जाता जाता एक नजर इथेही........

Monday, March 14, 2011

तांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )

लहानपणी टॉन्सिल्सच्या तावडीत मी अखंड सापडलेली होते. अमावस्या पौर्णिमेच्या आवर्तनासारखे यांचे येणे जाणे चालूच असायचे. नाना प्रकारची औषधे झाली पण यांनी आपले बिर्‍हाड एकदा जे बसवले ते. " भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी " च्या चालीवर तब्येतीत मांडले ते जवळपास दहावीपर्यंत. शाळा संपली आणि यांनीही निमूट दुसर्‍या घरचा रस्ता पकडला. महिनाभर सुरळीत गिळता आलेले पाहून काहीतरी भयंकर चुकल्यासारखे वाटू लागले. औषधे, इंजेक्शन यांचा अचानक बंद झालेला मारा याचा आनंद होता पण.... काहीतरी मिसिंग आहे ही भावना सारखी छळू लागली. आईला दहा वेळा मी बोलून दाखवले. तिलाही समजेना की आता सुखासुखी कारटीला काय खलते आहे.

लहानपणी माझ्या भावाला भूक लागली की तो म्हणायचा, " आई, मला ना ओशाळल्या सारखे वाटतेय. " आई विचारायची, " कोणाशी भांडलास का? कोणाला मारलेस का? " तर नाही. मग कशाला ओशाळल्यासारखे वाटतेय? म्हणजे नेमके तुला काय होतेय? असे विचारले की कपाळावर हात चोळून म्हणायचा, " अगं, इथे ओशाळल्यासारखे होतेय. " खेळण्याच्या नादात तो खायचा नाही. मग खूप वेळ न खाल्ल्याने पित्त चढून त्याचे डोके दुखायचे. भूक लागलीये हे न समजल्याने आणि केव्हातरी " ओशाळल्या सारखे वाटणे " हे कानावर पडलेले त्याच्या मनात पक्के बसलेले होते. तो सारखी तीच रट लावून धरायचा. मग आई त्याला पकडून जेवू घालायची की गडी पुन्हा टणाटण उड्या मारायला तयार.

माझेही असेच काहीतरी कारण असणार हे तिच्या लक्षात येऊ लागलेले पण काही केल्या चटकन ते कोणालाच उमगेना. झाले! ते निमित्त होऊन मी पुन्हा जोरदार ताप काढला. एकदम पारा चारच्या पुढेच चढला. रात्री ग्लानीत म्हणे मी खूप वेळ बडबडत होते. त्या बडबडीतून आईला त्या मिसिंग चा पत्ता लागला. इंजक्शन, थंड पाण्याच्या पट्ट्या, गोळ्या असा चोहोबाजूनी मारा केल्यावर दोन दिवसात ताप १०० वर आला. नुसत्या साखरपाणी, ग्लुकॉन डी, इलेक्ट्रॉल पिऊन कंटाळलेल्या जिभेला काहीतरी छानसे हवे ची जाणीव होऊ लागलेली. पोटात उंदरांनी कबड्डीचा हैदोस घातलेला. आईने तांदुळाची हिंगजिरे घालून साजुक तुपावर परतलेली पेज आणि मोठ्ठा पेढेघाटी डबा समोर ठेवला. पेजेच्या वासानेच भुकेले मन तृप्त होत गेले होते.

चार चमचे पेज पोटात गेल्यावर माझे डब्याकडे लक्ष गेले आणि मी जोरात, " आईईईईईई..... अगं..... "

" अगं हो हो... मला कळलेय आधीच तुला काय म्हणायचेय ते. आता खूश ना? त्यासाठी इतका ताप काढायची काही गरज नव्हती तुला. आजीला नुसते एक पत्र टाकले असते की काम झाले असते ना. आत्ता कसा हा डबा आला तसाच ताप न येताही आला असता. पण तू म्हणजे अशी आहेस ना..... असा कसा गं तुला हुकमी ताप काढता येतो? मला तरी सांग... " असे म्हणत आई हसत होती.

मी डबा जवळ ओढला. झाकण न उघडताच वास घेतला. अहाहाSSS ! तोच चिरपरिचित साजुक तुपावर भाजलेल्या तांदुळाचा, वेलदोडे मिश्रित साखरेचा वास. न राहवून लगेच डबा उघडला. पांढरे शुभ्र, गुलगुलीत, जिभेवर ठेवताक्षणी विरघळणारे तांदुळाचे लाडू मी त्यांना कधी गट्टम करते याची वाट पाहत दाटीवाटीने बसलेले. हे लाडू खावेत तर ते फक्त माझ्या आजीच्या हातचेच! अप्रतिम! एकदम मास्टरी होती तिची. मला ताप आलाय असा निरोप रावळगावी तिला गेला की लगोलग करून तिसर्‍या दिवशी कोणाला तरी पकडून ती मुंबईला माझ्या हातात पडण्याची चोख व्यवस्था करीत असे.

अचानक माझ्या टॉन्सिल्सनी काढता पाय घेतल्याने या दर पंधरा दिवसाआड येणार्‍या लुसलुशीत ठेव्याचा रतीब थांबला होता. हेच ते दु:ख मला छळत होते पण उलगडाच होत नव्हता. खरोखरच जसा हुकमी ताप आला तसा लाडवांचा डबा हातात पडल्याबरोबर तापाने लगेच काढता पाय घेतला. त्यानंतर न चुकता महिन्याभरात कोणाबरोबर तरी आजी हे लाडू धाडूनच देई. " उगाच पोरीने पुन्हा तेवढ्यासाठी ताप नको हो काढायला ", हे आणि वर.

तांदुळाचे लाडू खासच लागतात. त्याचा घास लागत नाही. वरवर येत नाहीत. दिवसाकाठी चार सहा जरी मटकावले तरी कुठलाच त्रास होत नाही. फक्त ते मन लावून करायला हवेत. माझ्या आजीसारखे.

वाढणी : आता ती तुम्हीच ठरवा बुवा....

साहित्य : चार वाट्या तांदूळ. तसे कुठलेही घेतले तरी चालतात पण आंबेमोहोर किंवा दुभराज घेतला तर सोनेपे सुहागा!

दीड ते पावणेदोन वाट्या साजुक तूप. आजी दोन वाट्या घेत असे. नुसती रेलचेल. पण माझा हात तितका सैल सुटत नाही म्हणून मी दीड वाटी आणि वर दोन चमचे घेतले.

तीन वाट्या घरी दळून घेतलेली साखर

दोन चमचे वेलदोड्याचे दाणे साखरेबरोबरच दळावेत.

कृती : मध्यम मंद आचेवर तांदूळ किंचितसा रंग बदलेतो भाजावेत. नीट भाजले गेल्याची खात्री करून लगेच ते गरम असतानाच त्यावर पाणी ओतून धुऊन घ्यावे. पाणी काढून टाकून कपड्यावर पसरून फार कडक ऊन पडणार नाही अशा बेताने ठेवून वाळवावेत. खडखडीत वाळल्यावर घरीच दळून त्याचे पीठ करून घ्यावे. परातीत/ ताटात ( फेसायला सोपे जाईल असे पसरट काहीही घ्यावे ) प्रथम तूप फेसून घ्यावे. नंतर त्यात दळलेली पिठीसाखर+ वेलदोडा घालून पुन्हा एकजीव होईतो फेसावे. मग तांदुळाचे पीठ घालून एकजीव करावे. खूप चांगले मळावे, जेणेकरून गुठळ्या अजिबात राहणार नाहीत व मिश्रण अतिशय हलके होईल. नंतर मध्यम आकाराचे लाडू वळावेत.

घरात कोणीही नसताना गुपचूप हे लाडू करावेत. स्वत: एक गट्टम करून झाल्यावर माणशी एक असे वाटीत काढून ठेवून बाकीचे लाडू दोन डब्यात विभागून ठेवावे. अन्यथा त्याचे त्या दिवशी परातीतच संपून जाण्याचा खतरा संभवतो. ( मी माझ्यापासूनच कसे लपवायचे बरे??? )




टीपा : तांदूळ भाजताना आच अजिबात वाढवू नये. घाईघाईने उरकून टाकणे प्रकारात हा लाडू बसत नाही. तांदुळाच्या पांढर्‍या रंगाचा काटा मोडला तर जायला हवाच. पण फक्त हलका बदामी रंग येईस्तोवरच. नाहीतर दृश्यस्वरुप खतरेमें! कुठलाही पदार्थ हा नुसताच जिभेने खायचा नसतो. आधी घरभर सुटणार्‍या वासाने जठराग्नी खवळून जायला हवा. मग परातीत सुबक बांधलेल्या लाडवांची तब्येतीत मारलेली बैठक डोळ्यांना सुखावून जायला हवी. मग हळूच तुकडा मोडून अल्लाद जिभेवर सोडायचा.... वा! आजी हो तो ऐसी!!!

गूळ घालूनही हा लाडू करता येतो. तूप व गूळ एकत्र करून गुळाचा पाक करून घ्यायचा बाकी सगळे वरीलप्रमाणेच करायचे. गुळाचा लाडू खमंग लागतो. त्याचा बाज वेगळाच आहे.

आवडत असल्यास साखरेचा लाडू करताना खसखस, काजू व सुके खोबरे भाजून घेऊन घालावे. ( प्रत्येकी अर्धी वाटी ) गुळाचा केल्यास तीळ, सुके खोबरे ( अर्धी वाटी ) घालावे. मात्र हे जिन्नस घातल्यास लाडूचा लुसलुशीतपणा काहीसा कमी होतो. म्हणून शक्यतो टाळावे.

Friday, March 11, 2011

निसर्गाची किमया!

नोव्हेंबर पंचवीस पासून हिमाने नुसते गोठवून टाकलेय. गवत, जमीन कशी दिसते हेच मी विसरून गेले आहे. बर्फाने मनसोक्त दंगा घातला आहे. रोज नित्यनेमाने तो पडतो. कधी मोठाले पुंजके तर कधी अखंड भुरभूर. कधी बारीक बारीक तडतड आवाज करत नाचणारे खडे तर कधी इतका सुळसुळीत राडा की अर्धा क्षण जरी चित्त ढळले तर कपाळमोक्षच. माझ्या घरामागे जवळपास चार पाच मैलाचे मोठे रान पसरलेले आहे. ऑक्टोबर मध्ये एकदा का पानगळती होऊन झाडांच्या संपूर्ण काड्या झाल्या की या रानाच्या घेराचा अंदाज येतो. एरवी भंडावून सोडणारे ससे, खारी, वक्तशीर ऑफिस टाइम नेमाने पाळणारी बदके, त्यांची पिलावळ, निरनिराळे पक्षी आणि अखंड बागडणारी फुलपाखरे, गोगलगायी, चतुर नुसती रेलचेल असते. मधूनच हरणांचे मोठाले कळप अगदी घरासमोर येऊन उभे राहतात. लक्ष नसले तर आपलीच घाबरगुंडी उडावी इतकी शूर झालीत हरणे. थंडीची चाहूल लागताच हरणे सोडून सगळे कुठेशी दडी मारून बसतात. एकतर एकही पान नाही. साधारण उणे १० फॅ. पासून अधिक २४ फॅ यात फिरणारे तापमान जवळपास साडेतीन महिने ठाण मांडून बसलेले. मार्च महिना सुरू झाला की पारा मधून मधून ३२ फॅ च्या पुढे मधूनच मुसंडी मारून सरकतो. रात्री पुन्हा हिम त्याला पकडून कुडकुडवते. त्यांचा हा खेळ अगदी एप्रिल संपेतो मनसोक्त चालतो.

थंडी तिचा गुणधर्म सोडत नाहीच. जितके शक्य होईल तितके ती तुम्हाला गोठवून टाकतेच. सूर्य कधी पाहिला होता हे आठवावे लागेल इतके प्रचंड दिवस झालेत. सूर्य नाही म्हणजे जिवंतपणाचा मागमूसच नाही. त्यामुळे येणारा असह्य अशक्य कंटाळा, अनुत्साह. हाडे फोडणारी थंडी, बेपत्ता सूर्य म्हणजे डिप्रेशनची पर्फेक्ट रेसिपीच. अगदी ओकाऱ्या होतील इतके घुसमटवणारे, मनाला गारद करणारे हे चार महिने सुसह्य करायचा प्रयत्न करणे आणि या थंडीचीच मजा घ्यायला सुरवात करणे ( हे मात्र कितीही प्रयत्न केला तरी मनापासून साधतच नाही... ) एवढेच काय ते हाती उरते.

झाडाझुडपांचे वेड अतिरेकी असल्याने आपल्याकडची अनेक सुवासिक झाडे मी कुंडीत लावलेली आहेत. वर्षातले सात महिने ती मला घरात ठेवावी लागतात. कटकट होतेच. संपूर्ण स्वयंपाकघर फक्त झाडेमय होऊन जाते. पुन्हा झाडांबरोबर असंख्य किडे घरात येतात, ती वीण वाढतच जाते. ते कमी की काय म्हणून येताजाता घरातल्यांचे टोमणे ऐकावे लागतात ही अजून एक भर. घर आहे का झाडेखाना? किती छांदिष्टपण गं तुझा.... पण हौसेला कटकट होतच नाही आणि त्यातून हे असे सुंदर फुल उमलले की सगळी मेहनत सार्थकी लागते. पंधरा दिवसांपूर्वी बाहेर १२-१४ फॅ तापमान असतानाही जास्वंदीचे फूल हसले. भरपूर कळ्यांनी हे झाड लेकुरवाळे झाले होतेच. पण मनात धाकधूक होती, कदाचित आत झिरपणाऱ्या थंडीने झाड कळ्यांना टाकून देईल. दोन तीन गळून गेल्याच मात्र या कळीने जिद्द धरलेली. खिडकीतून अहोरात्र दिसणारे बर्फ पाहत ही खुदकन हसलीये. हिच्या उमलण्याने खूप दिवसांनी मन उत्साहाने भरून गेलेय. आता लवकरच हे दुष्टचक्र संपेल आणि पुन्हा एकदा हे रान फुलापानांनी, पक्षांच्या चहकण्याने भरून जाईल. आसमंतात आनंद ओसंडून वाहू लागेल.

बर्फाचे फोटो काढत होते तर अचानक ही खारूताई माझ्याकडे वळून बघत बघत सुर्रकन पळाली ती थेट झाडावर. तिच्या मागे मी तिचे फोटो काढायला गुडघाभर बर्फातून लगबग केली. ती पठ्ठी एका जागेवर बसेल तर ना. तरीही काही फोटो काढलेच. शेवटी शेवटी ती फांदीला लटकून मस्त झोके घेत होती. ती छबी काही खूप छानशी हाती नाही लागली पण तरीही मी फोटो टाकलाय.

निसर्ग त्याचा कुठलाच गुणधर्म सोडत नाहीच. सगळेच भरभरून देण्याचा अखंड प्रयत्न. आता अचानक ठरलेल्या मायदेशाच्या भेटीत सूर्याची थोडी किरणेच बॅगेत भरून आणावी म्हणतेय.


मागील अंगण


माझी चाहूल घेणारी खारुताई

सरसर वर निघाली
मस्तीत झोके घेणारी

काय विचार आहे...


दरवाजा उघडला की

स्वयंपाक घरात नांदणारी हिरवाई

कोण कोणाला चिडवतेय...

आनंदीआनंद!