जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, January 17, 2013

गुळाची पोळी


संक्रांत आणि तिळाचे लाडू, वड्या, तिळगूळ, गुळाची पोळी हे समीकरण अगदी हवेहवेसेच. वर्षभरात आपण चिक्की किंवा वड्याही खातो पण सहसा गुळाची पोळी केली जात नाही. माझ्याकडून तरी नाही होत. तसेच आपल्याकडे या सगळ्या परंपरांमागेही एक धारणा दडलेली आहे. थंडीचा कडाका पडलेला असतो. त्वचा फार कोरडी, शुष्क जाणवते. शरीराला उष्णतेची, इंधनाची गरज तीव्रतेने जाणवते. मला आठवतेय माझी आजी दर शनीवारी चुकता वाटीत खोबरेल तेल घेऊन गरम करून संपूर्ण अंगाला लावत असे. ८४ वर्षापर्यंत तिच्या त्वचेची तकाकी आणि पोत इतका सुंदर होता. रोज मॉश्चरायजर लावले तरी तेलाइतका परिणाम बहुदा होत नाही. आजी, आई चुकता संक्रांतीला वड्या, लाडू गुळाची पोळी करतच करत. विशेषतः: पोळी हटकून होत असे. आई अजूनही करते. आजकाल घरटी माणसांची संख्या रोडावत चालली आहे. दोघच दोघं. असे घाट घालावा तर खाणार तरी कोण असा प्रश्न पडतोय. पण तरीही ही गुळपोळी, होळीला पुरणाची पोळी, पाडव्याला श्रीखंड, गणपतीला मोदक दिवाळीचा फराळ करायचाच असे ठरवून टाकलेय. या गोष्टी वारंवार होत नसल्याने दरवेळी थोडीशी धाकधूकच वाटते. तश्यांत जर केल्याच गेल्या नाहीत तर जमायच्याच नाहीत आणि इथे विकत मिळणार नाहीत.

" संक्रांतींच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!! "
" गुळाची पोळी अतिशय खुसखुशीत, खमंग झालीये. ती खाऊन तोंड गोड करा आणि गोड बोला !!! "


साहित्य :

पिवळा गूळ चार वाट्या

अर्धी वाटी खसखस,

अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ

दोन चमचे तीळ भाजून पूड करून

तांदळाची पिठी एक वाटी

सहा वाट्या कणीक

एक वाटी तेल

चवीपुरते मीठ

एक चमचा वेलदोड्याची पूड

दोन चमचे बदाम+काजूची पूड ( ऐच्छिक )

कृती :

फार कडक नाही लिबलिबीतही नाही असा चांगल्या प्रतीचा मऊसर पिवळा गूळ किसून घ्यावा. कुटूनही घेऊ शकतो. मात्र कुटताना खलबत्त्यात थोडे तेल घालावे म्हणजे खाली चिकटणार नाही. मी गूळ किसून घेते. खसखस तीळ मंद आचेवर भाजून पूड करावी. डाळीचे पीठ चमचाभर तेलावर बदामी रंगावर आंच मंद ठेवून पक्के भाजावे. किसलेला ( वा कुटलेला ) गुळात खसखस+तिळाचे कूट, डाळीचे पीठ, वेलदोड्याची बदाम+काजूची पूड घालून चांगले मळावे. गुळात खडे, गठुळ्या बिलकूल नसाव्यात. एकसंध गोळा व्हायला हवा. अन्यथा लाटताना हटकून चिरा पडतील.


कणकेमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. चवीपुरते मीठही घालावे. कणीक घट्ट भिजवावी. गुळाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. कणकेचेही गोळे करून घ्यावेत. एका पोळीला दोन गोळे हवेत त्यातील एक गुळाच्या गोळीपेक्षा किंचित मोठा असावा. कणकेच्या दोन गोळ्यांमध्ये गुळाची गोळी ठेवून दोन्ही कडा नीट जुळवून बंद करून घ्याव्यात. तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पातळ पोळी लाटावी. पोळी लाटताना गूळ नीट कडेपर्यंत पसरेल असे पाहावे.


तवा गरम करून घेऊन मध्यम आंचेवर हलकेच पोळी टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी. पातळ केलेले तूप त्यावर पसरवून गरम गरम खावी. गुळाची पोळी थंड झाली तरी छान लागते. आता घरोघरी मायक्रोव्हेव आहेत. टिशू पेपरमध्ये गुंडाळून तीस सेकंद ठेवून खाल्ल्यास नुकतीच केल्यासारखी चव लागेल. शिळी गुळाची पोळीही अप्रतिम लागते. थोडक्यात काय कशीही खाल्लीत तरी आवडणारच. :)




टीपा :
  
गूळ चांगला असणे हे फार महत्त्वाचे आहे. ओला जास्त आंबल्यासारखा वास येणार गूळ अजिबात घेऊ नये. तसेच अतिशय कोरडा, कडक गूळही घेऊ नये. गूळ फार वेळ किसून-कुटून उघडा ठेवून देऊ नये.


कणकेत तेलाचे मोहन घालायलाच हवे. हा पदार्थ फारच क्वचित केला जातो त्यामुळे तो करताना उगाच हात आखडता घेऊ नये. जे गरजेचे आहे ते तितक्या प्रमाणात घातले नाहीतर सगळे मुसळ केरात. पोळी लाटतानाच जर फुटली, चिरा गेल्या तर मग ती भाजताना फार कटकट होते.

गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :)


Tuesday, January 15, 2013

बस लगे रहो...

 नवीन वर्षाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! नवे संकल्प, नवे बेत, येत्या वर्षात अमुक एक गोष्ट पूर्णत्वास न्यायचीच हा मनाशी केलेला  निश्चय, वगैरे वगैरेंची आखणी झाली असेल. या सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे तडीस नेता येतील का नाही हे येणारा काळ ठरवेलच. प्रत्येक येता दिवस, ’ अजून वेळ आहे बरं काचा दिलासा देईल, प्रोत्साहन देईल. सरता दिवस, ’जातोय हं का एक एक दिवस हातातून निसटून . चला आता जरा जाणीवपूर्वक, मनावर घेऊन ठरवलेल्या बेतांची पाठपुरवणी करा ’ चा इशाराही देईल. बरेचदा मी नोटीस केले आहे की आळस हा फक्त त्या एका विवक्षित क्षणाचा असतो. जर का तो क्षण आपण निकराने जिंकला तर पुढचे सगळे सहज होऊ शकते.

संकल्प कशाचाही असू शकतो. अगदी रोज सकाळी उठून नियमितपणे स्वत:च्या इतरांच्या पांघरुणांची घडी घालण्याचा, झाडांना पाणी घालण्याचा, पंधरा दिवसातून एकदा कपाट आवरण्याचा, जे कव्हर असेल तीच सीडी त्याच्या आत ठेवण्याचा, चपला झटकून रॅकवर ठेवण्याचा, इस्त्रीचे कपडे वेळेत देऊन वेळेत आणण्याचा. संपूर्ण वर्षात शक्य तितका अनावश्यक खर्च टाळण्याचा. गोड बोलण्याचा. कालच संक्रांत झालीये नं.... :) रोज आजीशी किमान पंधरा मिनिटे बोलण्याचा. नियमितपणे... म्हणजे इतक्या नियमितपणे एखादे आईचे काम करण्याचा की ती त्या कामाबाबतीत निःशंक होऊन जाईल. किंवा रात्री झोपताना चुकता दात घासून झोपण्याचा. अगदी कशाचाही असू शकतो. इथे मी रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, गुंतवळ गॅलरीतून हळूच कोणी पाहत नाहीये नं असे मांजरीसारखे डोळे मिटून खाली सोडणे, वगैरे संकल्पही असतात असे म्हणणारच नाही कारण आपण कोणीही हे वेडे प्रकार करतच नाही हे गृहीत आहे. तर, हा किंवा हे संकल्प फक्त त्या वर्षापुरते नकोतच. त्या नेमेची उगवणार्‍या सौजन्य सप्ताहांचा सुळसुळाट आणि मग वर्षभर उडणारा बोजवारा पाहतोच की आपण. संकल्प कसे कायमचेच हवेत. त्यांना लोणच्यासारखे अंगी मुरवून टाकायचे. मग काही वर्षांनी आपण इतक्या गोष्टी नियमाने करत असू की त्या कधीतरी आपण जाणीवपूर्वक अंगी बाणवल्यात याचाही विसर पडावा. सातत्य... सातत्य... सहजता... विजय. काय... खरं नं?


तर या संकल्पांची प्रत्येक व्यक्तीनुरूप वेगवेगळी संकल्पना असली तरी नव्वद टक्के मनांमध्ये शिखरावर विराजमान असतो तो व्यायामाचा संकल्प. दर वर्षी केला जाणारा... वर्षात पुन्हा पुन्हा केला जाणारा... सारखा वाकुल्या दाखवणारा... , " कर नं... आज तरी.... करशील? करशील? पाहा जमतेय का? नाही म्हणजे इतका वेळ खाण्यात घालवतेस त्यातला थोडासा.... काय? जमेल गं तुला..... करशील? आज करच.... " म्हणत येताजाता समोर उभा ठाकणारा. मस्त गरम गरम बटाटेवडा खातांना.... त्या पिवळसर तकतकणार्‍या वड्याचा खमंग वास मनात भरून घेत पहिला घास घेऊ म्हणून त्याकडे पाहता... त्यावर कमरेवर हात ठेवून वड्याची आपल्या आनंदाची शकले करू पाहणारा हाच तो संकल्प. दिवसभर मस्त चापून झाल्यावर... झोपताना न चुकता स्वत:ला गिल्ट देणारा संकल्प. नेमेची हात धुऊन पाठपुरावा करणारा संकल्प.... व्यायामाचा संकल्प.

खरं तर तुम्हाला, मला, सगळ्यांनाच या संकल्पाची महती, जाणीव वाजलेले तीन तेरा माहीतच आहेत. शिवाय प्रत्येकाचे स्वत:चे वेगवेगळे अनुभवही आहेतच गाठीशी. तेव्हा आता वेगळे वेगळे ते काय मंथन होणार आहे या पोस्टमधून... मलाही असेच वाटत होते. म्हणून आळसाची साथ देत हाताला आरामच देत होते. चहाचा कप हाती घेऊन बाहेर साचून राहिलेला थिजलेला थंड शीळा स्नो पाहत असताना एकदम आईचे शब्द आठवले. अगं एखादी गोष्ट नीट लक्षात राहायला हवी असेल, अंमलबजावणी व्हायला हवी असेल तर लिहून काढावी. लिहिले की जास्त समजते... खोलवर पोचते... अर्थ भिडतो... आणि मुख्य म्हणजे कायमचे स्मरणात राहते. शाळेत, कॉलेजात हे सूत्र पर्फेक्ट उपयोगी पडतेच म्हणा. शिवाय काही वेळा गोष्टींच्या नोंदी ठेवल्या नं की पुढे संदर्भासाठी प्रचंड उपयोग होतो. आणि एखाद्या संध्याकाळी या सगळ्या डायर्‍या घेऊन कुठलेही पान उघडून वाचताना खूप मजाही येते... नॉस्टॅलजिकही होऊन जायला होते... महागाईचा राक्षस किती फोफावलाय हे पाहून गरगरून जायला होते. काही नाजुक, हृद्याशी जवळीक करून असलेल्या क्षणांमध्ये पुन्हा एकदा जगता येते. गाडी आता भरकटलीये... हा या पोस्टचा मुद्दा नाहीये. हे नाजुकसाजुक तरल काहितरी... व्यायामाला मागे सारून कुरघोडी करून टाकण्याआधी डायरी बंद. व्यायामाला लागूयात.... म्हणजे निदान संकल्पाचा पाठपुरावा करायचे मनावर घेऊयात.


इतर संकल्पांनपेक्षा हा व्यायामाचा संकल्प कशानेही हाणून पडतो. म्हणजे काहीही फुसकट कारणेही पुरतात. आज काय आभाळ भरून आलेय... आज मन मरगळलेय. आज कामवाली बाईच नाही आली. भांडी-धुणे-केरवारे केले म्हणजे होणारच आहे की व्यायाम. नुकतेच तर खाल्लेय आता चार तास व्यायाम करता येणार नाहीच. हो नं उगाच या नादात काहीतरी भलतेच व्हायचे. आज सकाळपासून हा मेला सेल पाठ सोडत नव्हता. आता गाडी पकडू का व्यायाम करू ? या घरातली माणसे म्हणजे नं.... स्वत: म्हणून काही करणार नाहीत. सारखं अगं अगं... आई आई... आता नोकराणीसारखी पडत्या फळाची आज्ञा झेलत फिरत राहते. वर माझ्या दिसामासाने वाढणार्‍या वजनाच्या वरकरणी दिखाऊ चिंतेचे ताशेरेही ऐकते. मागोमाग येणारे फुसकन हास्याचे फवारेही ऐकू येतात बरं का मला. जरा काही खायला गेले की आडपडद्याने सोडलेल्या फुसकुल्याही आहेतच भर घालायला.

गंमत म्हणजे या संकल्पाला सारखी लाचेचीही गरज असते. आठवडाभर व्यायाम केलास नं राणी तर शनीवारी हक्काने चाट खाता येईल. शहाणी नं तू. अगं तू मनात आणलेस तर तिकोनाही एका दमात चढून जाशील बघ.... कसे छान वाटेल नं कोणाचाही आधार न घेता गड सर करायला. अश्या लाडीगोडीचीही नितांत गरज असते. अगबाई, हा ड्रेस इथे दडला होता होय... बरं झालं सापडला. आता धुऊन उद्याच घालावा म्हणून तू सकाळी काढलास पण मग खट्टू झालीस... झालीस नं? व्यायाम केलास की महिन्याभरात होईल बघ. काय खुलायचा गं तो अंगावर... अश्या मखलाशीचीही गरज असते. या संकल्पाला बरेचदा सोबतीने तडीस नेता येते. एकटीने काय तो बाई करायचा व्यायाम. कोणीतरी सोबत असले की कसे उत्साह येतो. शिवाय त्या सख्यांच्या टोमण्यांच्या दडपणानेही आपण करतोच नं. नाहीतर उगाच, ’ तू किती गं आळशी किंवा किती आरंभशूर असे ऐकून घ्यावे लागेल की काय... म्हणून नेटाने आपण करतोच करतो. हे दडपण बरेच असते की. छुपा फायदा.


थोडक्यात , काचेच्या भांड्याला कसा जरासा धक्का लागला तर तडा जाऊ शकतो तसेच या व्यायामाचे आहे. आणि हे असे तडे रोजचे दबा धरून बसलेले असतातच. एकदा का यांचा कल्ला वाढला की खळकन आवाज येतो.... व्यायामाचा चक्काचूर होऊन जातो. तो होऊ नये म्हणून या लाचेच्या, मखलाश्यांच्या, लाडीगोडीच्या, धाकधपटश्याच्या, तलवार काढण्याच्या आणि फायनली गंगायमुनांच्या क्लुप्त्या स्वत:वरच योजत राहायच्या. विजयाच्या झेंड्याला हात लावल्यावर मिळणार्‍या आनंदाचे गाजर लटकवत ठेवायचे.


आता हेच पाहा नं, " रोज सकाळी गजर वाजला की मिटल्या पापण्यांच्या आत गाढ निजलेल्या माझ्या मनाला प्रथम जाणीव होते ती उठून आन्हिके झाली की व्यायाम करायचा आहे. नको नं, आज नको बाई. उद्या नक्की. जरा झोपू दे नं सुखाने. उठल्या उठल्या, आले, गवती चहा घालून केलेल्या त्या अमृताचा निवांतपणे आस्वाद घेऊ दे की. मेलं कशाचंच सुखं म्हणून मिळत नाही. आजकाल या व्यायामाचा बागुलबुवाच झालाय. लहान मुलांना कसे आपण थोडेसे घाबरवतो ऐकत नसली की तसेच होतेय. या अश्या बागुलबुवाच्या दडपणाखाली व्यायाम करूनही काही फायदा होणार नाहीच मुळी. मन चक्क मनाशीच गेम्स खेळू लागते. प्लीज, प्लीज... एकच दिवस. उद्या दुप्पट करू. हा झगडा अर्धवट झोपेत चालतो. मग तो क्षण रोज मी निकराने मागे ढकलते. त्याने मांडून ठेवलेली आमिषे दूर सारते आणि सर्वांगसुंदर व्यायामास सुरवात करते. पुढे ४५ मिनिटे सलग लड्या उलगडत जाव्यात तसा सहज उत्साहाने व्यायाम होतो. म्युझिक बंद करून, घामेघुम होऊन कोचावर टेकण्याचा तो क्षण सार्थक झाल्याचा. पुढला सगळा दिवस उत्साहात, जोमात जाणार याची ग्वाही देणारा. खातांना टोचणी देणारा. वय लहान असो का मोठे व्यायामाचे फायदे प्रचंडच. संपूर्ण दिवसाच्या उत्साहाची बेगमी करणारा व्यायाम. शरीराला रोज तरोताजा ठेवणारा व्यायाम. बॉडी टोन करणारा, लवचीकता टिकवणारा. पुढे पुढे, बिपी, कोलस्ट्रॉल, डायबेटिस सारख्या बोलावूनही आलेल्या कायमच्या गोचिडीसारख्या चिकटून बसलेल्या पाहुण्यांना काही अंशी लगाम घालणारा व्यायाम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:ला पाहिल्यावर आपल्या चेहर्‍यावर हसू उमटवणारा, पसंतीची पावती देणारा व्यायाम.


बरेचदा आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने जाणवणारी आता मनावर घेऊन काहीतरी करूयाच ची जाणीव करून देणारी गोष्ट म्हणजे, आपल्याला नवीन कपडे घ्यावेसे वाटतात. म्हणजे असे आतून वाटू लागते. एखादा छानसा ड्रेस कोणाच्या अंगावर पाहिलेला लक्षात राहून गेलेला असतो. तर कधी एखादा रंग मनात घोळत असतो. जेव्हां हे आतून वाटणे उतू जाऊ लागते तेव्हा आपण उत्साहाने बाजारात जातो. तसे येताजाता पारखी नजरेने काही दुकानात लावलेले ड्रेसेस, कापडे आपण हेरून ठेवलेली असतातच. बाजाराच्या दिशेने रिक्षा जाऊ लागली की मन त्या त्या हेरून ठेवलेल्या ड्रेसेसचा अदमास घेऊ लागते. नकळत काल्पनिक फॅशन शो सुरू होतो. एक एक ड्रेस घालून मनाच्या रॅंपवर परेड सुरू होतो. कसा दिसतोय? नको बाई. कोंबल्यासारखे वाटतेय. दुसरा ड्रेस... ह्म्म्म... हा किनई पायात ज्यांची उंची आहे नं त्यांनाच शोभून दिसेल. तिसरा ड्रेस... रंग किती गोंडस आहे नं पण माझ्यावर खुलत नाहीये. आडवे पट्टे नकोच. मन खट्टू. चौथा.... किती मऊ सुखद स्पर्श आहे कापडाचा आणि रंगही खुलतोय. पण हे काय.. त्या पुतळ्यावर किती सुंदर दिसत होता. मला तर नीट श्वासही घेता येत नाहीये. आता पुतळा कुठे आळशी आहे? त्याला खरी भूकही लागत नाही आणि कसलेही टेम्पटेशनही होत नाही. बरे आठवले, सीताफळाचे आइसक्रीम खाऊन बरेच दिवस झालेत. आज... आज... डोळे लगेच लकाकतात. दुसर्‍या क्षणी काहीतरी धडपडल्याचा आवाज येतो. अग बाई! कोण पडले... म्हणून पाहू लागते तर माझेच कुचकट मन ते. पडल्यापडल्याही कुच्छित हसतेय. दुष्ट.


शी बाई. मरू देत ते ड्रेस, छानसा स्कर्ट आणि दोन तीन ट्रेंडी टॉप्स घेऊयात. मग या रॅंपवरून उतरून दुसर्‍या रॅंपवर पुन्हा पहिल्याच उत्साहाने परेड सुरू होते. कॉलेजच्या दिवसातली स्कर्ट घातलेली स्वत:ची छबी डोळ्यासमोर तरळते. कसली तुडतुडी होते मी. त्या नादात स्कर्ट, टॉप्स उलगडू लागतात. या परेडची कथाही काही वेगळी नसतेच. विमानतळावरच्या बॅग्ज कलेक्शनच्या वेळी कसे काही वेळा दोन पट्ट्यावर बॅगा येतात आणि आपली तारांबळ उडवतात तसे वाटू लागते. मग हळूहळू ’ डिनायल ’ ची अवस्था पृष्ठावर येते. मी पण नं उगाच स्वत:ला इतके मोडीत काढतेय. मान्य आहे. वजन जरा वाढलेय. जरा...?? आतले मन माझ्या झापडं ओढून स्वत:लाच गोंजारणार्‍या बाह्य मनाला चापटी मारते. पाहा पाहा त्या शोकेषमधल्या काचेत पाहा निरखून. लावलेले सुंदर सुंदर ड्रेस दिसतात की मनाचे लाड करून झालेली तुंदिलतनू दिसतेय. बरं बरं, कळले हं का. इतकेही काही हिणवायला नकोय. मलाही काही हौस नाही आलीये इतके वजन घेऊन फिरायची. आणि दिसतेय नं तुला जरा कुठे उत्साहात निघालेय छानसा ड्रेस घेईन तर सगळ्या आनंदावर विरजण घालायचे काम तेवढे तू कुचकटपणे कर. व्यायाम टाळण्याच्यात्या क्षणी मात्र तू दडी मारून बस हं. दुष्ट दुष्ट. असू दे. मी कशीही दिसत असू दे. आज ड्रेस घेणारच असे म्हणत त्यातल्या त्यात जोरात मान झटकून समोर दिसेल त्या दुकानात घुसते.


आत  माझ्यासारखी उत्साही मने अखंड चिवचिवत कपड्यांच्या घड्यांवर घड्या उलगडत असतात. आरशासमोर उभे राहून हा ड्रेस कसा दिसतोय, तो कसा दिसतोय.... पाहता पाहता प्रत्येकीच्या शेजारी हा ढीग जमा झालेला असतो. नेमके कोण बापुडवाणे... ??? उत्साही मन, सेल्सगल्स की कपडे... हा प्रश्न मला सतावू लागतो. कपड्यांनी एकामागोमाग नाकारलेले पाहून दुखावलेले मन इरेला पेटलेले असते. बिचार्‍या सेल्सगल्सही आपले गळ्यात मारण्याचे कौशल्य पणाला लावून थकलेल्या असतात. कॉउंटवर नवीन कपडा ठेवायला जागा नसते आणि रॅकवर काहीही उरलेले नसते. हे एकंदरीत भयावह झालेले वातावरण माझी पकड घेण्याच्या आत मी या सगळ्याकडे काणाडोळा करत एका ड्रेसवर बोट ठेवते. क्षणात मला होईल नं हा अंदाज घेऊन तिला पॅक करायला सांगते. थकलेली ’ती ’ अवाक. इतर दुखावलेल्या ललना मी घेतलेल्या ड्रेसकडे पाहून कष्टी. हा मला का दिसला नाही??? पैसे देऊन दुकानातून बाहेर पडताना पुन्हा एकदा मी तितक्याच जोरात मान हालवते.... कशासाठी कोण जाणे. पण हालवते. बाकी काही नाही तरी दोन वेळा मान झटकल्यामुळे थोडासा व्यायाम तरी. तोच एक माझ्याच वयाची सखी माझ्यावर एक नजर टाकून काहीश्या ताठ्यातच ( म्हणजे मला तरी तसेच भासते नं... ) प्रफुल्लित मुद्रेने पुढे सरकते. त्या चवळीच्या शेंगेला पाहून काळजात खोलवर उठलेल्या मोठ्या कळीला दाबत मी स्वत:ला रिक्षात कोंबते.


घरी आल्यावर ड्रेस कपाटात ठेवून चहाचा कप हाती घेत आरशात पाहत मी पुन्हा नव्याने संकल्प करते. दाखवूनच देईन तुला आता. दोन महिन्यात किलो कमी करूनच हा ड्रेस घालेन. आरशातले मन मिश्किल हसत असते. घे रे तू हसून... पाहशीलच. फक्त दोन महिने. पैज आपली. मी जिंकले तर लगेच नवीन ड्रेस आणि तू जिंकलास तर हा ड्रेस कपाटातच. पुन्हा एकदा... तिसर्‍यांदा मान झटकून मी चहाच्या कपाकडे पाहत पुटपुटते... साखर पाव चमचाच घालायला हवी होती नं. मणामणाने साचलंय ते कणाकणाने जिंकायचंय. कपाटातला ड्रेस चडीचूप, आरशातले मन हाताची घडी तोंडावर बोट. कभी मै ड्रेसको देखू तो कभी आईनेको... दोनोंकी आंखोमें साफ दिख रहा हैं...., " नादान, खुदको देख और एक बार फिर खुदसे प्यार कर... तू ही नही तो कोई नही... कोई नही.. !! "


नवीन वर्ष सुरू होऊन पाहता पाहता १५ दिवस उलटलेही. संकल्पाची ऐशीतैशी अजून तरी झालेली नाही. चुकार एकदोन अपवाद वगळता सातत्याच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. हे सातत्यच मला विजयाची ललकारी ऐकवणार आहे नं... तेव्हां ... बस लगे रहो!

टीप : आपले वजन वाढलेय ही कल्पना व्यक्तीसापेक्ष असते.  म्हणजे वजन वाढलेले असतेच परंतु  कोणाला किती वाढलेले भयावह वाटेल आणि कोणाला कितीही वाढले तरी निवांत वाटेल.... तेव्हां... :) :)