जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 7, 2012

परीघ...

मध्यरात्र उलटून गेली तरी वसंता टकटकीत जागा होता. तशी ही काही आजचीच गोष्ट नव्हती. गेले कितीतरी दिवस, महिने, वर्ष, झोप त्याला तंगवून, उपकार केल्यागत पापण्यांच्या कडेवर साचू लागे. सुरवातीला ठरवून, रेखून, तो स्वप्नं पाही. अर्धमिटल्या पापण्यांवर नवनवीन तरल स्वप्नांना जन्म देई. अंजारे-गोंजारे, आंदुळे. त्याच्या उबदार तरुण डोळ्यांच्या दुलईत स्वप्नही असोशीने धाव घेत. कधी एकच स्वप्न तो दिवसोंदिवस जोजवी तर कधी रोज नवी थरथर! तारुण्याची रग, शरीराची धग. लाजून चूर जमीन उकरणारी पावले अन त्यांच्या दिशेने झेपावणारे त्याचे ओढाळ लालसर उष्ण ओठ ! पाहता पाहता स्वप्न खरं होऊ लागे. सुखाचे तरंग मनभर पसरत. शरीर व्यापून टाकत. त्या तृप्तीने पिसासारखं हलकं झालेलं मन आकाशाकडे झेपावू लागलं की वसंताचा चेहरा अर्भकासारखा होऊन जाई. अशावेळी भासे, जणू संचिताचे गाठोडे भरलेल्या मुठी घट्ट बंद करून एखादे तान्हुले हुंकार देत निर्व्याज पहुडलंय. हलकेच गाल वाकडा करून घटकेत हसू तर घटकेत ओठांची रडवेली महिरप.... अचानक कोरा तटस्थ भाव तर कधी अपार स्निग्धता... जणू देवाशी बोलणारं स्वच्छ, नितळ अस्पर्श हृदयच!

पण हे सारं सुरुवातीला.... छाती रुंदावताना. आताशा स्वप्न पाहण्यासाठी पालथ्या मुठीनं डोळ्यांना जखडून ठेवले तरीही शुष्क भेगाळलेल्या बाहुल्या अदृश्यं फटीतून बाहेर झेपावत. आढ्याला उलटे टांगून घेत वाकुल्या दाखवत. बाहुल्या हरवलेल्या पांढुरक्या खोबणीत कितीही सुंदर सुंदर स्वप्न पेरली तरी ती रुजत नसत. तीही बाहुल्यांच्या जोडीला झोके घेत त्याला खिजवत. वसंता चिडचिडे. किमान माझ्या स्वप्नांवर तरी माझा अधिकार असावा. झोप न येण्याचं शल्य कधीच मागे पडलं होतं. तशी कित्येक पडली होती म्हणा. पण हे स्वप्नांचं अनपेक्षित होतं. समजत, मानवत नव्हतं. स्वप्नंच काय ती फक्त त्याची होती. काळजाशी जपलेली. थेंबा थेंबात भरलेल्या स्वरचित सुखाने जीवापाड शिंपलेली. आताशा न पडलेल्या स्वप्नांचा ढीग साचत चाललेला. आतल्याआत कोंडून पडल्याने धुरकट होत आलेला. त्याच्यासारखाच...

डबक्यासारखं साचलेलं. दुसऱ्यांसाठीचं आयुष्य! गडद काळ्या अंधारासारखं... अंगावर येणारं. तरीही अंगवळणी पडलेलं आयुष्य ! संपलेली तक्रार. परतवलेले आकांक्षांचे कढ. स्वत:खेरीज स्वत:ची अशी फक्त स्वप्नं. ती पुन्हा पाहू इच्छिणारं अजूनही हिरवं मन. रंध्रारंध्रातून निकराने फुटू पाहणारं ओसरत चाललेलं तारुण्य. जोखड भिरकावू पाहणारं... मुक्त, स्वतंत्र, स्वच्छ जगायला झेपावणारं... अधीरं मन ! अतृप्त स्वप्नांनी काठोकाठ तुडुंब भरलेलं ओढाळ मन ! कितीही दाबलं तरी सांदीकोपऱ्यातून उसळणारं मन ! तळमळतं मन !

रात्र झाली की ’ आपल्या ’ माणसांचा स्वार्थ त्यांच्या त्यांच्या पापण्यांखाली दबले फूत्कार काढत अजगरासारखा सुस्तावे. त्याला किंचितही धक्का न लावता हलकेच श्वास नियमित करत वसंता स्वप्नांना हाकारत असे. मोतीपोवळी लेऊन आलेल्या प्राजक्तफुलांच्या सड्याने स्वप्नांचा मार्ग घमघमून, बहरून जाई. प्राजक्ताच्या रक्तवर्णी सड्यावरून अल्लाद चालत, सुंदर स्वप्नांची झूल पांघरून आलेली ’ ती ’ आस वसंताच्या मनाला तृप्त करून गुडुपं झोपी जाई. गेली कित्येक वर्षे अव्याहत वाहता हा सुखाचा मार्ग आताशा वसंतासारखा भकास, रिता होऊ लागला होता. रात्रीमागून रात्री वांझोट्या जाऊ लागल्या. आयुष्याचं वांझोटेपण लादलेलं... न कळत्या वयात लादलेलं.... अपरिहार्यपणे स्वीकारलेलं.... तेही नकळत.

सुरुवात कधी झाली बरं.......

दहावीची परीक्षा नुकतीच संपलेली. वर्षभर अभ्यास करणारा वसंता निर्धास्त होता. प्रभाकरराव, वसंताचे बाबा तर त्याच्यापेक्षाही निर्धास्त होते. पोरगा बोर्डात येणार. सायन्सला जाऊन इंजिनीअरिंगला फ्री सीट मिळवणारच! चार मुलात मोठा वसंता. बाबांचा गुणी, होतकरू वसंता. त्याच्यामागचा अशोक यथातथाच होता. अभ्यासाचा त्याला मनापासून कंटाळा. मात्र आईचा लाडका. अशोक झाला आणि प्रभाकररावांना एकदम मोठी बढती मिळाली. ऑफिसरच्या परीक्षेत वरचा नंबर आल्याने कारकुनाचे एकदम ऑफिसर झाले. बदलीवर नवीन गावी जायला लागले खरे पण घसघशीत पगारवाढ, राहायला छोटेसे टुमदार बंगलीवजा घर मिळाले. म्हणून तो आईचा लाडका. त्यातून अशोक चलाख होता. आईची एकदोन कामे करून गोड गोड बोलून मतलब साधून घेण्यात लहान असल्यापासून तरबेज होता. उषा त्याखालची. वसंताला नेहमी ती अळवाच्या पानावरील थेंबासारखी वाटे. सगळ्यापासून अलिप्त... तटस्थ. आतल्या गाठीची. स्वत:च्या आखीव, कॅलक्युलेटीव्ह परिघात नेमस्त. तिला कोणाचीच माया नव्हती. आजही ती तितकीच अलिप्त.... स्वत:च्या संसाराच्या परिघात रममाण. अळवाच्या पानाची आठवण फक्त गरजेला. हक्क गाजवायला. वारंवार...!

त्याहून धाकटी, मुग्धा. वसंताच्या आयुष्यातलं एकमेव सुख. खरे तर तो दहावीत असताना मुग्धा जन्मली. आईला बाळ होणार आहे हे कळले तेव्हां सुरुवातीला तर आई-बाबांकडे बघायचीही त्याला लाज वाटे. शी! मी इतका मोठा... दहावीतला आणि आता.... यांना बाळ होणार... मित्रही टिंगल करत. काहीबाही बोलत. वसंता संतापे. दिवसदिवस लायब्ररीत काढे. चिडून चिडून चिकाटीने अभ्यास करी. प्रिलिमला पंच्याण्णव टक्के गुण घेऊन वसंता घरी आला तेव्हा आईने हॉस्पिटल गाठलेले. दोन दिवस झाले बाळ होऊन पण वसंता फिरकलाही नाही. तिसऱ्या दिवशी आई बाळाला घेऊन घरी आल्यावरही रात्र होईतो तो घरी आलाच नाही. आल्यावरही जेवून तडक डोक्यावर पांघरूण ओढून त्याने झोपून टाकले. असेच दोन तीन दिवस गेले. आईने त्याला हाक मारून बाळाला दाखवायचा प्रयत्न केला पण न ऐकल्यासारखे करून तो पसार झाला. आठ एक दिवसांनी आई अंघोळीला गेली असताना हळूच तो बाळाच्या पाळण्यापाशी गेला. मुग्धा मजेत बाळमुठी चोखत, पाय हालवत होती. तो पाळण्यावर वाकताच तिची अस्थिर नजर त्याला पकडू लागली. तांबूस पालवीच्या रंगाची, तितक्याच कोमल त्वचेची, कुरळ्या लडिवाळ जावळाची, लांबसडक निमुळत्या लाललाल बोटांची... गोंडस मुग्धा! तिने क्षणात त्याचा कब्जा घेतला. तो कायमचा. आजही ती तितकीच लडिवाळ, निर्मळ! ' माया ’ जात्याच असावी तिच्या अंगी. या पन्नास वर्षात वाट्याला आलेलं एकमेव निःस्वार्थी माणूस. बाकी सगळाच आनंद!

मुग्धा झाली आणि बाबांना पुन्हा बढती मिळाली. ब्रॅंच मॅनेजरपद त्याची किंमत घेऊन आले. मुग्धा जेमतेम वर्षाची झालेली. बाबांच्या बॅंकेत अफरातफर झाली. रक्कम बरीच मोठी होती. रुरल एरिया होता तो. लोन मंजुरीसाठी हात ओले करावे लागतात म्हणून आधीच तीव्र असंतोष होताच, त्यात ही घटना. " खायापिया कुछ नही ग्लास तोडा...! " तशातली गत झाली बाबांची. कशी कोणी वरची चक्र फिरवली कोण जाणे पण प्रभाकररावांवर ठपका आला. अटक झाली. नाचक्की पदरात आली, रोजची उलट तपासणी सुरू झाली. सगळ्यांच्या नजरेत हेटाळणी दिसू लागली. प्रभाकररावांचा संताप संताप झाला. पण थोडाच वेळ. मग ते अगदी खचून गेले. बदनामी असह्य होऊन त्यांनी जगाशी फारकत घेतली. हे लांच्छन त्यांचा जीव घेऊन संपले. त्यांच्यापुरते संपले. मागे उरली ती पाच जणांना व्यापणारी लांच्छनाची पडछाया. बारावीचे अर्धे वर्ष यातच संपले. तशातही वसंता जीव तोडून अभ्यास करत होता.

बारावीचा निकाला अपेक्षेप्रमाणेच लागला. ’फ्री’ सीट हसत मिळाली. पण सटवाईने कपाळावर त्याक्षणाची लिहिलेली रेषा वेगळीच होती. वसंताच्या फ्री सीटचा खरा आनंद वाटणारा माणूस त्याला सोडून गे. इतरांना सोडाच पण वसंतालाही आनंद झाला नाही. काय झाले ते कधीच कळले नाही मात्र बाबांवरचा आरोप सिद्ध झाला नाही. खरे आरोपी सापडले नाहीतच पण बाबांवरचा अन्याय काहीसा भरून निघाला. थोडीफार शिल्लक होती ती सातआठ महिन्यात संपलेली. महिन्याकाठी येणारा पगार आटलेला. नातेवाईक पहिल्या पंधरा दिवसातच आपले रंग दाखवून पांगलेले. नियमानुसार बाबांच्या बदली घरातले एक माणूस लागू शकते म्हणून.... बारावी पास झालेल्या वसंताला बॅंकेने बाबांच्या बदली क्लार्क म्हणून नोकरीवर घेतले. बाबांच्या पश्चात घर सोडावे लागल्याने दोन खोल्यांत तोंड दाबून पाच जीवांचा बळी जाण्यापेक्षा एका इंजिनिअरला समाज मुकल्याने नुकसान कोणाचेच होणार नव्हते. बापड्या वसंताला कोण विचारतो? आईने त्याला गृहीत धरून होकार कळवून टाकला. वसंताने मुकाटपणे आपली पावले बॅंकेकडे वळवली.

दिवस त्यांच्या गतीने पसार होते होते. आपण शिकलो तर लवकर प्रमोशन मिळेल म्हणून घर सांभाळत एकीकडे वसंताने बीकॉम केले, सीएस केले. बॅंकेच्या परीक्षा देत देत ऑफिसर झाला. पगार चांगला मिळत होता. चार खोल्यांचा ब्लॉक घेतला. एकेकाळी छोटेसे गाव असलेल्या या शहरात अतिशय रास्त किमतीत छान स्वत:ची जागा झाल्याने खूप वर्षांनी वसंता खूश झाला. अशोकने डिप्लोमा पूर्ण केला. सुदैवाने त्याला चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली. पण थोड्याच दिवसात त्याला नोकरी म्हणजे हुजरेगिरी वाटायला लागली. मला ' वसंता ' व्हायचे नाही असे म्हणत त्याने नोकरी सोडून गॅरेज काढायचा बेत जाहीर केला. भांडवल उभे करताना आईने वसंताला पैसे द्यायला भाग पाडले. उषाचे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. तिच्या लग्नाचे पाहायला हवे असं मधूनमधून आई म्हणू लागली. तोच अचानक अशोकने लग्न ठरवले आणि लगेच केलेही. बायकोला घेऊन तो तिथेच राहिला. वेळीअवेळी वसंताला पिडत राहिला.

त्याच्या मागोमाग उषाचेही लग्न झाले. सगळा मानपान, दोन्ही बाजूंचा खर्च व्यवस्थित करून लग्न लावून दिले तरी उषाच्या नवऱ्याची तक्रार होतीच. ती कधीच संपली नाही. नवनवीन तक्रारींची भर पडतच राहिली. पाहतापाहता मुग्धा विशीची झाली. अतिशय लाघवी, देखणी मुग्धा, पाहताक्षणीच नजरेत भरू लागली. वसंताच्या लग्नाची चिंता सोडाच किमान त्याचे लग्नाचे वय कधीचेच उलटून गेलेय हेही आईच्या तोंडून कधी आले नाही. चटका लावून गेलेले बाबांचे जाणे, अचानक अंगावर आलेली जबाबदारी, " तू बाबांच्या जागी आहेस आता... " या आईच्या रोजच्या ऐकवण्यात मधली वीस वर्षे सगळ्यांसाठी झगडण्यात, शिक्षणात, त्यांचे सुखं पाहण्यात, त्यांच्या स्वप्नांची ओझी ’ त्यागाच्या धुंदीत वाहण्यात ’ कुठे गेली कळलंच नाही. क्वचित मन, शरीर बंड करून उठे पण त्या बंडाचा झेंडा फडकवण्याआधीच तह झालेला असे.

मुग्धाचेही लग्न झाले. तिचा नवरा- अजय साधा सरळ. मुग्धाच्या लग्नात अशोक, त्याची बायको, उषा, तिचा नवरा यांनीच वसंताला छळले. हे शेवटचे आणि लाडक्या मुग्धाचे कार्य म्हणून वसंताने सगळ्यांचे सगळे हट्ट पुरवले. मुग्धा सासरी गेली आणि अशोकला रान मोकळे झाले. चार खोल्यांमध्ये एक खोली वसंताची, एक अशोकची, आई आणि मुग्धा दिवाणखान्यात. मुग्धा गेल्यानंतर हळूहळू पद्धतशीरपणे अशोकने हालचाल सुरू केली. ते छोटेसे शहर आता मोठे होऊन आडवेतिडवे फुगत गेलेले. जागांचे भाव चढे होऊ लागलेले. वसंताची जागा मध्यवर्ती, मोक्याची. आपल्याला ती घशात कशी घालता येईल या संधीची अशोक वाट पाहू लागला.

चाळीशी उलटलेली असली तरी अजूनही आपले लग्न होईल. आईला आता तरी आपली आठवण येईल. " किती केलंस रे आमच्यासाठी ! स्वत:ला विसरुन बापाच्या संसाराचा गाडा ओढलास. " असे म्हणत कधीतरी आई प्रेमाने पाठीवरुन हात फिरवेल. आशा महा चिवट ! पण घडत होते भलतेच. एकदोनदा त्याने आडून आडून सुचवल्यावर, " तुला आता कुठली घोडनवरी मिळायला रे! आणि काय करणार आहेस लग्न करून? माझे म्हातारीचे शेवटचे दिवस तुझ्या बायकोचा तोरा सहन करण्यात जाणार की काय? माझं मेलीचं नशीबच फुटकं! चार दिवस सुखाने राहीन, अशोकच्या पोरांना खेळवीन पण नाही.... " आईचा हा कांगावा. " मेलं कसं का असेना हक्काचं माहेर होतं पण तेही आता पारखं होणार. दादा, आता या वयात कशाला लोढणं घेतोस बांधून? " उषाचे टोमणे. अशोकची-त्याच्या बायकोची आदळआपट. सारे सारे वसंताला विझवून थांबले. पन्नाशी आली. केस विरळ झाले. खांदे झुकले. मन विटले. नोकरी आणि घर एकमार्गी प्रवास अव्याहत सुरू होता. जवळीक साधून होती ती मुग्धा आणि पडणारी रात्रीची स्वप्ने.

आताशा या स्वप्नांवर घाला पडलेला. तळमळत्या रात्रींची मोजदाद करून मन शिणले. स्वप्न उमलेनात. तशात एक दिवस पुतण्याने काकाला लाडीगोडी लावली. " काका, अहो अभ्यास वाढतोय माझा. घरात सारखं कोणीतरी येतं जातं. तुम्ही असेही दिवसभर नसताच. मी तुमच्या खोलीत बसत जाऊ? " " अरे त्यात काय विचारायचे? माझी खोली तुझीच आहे की. बस बस, जोरदार अभ्यास कर. काही अडले की मला विचार. " थोड्याच दिवसात स्वत:च्याच खोलीत, वसंता उपरा होऊन गेला. घरी आला की बाल्कनीत तासंनतास बसू लागला. एक दिवस जागा झाला तेव्हां बाडबिस्तरा गॅलरीत होता. वसंता हसला. चला. खोलीचा पाश संपला. आता मोकळ्या हवेत, उघड्या आकाशाखाली, मंद हवेच्या झुळकेबरोबर हेलकावत जाणाऱ्या विरळ धुरकटणाऱ्या ढगांच्या सोबतीने, रात्रीच्या गारव्याबरोबर पुन्हा एकदा स्वप्ने पापण्यांवर साय धरतील. पण नाही... ती रुसलेलीच! का? का? वसंताची तगमग थांबेना. मोकळं होऊन जा... मुक्त ताना घे. रोज रात्री टक्क डोळ्यांची सोबत करणारं कलेकलेने आकार बदलत लटकणारं चंद्रबिंब त्याला खुणावू लागलं. ऊठ... सटवाईची रेघ तिचा वाटा घेऊन कधीच पसार झालीये. आता तू तुझा होऊन जग. हाती किती उरलंय कोण जाणे. सरलं त्याचा हिशोब घालू नको. नाहीतर आयुष्याची पन्नास वर्षांची अमावस्या कधीच उजळायची नाही. स्वप्नांची फुलपाखरं पापण्यांत पुन्हा उडायची नाहीत. अचानक डोक्यावरचा पांढुरका ढग दुभंगला. एकमेकांचा हात धरून लटकत घरंगळणाऱ्या पावसाच्या थेंबासारख्या चांदण्या त्याच्यावर बरसल्या. वसंता उमगल्यागत हसला. निर्णय झाला. संदिग्धता संपली. मनाच्या कुठल्याश्या कोपर्‍यात अजूनही तग धरून राहीलेली पाशांची मूळं जळून गेली.

पुढचे पंधरा दिवस धावपळीत गेले. पण सगळी कामे मनासारखी पार पडली. आजची शेवटची रात्र. त्याने डोळे मिटलेच नाहीत. उघड्या डोळ्यांनी उद्याची स्वप्ने रचली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठून त्याने आवरले. गॅलरीत बसून तीन पत्रं लिहिली. एक बॅंकेला, दुसरे आई व अशोकला आणि तिसरे लाडक्या मुग्धाला. तीनही पत्र व एक छोटीशी बॅग घेऊन तो निघाला तेव्हां कोणीही त्याची दखल घेतली नाही. खाली उतरून त्याने वळून घराकडे पाहिले. दाटून आलेल्या कडांवरले पाणी ओठांना मुरड घालून निग्रहाने जिरवले आणि पाठ फिरवली. आई व अशोकचे पत्र त्याच्या घराच्या पत्रपेटीत व बॅंकेचे आणि मुग्धाचे पत्र पोस्टाच्या पेटीत टाकून त्याने स्टेशनचा रस्ता पकडला. समोर दिसणाऱ्या ट्रेनमध्ये स्वत:ला झोकून देत खिडकीशी जाऊन बसला. ट्रेनच्या तालबद्ध नादात रस्ता, झाडे, माणसे, त्याच्यासकट सगळीच चटक-फटक, चटक-फटक धावू लागली. सर्वांगाचं पीस झाल्यासारखा अथांग आकाशात नवी स्वप्ने घेऊन तरंगू लागला. अज्ञाताच्या दिशेने..... स्वप्नांच्या वाटेवर...!

इकडे घरामध्ये हलकल्लोळ माजला. वसंताने घर विकून टाकले होते. पंधरा दिवसात घर रिकामे करण्याची नोटीस अशोक व आईला दिली होती. आईची वृद्धाश्रमात कायमची सोय लावून ठेवली होती. कंपनीला राजीनामा पोचला होता. मुग्धाच्या पत्रात फक्त एक नंबर होता. तिने ते पत्र कोणालाच दाखवले नाही. पण मनात मात्र काहूर होतं. काय करायचं ते माहीत होतं. पण कधी करावं ते नेमकं उमगत नव्हतं. मुग्धाचा काही काळ असाच मुग्धतेत गेला. अखेर महिन्याभराने एका शांत संध्याकाळी मुग्धाने ’ तो ’ नंबर फिरवला. अपेक्षेप्रमाणेच घडलं. मनमोकळा प्रफुल्लित आवाज आला, “ मुग्धा, कशी आहेस? “ आणि तो आवाज तिला आश्वस्त करून गेला.