर गेली तर..... बस का.... धावपळीत घड्याळ घरीच राहिले वाटते. डाव्या बाजूची शेजारीण, न बोलता- न पाहता चटकन डावे मनगट पुढे करते. अर्ध्या मिनिटाने पुन्हा पुस्तकात रमून जाते.

संध्याकाळी दमलेले, कंटाळलेले मन उगाचच कानातले-पिनांच्या बॉक्समध्ये डोकावू पाहते. पण ती विकणारी तर दूरवर असते. वारंवार नजर तिच्याकडे वळू लागते. तिच्या जवळपास बसणारी अचूक हे हेरते अन हातानेच तिला इशारा करते... लगोलग ' तो ' कंटाळ्याचा उतारा माझ्या हातात विसावतो. माझी नजर धन्यवाद देण्यासाठी तिच्यावर स्थिरावताच एक मनमोकळे हसू बदल्यात ' ती ' देते. भाजीवालीच्या पाटीतल्या बारीक मेथीच्या जुड्यांकडे नजर वारंवार वळू लागली की हमखास ती पिशवीत विराजमान होते.

कधी एखाद्याचा शर्ट आवडून जातो. तर कधी, ' तो ' घालणारा मन वेधून घेतो. कधी एखादी तिच्या सतेज, प्रफुल्लित कांतीने मोह घालते....... तर कधी कोणाच्या चेहऱ्यावर पसरून आपल्यावर मोहिनी घालणारे हसू सारखे लक्ष वेधत राहते. या सार्‍यांना नजरेने कौतुकाच्या पावत्या आपण आपल्याही नकळत कधीनूक पोचवतो अन तेही ती कौतुकाची नजर आवर्जून झेलतात. त्याची पावतीही देतात. तीही लगेचच.... कधी झुलपं उडवून, तर कधी मान थोडीशी ताठ करून एक थेट दृष्टिक्षेप येतो. तो ( दृष्टिक्षेप ) आला की आपण नजर चोरतो...... काही क्षणाने आपली नजर पुन्हा आपल्याला न जुमानता त्याच्याकडे ( त्या आवडलेल्या व्यक्तीकडे ) वळते अन तो ती अचूक पकडतो........ मग एक खट्याळ हास्य त्याच्या डोळ्यात उतरते...... कधी हा खेळ मिनिटभराचा असतो तर कधी अव्याहत. हे नजरेचे संवाद आपले मन सुखावून जातात. अर्थात यासोबत काही कटू नजराही असतातच. अंगाला चिकटलेल्या, ओरबाडणाऱ्या.... असहय.... मी आक्रसतेय.... स्वतःला अदृश्य करू पाहतेय...... तरीही ती नजर जळवेसारखी मला शोषतेय....... ' काळ हा सगळ्यावरचे औषध आहे.... ' , खरंच ??? मग... ती प्रत्येक नजर आजही तितकीच छळवादी असावी..... ?

पण हे सारे अनोळखी संवाद. ओघाओघात सहजगत्या झालेले. मात्र अनेकदा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशीही मूक संवाद करतो. शांततेने शांततेशी केलेला संवाद. एक वेगळीच अनुभूती करून देणारा संवाद. आपलंसं करणारा संवाद. आश्वस्त संवाद. कधी अनुभवलाय का तुम्ही? नसेल तर जरूर अनुभवा...... या अशा, मनाने मनाशी बांधलेल्या तारांतून एक अजब सुरावट बांधली जाते. या मोहमयी तरल विलक्षण सुरांची आवर्तने एका लयीत उठत राहतात. सर्वांगी भिनत जातात. शब्दांना कधीचेच मागे टाकून शब्दात न बांधता येणाऱ्या -भिडणाऱ्या भावनांना समोरच्याच्या मनात उतरवतात. कायमसाठी. चिरंतन.

खरं तर, गप्पा- बोलणे, संभाषण बरेचदा चमत्कारिक असते..... कधी कधी गप्पा संपतच नाहीत.... आपण मैत्रिणीशी बोलत असतो, पाहता पाहता एका बोलण्यातून दुसरे, दुसर्‍यातून तिसरे... आवर्तने सुरूच राहतात, तासंनतास आपण बोलत राहतो.... ना विषयाचे बंधन ना वेळेचे.... फारसा विचार न करता केलेले उत्स्फूर्त संभाषण. सुरू होते एका विषयातून अन मग सुरू होतो न संपणारा गप्पांचा ओघ..... हसणे, खिदळणे.... ऐकवणे, ऐकणे, लटके रुसणे, मनवणे, खोटा राग, अधिकार...... हे असे बोलणे हा केवळ एक बहाणा असतो. दोघींच्या मनातले एकमेकीवरचे प्रेम हा सारा, बराचसा निरर्थक शब्दांचा प्रवास करत असते.

मात्र अनेकदा असेही होते की तिच दोन माणसे..... अतिशय चांगली मैत्री..... जवळचे घट्ट संबंध..... अंतरीचा तोच भाव....अपार स्नेह.... तरीही जेव्हां भेटतात तेव्हां , " काय म्हणतेस? कशी आहेस? बाकी..... " च्या पुढे गाडी हालतंच नाही..... पसरत राहते एक मूक अबोल शांतता.... मौनाचा तीव्र पगडा.... कोशात हरवलेले मन... ओठांच्या बंद महिरपी.... का? कारणं उमजतच नाही. खरं तर आपल्याजवळ बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही असतं...... ऐकवण्यासारखंही बरंच काही तिच्यापाशीही असत.... पण मन आक्रसून जातं.... संवादापासून दूर दूर पळ काढतं...... आज या घडीला काहीच नको..... अगदी काहीही नको.... शब्दांसमवेतही नको अन शब्दांवाचूनही...... शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद......

Saturday, August 7, 2010

चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स... अंतिम

संध्यासमय

पानी रे पानी तेरा रंग कैसा...

झेपावणारे समुद्रपक्षी

परतीच्या प्रवासात एका विवक्षीत जागी बोट पोहोचताच साठ-सत्तर समुद्रपक्षी अचानक आमच्यावर झेपावू लागले. लांबून गोंडस दिसणारा हा पक्षी प्रसंगी किती रौद्ररूप घेउ शकतो याची झलक मिळाली. कमीतकमी अडीचशे लोक तरी आम्ही होतो तरीही अतिशय वेगाने व उग्र आवेशात हे आमच्यावर झेपावत होते. सावजावर झडप घालताना त्यांच्या डोळ्यात काय भाव असतील त्याचा प्रत्यय आला. जसे अचानक हे आले तसेच वीसएक मिनीटे आमच्यावर घिरट्या घालून ते गायब झाले.


रसरसते सोने

एकांडा शिलेदार

फोटो मोठा करून पाहिल्यावर लक्षात येईल की ज्या दगडावर हे इतके मोठे झाड रुजलेयं त्यावर फारच कमी ( किंबहुना जवळ जवळ नाहीच ) माती आहे. झाडाची मुळे बाजूलाच असलेल्या मोठ्या दगडावर गेलीत आणि झाडाचे पोषण तिथून होते आहे. :) काय जबर तोडगा शोधलाय नं... आणि या दगडाचा आकारही अचंबित करणाराच. खाली हिरवे पाणी, पिवळसर-सोनेरी दगड, सभोवताली हिरगे गर्द सरळसोट वाढणारे वृक्ष अन वर स्वच्छ निळे आकाश. ट्रेल करू तेव्हां या जागेसाठी किमान तासभर तरी हवाच.

सोन्याचा पर्वत

युध्दनौका - मोरपंखी पाणी

कुठल्या सिनेमाची आठवण होतेय... :)

कुठे मोरपंखी, कुठे हिरवे तर कुठे चकाकते सोनेरी जल...

होडके घेऊन गेलो की या स्तंभाशी थांबून पाण्यात पाय सोडून निसर्गाशी एकरूप होता येते

सूर्याचा कटाक्ष

उजळलेले शेंडे

या हिरव्या जलात समर्पित व्हावं...

फोटो सौजन्य : नचिकेत
समाप्त.

Friday, August 6, 2010

चित्रदगड- पिक्चर्ड रॉक्स.... २

भव्य भिंती... त्यातून दिसणारा आकाशाचा तुकडा

पाचूने मढलेल्या तटबंद्या

पाचूच्या प्रदेशात शिरताना

बांधून काढल्यासारखे अजस्त्र दणकट स्तंभ
हिरवेगार पाणी... पाण्याच्या सपकार्‍यांनी झालेल्या कपारी

अस्तास निघाला रवी

सोन्याच्या भिंती

युध्दनौका

ऊन सावलीचा खेळ


कलत्या उन्हाची बंडखोरी

झळाळते सौंदर्य

निसर्गाची अप्रतिम कारागरी

रंगांची मनमुक्त उधळण

लखलखाट

फोटो सौजन्य : नचिकेत
क्रमश:

Wednesday, August 4, 2010

चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स

नेटीव इंडियन चेहरा

गेल्या महिन्यात पाहुण्यांना घेऊन, " मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स पिक्चर्ड रॉक्स " असा एक मस्त दौरा केला. यावेळी पिक्चर्ड रॉक्सपासून सुरवात करून उलटे मागे येतेय. मॅकिनॉवचा वृत्तांत काही दिवसांपूर्वी इथे दिलाच आहे. यावेळी नवीन काही फोटोंची भर पडली असल्याने शेवटी ते फोटो टाकेनच.

जगप्रसिद्ध असलेल्या पिक्चर्ड रॉक्सना कितीही वेळ कितीही वेळा पाहिले तरीही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल. अगदी नायगारा सारखेच. पाहिलेत नं, माझे नायगारा प्रेम लगेच उफाळले. यावर्षी उन्हाळ्यात गेलो नाही आम्ही. अजून रुखरुख लागलीये. अर्थात हातात दोन महिने तर नक्कीच आहेत तेव्हां कधीही भूर्रर्रर्रकन उडेनही.

तर जणू हे खरेखुरे दृश्य नसून चित्रेच पाहतोय की काय असे वाटायला लावणारे, वेड लावणारे हे ' चित्रदगड ’. लेक सुपिरिअरच्या दक्षिण किनाऱ्यावर साधारण ४२ मैलाच्या परिसरात पसरलेले, वाळूचे बनलेले हे दगड त्यातून घडलेल्या कडे-कपारी, उंचउंच कपचे कपचे काढल्यासारख्या अवाढव्य भिंती, मधूनच अगदी टोकदार सुळके, तर कुठे चक्क नेटीव इंडियन्सच्या चेहऱ्याचा भास व्हावा, ( अगदी खराच चेहराच आहे असे वाटावे इतका भास होतो. ) लवर्स पॉईंट, इंद्रधनुष्यी गुहा, जणू युद्धासाठी उभ्या आहेत असे भासणाऱ्या युद्धनौका, लवर्स लिप, चॅपेल रॉक. हे सारे ज्ञात आकार. परंतु खरे तर जितके गुंगून आपण पाहू लागतो तितके अनेकविध आकार आपल्याला दिसू लागतात. हा मनाचा खेळ पुढे पुढे इतका वाढतो की मग बोटीतले अनेक अनोळखी सहप्रवासीही एकमेकांना, " अरे, ते पाहिलेस का? किती खराखुरा वाटतोय नं?" असे प्रश्न विचारू लागतात.

वाळूच्या दगडांवर गेली हजारो वर्षे पाणी, वारा - वादळे, पडणारा प्रचंड बर्फ त्याचा या दगडांवर चढलेला जबर थर कधी हलक्या तर कधी सपकारे ओढणाऱ्या, कधी प्रचंड उसळी घेऊन या दगडांवर फुटणाऱ्या मोठ्याला लाटांमुळे या दगडांचा आकार बदलत गेला बदलतो आहे. काही कपारी तर खूपच खोल आहेत. काही ठिकाणी कमानी झाल्यात. या ३७ मैलात नानाविध प्रकार आपल्या डोळ्यांना सुखावतात. हे सारे विविधाआकार धारण केलेले दगड नैसर्गिकरीत्या अत्यंत मनोहरी रंगांनी मढवलेले आहेत. पाण्यातली निरनिराळ्या खनिजांमुळे चॉकलेटी, तांबूस, रापलेला सोनेरी रंग, मँगनीज, तांबे, चुनकळी, लोखंडामुळे चढलेली हिरवट छटा..... या दगडांवरून अनेक ठिकाणी कोसळणारे छोटेमोठे धबधबे - एकंदरीत सात मोठे धबधबे अगणित छोटे ओहोळ, सुपिरिअर लेकचे नितळ, स्वच्छ - कुठे हिरवेगार तर कुठे निळेशार पाणी..... या साऱ्यावर जेव्हां अस्तास जाणाऱ्या सूर्याची किरणे उन्हाळ्यात पडतात तेव्हां ते तीन-चार तास अवर्णनिय़ आनंदाचे. डोळ्यांचे पारणे फिटते. एका ठिकाणी तिन्ही बाजूंनी प्रचंड उंच कपच्यांच्या भिंती, त्यावर अक्षरशः पाचूच मढवलेत असे वाटावे इतका गडद हिरव्या रंगाचा राप खाली हिरवेकंच पाणी.... वेडे झालो होतो आम्ही सगळेच. निसर्गाची किमया अगाध आहे, तो अनंत करांनी उधळतोय आपल्यावर..... आपण त्याच्या स्वाधीन होऊन जायचे. बस.

वर्षातील सगळ्या ऋतूंत वेगवेगळे सौंदर्य पाहायला मिळेल असे हे ठिकाण. आवर्जून निदान एकदा तरी भेट द्यावीच असेच हे ठिकाण. जेव्हां पीक विंटर असतो त्यावेळी पुन्हा भेट द्यायची असे आजतरी मी ठरवलेय. साधारण १४० इंच बर्फ पडतो. लेक सुपिरिअरचा वरचा १३ इंचाचा लेअर या परिसरात गोठतो. हा संपूर्ण ४२ मैलांचा किनारा चित्रदगड हिमाने माखलेले असतात. त्यातून निर्माण होणारे आकार, हिमावर पडलेली सूर्याची किरणे, लकाकणारे हिमं, इंद्रधनू लोलक.... जीवघेणी थंडी असली तरी त्याहून जीवाला पिसे लावणारे दृश्य पाहायला जायचेच.

सोबत नचिकेतने कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली विलोभनीय दृश्ये दोन भागात टाकतेय. चित्रफितीही मला टाकायच्यात. परंतु मॅकिनॉवचे प्रॉमिस अजून पुरे केले गेलेले नाही - सॉरी. नाईलाज झालाय अगदी. पण ते माझ्या हातात नाहीये नं..... नचिकेतच्या नाकदुऱ्या काढणे चालू आहे.... कधीतरी यश मिळेलच. तेव्हां पिक्चर रॉकच्याही चित्रफिती लवकर टाकेन अशी आशा मनाशी बाळगून आहे.


ग्रॅंड पोर्टल पॉईंट

लवर्स लिप















मायनर्स कॅसल

फोटो सौजन्य : नचिकेत
क्रमश: