जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, February 23, 2011

इन्स्पिरेशन... रियली ???

सिनेमांच्या तंतोतंत चोऱ्या इतक्या सातत्याने होत आहेत की आजकाल नवीन सिनेमा आला की नकळत उगमाचा शोध घेतला जातो. ही क्रिया आपसूक व्हावी इतकी अंगवळणी पडलीये. एकदा कशावरून बेतलाय हे सापडले ( फारसे शोधावे लागतच नाही इतकी ही चोरी उघड असते, ) की पूर्ण कंट्रोल सी कंट्रोल वी मारलाय का याची जबर उत्सुकता निर्माण होते. एक बरे आहे की बॉलीवूड डोक्याला फारसा ताप देतच नाही. अगदी शेवटची वीट पडण्यापर्यंत तंतोतंत कॉपी. ( मेट्रिक्स ) काही वेळा चोऱ्या करूनही अपवादात्मक सुंदर सिनेमेही बेतले गेलेत. विकांताला जमलेल्या मैफलीत एकदा का ही चर्चा छेडली गेली की रात्र संपेल पण यादी संपायची नाही... नुसती धमाल.

जे सिनेमांचे तेच संगीताचेही. मोठ्या मोठ्या दिग्गज संगीतकारांनीही जेव्हां सातत्याने या चोऱ्या केल्याचे समोर येते तेव्हां खरेच हळहळ वाटते. मनावर छाप सोडणाऱ्या अनेक गाण्यांमागची डिट्टो मारलेली कॉपी ऐकली की त्या गाण्याची मोहिनीच संपून जाते. अगदी साठच्या दशकापासूनच हा खेळ सर्रास चालू झालेला दिसून येतो. आपल्याकडे ज्या काळाला आजही चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हटले जात , त्यातली काही अजरामर गाणी शब्द वगळता जशीच्यातशी उचललेली आहेत. कुछ तो बदला होता यार! बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते. एकच सुख की या चोरलेल्या चालींवर अतिशय सुंदर व नेमकी शब्दयोजना केली गेली. शिवाय चित्रपटात समयोचित ठिकाणी वापरल्याने ठिगळं वाटत नाहीत. प्रसंग, भावनांच्या गरजेची नस ओळखून चपखल बसलीत. आपल्या प्रेक्षकांची त्या त्या दशकानुसार बदलत जाणारी मानसिकता अचूक हेरत या मारलेल्या कॉप्या पर्फेक्ट पेरल्या गेल्यात. कदाचित म्हणूनच चोरलेली असली तरी इतकी प्रचंड गाजलीत. आजही तितकीच भुरळ घालतात.

बाकी काहींनी संपूर्ण चित्रपट तर कॉपी पेस्ट मारलेत, पण तेवढ्यावरच त्यांचे पोट न भरल्याने त्यातली गाणीही कॉपी पेस्ट मारली. कदाचित त्यावेळी, आडात काहीच नसावे मग पोहऱ्यात येणार कुठून ? मरो, कोण ताप करून घेणार. ऐसेभी आख्खा मूव्ही छाप रहे हैं ना, गाने भी कहींसे उठा लो यार! ऐसा न हो हम वरिजनल के पिछे भागते रह जायेंगे और उधर साला दुसरा कोई, मूव्ही रिलीज भी कर देगा!

अश्या सिना ठोकके केलेल्या काही चोऱ्यांचे मूळ गाणे व बेतलेले गाणे सोबत जोडलेय. गंमत म्हणजे दोन्हीही तितकीच भावतात.




वरून १९५८ साली आलेल्या, " चलती का नाम गाडीतले " दिग्गज : एस डी बर्मन यांचे,



इतके आवडते गाणे पण प्रत्येक वेळी ऐकताना बॅगराउंडला वॉटरमेलन वाजत राहते....



पोलिश फोक


वरून " मधुमती " मधले, दिग्गज : सलिल चौधरी यांचे अजरामर गाणे,



अख्खा मेमरी का वाट लगा दिया ...



एल्विस प्रेस्ली चे



वरून " झुक गया आसमाँ " मधले, शंकर जयकिशनचे ,







कसला आत आत उतरत जाणारा आवाज आहे तिचा... अप्रतिम!
वरून " यादों की बारात " मधले जबर गाजलेले, दिग्गज : आर डी बर्मन चे,



ची मोहिनी आजही तितकीच!




वरून " सी आय डी (१९५६ ) " मधले, दिग्गज : ओ पी नय्यर यांचे,

जॉनी वॉकर, रफी व गीता दत्त के क्या कहनें...






Elvis Presley , " The Yellow Rose of Texas "




वरून " आ गले लग जा " मधले, दिग्गज : आर डी चे,





या गाण्याबद्दल काय बोलावे...



अक्षरशा: तंतोतंत
कॉपी केली आहे आर डी ने, तरीही मेहबुबा मेहबुबा चा जबर पगडा आजही कायम आहेच.



पण खरे मार्क्स
द्यायला हवेत ते Demis Roussos ला




सिनेमा चोरलाच पण त्याने पोट भरले नाही म्हणून गाणेही....




" क्रिमिनल " मधले,





क्लिफ्फ़
रिचर्ड चे,



वरून " लगे रहो मुन्नाभाई " मधील, शंतनु मोइत्रा चे,





भप्पीदांचे , " हरी ओम हरी " , " कोई यहां नाचे नाचे... " आणि अनू मलिकके क्या कहनें! यादी भली मोठी आहे. असाही तो दिग्गजांमध्ये मोडतही नाहीच म्हणा...

Saturday, February 19, 2011

आभार्स ! ! !

" ब्लॉगबाळ " काल दोन वर्षांचं झालं. याचा वाढदिवस असणं आणि नेमकं त्याचवेळी मी प्रवासास जाणं, हा योगायोग दोन्ही वेळी झाला. गंमतच आहे. काल पोस्ट टाकणे अशक्यच होते. पण माझ्या मैत्रिणीने ' उमाने ' खास लक्षात ठेवून शुभेच्छा व केक बझवर टाकला. खूप खूप आभार्स बयो! जी खूश हो गया!!

आजकाल वाढदिवस या शब्दानेच मला कापरे भरते. मेली ' कशाकशाची ' जाणीव ठळकपणे होते. आत्ता आत्ता पर्यंत आरशात पाहून, नटणे-मुरडणे, गिरक्या मारणे, स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे, ( हे लिहिता क्षणीच... , " खर्रच?? वेडपट कुठली... असे स्वतःलाच म्हणत काढलेली मोठ्ठी जीभ..... " ) प्रकार सुरू होते. आता किती जमेस धरता येईल चा हिशोब आणि आरशापासून लांब लांब पळावेच्या स्थितीशी मन रेंगाळू लागलेय. असेही, " म्हातारे जरा धडपड कमी कर " म्हणत तन्वी, अंमळ दमात घेत असतेच. तरीही या बाळाच्या वाढदिवसाची दखल घ्यायला हवीच. काहीसे उदास, व्याकुळ झालेले मन याच्या आगमनाने, चहलपहलीने भरून टाकले. सदैव माणसांच्या गर्दीत रमणारी मी, अलिप्त, शून्यवत होत चालले होते. या बाळाने चैतन्य फुंकले. एक अनामिक ओढ निर्माण केली. ' वैयक्तिक आनंद ' मिळवून दिला.

आपण सगळीच कुटुंबासाठी जगतो, झटतो. त्यांच्या सुखात आपले सुखं पाहतो. कित्येक प्रसंगी स्वतःला बाजूला सारून इतरांना प्राधान्य देतो. ती क्रिया इतकी सहज व प्रेमाने केलेली असते की तिला त्यागाचे लेबल जोडावेसे वाटतच नाही. आपण हे असेच केले पाहिजे, ही भावना गृहीत असते. हा सारा पसारा आपण स्वतःला विरघळून टाकून जपलाच पाहिजे हे जितके खरे तितकेच, स्वतःचे जग - अस्तित्व, असणेही गरजेचे. जे मनात येईल ते न संकोचता, खाडाखोड न करता, बेगडीपणा, मुखवटे न चढवता व्यक्त होण्याची गरज. मनाचे कोंडलेपण मोकळे करण्याची गरज. त्यातूनच शब्दांचे पूल बांधत उमलत जाणारा संवाद, ' स्व ' अस्तित्वासाठी अपरिहार्य!

गेली काही वर्षे प्रत्यक्षात तशी मी एकटीच झालेय. आधीचे प्रचंड गोत जुन्या गावीच राहिले. जीवनचक्रानुसार वाहते पाणी बनावेच लागते. मायदेश सुटला... इथे येऊन रुजवलेले बंधही अंतरांच्या परिमाणात दुरावले.... चालायचेच! वर्षातले सात महिने थंडी व पाच महिने तब्येतीत लाड करून घेणारे हिमं, यांच्या सोबतीत जिवंतपणाची लक्षणे गोठायला लागलीत की काय असा प्रश्न वारंवार पडू लागला. मनात नेहमीच अनेक विषय, आठवणी, माणसे, प्रसंग, फेर धरून असतातच. ऊन पावसाचा खेळ सततचा व आवडीचाही. डायरीची अखंड आराधना. ते पृष्ठावर आलेले भाव रिते केल्याशिवाय मन शांत होईना झालेले. तश्यांत या एकटेपणात तुटलेपणाची भावना तीव्र बळावत चाललेली. संवाद खुंटायला लागलेला. अन अचानक एके दिवशी अरुणदादा रोहिणीच्या बोलण्यातून हे विश्व गवसले. त्यांचे ऋण कायमचेच.

मनाला जिवंत ठेवणारी एक ओघवती वाट सुरू झाली. आपल्या समोर प्रत्येक गोष्ट येईलच असे नसतेच. पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली. राजकारण, समाजकारण, आनुषंगिक चर्चा, संवाद, वादविवाद, मायदेश व देशोदेशीचे पर्यटन, अतिशय तरल भावानुभव देणारे ललित, निरनिराळ्या विषयांना समर्थपणे हाताळत लिहिलेल्या उत्तमोत्तम कथा, नेमक्या भावना भिडवणाऱ्या कविता, आवडीची खादाडी व त्यांची रसभरित वर्णने, फोटू.... अश्या अनेकविध अंगांनी काही वर्षे अडखळत सुरू असलेला हा प्रवास पुन्हा प्रवाहित झाला. अर्थात हे सारे इंटरनेट कृपेनेच शक्य झाले.

अगदी सहज म्हणून सुरू केलेला ब्लॉग दोन वर्षे टिकलाय याचा खूप आन्ंद आहे. सातत्य पहिल्या वर्षाइतके नसले तरी हुरूप तितकाच आहे. गेल्या दोन वर्षातील या लेखन प्रवासाने मला खूप आनंद दिला. अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. निःस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड गोत दिले. दोन दिवसांपूर्वीच राजीव ( श्री. फळणीटकर ) यांच्याशी बोलता बोलता किती वाजलेत हा विषय येताच चटकन तुमचे इतके वाजलेत ना? असे म्हणताच, ते किंचित चकित झाले. मायदेशाचे वेळेचे गणित चटदिशी सांगता येईलच पण या ब्लॉगमैत्रीमुळे चक्क देशोदेशीच्या टाईमझोनचे कोष्टक मनात पक्के गिरवले गेले. विचार करावाच लागत नाही या वेळेच्या गणिताचा. काश, शाळेत असताना हे साधले असते....

रोहन मुळे कित्येक वर्षांनी , ' तिकोना गडाचा ' ट्रेक करता आला. तो आनंद अवर्णनीयच! महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंबअपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! नेटभेट भुंगाचे आभार्स! दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत!! खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे! कांचनने, ' मोगरा फुलला ' च्या दिवाळी अंकात संपादकीय लुडबुडायला दिले. धन्यू गं. अजून बरेच जण आहेत.... पण....

तीस सेकंदाची वेळ कधीचीच संपलिये. ' आवरा ' चे संगीत लाउड लाउड होत चाललेय. तेव्हां आता कलटी मारावी. काट्याला काट्याने मारावे तसे म्हणत हिमाला बदाम कुल्फीने हुडहुडी भरवतेय. आपापल्या भौगोलिक क्षेत्रानुसार कुठे कुडकुडत तर कुठे घामाच्या धारांसोबत ती यथेच्छ हाणा.


Monday, February 14, 2011

प्रेममयी...

मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आम्ही दोघींनी दंगा मांडलेला. तोच, एकेकाळी रोज गाठभेट होणार्‍या एका ओळखीच्यांचा फोन आला. " कधी आलीस? कशी आहेस? मुक्काम किती? यावेळी जमलं तर भेटूयात आपण. पुढच्या वेळी येशील तेव्हां न जाने हम अल्ला को प्यारे... " असे म्हणत नेहमीचे त्यांचे गडगडाटी हसणे. भरभर प्रश्न विचारणे आणि स्वत:च त्यांची स्वत:ला हवी असलेली उत्तरे देत ते निकालातही काढणे. माझ्या शहाळी प्रेमाची उजळणी झाली. " अगं, परवाच गेलो होतो शहाळे आणायला. चक्क तो नारीयलपानीवाला तुला विचारत होता. वो हमारी छोकरी किधर हैं? दिखतीच नही बिलकुल. मी त्याला सांगितले, अरे वो तो उडनछू हो गयी. भूल जाव उसको और हमको देखो. " पाठोपाठ हसण्याचा गडगडाट.

जसा अचानक फोन आला तसाच अचानक तो बंदही झाला. नेहमीसारखाच. पंधरा मिनिटे हा कोसळता धबधबा अखंड झेलून मी थोडीशी भिरभिरलेच होते. बोलत होते ते पण धाप मला लागली होती. क्षणात कित्येक वर्षे डोळ्यासमोर तरळून गेली. तसे ते माझे साहेब कधीच नव्हते. मात्र शेजारी होते. आईच्या घरापासून पाच मिनिटांवरच राहत असल्याने आम्ही एकाच कॉन्ट्रॅक्ट बसने रोज जा ये करत असू. मी नुकतीच लागलेली, अजून रुळत होते. तेव्हांपासून यांनी जी साथ केली ती आजही तितकीच टिकून आहे. गेल्या अकरा-बारा वर्षात प्रत्यक्ष भेटी तश्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच घडल्या. त्यांचे वयही तसे बरेच झालेय. वयानुसार येणारी दुखणीही आहेतच. घरातही फार काही सुसंवाद आधीही नव्हता आणि आजही नाहीये. " जीवनाचे सगळेच चॅप्टर आपल्याला हवे तसे कसे लिहिता येतील? काहीतरी डावेउजवे असणारच. असे मी कधीतरी म्हणून गेलेली. " ते वाक्य ' घर ' हा शब्द निघाला की लगेच ते मला परत करतात आणि पुन्हा नेहमीचे गडगडाटी हसतात. पंचवीस वर्षांच्या सहवासाने त्यातला उपहास, कारुण्य ठसठशीत समोर येते. जसे ते दाखवत नाहीत तसे मीही न दाखवता मंद हसते. तो मंदपणा त्यांच्यापर्यंत अचूक पोहोचतो. की लगेच आमच्यात ' तेंडल्या ' येतो. पुन्हा एक अखंड उत्साहाचा धबधबा उसळायला लागतो. क्रिकेट त्यांच्या नसानसातून वाहत असते.

मी नकळत या सार्‍यात गुंतत गेलेली. तोच समोरून प्रश्न आला, " अजूनही तुमचे संबंध आहेत? कमालच आहे? आता कशाला ही झेंगट सांभाळते आहेस? काम ना धाम, उगाच नको ते ताप नुसते. "

" अगं, असं काय म्हणतेस? अशी तोडून का टाकता येतात माणसे? "

" हो येतात. काम संपले की तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते. अशी खरकटी उगाच डोईजड होऊन बसतात. तुला इतकेही समजत नाही म्हणजे... "

" काय समजत नाहीये गं? थोडक्यात स्वार्थ पुरा होईतो ओळख, संबंध, मैत्री ठेवायची आणि मग झटकून टाकायचे, असेच म्हणते आहेस ना? आणि जी ओळख स्वार्थाविनाच होते तिचे काय करायचे? का अशी ओळख होतच नसते? "

" अगदी बरोब्बर नेमक्या शब्दात बोललीस. हेच मला म्हणायचे आहे. अशी ओळख झाली तरी मैत्री स्वार्थाशिवाय होत नसते. तुझा स्वभाव आता तरी बदल जरा. किती तरी लोकांनी गैरफायदा घेतलाय तुझा हे विसरून कशी जातेस तू. जसे लोकं आपल्याशी वागतील तसेच आपण त्यांच्याशी वागायला हवे हे शीक जरा. "

पुढे बराच वेळ ती मला काय काय ऐकवत होती. त्या शब्दांच्या वावटळीतून अनेक भिंती माझ्याभोवती उभ्या राहत गेल्या. ही माझी खूप जुनी मैत्रीण. जवळची. मी आजही तिला तितकीच जवळची मानतेय, पण ही तर शेकडो कोस दुरावलीये. या इतक्या अदृश्य भिंती कधी उभ्या केल्या तिने ? का?

तिचे शब्द अजूनही ऐकू येतच होते. " अगं, इतकी ढील कशाला द्यायची मी म्हणते? हाय आणि बाय करावं मोकळं व्हावं. तू पण ना.... अशीच बावळट राहशील कायम. बरं चल मी पळते आता. फोन करतेच तुला मग भेटू पुन्हा सवडीने. " मी नुसतीच मान डोलवली.

ती गेल्यावर मी आरशासमोर जाऊन उभी राहिले. " काय? सारे आलबेल आहे ना? "

प्रतिबिंब गालातल्या गालात हसून म्हणाले, " तूच सांग.. "

" मी हादरलेय. आज एक विकेट पडली. कदाचित कधीचीच पडली असावी फक्त मला आज कळली आहे. "

" मग त्यात नवीन ते काय? आयुष्याचे पीच पावलोपावली बदलतेय ना? असे व्हायचेच. "

" अगं, मैत्री ही काय वरवरची असते का? त्यात्या वेळेपुरती, कारणीक, गरजेची, तकलादू? "

" हे असे बावळट प्रश्न विचारण्याची सवय तुझी कधी सुटणार गं बाई? आता इतके रामायण ऐकूनही तू हा प्रश्न विचारतेस? "

" तू मला तिच्यासारखेच भिरभिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी बावळट असेनही पण स्वार्थी नाहीये. एक तर, मैत्री असते किंवा नसते. उगाच संभ्रम नकोत. बांडगुळासारखी लटकणारी मैत्री ही अशी गळून पडतेच. पण म्हणून मी काही सगळ्यांना एकाच तागडीत तोलायची नाही. भेटीगाठी, स्वार्थ, तात्पुरती, साखरपेरणी शब्दांची, मौताज नसते मैत्री. माझा विश्वास आहे या नात्यावर आणि कायम राहील. नात्यात गुंता असायचाच. त्याला गृहीत धरून त्याची संगती लावत ते नाते पुढे नेण्यात तर, ' खरा कस ' लागतो. अलिप्तता, पलायनवाद हे उत्तर असूच शकत नाही. मैत्री ही आपल्याला हवी तशी आणि हवी तितकीच होऊ शकत नाही. या कुंपणांची मौताज मने फक्त सौदाच करतात. सगळ्याच गोष्टी समीकरणात मांडता येत नसतात. एक अधिक एक इतके सोपे भावनांचे गणित नसते. "

प्रतिबिंब पुन्हा गालातल्या गालात हसले. मला का कोण जाणे पण त्यात कुत्सित भाव दिसले. चिडून काहीतरी बोलायला जाणार होते पण ते पठ्ठे पळून गेले. मग मी त्याचा नाद सोडला आणि पुन्हा मैत्रीला शोधायला सुरवात केली.

खरेच का केवळ स्वार्थापोटी संबंध असावेत? मग माझा स्वार्थ असताना त्या समोरच्याने पाठ फिरवली तर तो दोष कोणाचा? माझा? का तोही त्याचाच? प्रत्येक ओळखीचे रुपांतर स्नेहात होऊ शकत नाही, मान्य. पण म्हणून स्नेह वाढवायचाच नाही हे समीकरण कसं योग्य? मैत्रीतही एक ठरावीक स्पेस - अंतर राखलेले असतेच की. सौजन्य व सामंजस्याने प्रेरित होऊन आखलेली अतिशय पुसटशी लक्षुमण रेषा. तुला हवे तेव्हां मी आहेच गं, हे आश्वासन देणारी. अनावश्यक हक्क टाळणारी. दुसर्‍यावर स्वत:ला लादून त्याच्या भावनांची नासधूस न करता हळुवार फुंकर मारत गोंजारणारी. व्यवहाराच्या, स्वार्थाच्या अभेद्य भिंती उभ्या होण्याआधीच रोखण्याची ताकद असलेली समर्थ मैत्री निर्माण करण्याची आंतरिक ऊर्मी आपल्यात असायला हवी. केवळ, " काय म्हणतेस? कशी आहेस? " इथेच खुंटणारी, काठाकाठाने सामाजिक नियमात पोहणारी मैत्री निव्वळ कुचकामीच. जवळीक भासवून पोटात शिरून, दुसर्‍याच्या दुखर्‍या जागा नेमक्या हेरत काढून घेतलेल्या गुपितांची चारचौघात वाटणी करत कुचाळक्या करणारी मैत्री आणि खरा स्नेह यातला फरक ओळखता यायला हवाच. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये या नियमाला अनुसरून कोणालाही आपल्यावर आक्रमण करू देऊ नयेच, बांडगुळे नसावीतच हे जितके खरे तितकाच मैत्रीतला सच्चेपणाही जपता आला की मनामनातल्या दरीची निर्मितीच थांबेल. असेल ती फक्त एक निखळ स्वच्छ पायवाट. मुळात आयुष्यात इतर अनेक कठीण झगडे आहेतच निदान ही वाट सहज, प्रेममयी करणं तरी आपल्याला नक्कीच जमेल, जमायला हवच... काय?

Sunday, February 6, 2011

राधाक्का...

वाड्यातल्या त्या काहीश्या अंधार्‍या, कोंदट, पोपडे उडालेल्या भिंती. आठवड्यापूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीला शुष्कतेने पडलेल्या भेगा. धगधगलेल्या चुलीतून भसभसून निघणारा, ज्याला खिडकीपेक्षा खिंडार म्हणणे योग्य ठरेल अश्या मोठ्या भगदाडातून, मोकळा होण्यासाठी झेपावणारा काळा धूर. राधाक्काचा कोंडलेला, घुसमटलेला श्वास. ओली लाकडे पेटवताना फुंकणी फुंकून फुंकून कोरडा पडलेला घसा. तिच्या संपूर्ण जीवनाची धग दाखवत रसरसून लालबुंद झालेला चेहरा. भगदाडातून संधी मिळताच धुराला बाजूला सारत मुसंडी मारून घुसलेली सूर्याची किरणे. त्यांचा तयार झालेला धूमकेतूच्या शेपटीसारखा एक लांबलचक पट्टा. त्यात बंदिस्त होऊन फिरणारी निरनिराळी तुसे, तंतू, कण अन त्यातच मुक्त भरकटणारे राधाक्काचे ' मन ', तिची स्वप्ने, तिच्या आयुष्याला पुरून उरलेले तिचे अविरत कष्ट, तिच्या व्यथा, क्वचित मिळालेली सुखं. तिची सगळ्यात मोठी मिळकत... तिची आठ मुले व त्यांच्याभोवती फिरणारे तिचे संपूर्ण जीवन. सगळे कसे त्यांच्या त्यांच्या जागा नेमून दिल्यासारखे त्या पट्ट्यात रोज गरगरे. काही तुसं विरळ होत होत नाहिशी होत तर कधी बंड करून तिथल्यातिथे विरून जात. काही तंतू बंध तोडून, ती नेमून दिलेली चाकोरी तटकन भेदत इकडे तिकडे सैरावैरा पळत तर काही नेमक्या जागी राहून हा पसारा अलिप्त न्याहाळत. ना किरणं त्यांचा क्रम चुकवत ना हा तुकड्यांचा पट्टा. सातत्याची महती सांगणारी जीवनाची कहाणी अविरत वाहत राही.

चुलीवर अन्न रटरटू लागे. डोह डुचमळवून उरापोटी भिरकावलेला एखादा दगड राधाक्का बाहेर काढे. मग त्या दगडाच्या भिंती त्यांना न फोडता शिताफीने भेदण्याचा तिचा रोजचा आवडता खेळ सुरू होई. परातीत घेतलेल्या कणकेची एक सुबक मोट बांधून होईतो त्या भिंती तिला आपलेसे करत. तिंबलेली कणीक गोळ्या गोळ्यात वाटली जाई. प्रत्येक गोळ्याची निगुतीने चौपदरी घडी होई. दगडाचे पदर सुटे सुटे होत अलवार उलगडू लागत. त्यातले कणभर सुख मणाचे दु:ख मागे सारे. त्या निसटलेल्या सुखाच्या तुकड्याची उब तिच्या दुबळ्या, बांगड्या पिचलेल्या मनगटांना बळ देई. एका तालात मनगटे हालू लागत. चौपदरीचा वाटोळा चंद्र तयार होई. एकसारखा... एकसंध. कुठे जाड नाही की कुठे पातळ नाही. तिचा न्याय कायम तोललेलाच. जगाने इतका दुजाभाव, मतलब दाखवूनही तिची चाल प्रेमाचीच गाणी गाई. चुलीखालची लाकडे त्या पिचलेल्या बांगड्यांत उरलेल्या किणकिणीत समरसून धगधगू लागत. तवा रसरसून उठे. दोन्ही डोळ्यात फुल पडलेली राधाक्का तव्याच्या मध्यावर तळहात ठेवून त्याला चाचपे. त्वचेचा चर्र आवाज ' कसा ऐकू आला म्हणजे वाटोळा चंद्र हसरा होईल ' याचे तिचे गणित पक्के होते. पाहता पाहता पौर्णिमेच्या चंद्रावर मोजके मातकट ठिपके उमटलेली, आतडी पेटवणारी खरपूस रास टोपलीत रचली जाई. बुडी मारली तरी डाळीचा कणही सापडणार नाही असे फोडणी दिलेले पिवळसर पाणी व डाव्या बाजूला उगाच बोटभर तेलात खललेले तिखट मीठ घेत आठ पोरं पंचेंद्रिये एकवटून राधाक्काने वाटून दिलेले सुग्रास अन्न चवीचवीने खात. दमलेल्या मनगटांची गती किंचित सैलावत मायेचे कान प्रत्येकाच्या मिटक्यांतून आजच्या दिवसाचे सार्थक आनंदून ऐकत राही.

पोटाची खळगी तूप्तीने हुंकारू लागली की सगळी पांगत. पांगताना टोपलीतल्या चंद्रांची मोजदाद भिरभिरते डोळे करत. संध्याकाळी फक्त पाणी का त्या पाण्यासोबत एखादा चतकोर मिळेलची चाचपणी चोरटेपणाने होई. आजूबाजूचा वावर राधाक्काचे कान टिपत पण आता तिचे त्यातले लक्ष उडालेले असे. आजचा दगड तिचा आवडता. सुखाची रास घेऊन आलेला.....

" नुकतेच नहाण आलेली दहा वर्षांची परकरी पोर, राधा. कालपर्यंत सुरपारंब्या, झिम्मा, फुगडी, आट्यापाट्या खेळणारी, पिसासारखी आनंदाने तरंगणारी राधा, सगळ्यांच्या दृष्टीने अचानक मोठी झाली. तिच्या पाठवणीची बोलणी दिवसरात्र वाड्यात घुमू लागली. तिकडून निरोप आला, " घ्यायला येतो. " त्या क्षणी राधेची, राधाक्का झाली. घरावरचे हक्क बदलले. " हक्काचे घर तिकडचे बरं आता राधाबाई. इथे माहेरवाशिणी सारखे यायचे आता चार दिवस. " या बोलांचा अर्थ त्या बालजीवाला कळला नाही तरी त्यामागचे भाव उमगले. तिकडून येणं झालं आणि राधाक्का आज खर्‍या अर्थाने सासरी निघालेली. पैठणी नेसलेली, सोन्याने वाकलेली तिची इवलीशी कुडी आईला सोडून जायचेय या कल्पनेनेच गदगदलेली. आता आई कधी भेटेल? मैत्रिणींसंगे कधी आट्यापाट्यांचा डाव पडेल. आईची सय आली की मी कोणाच्या कुशीत शिरू?? नुसती प्रश्नांची माळ गुंफली जाऊ लागली. उत्तरे नसलेली प्रश्नांची माळ. "

निघताना काकीसासूबाईंना आई म्हणाली, " आमच्या राधेला ना वरणावरचे पाणी खूप आवडते हो. कधी मधी.... " आईचे ते वाक्य पुरे होण्याआधीच काकीसासूबाई उद्गारल्या, " राधेच्या आई तुम्ही मुळीच चिंतीत होऊ नका. अहो डोणीत बुडी मारून शोधली ना तरीही डाळ दृष्टीस पडायची नाही इतके मोठे खटले आमचे. कधीमधी कशाला रोज मिळेल हो. " खरेच काकीसासुबाईंनी दिलेला शब्द कधी मोडला नाही. तेव्हाही नाही आणि त्यांच्या माघारीही नाही. राधाक्काच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले, सुरकुतलेल्या गालांना गोंजारत हनुवटीवरून तळहातावरच्या आजच्या चर्रवर पडले. चटक्याचा दाह थोडासा निमाला. राधाक्काने हलकेच कवाड लावले. दगडाच्या भिंती पुन्हा लिंपल्या. अन ओंजळीतले ते क्षण पुन्हा डोहाच्या तळाशी सोडून दिले. डुबुक.... डोह थरथरला. ते छोटेसे तरंगाचे वर्तुळ शांत झाले. गुढतेची झूल पांघरून डोह पुन्हा पूर्ववत गडद, अगम्य झाला.

" माये, अगं जेवतेस ना? हे बघ तुझे ताट वाढलेय. कुसूमने गरम गरम दोन भाकर्‍या टाकल्यात बघ तुझ्यासाठी. आणि तुला माहितीये का, परवा एक पोह्याचा पापड लपवून ठेवला होता शामने. त्याची चटणी तुला खूप आवडते ना... ती वाढलीये करून. ऊठ ऊठ चुलीसमोरून. पोतेरे घालू दे मला. " कमळी राधाक्काला उठवत होती. फक्त सोळा वर्षाची विधवा पोर माझी. काय आहे हिच्या नशिबात देवच जाणे. किती समजुतीने बोलत असते आजकाल. पोरं मोठी झालीत. मायेचे कष्ट, पोरांच्या करणीतून दिसू लागलेत. धूमकेतूच्या शेपटीतल्या दु:खाच्या थिजलेल्या काळ्या गडद पुंजक्याला खिंडार पडू लागलीत. इवल्या इवल्या मूठी, जोर लावून सर्वशक्तीनिशी राधाक्काचा वर्तमान उजळायचा प्रयत्न करत आहेत. ही माझी आठ किरणे सदैव तेजस्वी ठेव रे देवा. ओचा सोडून हाताने चाचपडत राधाक्का चुलीसमोरून उठून भिंतीशी पाठ टेकून उजवा पाय उकिडवा ठेवून बसली. पदराने चेहरा पुसून त्याच्या शेवेत तिने दु:खाची गाठ मारली. कुसुमने केलेल्या भाकरीचा तुकडा चटणीला लावून तोंडात सारून सुखाची चाहूल घोळवत राहिली.

चुलीवर पाण्याचा हबका मारून कमळीने मागे वळून पाहिले. मायेच्या पांढुरक्या राखाडी बुबळातून उमलणारी समाधानाची साक्ष पाहून ती हरखून गेली. मोरीच्या कट्ट्यावर बसून भांडी विसळीत असलेल्या शामशी तिची नजरानजर झाली आणि दोघी खुदकन हसल्या. समाधानाचा एक त्रिकोण पूर्ण झालेला...


काही माणसे भक्ती करावी अशीच असतात. त्या भक्तीची सुरवात या माझ्या राधाक्केपासून ( माझी आजी - आईची आई ) झाली. तिच्या जीवनाचे, माझ्या हाती लागलेले काही तुकडे... या डोहाची खोली लागणे शक्यच नाही. काही घटना तिने स्वतः वर्णन करून ऐकवल्यात. काही तुकडे मी अनुभवातून वेचलेय काही सगळ्यांच्या तोंडून हृदयावर कोरलेत....